🍁🍁
#सुधा_म्हणे
#सहज_सुचलेलं
मित्रहो, सुप्रभात. मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी धावली. त्याला आज 170 वर्षे पूर्ण झाली. तेंव्हा आगगाडी आली म्हणजे जणू भूत आलं असं लोकांना वाटायचं. मात्र पाहतापाहता ही गाडी आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनून गेली.
"झुक झुक...झुक झुक ... आगीनगाडी.. " म्हटलं की आपली मनं थेट बालपणात जातात. एकमेकांच्या शर्टाला धरून केलेली खेळण्यातली आगगाडी आठवते, तोंडाने वाजवलेली शिट्टी आठवते. मन पिसासारखं हलकं हलकं होऊन जातं.
आकाशात उडणाऱ्या विमानाचा आवाज ऐकू आला की पावलं अंगणाकडे धावायची. विमान दिसू लागलं की चेहऱ्यावर एक अनामिक आनंदी हसू फुलायचं. विमान
पाहायला असं आवडत असलं तरी मला ही आगगाडी किंवा ट्रेन अधिक जवळची वाटते.
कोकणात चिपळूणला राहत असताना, कोकण रेल्वे हॊणार असं किती वर्षं ऐकलं होतं. पण आगगाडी काही पाहायला मिळत नव्हती.
त्यामुळे कोल्हापूर, सांगली, बेळगाव, पुणे, रायबाग, मुंबई असं कुठेही नातेवाईकांकडे कडे गेलं की आम्हां बच्चेकम्पनीचा मुक्काम रेल्वे रुळाच्या, स्टेशनच्या आसपास असायचा.
आगगाडीच्या शिट्टीचा आवाज ऐकला की कोणत्या दिशेने गाडी येईल, किती डबे असतील अशी पैज लागे. गाडी दूर असताना अगदी रुळावर डोकं ठेवून थरथर, धडधड ऐकू येतेय का हेही पाहण्याचे उद्योग आम्ही करायचो. स्टेशनवर गाडी येताना तो धूर, ते झेंडा दाखवणारे स्टेशन मास्तर, ते रिंग टाकणं, फुस्स असा आवाज करून गाडीने दम टाकत थांबणं, मग हमाल, पाणीवाले , 'चॉय - चॉय करणारे' चहावाले यांची लगबग. गाडी निघून गेली की सारं शान्त शान्त. एक सुस्तपणा पुन्हा सर्वत्र भरून जायचा. हे सारं चित्र मी मन लावून पाहत बसायचो. त्या लंपन सारखं " म्याड " होऊन!
गाडीच्या प्रवासात तर मज्जाच मज्जा असे. सतत काहीतरी खात राहायचं. स्टेशन, नद्यावरचे मोठे मोठे पूल पहायचे. रेल्वे क्रॉसिंग वरच्या वॉचमन ला टाटा करायचा असं सगळं फार निरागस बाळपण होतं ते. अगदी " रेलगाडी.. झुक झुक.. झुक.. " गाणाऱ्या अशोककुमार ने समोर आणलं होतं तसं! स्टेशनमास्तरचा रुबाब मोठा असला तरी मला इतकं मोठं धूड लीलया हाताळणारा इंजिन ड्रायव्हर बनावं असं वाटायचं.. म्याडच असतो ना आपण त्या वयात...!
आणि एकदिवस अचानक मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, श्रीधरन यांच्यामुळे "कोकण रेल्वे" चं थेट कामच सुरु झालं. अत्यंत कठीण अशी भौगोलिक आव्हाने पार पाडत इंजिनियर दौडू लागले. कॉलेजच्या त्या दिवसात काही जवळच्या मित्रांमुळे बोगदे खणण्याची कामं, स्लीपर्स बनवणे, रूळ जोडणे, सिग्नल यंत्रणा हे सारं जवळून पाहता आलं. आणि खूप छान वाटत राहिलं.
जी गावं स्टेशन किंवा रेल्वेच्या अगदी जवळ त्यांचं तर रोजचं जगणं त्या वेळापत्रकाशी जुळलेलं असतं. लोकांचं येणं जाणे, बदल्या, ते क्वार्टर्स मधलं राहणं हे सगळं विश्व वेगळंच. रेल्वेस्टेशनचे परिसर मुंबईसारख्या ठिकाणी बकाल. पण त्या ट्रेन, त्या लोकलशिवाय जगणं ही अशक्यच. गेल्या काही वर्षात भारतीय रेल्वेने अक्षरशः कात टाकली. अनेक सुधारणा झाल्या. नवनवीन ऍप्स च्या माध्यमातून प्रवास अधिक सोईस्कर झाले. भारतीय रेल्वे आपल्या आयुष्याचा अधिकाधिक भाग व्यापून राहिलीय.
वय वाढत गेलं तसं रेल्वेगाडी अधिक आवडत गेली. खूप प्रवास केले. त्या धावत्या तालात मनात कविता, गाणी, लेखन सुचत गेलं. . आजही विमानापासून सगळे प्रवास घडले तरी रेल्वेच्या प्रवासासाठीच मन कायमच आतुरलेलं असतं.
रेल्वेचा प्रवास म्हटलं की मला ' पाकिजा " सिनेमातील दृश्य आठवतं. मीनाकुमारी आठवते आणि " आपके पांव देखे, बहुत हसीन हैं... इन्हें जमीन पें मत उतारिएगा , मैले हॊ जायेंगे... " असं म्हणणारा राजकुमार आठवतो. सिनेमातला तो पूल आठवतो. मन हळवं हळवं होऊन जातं.!
आजही स्वप्न आहे की आपण रेल्वेतून कुठंतरी जात राहावं, आपलं जिवलग माणूस सोबत असावं आणि दिवस-रात्री न मोजता फ़क्त फ़क्त प्रवास करत राहावं. नवनवीन गावं पाहावीत, डोंगर पाहावेत, नद्या पाहाव्यात, हिमशिखरे पाहावीत, खावं प्यावं आणि आनंदाने हिंडत राहावं...एकमेकांसोबत प्रत्येक दिवस नव्याने जगत राहावं.. !
तुम्हालाही असं वाटतं का?
तुम्हीही तुमच्या रेल्वेप्रवासाच्या आनंददायी आठवणी अवश्य सांगा ना...
- सुधांशु नाईक (9833299791)🌿
🍁🍁🍁🍁🍁
nice blog
ReplyDelete