या वर्षभरातील अचानक आलेल्या संकटांच्या मालिकेनं समाजमनात प्रचंड अस्वस्थता, नैराश्य पसरलंय. अनेक क्षेत्रातील उद्योग बंद पडलेत. माणसं मुकी मुकी झालीयत. सगळ्यांनाच काही ना समस्या. कुणी कुणाशी काय बोलायचं असं झालंय अनेकांना. पण मंडळी बोलायला हवं एकमेकांशी. धीर द्यायला हवा.
भले आपण पैसे, वस्तूरुपानं मदत करु शकणार नाही पण " मी तुमच्यासोबत आहे, या संकटांतून एकत्र तरुन जाऊया" हा विश्वास देणं गरजेचं. त्यासाठीच सुरु केलाय आपण #जादूचीपेटी हा उपक्रम. लोकांना मानसिक धीर, प्रेम देण्यासाठी. ज्यांना कुणापाशी मन मोकळं करता येत नाहीये त्यांनी अवश्य आम्हाला काॅल करा 9833299791 या नंबरवर किंवा पत्र लिहू शकता nsudha19@gmail.com या मेल आयडीवर....
या कोरोना काळात अनेकांचे उद्योगधंदे विस्कळीत झालेत,अनेकांचं काम गेलंय, काहीजण आधीच अडचणीत होते त्यात हे परत मोठं संकट. यावर मात करायची तर अंगी असलेली स्किल्स वापरुन काही काम करायला हवं असं अनेक मार्गदर्शक मंडळी सांगतील. पण प्रत्यक्ष स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रात किती भयावह परिस्थिती आहे याबाबतचा माझ्याच एका मित्राशी झालेला हा संवाद. स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रात आम्ही कार्यरत होतो पण या 2 वर्षात या क्षेत्रात भयंकर प्रश्न आहेत. हा संवाद परिस्थितीचं गांभीर्य, भयानक रुप अधोरेखित करणारा...
#जादूचीपेटी # 05
" गुडमाॅर्निंग सुधांशु. प्रवीण बोलतोय. कसे आहात..पूर्ण बरे झालात ना?"
गुडमाॅर्निंग प्रवीण. आहे बघा आता ठीक. लढलो कोरोनाशी... काय म्हणतंय ट्रेनिंग सेंटर...?"
" बंदच की सगळं. ना सरकारी बॅचेस ना खाजगी बॅचेस. मोठा गाजावाजा करुन योजना सुरु केल्या. लाखो रुपये खर्चून सेंटर्स बनवायला लागली. विद्यार्थ्यांकडून फी न घेता सरकारी अनुदानावर शिकवायचं. इतकं काम देऊ, हा प्लान तो प्लान.. सगळं झालं सांगून. प्रत्यक्षात हाती धुपाटणंच. खर्च तेवढे प्रचंड. ना सरकारी काम करता येतंय ना खाजगी. थकलेली भाडी, लोकांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. तुम्हाला माहितीये काही जणांनी राज्यात आत्महत्याही केल्याहेत. भयंकर झालंय सगळं. काय करू काय सुचत नाहीये..
" प्रवीण, हे कोरोनाचं जाऊद्या. पण तसंही गेली 2 वर्षं केंद्र व राज्य सरकारी पातळीवर स्किल डेव्हलपमेंट क्षेत्राकडे पूर्ण कानाडोळाच केला गेला हे सत्य. या क्षेत्रात काम करणारे आपण बरेचजण सरकारी योजनेतून भरपूर काम मिळेल या विचारांनं निर्धास्त होऊन शासनाच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलो हे चुकलंच. एकतर मुलांना फुकट शिकवणे हा निर्णय घ्यायलाच नको होता. त्यामुळे काय झालं की मुलं फुकट मिळतंय म्हणूनच कोर्सला येऊ लागली. पैसे देऊन त्याच कोर्सची जी ट्रेनिंग आपण पूर्वीपासून प्रामाणिकपणे सगळे करत होतो ती बंद पडली मग. सरकारच्या अनुदानाचे निकष पहाता या योजनेत " मुलांनी ट्रेनिंग नंतर नोकरी काही मुदतीत पूर्णवेळ केली तर अमुक एक रक्कम ( 30, 40 टक्के वगैरे) मिळेल" या निकषाचा मोठा फटका स्किल्स सेंटर्सना बसला कारण एकतर बरीच मुलं नोकरी करायला तयार नव्हती, सर्टिफिकेट घेऊन पुन्हा निवांत हिंडत बसायची, त्यात काहीजण नोकरीवर गेलेच तर पूर्ण कायम होत नव्हते व अनेकांना नोकरीच मिळत नव्हती.
ट्रेनिंग सेंटर्सचं बजेट कोलमडायला मग सुरुवात झाली. त्यातच सरकारच्या प्रायरिटीज या 3 वर्षात बदलल्या. सुरुवातीला कौशल्य योजनांना भरपूर निधी मिळाला पण यात प्रचंड कपात होत गेली. सर्व निधी अन्य क्षेत्राकडे वळवला गेला. किरकोळ निधी या क्षेत्राकडे. ज्या ट्रेनिंग सेंटर्सना दरमहा 300, 400 मुलांचं ट्रेनिंग द्यायचं होतं तिथं कसंबसं 30,50 मुलांपर्यंतची मंजुरी मिळू लागली. खर्च तितकेच राहिले व कमाई शून्य होऊ लागली.
या क्षेत्रात मग काही संघटना उभ्या राहिल्या. मुंबई/ दिल्लीपर्यंत निवेदनं, आंदोलनं हेही झालं पण हाती अजूनही ब-यापैकी शून्यच आहे.
" बरोबर सुधांशु. पण आता काय करायचं ? हेच सुचेना."
" तुमच्या कदाचित लक्षात असेल की एकदा ब-याच संस्थांची मिटिंग झालेली. त्यात एक मुद्दा मांडलेला की सरकारी मदतीवर जराही विसंबून न रहाता काही करता आलं तर करायला हवं. या क्षेत्रात किंवा अन्य आवडीच्या क्षेत्रात. नुसतंच जागेचं भाडं, काॅम्प्युटर्स आदि उपकरणांचे खर्च वाढवत बसण्यापेक्षा कुठं थांबायचं हे ठरवायला हवं. सरकार अधूनमधून एकदम नवी योजना, नवे निकष असं काहीतरी पुढे करतं अन् जरा चलनवलन सुरु झालं की परत आडवा दांडा. पैसे मिळत नाहीतच पण खर्च वाढत रहातोय.. बहुदा कुणाला तेव्हा ते पटलं नव्हतं...."
तसंच प्रवीण आता कोरोनाचं संकट. जगभरची अस्थिरता यामुळे ट्रेनिंग अॅन्ड डेव्हलपमेंट या क्षेत्रात प्रचंड बदल होणार. मुळात नोक-याच नाहीत. घराघरात पैसे कमी होतायत. त्यामुळे पैसे देऊन स्किल्स शिकायला कमीच लोक येणार. बरचसं आॅनलाईन व फ्री असं सुरु झालंय. ज्याच्याकडे खरंच काही भन्नाट कोर्स असेल त्याच्याकडेच पैसे देऊन मुलं शिकायला येतील. पण त्याचीही गॅरंटी सध्या देता येत नाही. सरकारही सर्वाधिक गरजेच्या अशा शेती, आरोग्य, रस्ते/ पाणी/ वीज आदि क्षेत्रातच जास्त निधी वळवणार या सगळ्याचा विचार करता " स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रातील संस्थांनी" कुठं थांबायचं याचा निश्चित आराखडा ठरवायला हवा. झालं नुकसान तेवढं पुरे अजून परत स्वत: च्या लायबिलिटीज वाढवू नयेत. भाड्यानं जागा घेतल्या असल्यास त्या परत देऊन टाकाव्यात किंवा सरकारी योजनेची आशा सोडून लहान जागेत शिफ्ट व्हावं. लहानप्रमाणात खाजगी कोर्स, 10वी, 12 वी किंवा इंजिनियरिंग/ अकौंटन्सी/ JEE वगैरेचे क्लासेस यात लक्ष द्यावं. पुढील दीडदोन वर्षं अधिक आव्हानात्मक असणार आहेत. कमीत कमी खर्च करुन आपण दोन वेळचं जेवून जगू कसं शकू यावर लक्ष द्यायला हवं.
इतकंच नव्हे तर प्रसंगी किराणा, भाजी किंवा अन्य दुकान चालवणे, आॅनलाईन ट्रेडिंग, काही मेडिकल प्राॅडक्टस् चं मार्केटिंग सेल्स, मेडिकल क्षेत्रासाठी आॅनलाईन किंवा खाजगी ट्रेनिंग्ज असं काही वेगळं करायला हवं तरच जिवंत रहाता येईल.
" बरोबर आहे. हे सगळं कळतंय पण अजूनही जीव तुटतोय. 20,22 लाख घालून जे सेंटर उभं केलं ते बंद करायचं याचं दु:ख फार आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आगामी खर्च शून्य करायचे असतील तर याला पर्याय नाहीच. करायला लागणार.. कारण आता सरकार आपल्याला या क्षेत्रात मदत करेल या आशेवर रहाण्यात काहीच अर्थ उरला नाही हेच सत्य.."
मंडळी, आम्ही स्वत: ज्या क्षेत्रात कार्यरत त्याच क्षेत्रातील ही भयावह परिस्थिती. म्हटलं तर कुणाचीच चूक नाही..म्हटलं तर सगळीच गणितं चुकलीयत. राज्यभर हजारो स्किल ट्रेनिंग सेंटर्स अशी बंद पडलीयत. तिथल्या कित्येक कर्मचा-यांची नोकरी गेलीच. मालकालाच जिथे पैसे मिळत नाहीत तिथे त्यांना कुठून पगार.. ?
Change is inevitable...थोडक्यात बदल हा अपरिहार्य असतो हे जगप्रसिध्द वाक्य. कधी स्वत: हून बदल करावा लागतो तर कधी परिस्थिती आपल्याला वाकवून, मोडून बदलायला भाग पाडते. जे बदललतात ते टिकायची शक्यता जास्त असते. आपण सर्वांना या संकटकाळात टिकायचंय. म्हणून जे काही झालं ते मागे सोडून नवं काही करायला हवंय. खर्च त्वरीत कमी करुन किमान तुटपुंजं काही कसं कमवता येईल याचे अन्य पर्याय शोधायला हवेत असं मला वाटतं.
याक्षणी या समस्येवर तसं ठोस उत्तर इतकंच असू शकतं असं मला वाटतं.
परिस्थितीनं हताश होऊन जीव मात्र कुणी गमवू नका, एकमेकांशी बोलूया, एकमेकांना धीर देऊया... जगायला बळ देऊया.
ज्यांना आमच्यापाशी मनमोकळा संवाद साधायचाय ते कधीही 9833299791 या नंबरवर काॅल करु शकतात. काॅलिंगची सेवा मोफतच आहे. ज्यांना काही जास्त समुपदेशन, मानसोपचार यांची गरज असेल त्यांना त्या पध्दतीची ट्रीटमेंट योग्य व्यक्ती किंवा संस्थांमधून देण्याची आपण नक्की व्यवस्था करु.
मन मोकळं बोलूया. तणावातून बाहेर पडूया.
- सुधांशु नाईक, कोल्हापूर( 9833299791)🌿
No comments:
Post a Comment