marathi blog vishwa

Thursday, 24 September 2020

जादूची पेटी - किस्सा 3 :- छेडछाड अन् मुलीची काळजी

मित्रहो सुप्रभात. एकमेकांशी सुसंवाद असावा, लोकांनी मनमोकळं व्यक्त व्हावं, मानसिक ताणावर मात करावी यासाठी आपण सुरु क्लेला उपक्रम म्हणजे #जादूचीपेटी. तुमच्या समस्यांविषयी आमच्याशी बोला, आम्हाला 9833299791 या नंबरवर काॅल करा किंवा nsudha19@gmail.com या ईमेलवर पत्र लिहा व तुमचं मन मोकळं करा इतकं साधं हे सूत्र. या मनमोकळ्या संवादातून तुम्हालाच तुमचा मार्ग सापडावा ही अपेक्षा.
 तसंच जिथं जरा अधिक गंभीर समस्या आहे तिथं विविध सामाजिक संस्थांची मदत घेत अडचणी सोडवायचे प्रयत्न आपण करतो आहोत. 
या मोफत उपक्रमाला अनेकांचा प्रतिसाद मिळत आहे त्यापैकी हा एक संवाद... 
( अर्थातच नाव बदलून लिहिलेला.)

#जादूचीपेटी #03

"नमस्कार सुधांशुसर,  मी मालती बोलतेय. माझ्या मुलीबाबत मला बोलायचंय. ती दहावीला आहे.

" बोला मालतीताई...जरा तुमच्या कुटुंबाविषयी संक्षिप्त माहिती द्याल का"

"सर, आम्ही शहराजवळच्या उपनगरात राहतो. माझे मिस्टर पुण्यात नोकरी करतात. वीकेंडला घरी येतात. आम्हाला दोन मुलं, आमची मुलगी 10वी ला तर मुलगा 7वीला आहे. दोघांचाही अभ्यास नीट सुरु आहे. मी घरीच असते पण मुलांच्या शाळा, क्लास, अभ्यास यातच वेळ जातो. यंदा कोरोनाचं लाॅकडाऊन झाल्यावर आम्हाला शेजारच्या मुलांकडून जरा त्रास सुरु झालाय..."

" ताई, त्रास होतोय म्हणजे नेमकं काय? 

" सर, आमच्याच परिसरातील काही मुलं आहेत. काॅलेजला जाणारी. ओळखीतलेच आहेत. गेली 5,7 वर्षे इथेच वाढलीयत. ती कायम रस्त्यावरच्या चौकात उभी असायची. त्यांच्यात्यांच्यात असायची... गप्पा, आरडाओरडा, टोमणे वगैरे सुरु होतं. तसा फारसा त्रास पूर्वी नव्हता आम्हाला.. पण लाॅकडाऊनमध्ये घरातलं सामान वगैरे संपलं तर हीच मुलं सगळीकडे मदतीला येऊ लागली. काकी, तुम्हाला काही लागलं तर सांगा आम्ही देऊ असं सांगून दूध, किराणा, भाजी असं काही ते आम्हाला घरी आणून देत होते... त्यातूनच लक्षात आलं की त्यातील 2 मुलं आमच्या मुलीशी थोडं जास्त जवळीक साधताहेत. तिच्याशी बोलायचे चान्स मारतायत.."
" तुमच्या मुलीची प्रतिक्रिया काय होती.. तिलाही त्यातला मुलगा आवडतो का..? ती काय म्हणाली ?"

मालती ताई म्हणाल्या, " सर, लहान आहे हो ती. त्यांच्याशी बोलायची. चॅटिंग ही सुरु झालेलं. मग मी ते थांबवायला लावलं. कुठं काय कळतंय तिला.. तिला मी सांगितलेलं की मुलं वाईट असतात, जपून रहा."

" ताई, हे असं त्रोटक सांगण्याला काही अर्थ नसतो. तुम्हालाही ठाऊक आहे मुली हल्ली लवकर वयात येतात. वयाच्या 10,12 वर्षापासून त्यांना बरंच काही कळत असतं. प्रत्येक गोष्ट नीट समजावून सांगितली तरच मुलं ऐकतात. आज पटकन् एखादी गोष्ट कर म्हटलं तर आमच्याही मुली लगेच ऐकतातच असं नाही. मात्र एखादी गोष्ट पटली तर नक्की ऐकतात. तुमचा आता नेमका प्राॅब्लेम काय आहे?"

" सर, त्यानंतर आता ती दोन मुलं आमच्या लेकीवर पाळत ठेवतात. ती कुठं मैत्रिणीकडे निघाली तर किंवा जवळच क्लास ला जाते तेव्हा तिच्या मागावर असतात. तिला टोमणे मारतात.. त्यातला एकजण सतत लव्हशिप दे, दुस-या कुणा मुलाशी बोललीस तर याद राख वगैरे सांगतो.. दुसरा त्याला सपोर्ट करतो. काही दिवस हे मुलीनं सांगितलं नव्हतं. ती चिडून काही त्यांना बोलली म्हणून ते जास्त चिडलेत. आता लाॅकडाऊन वगैरे नसल्यानं त्यांना घरापर्यंत येता येत नाही मग कुणाच्यातरी अन्य फोनवरुन काॅल ही करतात.

गेल्या आठवड्यातच मी लेकीसोबत भाजी आणायला जाताना त्यांनी गलिच्छ शेरेबाजी केली. मी त्यांना जाब विचारला तर अंगावर आले. म्हणाले, " काकी, जास्त बोलायचं नाही, आम्ही तुम्हाला मदत केलीये.. आम्ही त्रासही देऊ शकतो.. तुमच्या लेकीनं बोलणं थांबवलंय आमच्याशी.. ते चालणार नाही.." 

मी मग त्या मुलांच्या घरी गेले. त्यांना सांगितलं. पण ते घरचे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. वडील घरी नव्हते पण आईनं सांगितलं की, " आमच्या मुलाला समजावतो आम्ही. पण प्रत्येकनं आपापली मुलगी जपायला पाहिजे. रस्त्यावर शंभर मुलं असणारच. किती जणांना तुम्ही समजवणार. तिनंच यांना खाणाखुणा करुन भुलवलं असेल...वगैरे वगैरे.."

त्यानंतर त्या मुलांना जरा अधिक चेव चढल्यासारखं झालंय.. मला खूप भीती वाटतीये हो. मी घरी जायला नको होतं का? आता काय करु हे. मुलीचं दहावीचं वर्षं.. त्यात शाळा बंदच अजून.. शाळा, गाव बदलूनही जाता येत नाही...मुलगी तर मला म्हणाली "त्याला हो म्हणते किमान रोजचा त्रास तरी नाही..." काही सुचेना झालंय हो...

" ताई, तुम्ही घरी गेलात हे बरोबरच आहे. तुम्ही आधी स्वत: हून मुलांना समजावयाचा प्रयत्न केला, आता घरच्यांनाही.. तुम्ही योग्य तेच सामोपचाराने करताय. तुम्ही सर्वात प्रथम 1 गोष्ट करा. मुलीला धीर द्या. तिची मनस्थिती ढासळू देऊ नका. तसेच मैत्रीच्या नात्यानं तिला खरंच तो मुलगा आवडतो का, की नाही आवडत.. तुम्ही मध्यंतरी हस्तक्षेप केला म्हणून ती घाबरुन त्याला नकार देऊ लागली का याचा स्पष्ट खुलासा करुन घ्या. जर मुलीच्या मनाविरुध्द तुम्ही रोखलं असेल तर एखाद्या क्षणी तीच त्याच्यासोबत जाऊ शकते... सध्या मी काही चुकत नाही हे तुम्हाला दाखवण्यापुरतं ती सरळमार्गी असल्याचं दाखवू शकते.. अर्थातच यामुळे प्रश्न मात्र वाढतो. अशावेळी तुम्हाला आधी मुलीचं समुपदेशन करायला हवं. तिचं शिक्षण, करियर, घराची जबाबदारी हे समजावून सांगायला हवं.

जर तिच्या मनात त्या मुलाविषयी आकर्षण वगैरे काही नसेल तर मात्र तिच्या संरक्षणासाठी तुम्ही कठोर होणं गरजेचं आहे. 

तुम्ही पुन्हा एकदा पतीसह किंवा तुमच्या घरातील/ परिचयातील अन्य ज्येष्ठ व्यक्तीसह  त्या मुलाच्या पालकांना भेटावं. त्यांनी आपल्या मुलाला कठोर समज द्यावी यासाठी स्पष्ट सुनावावं.

जर त्यातून मार्ग निघत नाही असं वाटलं तर त्वरीत पोलिसात तक्रार द्यायला हवी. कोणालाही अजिबात घाबरु नका. त्याचबरोबर महिला दक्षता समिती, विविध पोलिस स्टेशन्सच्या हद्दीतील महिला कार्यकर्त्यांची ' भरारी पथक' व्यवस्था यांच्याशी संपर्क साधायला हवा. हे सांगून त्यांना माझ्या परिचयातील काही कार्यकर्त्यांचे फोन नंबर्स दिले.
" ठीकेय सर.. मी प्रयत्न करते.. मुलीला जपण्यासाठी काहीही करेन मी. पण वाईट वाटतं हो, या फेजमध्ये अभ्यासाऐवजी तिला या ताणाचा सामना करावा लागतोय..."

##

मंडळी, मालती ताईंनी महिला दक्षता समितीशी संपर्क साधलाय व पोलिसातही साधी तक्रार नोंदवली आहे. त्या मुलांना सध्या पोलिसांमार्फत समज देण्यात आली आहे. 

समाजात हे आजच नव्हे तर अनेक वर्षं सुरु आहे. वयात येणा-या शाळकरी मुलींपासून ते वयाच्या पन्नाशीत पोचलेल्या महिलेपर्यंत अनेकींना विविध प्रसंगी पुरुषांकडून अर्वाच्य शेरेबाजी, मुद्दामून केलेलं लगट, घाणेरडे स्पर्श, छेडछाड यांचा सामना करावा लागतो हे समाज म्हणून आपल्यासाठी घृणास्पद , निंदनीय आहे. 
स्त्री पुरुष नातं, त्यांना एकमेकांविषयी प्रेम- आकर्षण वाटणं हे नैसर्गिक असलं तरी प्रत्येक स्त्री आपल्यासाठी उपलब्ध असावी हे चूक आहे. यातून अनेकदा मुलींना जबरदस्तीला सामोरे जावे लागते, प्रसंगी प्रेमाच्या आणाभाकांना भुलून लहान वयात मुली प्रेमविवाह करु पहातात किंवा कधी ताण असह्य झाला तर  जीव देतात. तुमच्या आसपास जर कुठे मुलींवर जबरदस्ती होत असेल, मुलींची छेडछाड होत असेल तर अवश्य जवळच्या पोलिस स्टेशनला कळवा, महिला कार्यकर्त्यांना कळवा. प्रत्य्क मुलीला निर्भयतेनं जगता यावं यासाठी समाज म्हणून पाठीशी उभं राहूया.

अशाच विविध समस्या जर कुणाला भेडसावत असतील तर अवश्य संपर्क साधा आमच्याशी 9833299791 या नंबरवर किंवा पत्र लिहू शकता nsudha19@gmail.com  या ईमेल आयडीवर. तुमची सिक्रेटस् नक्की जपली जातील अन् या तुमची अडचण मांडायच्या संवादासाठी कोणतीही फी नाही याची नोंद घ्यावी. 
- सुधांशु नाईक, कोल्हापूर (९८३३२९९७९१)🌿

No comments:

Post a Comment