marathi blog vishwa

Saturday 5 August 2023

रमैय्या बिन नीन्द न आवे

 #सुधा_म्हणे:  रमैय्या बिन नीन्द न आवे...

05 ऑगस्ट 23

मीरा. भारताच्या सांस्कृतिक इतिहासात अजरामर झालेलं व्यक्तिमत्व. मीरा किंवा मीराबाई आणि तिचं  नेमकं आयुष्य याबाबत इतिहास बऱ्यापैकी मौन बाळगतो. साधारण 15 व्या शतकात होऊन गेलेली मीरा आजही आपल्या मनात जिवंत आहे ती मुख्यत: तिच्या मनस्वी पदांच्या किंवा भजनामुळे. कृष्णाच्या दर्शनाची अतीव ओढ लागलेल्या त्या विरहिणी मीरेचे तिच्याच भजनातून दिसणारे चित्रच फार मनमोहक आहे कारण अपार प्रेमात, भक्तीमध्ये बुडलेली कोणतीही व्यक्ती ही अशी सुंदरच दिसते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूत विरहाची जाणीव किती वेगळी. वातावरणातील सूक्ष्म बदल आपल्या मनावर देखील किती परिणाम करत असतात ना?


पावसाळ्यातील चिंब वातावरण, सर्वत्र भरून राहिलेला ओला गंध, एका लयीत बरसणाऱ्या पाऊसधारांची सुरेल पार्श्वभूमी, हवेतील सुखद गारवा यामुळे आपल्या जिवलगासाठी आतुरलेले मन. ही जशी सर्व विरहार्त जीवांची अवस्था असते तशीच तगमग मीरेचीही. अरे मनमोहन कृष्णा, तुला भेटायला इतकी आतुरले आहे की अजिबात झोप येत नाही हे सांगत मीरा थेट म्हणते,

हो रमैय्या बिन नींद न आवे...

बिरहा सतावे प्रेम की आग जलावे...

मीरेच्या शब्दातून तो पाऊसदेखील जिवंत होऊन समोर येतो. झकास सूर लावलेले बेडूक, मोर, सुरेल गाणारे चातक पक्षी, आकाशात कडाडणाऱ्या वीजेमुळे वाटणारे भय, आणि भरून येत बरसणाऱ्या ढगामुळे हुरहुरते मन हे सगळं चित्र मीरा अवघ्या दोन ओळीत उभं करते.

दादुर मोर पपीहा बोलै, कोयल सबद सुनावै

घुमट घटा उलर हुई आई दामिन दमक डरावै

नैन झर लावै हो रमैया बिन नींद न आवे...

डोळ्यातून अश्रुधारा वाहताहेत आणि आपल्या जिवलग कृष्णाला भेटायला आसुसलेली, कुशीवर तळमळत राहणारी ती मीरा. त्याची भेट कशी घडू शकेल हे तिला उमगत नाहीये आणि मग किमान आपल्या एखाद्या सखीने काहीतरी करावं आणि कृष्णभेट घडवून आणावी यासाठी व्याकुळतेने विनवणारी ती विरहिणी आपल्या समोर जणू जिवंत होऊन जाते.

को है सखी मोरी सहेली सजनी पिया को आन मिलावै

मीरा को प्रभु कब रे मिलोगे मन मोहन मोहि भावै

कब बतलावै हो रमैय्या बिन नींद न आवे

नींद न आवे बिरहा सतावे प्रेम की आग जलावे

रमैय्या बिन नींद ना आवे..

लतादीदीच्या आवाजात मीरेची ही विरहवेदना अधिकाधिक गहिरी होत जाते. विश्वव्यापी होऊन जाते. तुमची माझी, सर्वांची होऊन जाते. प्रत्येक मीरेला तिचा कृष्ण भेटावा आणि कुणाच्याच नशिबी अशी तळमळ येऊ नये असंच वाटत राहते.

*****





8 comments:

  1. संत प्रवास ...सुंदर .मीराबाई पासून सूरवात केली छान .... शिवश्री 🙏

    ReplyDelete
  2. व्वा , सुंदर

    ReplyDelete
  3. सुंदर विश्लेषण!या विरहिणीत अजून एक सुंदर अंतरा आहे.त्याचीही दखल घ्यावी ही विनंती.

    बीन पिया ज्योत मंदिर अंधियारो
    दीपक दायन आवै
    पिया बिन मेरी सेज अलूनी
    जागत रैन बितावै
    पिया कब आवै
    हो रमया बीन निंद न आवै ||

    ReplyDelete
  4. अगदी छान सदर सुरू केला आहात सरजी मस्तच.

    ReplyDelete
  5. डॉ सौ पूजा कुलकर्णी5 August 2023 at 23:34

    वा
    रचना सुरेख आहेच, ती तुम्ही छान विस्तृतपणे सांगितली.

    ReplyDelete
  6. छान. 💐

    ReplyDelete
  7. वाह, खूप सुंदर लिहिलंय 💐🙏

    ReplyDelete