marathi blog vishwa

Saturday 18 March 2023

अशा घटना रोखायला हव्यात..!

किती क्रूर आहें हे...!
चार वर्षाची छोटुली मुलगी. निसर्गाने तिला अपंग बनवलं. आणि प्रत्यक्ष बापाच्या हातून भयानक मृत्यू.. असं कोणतं दुर्दैव घेऊन जन्माला आलेली ही की अवघ्या चार वर्षात हे सगळं नशिबी यावं ? बातमी काल वृत्तपत्रात वाचली आणि दिवसभर अस्वस्थ वाटत राहिलं.
आपल्या आजूबाजूला सगळीकडे असं काहीसं घडतंय. का..?
अपंग मूल कुणाच्या पदरी असणं हे किती यातनामय हे आपण समजू शकतो. त्या जीवाला स्वतःला त्रास होत असतातच, मात्र त्याच्या आई-बाबांना देखील खूप सहन करावं लागतं. रोजच्या जगण्यात शेकडो तडजोडी कराव्या लागतात. दिलीप प्रभावळकर, अतुल परचुरे यांच्या गंभीर अभिनयाने गाजलेलं " नातीगोती" सारखं नाटक असो की " कळत नकळत", " आम्ही असू लाडके", " यलो " " ब्लॅक " या सारखे चित्रपट... अपंग व्यक्तीची आणि सोबतच्या लोकांची धडपड आपण पाहिलेली आहें. समजू शकतोय ते दुःख.
पण आपल्या पोटच्या पोराचा जीव घेण्याइतका ताण त्या पालकावर का आला याचा विचार आसपासच्या लोकांनी करायला हवाय. कोल्हापूर मध्यें आमच्या " Helpers Of The Handicapped-HoH सारखी संस्था असो किंवा पुण्यातील Vanchit Vikas असो, अपना घर असो...नगरचे स्नेहालय असो, इथं दुर्बल व्यक्तीला सन्मानपूर्वक जगायला मदत केली जाते. त्यांची कौशल्य विकसित केली जातात. या संस्थांव्यतिरिक्त राज्यात आणि देशांत अनेक संस्था कार्यरत आहेत. इथं अशा मुलांना, पालकांना नक्कीच आधार मिळू शकतो. मात्र अशा घटना पहिल्या की वाटतं किती अपुरे आहेत आपले प्रयत्न. किती धडपड केली तरी कमी पडतेय. आपण पोचतच नाही लोकांपर्यंत असं वाटतंय..
आपल्या आसपास वाढलेल्या, स्वतःच्याच अपंगत्वावर मात करून लढत राहणाऱ्या कित्येक व्यक्ती आहेतच. आमच्या हेल्पर्स मधले Awinash Kulkarni Rekha Desai असोत किंवा गाजत असलेली लोकप्रिय लेखिका अशी मैत्रीण सोनाली नवांगुळ Sonali Navangul वल्लरी करमरकर, ठाण्याच्या Smita Kulkarni आणि Sandeep Kulkarni यांची गुणी कन्या मनाली असोत.. यांचं जीवन आदर्श मानलं तर अशा घटना घडणं कमी करता येईल.
यासाठी सर्वाधिक गरज आहें समाजात अधिकाधिक अवेअरनेस निर्माण होण्याची. आपण सगळ्यांनी काहीतरी करत राहण्याची. चांगल्या संस्था, आपल्या अपंगत्वावर मात केलेल्या लोकांच्या कहाण्या अशा निराश व्यक्तीपर्यंत पोचवण्याची.
सर्वांनीच आपापल्या परीने हे करायला हवं. मूक आणि निष्पाप असे लहान जीव वाचायला हवेत म्हणून ही कळकळीची विनंती. तुमच्या तुमच्या परिसरात जागरूकता वाढवूया.
- सुधांशु नाईक, 9833299791🌿

#सहज #सुचलेलं

1 comment:

  1. त्या वडिलांची काय मानसिकता होती, अथवा काय अडचणी होत्या ते आपल्याला ठाऊक नाहीत. पण आपल्या पोटी जन्माला आलेले मूल कसेही असले तरी त्याला, स्वावलंबी कसे करता येईल, हे पहाणे कर्तव्य, प्रेम आहे. अपंग मुल वाढविणे, हे एक अव्हान स्विकारून त्याकडे पहायला हवे.

    ReplyDelete