marathi blog vishwa

Friday 10 February 2023

मन मनास उमगत नाही...

मन मनास उमगत नाही...
-सुधांशु नाईक.
" सहज सुचलेलं... " या लेखमालेतील हा पाचवा लेख.

मन सगळ्यांनाच असतं, पण असतं कुठं नेमकं? हे काही सांगता येत नाही. मनाची अशी ठोस व्याख्याच नाही. तांत्रिकदृष्टया सांगायचं तर मन म्हणजे जणू एक केमिकल लोचा आपल्या मेंदूतील आणि शरीरात अन्यत्र असणाऱ्या ग्रंथीनी घडवलेला. हा लोचा आपल्याला सुखावतो, दुखावतो, विद्ध करतो, कधी देव बनवतो तर कधी दानव... कधी जगायला उर्मी देतो आणि कधी सगळं संपवून टाकायची आत्यंत्यिक कृती देखील करायला लावतो.

शरीराच्या रोमारोमात भरून राहणारी, बदलत राहणारी संवेदना म्हणजे मन असं आपण समजूया आणि करूया जरा चिंतन या मनाच्या अथांग दुनियेविषयी.

महेश आणि राजेश ही जुळी मुलं शाळेत एकत्र होती. हुशार आणि एकाच घरात एकाच प्रकारे वाढलेली. दोघांवरही तेच मराठी मध्यमवर्गीय  संस्कार. दोघंही एकाच ग्राउंड वर त्याच मुलांच्या संगतीत खेळणारी.
तरीही दोघांच्या वर्तनात मात्र कमालीचा फरक. महेश शान्त, मवाळ, सहसा कुणाला त्रास न देणारा. आपण बरं आपला अभ्यास बरा असं वागणारा. दप्तर, डबा, वॉटरबॅग नीट सांभाळून नेणारा.
त्याच्या बरोबर उलटं राजेश वागायचा. हुशार असूनही होमवर्क कित्येकदा अर्धवट ठेवणारा. बघावं तेंव्हा महेश ला आणि इतरांना त्रास देणारा. सतत दुसऱ्याशी भांडणं, खोड्या काढणे असे उद्योग सुरु. शर्टाची बटणं तुटलेली, चप्पलचा बंद तुटलेला, वस्तू हरवत असणारा. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या संगोपनात कधी भेदभाव केला नाही. तरी हे असं का? दोघेही हुषार. वर्गात सुरुवातीला पहिला दुसरा नंबर ठरलेला. पण मग हळूहळू आपल्या अवगुणामुळे राजेश सर्वांचा नावडता होत गेला. शेवटी त्यांना मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा लागला.
काय कारण असेल यांच्या मानसिकतेतील फरकाचे? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. हीच नव्हे तर अशी असंख्य गुंतागुंतीची उदाहरणं आपण आसपास पाहत असतो.

एखादा माणूस खूप श्रीमंत असतो तरी मनानं सतत असमाधानी.  तर एखादा साधा गरीब माणूस, आहे त्यात सुखी आनंदी असतो.  कधी खूप प्रतिष्ठा असलेला, खूप उच्च पदावर कार्यरत असलेला डॉ. कलाम यांच्यासारखा माणूस अत्यंत साधेपणाने वागतो, कमीत कमी खर्च स्वतःवर करतो. आणि आपल्या संपत्तीतील वाटा दानही करतो. तर त्याचवेळी एखाद्या सामान्य घरातील माणूस आपला महिन्याचा पगार बारमध्ये एका रात्रीत उधळून देतो. एखाद्या घरात एकवेळच्या जेवणाची भ्रान्त असते तर त्याचवेळी शेजारच्या एखाद्या हॉटेलमध्यें काही लोक प्रचंड प्रमाणात अन्न टाकून मस्तवालपणे निघून जात असतात.
लहानपणापासून उत्तम संस्कार लाभलेली मुलं देखील वाढत्या वयात कधी नशेबाज होतात, गुन्हेगार बनतात तर एखाद्या नाल्याकाठी किंवा खेडेगावात जन्मलेली व्यक्ती उत्तम अधिकारी बनते. हे सगळं असं का घडतं?
सगळ्यासाठी अनेक कारणे देता येतील. मात्र मनोव्यापाराचं विश्व इतकं गुंतागुंतीचे का असा प्रश्न आपल्याला पडतो का? का घडतं असं? जगात करोडो माणसं. प्रत्येकाच्या मनात इतकी गुंतागुंत का असते? मनाला कसं ताब्यात ठेवायचं? मनाला योग्य ते वळण लावून सकारात्मक कृतीकडे कसं वळवायचं? वाईट मार्गी अडकलेलं मन पुन्हा त्यातून बाहेर कसं काढायचं? असे कितीतरी प्रश्न... मन मनास उमगत नाही... असं गाण्यात जे म्हटलं आहे अगदी तशीच प्रचिती येते.

मनाच्या अशा विचाराचा, आपल्या प्राचीन भारतीय परंपरेने खूप मोठया प्रमाणात अभ्यास केला आहे. मनाची एकाग्रता, मनाची ताकद यावर योगशास्त्र, आयुर्वेद, धर्मशास्त्र, राज्यशास्त्र, आपले चारी वेद, उपनिषदे, भगवतगीता इत्यादी इत्यादी ठिकाणी त्या त्या अनुषंगाने लोकांच्या मानसिकतेचा इतका विचार केला गेलाय त्याचं कौतुक वाटतं.

अगदी 400 वर्षांपूवी समर्थ रामदासानी मनाचे श्लोक रचले. गावोगावी विविध जातीजमातीतील लोकांना सांगितलेलं. त्यांनी ते पाठ केले. त्यातही मनाला कसं ताब्यात ठेवावं हेच तर ते सांगतात.
" अचपळ मन माझे नावरे आवरीता, तुजवीण शीण होतो धाव रे धाव आता... " असं आर्तपणे प्रभू रामाला साद घालणाऱ्या समर्थांनी मनाच्या श्लोकात इतक्या साध्या भाषेत लोकांना उपदेश केलाय की अगदी अशिक्षित, भोळ्या माणसाला देखील ते सहज उमगावेत.
जगावं कसं, वागावं कसं हे किती छानपणे ते कळकळीने सांगतात पहा ना,

नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगींकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे
मना बोलणे नीच सोशीत जावें॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांस रे नीववावें॥७॥

देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी।
मना सज्जना हेच क्रीया धरावी॥
मना चंदनाचेपरी त्वाां झिजावे।
परी अंतरीं सज्जना नीववावे॥८॥

यावर आपण अजून काय बोलायचं?

आपल्या मनाला उत्तम तेच सतत देत राहावं. मनाचं मालिन्य जाऊ दे, मनाला चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवावे, सर्व सुखंदुःख स्थिरबुद्धीने पाहावीत, विकारवश न होता आपलं कर्तृत्व सिद्ध करावं, ज्ञानी बनावं यासाठी अनेक ठिकाणी मार्गदर्शक गोष्टी सांगितल्या आहेत.

एका ठिकाणी असं म्हटलंय की,
यस्य कृत्यं न विघ्नन्ति शीतमुष्णं भयं रतिः । 
समृद्धिरसमृद्धिर्वा स वै पण्डित उच्यते ॥
याचा अर्थ असा की, उन्हाळा - हिवाळा, गरिबी - श्रीमंती, प्रेम - तिरस्कार आदि कोणत्याही गोष्टीने विचलित होत नाही आणि स्थिर राहतो तोच ज्ञानी पुरुष असतो.
अगदी असंच काहीसं भगवदगीतेमध्यें 12 व्या अध्यायात सांगितलं आहे,
समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः ।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥18॥
तुल्यनिन्दास्तुतिमौनी सन्तुष्टो येन केनचित् ।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥19॥

माणसाने मनाला कसं घडवावं, कसं ताब्यात ठेवावं हे सगळंगेली हजारो वर्षे सांगितलंय आपल्याला अनेक ग्रंथामधून . तरीही आपण त्याकडे खरंच लक्ष देतोय का हे आपण स्वतःलाच विचारायला हवे. माणसाची मती स्थिर झाली की तो कुटुंबाची, समाजाची, देशाची उन्नती करू शकतो. सर्व माणसं अशी व्हावीत, तेजस्वी व्हावीत परस्पर सहकार्य करत राहावीत अशी त्या ऋषींची ती भावना.

जे खळांची व्यंकटी सांडो | तयां सत्कर्मीं रती वाढो ||
भूतां परस्परें जडो | मैत्र जीवांचें ||'

अशी मानसिकता बाळगणारे ज्ञानदेव ही त्यातलेच. मात्र तरीही लोकांच्या मनात विविध विकार बलवान होत राहतात. आणि मनाच्या तीव्र आंदोलनात माणसं गरगरत राहतात.

2012 मध्यें माझ्याच एका कवितेत मीं म्हटलं आहे तें सांगायचा मोह इथं आवरत नाहीये,

मन गंभीर, मन उदास
मन एकाकी ... गहिवरलेले..

मन हसरे , मन नाचरे
मन गहिरे ... आसुसलेले..

मन कठीण, मन वाईट
मन ओंगळ ... बरबटलेले..

मन चंचल, मन अस्थिर
मन वासरू ... भरकटलेले..

मन तृप्त, मन शांत
मन आत्मरंगी ..रंगलेले..

अशा मनाला बहिणाबाई देखील " मन वढाय वढाय, जसं उभ्या पिकातलं ढोर ' असं म्हणून जातात. या ढोराला नीट वागावं कसं हे शिकवणं आपल्याच हाती आहे.

मुलांचं संगोपन, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या यासोबतच स्त्री पुरुष संबंध याबाबत देखील मनाच्या गुंतागुंतीचे शेकडो प्रकार आपल्या समोर येतात. मनाच्या विविध समस्या, त्यावरच निराकरण योग्य वेळी झालं नाही तर समस्या अतिशय गंभीर होऊ शकते. म्हणून मनाकडे कधीच दुर्लक्ष करू नये. समुपदेशन, मानसोपचार याबाबत किती परिणामकारक ठरतात आदि गोष्टींबाबत जाणून घेऊया पुढील दुसऱ्या भागात...
-सुधांशु नाईक, कोल्हापूर. 9833299791🌿
( टीप :- ज्यांना कोणत्याही प्रकारचे काउन्सिलिंग हवं असं वाटत आहे तें माझ्याशी फोनवरून अवश्य सम्पर्क साधू शकतात.) 

4 comments:

  1. खूप छान लिहिलंय, सुधांशु सर

    ReplyDelete
  2. सुधांशु जी 'मन'या अत्यंत जटील अवस्थेबद्दल अतिशय सुरेख ,मार्मिक लेख लिहीला आहे आणि त्यासाठी अगदी चपखल उदाहरणे दिली आहेत.खरचं प्राचीन काळापासून मनाच्या चलनवलनाचा मागोवा घ्यायचा प्रयत्न अनेक संत,शास्त्रज्ञ, तत्वज्ञ यानी केला व अजूनही तो शोध अव्याहत चालूच आहे पण मन हे न उलगडणारे असे शरिरातील रसायन आहे .खूप आवडला लेख !

    ReplyDelete
  3. सुधांशुजी ,शरिराच्या रोमारोमात भरुन राहिलेली,वेळोवेळी बदलत राहणारी संवेदना म्हणजे मन ही मनाची व्याख्या अगदी अचूक व यथार्थ वाटली ,'मन'हा प्रकार इतका गुंतागुंतीचा आहे की अगदी पुराणकाळापासून मानवाला या मनाच्या नेमकेपणाबद्दल कुतुहल व कोडे पडलेले आहे व शेकडो लेख,काव्ये त्याच्यावर लिहीली गेली तरीही समाधानकारक असा शोध माणसाला लागला नाही !

    ReplyDelete