डॉक्टर म्हटलं की पहिल्यांदा आठवतात ते लहानपणी चिपळूणला आमच्या घरी येणारे बेल्लारीकर डॉक्टर. ते मूळचे मांजरी - चिकोडी या परिसरातले. आमचंही आजोबांचं मूळ गाव ते त्यामुळं बाबांचं आणि त्यांचं जरा जास्त सख्य झालं असावं.
त्यांची तेव्हा " यझदी " मोटरसायकल होती. जावा, यझदी यांचं फायरिंग दुरून ही ऐकू येत असे. तीच त्यांची ठळक ओळख.
पागेवर त्यांच्या दवाखान्यात आम्ही सगळे जात असू. चितळ्यांच्या घरात राहताना, त्यांच्या चार ही मुली म्हणजे ज्योतीताई, स्वातीताई, सुजाताताई आणि गीताताई यापैकी कुणीतरी आम्हाला घेऊन जाई. त्यातही गंमत अशी असायची की स्वातीताई आणि मी बरेचदा एकदम आजारी पडायचो. हवा बदलली की लगेच ताप, सर्दी व्हायचीच आम्हाला. मग दोघेच कित्येकदा डॉक्टरकडे जायचो.
बेल्लारीकर डॉ. मग आम्हाला चेक करून एक इंजेक्शन द्यायचे आणि वर सल्फाच्या वगैरे गोळ्या. पांढरी गोळी दिवसातून 2 वेळा, लाल गोळी एकदा असं काही सांगून पुडीतून देत. हिशोब वहीत लिहून ठेवायचे. मग महिन्यातून कधीतरी बाबा ते चुकते करायचे.
बेल्लारीकर अत्यंत ऋजु स्वभावाचे. त्यामुळं सगळ्यांशी त्यांचं छान जमायचं. कुणाचं आजारपण सिरीयस वाटलं तरी लगेच दुसरीकडे ताबडतोब न्यायला सांगायचे.
बाबांना अंगावर अचानक उठणारे पित्त, आईच आजारपण असं काही असलं की ते घरीच येत. मग घरी स्टोव्हवर पाण्याचं आधण ठेवायचं. पाणी उकळलं की त्या पातेल्यात इंजेक्शनची ती स्टीलची सिरिंज, सुया बुडवायचे. मग चिमट्याने ते बाहेर काढायचं. मग औषध त्या सिरिंजमध्यें घेणं हे सगळं आम्ही अगदी निरखून बघत बसायचो.
आता ते आपल्यात नाहीत पण फॅमिली डॉक्टर कसे हवेत असं कुणी विचारलं की नेहमी डोळ्यासमोर त्यांची मूर्ती येते.
आईच्या आजारपणात तेंव्हा लहानपणी कधी आम्ही होमिओपॅथी डॉक्टर कडेदेखील जाऊन आलेलो. आईला सोबत म्हणून शाळेची वेळ पाहून, मी किंवा धाकटा भाऊ तिच्यासोबत जात असू.
पुढं चिपळूणजवळच्या निवळी या गावातील वृद्ध आगवेकर वैद्य यांचा परिचय झाला आणि त्यांची आयुर्वेदिक औषधं घरी येऊ लागली. तेही स्वतः अनेकदा घरी येत. आम्ही कुणी किंवा इतर शेजारी पाजारी यांना औषधं देत. आयुर्वेद रसशाळा, अर्कशाळा, धुतपापेश्वर आदि आयुर्वेदिक कम्पन्यांची नावं त्यामुळं माहितीची झाली. चिपळूणला असलेलं श्रीराम औषधी भांडार हे तर घराजवळ होतच.
रत्नागिरी जिल्ह्यातील दाताचे पाहिले डॉक्टर सुरेश जोशी हे तर माझा बालमित्र निहारचे वडीलच. त्यामुळे त्यांच्या घरी मुक्त प्रवेश असायचा. तर दुसरे नावाजलेले भडभडे डॉक्टर. त्यांचा मुलगा हर्षद हा लहान भाऊ सुशांतच्या वर्गात. त्यामुळं त्यांच्याकडे ही घरच्यासारखा वावर असे.
डॉक्टर ही जमात पेशन्टला लुटते असं आम्हाला कधीही वाटलं नाही त्याचं कारण ही सर्व आसपास पाहिलेली मंडळी. प्रसंगी स्वतःकडील फुकट औषधं देणारी. गोर गरिबाकडे पैसे नसले तर खात्यावर मांडून ठेवणारी, "सावकास दे नंतर" असं सांगून आधी उपचार करणारी. गरीब मंडळी पण प्रामाणिकपणे 3,4 महिन्यांनी आवर्जून ते पैसे परत देत.
पुढं कामासाठी, नोकरीसाठी कोल्हापूर, कल्याण, सांगली, आखाती देश असं कुठं कुठं हिंडलो तिथंही डॉक्टर्सचे चांगलेच अनुभव मिळाले.
कोल्हापूर मधील ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ पत्की. अनेकांना जणू ते देवासारखे भासतात. पत्नीसाठी आणि नंतर जुळ्या मुली असल्याने तिच्या गरोदरपणातील अनेक अडचणी त्यांनी अत्यंत धीर देऊन सहज सोडवल्या. वर दूरच्या नात्याची आठवण करून देत पैसे घ्यायला नकार. शेवटी आमच्या हट्टखातर पैसे घेतले तेही डिस्काउंट करून.
कोल्हापूरमधील ज्येष्ठ होमिओपॅथ डॉ गुणे यांच्यामुळं तर आमच्या लहान मुलींचे विविध प्रश्न मार्गी लागले. आज त्या मोठया झाल्याहेत. पण साधं सर्दी खोकला झाला तरी त्यांना गुणे काकांचं औषधच हवं असतं.
सासरे आणि आईचे कॅन्सरचं दुखणं सुरु असताना डॉ. कुणाल चव्हाण, डॉ. गणपुले, डॉ. पुजारी, डॉ. औरंगाबादकर, डॉ. नवरे, डॉ. दामोदरे आदिनी जी मदत केलीये त्याचं ऋणच आहे आमच्यावर. आमच्या स्नेही आणि हेल्पर्स ऑफ दि हॅंडीकॅप्ड संस्थेच्या रजनीताई, अनघा पुरोहित यांच्या आजारपणात आधार हॉस्पिटलच्या डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. केणी आदिनी अवघड परिस्थिती असताना अथक प्रयत्न केले ते कसं विसरता येईल?
साहित्य - संगीतादि विविध कलांच्या समान आवडीमुळे मित्र बनलेले भूलतज्ञ डॉ. भिंगार्डे, डॉ. भाई देशपांडे, डॉ. रसिका देशपांडे, डॉ. भिर्डी, डॉ. अनघा व अद्वैत आफळे हे दंतवैद्यक दांपत्य हे तर अगदी घरचेच झालेत.
यांच्याशिवायही आजवर जे जे डॉक्टर भेटले त्यात कधीच कुणी असं भेटलं नाही की त्यांच्यामुळे वाटावं हे आपल्याला लुटतायत.
समाजात डॉक्टरवर हल्ले, त्यांच्याकडून रुग्णांची पिळवणूक आदि बातम्या ऐकल्या की मन खिन्न होतं. काही बेईमान डॉक्टर्स आहेतही समाजात, मात्र त्यासाठी समस्त डॉक्टर्स मंडळींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नव्हेच.
एखाद्या रुग्णाला बरं वाटण्यासाठी डॉक्टरचं योग्य निदान जितकं आवश्यक तितकंच रुग्णाने,सर्व त्रास नीट सांगणं, काही न लपवणं, त्याला दिलेला सल्ला फॉलो करणं देखील अत्यावश्यक.
डॉक्टर हा पेशा सेवेचाच. त्यामुळं ही माणसं दिवसाचे 24 तास अगदी on toes असतात. प्रसंगी जेवण, झोप विसरून एखाद्याचा जीव वाचवायला धावून जातात. अनेकदा आपण त्यांना साधं थँक्स म्हणायचं देखील विसरून जातो मात्र जेंव्हा त्यांना कधी अपयश येते तेंव्हा त्यांनाही वेदना होतातच हेही विसरून जातो. अशा डॉक्टरला समजून घेण्यात लोक कमी पडतात. त्यांच्या दवाखान्याची तोडफोड करून त्यांना अधिक दुःख देतात.
कित्येक डॉक्टर स्वतःच्या ऍडमिशन पासून दवाखाना उघडेपर्यंत लाखो रुपये खर्च करतात. प्रसंगी कर्ज काढतात. त्यांना त्याकडे व्यवसाय म्हणून पाहावं लागणार हे नक्कीच. मात्र लोक सहजपणे कॉमेंट करतात की " हे काय पैशाच्या मागे लागलेत.यांना धडा शिकवायला हवा.. "हे चुकीचं आहे. असं घडायला नको.
काही अपवाद वगळता बहुतांश डॉक्टर हे या पेशाकडे अधिकाधिक सेवा म्हणून पाहतात असं वाटतं. जे काही तात्कालिक फायदा पाहतात त्यांनाही आपली वर्तणूक सुधारायची सद्बुद्धी मिळू दे.
आज नवनवीन तंत्रज्ञान आलंय, औषधं देखील महाग झालीयेत अशावेळी सगळंच सांभाळणे ही तारेवरची कसरत असते रुग्णासाठी आणि डॉक्टर्स साठी देखील.
त्यामुळं सर्वांनीच एकमेकांना समजून घेणं आवश्यक बनले आहे.
गेल्या 2 वर्षात आपण पाहिलंय की एखादा आजार किती हाहाकार माजवू शकतो ते. त्यामुळं आपल्यासोबत चांगला डॉक्टर असणं हे फार आवश्यक झालंय. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना प्रत्यक्षात जास्तीत जास्त प्रमाणात असायलाच हवीय.
निरोगी समाज असणं हे सर्वांच्या भल्यासाठीच. मात्र ती केवळ डॉक्टरची जबाबदारी असू शकत नाही. आपण आपलीही जीवनशैली बदलायला हवीय. आपण निरोप घेताना एरवी म्हणतो तसं, " पुन्हा भेटूया " असं डॉक्टर्सना म्हणावं लागू नये असं सर्वाना खरंतर वाटतंच. मात्र उत्तम डॉक्टर आपला फॅमिली फ्रेंड व्हावा आणि त्याला भेटताना आनंदच व्हायला हवा. आगामी वर्षात हे नातं अजून छान होऊ दे, दृढ होऊ दे आणि मानवाला कमीत कमी आजारांचा सामना करावा लागू दे हीच प्रार्थना!
- सुधांशु नाईक, सध्या कोल्हापूर. 9833299791🌿

(विनंती - ब्लॉगवर जर anonymous म्हणून कॉमेंट करत असाल तर, कृपया कमेंट च्या खाली आपलं नाव अवश्य लिहा, म्हणजे कुणी कमेंट केलीये हे कळेल आणि त्याला योग्य प्रतिसाद देता येईल. माझा नंबर दिला आहेच. तुमच्या कॉल आणि मेसेजेसला नक्कीच उत्तरं देईन.)
खूप सुंदर आणि यथार्थ वर्णन.
ReplyDelete40/50 वर्षा पूर्वीचा , विशेषतः ग्रामीण आणि अर्धशहरी भागातील फॅमिली डॉक्टरांचा समाजातील वावर ,सेवावृत्ती, या बाबत चा बहुतेकांचा अनुभव हा असाच असणार.
अगदी मध्यरात्री,पावसापाण्यात पेशंटच्या घरी जाऊन उपचार करणे, स्वतः कडील औषध/इंजेक्शन वापरन, तेही बऱ्याच वेळा उधारी चे व्यवहार करून.
त्यामुळे त्याकाळात त्यांना देवा इतका मान होता.
बहुदा हे डॉक्टर R M P, GFAM, आयुर्वेदिक आणि काही वेळा तर चक्क कोणतीही डिग्री नसलेली असत. पण हातगूण म्हणाल तर एक नंबर.
श्रद्धेपोटी बरेच ग्रामस्थ या डॉक्टरना, शेतातील भाजीपाला, फळे,गूळ शेंगा,दुध ,त्यांच्या घरकामात मदत करत असत.
....काळ बदलला, आम्हा सर्वांना शहाणपण आलं आणि येथेच बिघडलं. असो हेही कालचक्र फिरेल आणि *तो* काळ नव्या स्वरूपात येईल .
रमेश मोहिते