हे सावरकर कायमच लक्षात ठेवायला हवेत!
- सुधांशु नाईक.
" सहज सुचलेलं " या लेखमालेतील हा आठवा लेख.
26 फेब्रुवारी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतिदिन. आपलं अवघे आयुष्य ज्यांनी देशहितासाठी झिजवलं त्यांना सादर प्रणाम. सावरकरांनी अफाट क्रांतिकार्य तर केलंच मात्र तितक्याच नव्हे तर त्यापेक्षा जास्त तळमळीने सामाजिक सुधारणांचा आग्रह धरला. कर्मठ ब्राह्मणांचे गाव असं मानल्या गेलेल्या रत्नागिरीसारख्या ठिकाणी स्पृश्यास्पृश्यता मिटवण्यासाठी 1925 नंतर अथक प्रयत्न केले. अनेकांनी टिंगल केली, निंदा केली पण सावरकर शांतपणे आपलं कार्य अधिक जोमाने करत राहिले. लेखक आणि कवी म्हणून सावरकर थोर आहेतच. मात्र समाजासाठी अत्यन्त आवश्यक असे त्यांचं पुस्तक म्हणजे " विज्ञाननिष्ठ निबंध ".
त्याकाळी किर्लोस्कर - मनोहर आदि मासिकातून त्यांनी जे लेखन केलं, जे पुरोगामी विचार मांडले ते आजही आचरणात आणताना आपल्याला झेपतील का असंच वाटतं. मात्र नेहमीच भविष्याचा वेध घेणारे सावरकर त्याचा पाठपुरावा करत राहिले..
एका ठिकाणी ते स्वतः म्हणतात, " यापुढे क्रांतिकारी सावरकर जरी तुम्ही विसरून गेलात तरी चालेल मात्र सुधारक सावरकर विसरू नका."
क्रांतिकारक सावरकर, विदेशी कपड्यांची पहिली होळी करणारे सावरकर, मदनलाल धिंग्रा- अनंत कान्हेरे- सेनापती बापट आदि वीरांना सदैव मार्गदर्शक असेल सावरकर, सागरा प्राण तळमळला सारख अजरामर काव्य लिहिणारे सावरकर, बोटीतून उडी मारून सुटकेची धडपड करणारे सावरकर, दोन जन्मठेपेची सजा होऊनही अंदमानच्या कारागृहात सुधारणा करू पाहणारे सावरकर... अशी त्यांची विविध रूपं आपल्याला माहिती असतात. मात्र समाज सुधारक सावरकर याकडे आपलं तुलनेने दुर्लक्ष होतं. हे पुस्तक खास " समाज सुधारक सावरकर " यांचं आहे.
आपला समाज प्रगत व्हावा, भारतीय म्हणून हिंदू म्हणून एकजुटीने उभा राहावा आणि विज्ञानयुगाची कास धरून जगात अग्रगण्य व्हावा ही त्यांची तळमळ. त्यासाठीच 1925 नंतर त्यांनी किर्लोस्कर, मनोहर आदि मासिकातून जे विज्ञाननिष्ठ लेखन केलं ते आजही अनुकरण करावं असंच आहे. मात्र ते इतकं धगधगीत तेजस्वी आहे की आपल्याला पचवणे अजूनही जड जाते.
हिंदुत्वाचा आग्रह धरणारे सावरकर, आपल्या रूढी, अंधश्रद्धा, धर्मभोळेपणा यावर इतका कडाडून आघात करतात की परधार्मिय व्यक्ती देखील इतकं कठोर बोलणार नाही.
गाय हा एक उपयुक्त पशु आहे हे त्यांचं वाक्य " गोपालन हवे, गोपूजन नव्हे" या लेखातलं. तो या पुस्तकातच आहे. गायीचं दूध, शेण, चर्म यांचा अवश्य वापर करावा, त्यासाठीच अधिकाधिक गोपालन करा. त्यानिमित्ताने अनेकांना लाभ होईल मात्र गोपूजनाचा अतिरेक करू नका असं ते सांगतात. गाय असो की आपली यज्ञसंस्था यांच्याकडे उपयुक्तता म्हणून पहा, त्याचं आवडम्बर माजवू नका असं सांगतात.
" दोन शब्दांत दोन संस्कृती " हा त्यांचा लेख तर सदैव सर्वांनी वाचावा असा. अद्ययावत या शब्दाची गरज आणि श्रुतीस्मृतिपुराणोक्त या शब्दाला टाकून देणे याची गरज ते परखडपणे व्यक्त करतात.
विज्ञानाची कास धरली म्हणूनच आज पाश्चिमात्य राष्ट्रे बलवान झाली. आपले ग्रंथ, आधीच्या लोकांनी लावलेले शोध याचं अंधानुकारण न करता त्यांनी त्यावर पुन्हा पुन्हा संशोधन केलं, त्यात योग्य तेवढं घेतलं नको वाटलं ते वगळून नवीन त्यात वाढवलं. त्यामुळे ते अद्ययावत बनले. आपल्याला असं व्हायला हवंय. उत्तम वस्तू, उत्तम यंत्रे, उत्तम बंदूका, उत्तम विमाने, उत्तम बसगाड्या, उत्तम रेल्वे असं विज्ञानाच्या बळावर आपण बनवलं पाहिजे. यंत्रांची कास धरा, जुन्या पोथ्या पुराणांना कवटाळत बसू नका असं पोटतिडिकीने ते सांगत राहिले.
" ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय?" या लेखात धर्मभोळेपणाच्या कल्पनांवर आघात करताना ते म्हणतात, " सामर्थ्य आहे चळवळीचे.. " असं समर्थ रामदास सांगून गेले. मराठ्यांनी ते आचरलं म्हणून 1600 ते 1800 या दोन वर्षात इतिहास बदलला. कारण मराठ्यांनी आपलं सामर्थ्य विकसित केलं.
त्यापूर्वी अनेक पूजा, अनेक यज्ञ करत असूनही परकीय आक्रमकांनी आपलं आयुष्य मुळासकट उध्वस्त केलं. कोणताही देव तिथं मदतीला आला नाही. त्यामुळे धर्मभोळेपणा टाकून द्या, बळवंत व्हा, जे जे नवीन ते ते आत्मसात करा. जुन्या काळात जे लोक जगले ते त्यांनी त्या काळशी सुसंगत असं सगळं केलं होतं. ते सगळं एका भव्य युगाचा इतिहास म्हणून अवश्य अभ्यासावं मात्र त्याचं अंधानुकारण करू नका. वेद हे कुणा ऋषींना स्फुरले, विविध उपनिषदे, ग्रंथ त्या त्या काळाची निर्मिती होती आता तुम्ही तुमचा इतिहास घडवा असं रोखठोक सांगत राहिले.
अस्पृश्यता निवारण करण्यासाठी सर्व जातीतील लोकांचे सहभोजन करा , रूढी बंदी करत नवीन रूढी निर्माण करा , बेटीबंदी नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाह करा, सिंधुबंदी मोडीत काढत जगभर जा, नवं शिकून देश समृद्ध करा असं सांगत राहिले.
हिंदू समाज खूप सारा निद्रिस्त असतो. सगळं काही देव करेल या विचारात भ्रमित असतो त्याचाच फायदा आजवर मुस्लिम, ख्रिश्चन आक्रमक देशांनी घेतला. यापुढे असं होऊ देऊ नका. एकजुटीने उभे रहा. आपला धर्म आणि आपला देश जगात उच्चस्थानी हवा असेल तर आपल्यात जे जे चुकीचं आहे ते ते काढून टाकायला हवं. विज्ञानाची कास धरून नवं सगळं प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करायला हवं. या भावनेने ते प्रसंगी कठोर आणि परखड बोलत राहिले.
" मनुस्मृतीमध्यें " न स्त्रिस्वातंत्र्यम अर्हति " असं म्हटलं आहे यावर आपण सतत टीका करतो. मात्र त्याच ग्रंथात " यत्र नारयस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता" असंही म्हटलंय. आपण स्त्रियांना अधिक चांगलं वागवलं पाहिजे. त्यांना समाजात समानतेने सर्वत्र कार्यरत व्हायला प्रोत्साहन दिले पाहिजे. जसं परदेशी लोकांच्यात स्त्रियांवरील निर्बंध आता हटवले गेले, अगदी सैन्यातही स्त्रिया लढताहेत ते आपण करायला हवं... " असं सावरकर 1930/40 च्या सुमारास सांगत होते हे पाहून थक्क व्हायला होतं.
खरतर त्यांना आधीच लोकांनी देवत्व दिलं होतं. लोकांना गोड वाटतील अशी भाषणे, लेखन करून ते आयुष्यभर लोकप्रिय राहिले असतेच. मात्र लोकांचा अनुनय करण्यापेक्षा सतत देशहित त्यांच्या नजरेसमोर होतं, त्याला प्राधान्य होतं.
तरीही कित्येक वर्षं आपण त्यांचे विचार बाजूला ठेवले. नेहमीच आपल्याकडे सावरकरांची अवहेलना होत राहिली. आज नवीन टेक्नॉलॉजीमध्यें, संरक्षण क्षेत्रात, नौदल, हवाई दलात भारताने जी मुसंडी मारली आहे ते पाहायला सावरकर असते तर त्यांना नक्कीच कृतकृत्य वाटत राहिलं असतं असं वाटतं. सावरकरांच्या सारख्या व्यक्तिमत्वाला नुसते जयजयकार नको असतात ते देशहितासाठी केलेल्या प्रत्यक्ष कृती हव्या असतात. आपण ही आपला देश बलवान व्हावा यासाठी काहीतरी सतत करत राहू हीच त्यांना खरी आदरांजली असेल.
या तेजस्वी व्यक्तिमत्वाला पुन्हा एकदा सादर प्रणाम.
- सुधांशु नाईक, 9833299791🌿
( छ. शिवाजी महाराज, भगवान श्रीकृष्ण, स्वा. सावरकर,यांच्या विविध पैलूविषयी अधिक माहिती देणारी व्याख्याने मी नेहमीच देत आलोय. महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात कुठेही बोलवलं तर अवश्य येईनच. )
#सहज #सुचलेलं
देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि देशाचे आपण काही देणे लागतो हे शब्दशहा जगलेला एक अवलिया देशभक्त.
ReplyDeleteखूप छान लिहिलंय समर्पक.