marathi blog vishwa

Friday 10 March 2023

मुसाफिर हूं यारो...


" सहज सुचलेलं... " या लेखमालेतील हा आठवा लेख आजवरच्या प्रवासाविषयी...
- सुधांशु नाईक.
केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार।
शास्त्रग्रंथविलोकत, मनुजा चातुर्य येतसे फार।।'
असं कवी मोरोपंतांनी कित्येक वर्षांपूर्वी सांगून ठेवलंय. माणूस चतुर, हुषार होण्यासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यात प्रथम स्थान त्यांनी देशाटन, प्रवास किंवा भटकंतीला दिलंय. आजवर खूप भटकंती केली, त्यामुळे चातुर्य अंगीं आलं नसलं तरी या प्रवासात खूप आनंद मात्र नक्की मिळत राहिलाय. आजचा हा लेख आजवरच्या प्रवासातील काही आठवणीविषयी ..
≈≈
1998 डिसेंबर. सवाई गंधर्व चा समारोप झाला आणि मी खांद्यावर सॅक टाकून पुण्यातून भीमाशंकरला निघालो. दुपारी पोचलो. दर्शन घेतलं. चहूबाजूने हिंडून मंदिर पाहिलं.  मग बाहेर पडलो. मुक्काम करायचा होता तिथं बॅग ठेवली आणि एका स्थानिक मुलाला सोबत घेऊन जंगलात शिरलो. गुप्त भीमाशंकर पाहणं. जन्गल पाहणं हाच मुख्य उद्देश होता.  इथलं खास वैशिष्ट्य असं शेकरू पाहिलं. कितीतरी परिचित पक्षी दिसलें. 2,3 तास हिंडलो.
 कोकण कड्याजवळून दूरवर रात्रीच्या कुशीत जाऊ पाहणारे सूर्यबिंब पाहिलं. मग परतलो. गरमागरम पिठलं भाकरी खाल्ली. आणि रात्री नागफणी कड्याजवळ आणि हनुमान तळ्याजवळ गेलो. आवडतं असं शान्त चालत राहणं. आकाशात शेकडो तारका. बसून राहिलो तळ्याजवळ. आसमंतात भरून राहिलेली शांतता, रातकिड्यांची किरकीर. वाऱ्याची मधूनच येणारी झुळूक... आणि तेवढ्यात कानावर ऐकू आलं गावातून कुणाच्या रेडिओवर उमटलेलं गाणं....
जिंदगी का सफर... हैं ये कैसा सफर
कोई समझा नही, कोई जाना नही...

खरंच असतं ना हे? आजचा दिवस आपला. उद्या उजाडणार आहे का, कसा असेल उद्याचा दिवस, कुठं असू, काय करत असू कुणाला कुठं माहिती असतं? आपण फ़क्त शेकडो प्लॅन करत असतो अमरत्वाचे वरदान मिळाल्यासारखं.

आता भीमाशंकर तितकं शान्त उरलं नाही. तिथं हनुमान तळ्याजवळ पुन्हा तसंच निःशब्द बसता येईल का हेही माहिती नाही. पण आजही हे गाणं लागलं की, मला त्या परिसरात असल्याचीं, त्या शांततेची अनुभूती येत राहते.
≈≈≈≈
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जुन्नरकडे गेलो.

तिथून जरा आडबाजूला असलेली तुळजा लेणी पाहायला गेलो. इतका रम्य परिसर पण कुणीही नव्हतं.
एकटाच हिंडत बसलो.
तिथून मग मुक्कामाला लेण्याद्री. भक्त निवासमध्यें रूम घेतली.सॅक ठेवली. बाहेर टपरीवर मस्त चहा भजी खाऊन वर निघालो. खूप माकडं त्रास देतात वाटेत. ( सध्याचं माहिती नाही ) काही लेणी, गणेश दर्शन करून एका बाजूला बसलो. समोर भला थोरला शिवनेरी खुणावत होता. उद्या तिथं पोचायचं होतं.
चौकशी केली तर सकाळी 9 पर्यंत कोणतीच गाडी नाही कळलं. मग वेगळाच प्लॅन ठरवला आणि झोपी गेलो. पहाटे काकडआरती चीं वेळ. आवरलं पटापट. आणि चालत चालत निघालो. एकटाच. 7,8 किमीवर जुन्नर आणि तिथून 4,5 किमीवर शिवनेरी. त्यावेळेस Aiwa कंपनीचा छान वॉल्कमन होता माझ्याकडे. आणि पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्या देसी तोडी रागाची कॅसेट. " म्हारे डेरे आओ... हा विलंबित ख्याल आणि करमकी छ्हैया...ही दृत बंदिश.. आणि त्या नंतर त्यांनी गाजवलेलं मिश्र भैरवी तील मीरा भजन.. " मत जा. मत जा.. जोगी.. मत जा.. "
पं. ओंकारनाथ हे खूप सुप्रसिद्ध नाव. प्रत्यक्ष कुमारजी त्यांना मानायचे. त्यांच्या भावव्याकुळ गायनाचे देशभर चाहते.
त्यांची ती कॅसेट नुकतीच पुण्यात मिळालेली. भान हरपून ऐकत राहिलो. चालत राहिलो. पहाटे 5 ला चालत चालत जाताना ऐकलेली ती मैफिल आजही कानात तशीच ऐकू येतेय.
शिवनेरी पाठोपाठ हडसरचा पर्वतगड पाहून मग परतीच्या मार्गाला लागलो होतो. मात्र आजही एकट्याने केलेल्या प्रवासतील सर्वात आनंदी आठवण म्हणजे पहाटे केलेली तंगडतोड आणि ओंकारनाथ ठाकुरांचे गायन.
≈≈≈≈
प्रवास करायचं वेड हे बाबांच्याकडून आलेलं. त्यांनी अनेक ठिकाणी लहानपणापासून नेलेलं. मोठेपणी आमचं आम्ही हिंडू लागलो. सोबतीला कुणी आपलं असलं तरी त्याची नशा काही वेगळीच.  विमान, रेल्वे, होडी, बस, जीप, ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी असं मिळेल त्या वाहनाने हिंडलो. प्रसंगी जे मिळेल ते खाल्लं. कळकळत्या उन्हात हिंडलो आणि कडक्याच्या थंडीत देखील. पावसात हिंडायला तर मी नेहमीच चटावलेला.
थंडीवरून आठवला भेडाघाट चा किस्सा.
≈≈≈

संदीप आगवेकर या मित्राच्या कामानिमित्त जमशेदपूर ला जायचं होतं. बहुदा 2002/ 03 चं वर्षं. कामं झाली की भटकंती करायची असेल तरी येतो असं सांगून मग प्लॅन ठरवला आणि दोघेच निघालो. जमशेद्पुर, रांची, मग परत मागे येऊन दुर्गं भिलाई ला आलो. रेल्वे स्टेशन वर असलेल्या निवासगृहात रूम घेतली. अचानक वाटलं जबलपूर जवळचे भेडाघाट पाहू. रेल्वेची चौकशी केली आणि रात्रीची ट्रेन पकडून निघालो. जागा मिळेल असं वाटलंच नव्हतं.. मात्र टीसीसोबत चर्चा करून दोघांत एक बर्थ मिळवली.

एकीकडे माझं डोकं दुसरीकडे त्याचं. झोपलो. प्रचंड थंडी. खिडकी नीट बंद होत नसल्याने गार गार झोंबणारा वारा.. त्याला म्हटलं, " अरे तुझ्याऐवजी सोबत प्रेयसी असती तरी जास्त बरं झालं असतं. किमान थंडी तरी नसती वाजली... "
झोपच लागत नसल्याने मग तो रफीची गाणी गात बसला. मी ऐकत... एकदाचे जबलपूर ला पोचलो सकाळी. 4,5 कप गरम चहा घेतला तरी थंडी जाईना.
मग तिथून भेडाघाट.
तिथं पोचलो. एक खोली घेतली आणि थेट नर्मदेंकडे धावत सुटलो. हवेत गारवा असूनही कपडे झुगारून दिले. त्या हिरव्या निळ्या पाण्यात स्वतः ला झोकून दिलं. चार हात मारत पोहत राहिलो. मैय्यानें मायेने जवळ घेतलं. तो ऊबदार स्पर्श अजून आठवत राहिलाय.

दुपारी धुवाधार धबधबा पहिला. मग नदीतून होडीने हिंडायचं होतं. दो बाजूला ते संगमरवरी पहाड.. मावळतीचे सोनेरी किरण, त्यांचं या खडकावरून प्रतिबिंबित होणं, नदीचा वेगवान प्रवाह आणि होडीचा आवाज. तो होडीवाला काही सांगू लागला. इथं या सिनेमाचं शूटिंग झालं, ती हिरोईन इथं होती वगैरे. त्याला म्हटलं, बाबा तू कसलीच कहाणी सांगू नकोस. आम्हला शान्तपणे अनुभवू दे हा प्रवाह आणि हे वातावरण.

फिरून आल्यावर मस्त गरमागरम पुरी भाजी खाल्ली. त्या होडीवाल्यालाही खिलवलं. तोही खुश. रात्रीपण आम्हाला एकदा नदीतून फिरवून आण्याबाबत शिक्का मोर्तब करून घेतलं. त्या रात्री त्या संगमरवरी खडकातून होडीने हिंडून आलो. किती भन्नाट अनुभव होता तो. शब्दांत सांगणं अवघडच. निसर्ग तुम्हाला अंतर्मुख करतो. हेच खरं. आकाशात टिपूर चांदणं, नर्मदेचा वाहता प्रवाह, दूरवरून येणारा धुवाधार धबधब्याचा गंभीर नाद आणि होडीचा आवाज. अर्ध्यातासाने परतलो.
मग पाण्यात पाय सोडून काठावर बसून राहिलो. संदीप मुक्त कंठाने गाऊ लागला..
" हे मना.. आज कोणी बघ तुला.. साद घाली.."
≈≈≈
ट्रेकसाठी केलेली भटकंती हा तर एक वेगळाच प्रदीर्घ असा विषय. मोजके सवंगडी, लहान मोठे ग्रुप्स, सोबत घेतलेले डबे, गडावर केलेले मुक्काम, बनवलेली दाल खिचडी किंवा मॅगी.. ऊन वारा पाऊस कशाची तमा ना बाळगता केलेली तंगडतोड... सगळ्यांच्या किती गोष्टी.. माझ्याच नव्हे तर ट्रेक करणाऱ्या प्रत्येकाच्याच. अगदी घरात देखील गोड ना खाणारी मंडळी ट्रेक मध्यें कुणीतरी आणलेल्या श्रीखंडाच्या डब्याचा एकेक बोटाने श्रीखंड चोखत, अगदी चाटूनपुसून फन्ना उडवतात तेंव्हा भरभरून हसू येतं. ती जादू सहवासाची. त्या वातावरणाची.

अशा ट्रेकमध्येंच मग प्रेम कहाण्या सुरु होतात. टिकतात किंवा तुटतात देखील. मात्र सोबत जगलेले ते निखळ निर्मळ क्षण कायमच सोबत करतात आयुष्यभर.
≈≈≈≈≈≈
विमान प्रवास केला खूप. 2004-05 पासून...
मात्र मला त्यात अवघडल्यासारखं होतं. लोक उगीचच मुखवटे चढवून बसलेत असं वाटत राहतं. अगदी इकॉनॉमी क्लास मध्यें बसलेला एखादा देखील आपण कंपनी चा मालक असल्याचा आव आणत बसतो.
मात्र लांबचा विमान प्रवास असेल तर काही काळाने लोक मोकळेपणाने बोलू लागतात. त्यात ही जे ड्रिंक्स घेणारे असतात, ते पटकन संवाद सुरु करू शकतात असं माझं लहानसे निरीक्षण आहे. विमानात जागाही कमी असते. एखादयाला उठून बाथरूमला जायचं असलं तरी असं अंग वाकडं वाकडं करत जावं लागतं. प्रसंगी सह प्रवाशाला उठवावं लागतं.
आतमध्ये फ़क्त हवाई सुंदरीच असतात असा एक लोकांचा समज असायचा पूर्वी. आणि त्या " सगळी " काळजी घेतात ना? हा दुसरा गैरसमज! यात किंगफिशर सारख्या विमानातील सुंदऱ्या, त्यांचे तोकडे पोशाख याबाबतीत बाहेरच्या जगात अनेक कल्पना पसरलेल्या...

किमान एका तरी व्यक्तीने सुरुवातीला मला विचारलं आहे, त्या सुंदऱ्या नक्की काय काय करतात रे...?
मग आपण सांगतो, " आपल्याला सेफ्टी बाबत सूचना देतात. जेवणं, ड्रिंक्स वगैरे देतात. विमानात कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतात. पायलट सोबत इमर्जन्सी वेळी सगळ्यांना सम्भाळून बाहेर काढतात... " मग त्यांना असं वाटे की हा काहीतरी लपवतोय. याने भरपूर मजा मारली असणारे मात्र इथं उगीचच खोटं सांगतोय.
2010 नंतर भारतात अंतर्गत विमानातून, टूर्स मधून जास्त लोक हिंडू लागले, विविध सिनेमातून विमानातील जग समोर आलं आणि लोकांना वस्तुस्थिती कळलीये. त्यामुळे आता असे खट्याळ प्रश्न कमी होत गेलेत.
विमानात माणसं पाहत बसायला मजा येते. टेकऑफ किंवा लँडिंग वेळी घाबरून डोळे मिटून घेणारी मंडळी, आपली सीट सोडून इतरत्र हिंडणारे लोक, भरपूर वजन घेऊन येणारे लोक, सीटमोरील टीव्ही स्क्रिन वर सतत चॅनेल सर्फीन्ग करणारे अस्वस्थ लोक, आपली कामं करत असलेल्या हवाई सुंदरीकडे सतत आशाळभूतपणे पाहणारे लोक, नाश्ता जेवण, कॉफ़ी / ज्यूस किंवा दारू सर्व्ह होत असताना थोडंसं का असेना पण एक्स्ट्रा मिळावं म्हणून धडपडणारे लोक... ही सगळी माणसं वाचत बसणं खूप छान वाटतं.
≈≈≈≈≈
प्रवास करताना बाजूला छान देखणी स्त्री येऊन बसणं याबाबत ही किती फँटसीज आहेत ना सर्वांच्या. रेल्वेत, विमानात, बसमध्ये शेजारी कुणी स्त्री असणं यात इतकं रंगवून काय सांगायचं? पण लोक किती मनगडन्त कहाण्या सांगत बसतात. देखणी स्त्री सहप्रवासी असणे मग तिच्यासोबत भरपूर गप्पा वगैरे मारायला मिळणे हा भाग्य योग काही माझ्या नशिबी मात्र नव्हता.
मात्र आसपास बसलेल्या प्रवाशांमधील असं प्रेमकूजन करणारे युगुल पाहत बसणं मला आनंददायी वाटतं बुवा.

किती मस्त एकमेकांत रमलेले असतात ते. एकच बिस्कीट किंवा चॉकलेट अर्ध अर्ध खाणे, त्याच्या विस्कटलेल्या केसांना तिने सारखं करत राहणं, त्याच्या आश्वासक खांद्यावर डोकं ठेऊन मस्त झोपून जाणारी ती... तिला ऊन लागू नये म्हणून हळूच ओढणी चा पडदा करणारा तो... ते समजून त्याच्या अधिकच जवळ जात बिलगून बसलेली ती हे सगळं फार तरल, मुलायम असतं. आपलं आपण समजून घ्यायचं असतं... तिसऱ्याने त्यात फार लक्ष घालू नये हेच बरं.
≈≈≈
प्रवासात भेटणाऱ्या आजी आजोबांची साथ ही मला आवडते. सुरुवातीला काहीजण जरा किरकिर करतात. आमच्याकडे किंवा आमच्यावेळी असं.. आमच्यावेळी तसं.. ही रेकॉर्ड असतेस. पण हळूहळू त्यांच्यातील माया दिसू लागते. सोबत आणलेल्या लाडू, चिवडा, बर्फी, थालीपीठ, अशा गोष्टीत आपल्याला हक्काने सामील करून घेतल जातं. " कसली रे तुम्ही आजची मुलं, पोटभर खात देखील नाही.. " असा लाडीक त्रागा करून दोन घास जास्त खिलवले जातात.

एकदा मुंबई ते नागपूर रेल्वे प्रवासात एका आजोबानी तर भरपूर मिठाई आणलेली. आणि आम्हाला सगळ्यांना वाटत सुटलेले. त्यांना घ्या असं म्हटलं. तुम्ही सगळंच आम्हाला का देताय असं विचारलं तेंव्हा म्हणाले, " अरे बाळा, मला गोड खायचं नाही असं सांगितलंय डॉक्टरनें. मला आवडतात गोड पदार्थ. पण खाता येत नाहीत. मग असं तुम्हाला खाताना पाहिलं की मलाच खाल्ल्याचे समाधान मिळते. "
ऐकल्यावर गलबलून आलं.
खेड्या पाड्यात एसटीनें फिरलोय. तिथं तर भाजी विकणाऱ्या, फळं विकणाऱ्या कित्येक मामी / मावश्या संध्यकाळच्या गाडीत उरलेले सगळे उदार हस्ते वाटून टाकायच्या. किती अल्प तो  त्यांचा रोजचा व्यापार.  पण त्यातही समाधानी असायच्या. आपल्यालाच वाटतं मग, इतकी मेहनत, इतके पैसे कमवून देखील आपण बाकीचे सगळे का सुख मानत नाही...? प्रश्न तसेच मनात राहतात. आठवत राहते त्या निष्पाप मावशीची माया.
≈≈≈≈≈
आजवर च्या प्रवासात चोरीचे फसवणूकीचे अनुभव मात्र कधीच आले नाहीत. जरा धांदरट असल्याने प्रसंगी कित्येकदा गाडीत पाकीट विसरलोय. मोबाईल विसरलोय. बॅग विसरलोय. पण सगळं परत मिळालं. त्या बाबत कतार मधला किस्सा तर भारीच.
एल अँड टी तर्फे कतार पेट्रोलियम च्या एका मोठया प्रोजेक्टचा प्रमुख म्हणून काम करत होतो. दोहा या मुख्य ठिकाणापासून समुद्रात 100 किमीवर एक बेट. तिथं कामं सुरु होती. आठ दहा दिवसातून एक फेरी असायची. तिथ फ़क्त हेलिकॉप्टरनेंच जाता येई. प्रोजेक्टचा असा विशिष्ट पोशाख ( coverall) घालूनच जावं लागायचं.

जाताना त्या हेलिपॅड वर कुठंतरी माझं पाकीट पडलं. मी साईटवर पोचलो. मिटिंग्ज झाल्या. साईट व्हिजिट झाल्या. संध्याकाळी मग लक्षात आलं की पाकीट गायब. मग साईटवरच्या कॉन्ट्रॅक्टरचीं मुलं सगळीकडे पाकीट शोधतायत. कुठं सापडलं नाही. मग एकाने सिक्युरिटी डिपार्टमेंट ला कळवून ठेवलं. मिळालं तर मिळालं म्हणून.
पाकिटात पैसे होतेच पण national ID card, कंपनीचं कार्ड, बँक card, कतार चं ड्रायव्हिंग लायसन्स असं सगळं होतं जे जास्त महत्वाचं होतं. मी तर हे सगळं नवीन कस बनवायची याचीच माहिती घ्यायला सुरुवात केली.

दुसऱ्या दिवशी पुन्हा परतीचा प्रवास. इथल्या हेलिकॉप्टर नें परत जाताना निरोप मिळाला की तुमचं पाकीट मिळाले आहे आणि 3 दिवसांची सुट्टी संपल्यावर घेऊन जा.

3 दिवसांनी गेलो. तिथल्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने ते माझंच पाकीट आहे याची चौकशी केली आणि एकाही वस्तूला हात ना लावता सगळं परत दिलं. वर कोणतीही बक्षीसी घ्यायलाही नकार दिला.

असे किती किस्से सांगावेत तेवढे कमीच. खूप प्रवास करत राहिल्याने " जगात माणुसकी आहे.. " या गोष्टीवरचा माझा विश्वास मात्र पक्का झालाय.
"  केल्याने देशाटन " मला चातुर्य मिळालं का हे माहिती नाही.  पण मिळालेले हे शेकडो लोभस अनुभव हेच माझं संचित आहे. जे सतत मनाला सुखावत राहणार आहे. " आयुष्य हाच एक प्रवास असतं, तो सुंदर करणं आपल्याच हातात असतं.
परिचय चित्रपटात गुलजार लिहितात ना ते मला खूपदा माझ्या मनातलं आहे असं वाटतं. आयुष्य अनेक वाटांनी आपल्या समोर येत असतं. आपण स्वच्छ मन, कोरी पाटी घेऊन त्याला सामोरं जायला हवं असं मला वाटतं.

ते म्हणतात,
एक राह रुक गई, तो और जुड़ गई
मैं मुड़ा तो साथ-साथ, राह मुड़ गई
हवा के परों पे, मेरा आशियाना
मुसाफ़िर हूं यारो......

आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत आपले पाय नवनव्या वाटेवर हिंडत राहावेत, रोजचे सूर्योदय सूर्यास्त मोहवत राहावेत, जिथं जे जे उत्तम मिळेल ते खात राहावे आणि आपला प्रवास आपल्याच नादात धुंद सुरु राहावे इतकीच अपेक्षा.
- सुधांशु नाईक, 9833299791🌿
( ब्लॉगवर कमेंट करताना आपलं नांव गाव अवश्य सांगावे. म्हणजे तुम्हाला तसा प्रतिसाद देता येईल. ) 

8 comments:

  1. खूप छान लिखाण सर जी...महेश निगडे

    ReplyDelete
  2. खूप छान लिखाण सर जी.....

    ReplyDelete
  3. लेख आवडला मला... प्रवासाने माणुस फार समृद्ध होतं रहातो हे लेख वाचुन परत कळुन आलं.

    ReplyDelete
  4. सुधांशुदादा, प्रवासानं माणूस समृद्ध होतो हे जरी सत्य असलं तरी हा असा प्रवासब्लाॅगही काही कमी समृद्ध करत नाही !! छान लिहिताय !!! मनःपूर्वक धन्यवाद.....नमिता

    ReplyDelete