marathi blog vishwa

Thursday, 1 October 2015

दोन घोट पाण्यासाठी...!



आज हे सोबतचे छायाचित्र पहिले. टीव्हीवर बातमीसुद्धा पाहिली. लोक ज्याकडे तमाशा म्हणून पाहत होते, त्या या गोष्टीने मात्र मला कासावीस केलं. गेले कित्येक महिने लिहायला जराही वेळ मिळाला नव्हता. आज लिहिण्याची उर्मी अनावर झालीच त्याला हे चित्र कारणीभूत ठरलं.
काय आहे ही बातमी? म्हटलं तर साधीच. राजस्थान मधल्या एका गावात तहानेने व्याकुळलेला एक बिबट्या आला. त्याने एका घागरीतलं पाणी प्यायला त्यात तोंड घातले. मग त्यातच त्याचे तोंड अडकून पडले.
अगदी पंचतंत्राच्या गोष्टीत शोभेल अशीच ही कहाणी.
पण मग ती गावातली माणसे कशी वागली? त्यांनी त्याला पट्कन मोकळं केलं का?
आणि तिथेच तर खरा प्रश्न आहे.
जो माणूस स्वतःला विश्वातील सर्वात बुद्धिमान प्राणी समजतो त्या माणसाने त्या बिबट्याला त्या बिकट अवस्थेतून सोडवायला चक्क सहा-सात तास घेतले. काय करत होती ही माणसे मग?

ती गोष्ट घडल्याक्षणी सगळ्यात प्रथम माणसांनी आपले मोबाईल सरसावले. किती तरी जण जमले. कुणी फोटो काढतोय. कुणी वीडीओ शुटींग करतोय. कुणी त्या बिबट्याच्या असहायतेचा फायदा घेऊन त्याला काठीने टोचतोय. तर कुणी त्या बिचाऱ्याची शेपटी धरून ओढतोय. काय चाललंय हे???
खरंच आपण माणूस म्हणून उरलोय की आपलं सगळं माणूसपणच विसरलोय? ज्या प्राण्यांची घरं असलेली  ती जंगलं आम्ही वेगानं नष्ट करत सुटलोय, त्या प्राण्यांची काळजी घ्यावी अशी बुद्धी का होत नाही आम्हाला? खरंच आमच्यात माणूसपण उरलं आहे का?

या घटनेवेळी अपेक्षित होतं काय तर पट्कन माणसांनी त्या बिबट्याला हुशारीने मोकळे करून एखाद्या घरात कोंडून ठेवणे व नंतर वन विभागाद्वारे त्याला योग्य तिथे जंगलात सोडणे. अगदीच ते नाही जमलं तर वन-विभागाच्या लोकांना पट्कन बोलावून आणणे. मात्र त्या ठिकाणी वन-खात्याची माणसे यायलाच जणू सहा तास लागले. या कालावधीत ते भांबावलेले व तहानलेले जनावर मरून गेले असते तरी आम्हाला काय त्याचे? समजा त्या जनावराच्या जागी एखादा धुळीनं माखलेला गरीब माणूस असता तर काय केलं आम्ही? का चोर म्हणून त्यालाही मारून टाकलं असतं? पण आम्हाला काय त्याचं ? आमची तर करमणूक झाली नं? मस्त सोशल मिडियावर लाइव्ह अपडेट्स टाकता आले, आणि काय पाहिजे?

त्याच बरोबर बिबट्या पाण्याच्या शोधात घरात का घुसला त्याबद्दल विचार करणे आवश्यक होतं. ही बातमी  दाखवणाऱ्या मिडियानेही अशा काही गोष्टींचा उहापोह करायला हवा होता.
उदाहरणार्थ गावाबाहेर पाणवठे का असू नयेत? तिथे आसपासच्या प्राणीमात्रांना घोटभर पुरेल इतकं पाणी कसं जमा करता येईल याबाबत गावकरी मंडळी काय करू शकतात?. तसेच गावात प्राणी येऊ नयेत यासाठी काय करायला हवंय? आज आपली ही प्राणीसंपदा सुद्धा अस्तंगत होते आहे. त्याच्या संवर्धनासाठी काय उपाय करायला हवेत? असं काही चर्चेतून किंवा विशेष फीचर्स मधून सांगायला हवं होतं. त्यासाठी स्वतः पुढाकार घ्यायला हवा होता. मात्र ते झालं नाही. किंवा कुणी केलं असल्यास माझ्यातरी नजरेस आले नाही.
आज माणसांनी सगळीकडे कब्जा केलाय. जंगलं उध्वस्त होत आहेत. पाणीसाठे नष्ट होत आहेत. कुठेतरी कोकण व घाटमाथ्याजवळची धरणे तेवढी भरलेली. ती देखील अजून ४-५ महिन्यासाठीच. त्यातील पाणीसुद्धा आम्ही बंद पाईपातून शहरात आणणार. पुन्हा त्या पाण्यावर अनेकांचे हक्क. मग त्यावरून भांडणं व राजकारणाचे आखाडे रंगणार. एवढं झाल्यावर सुद्धा ते पाणी जास्त करून सर्व धनदांडगे, कारखाने यांनाच मिळणार. गरिबांना कशाला लागतंय पाणी? आणि गरिबांनाच जिथे पाणी मिळेनासं झालंय तिथे हे जंगलातले प्राणी म्हणजे किस झाड की पत्ती. त्यातही या गरीब बिचाऱ्या प्राण्यांना ना अशा गोष्टींविरुद्ध आवाज उठवता येत ना सार्वजनिक नळावर जाऊन आपल्या घरातली भांडी भरून आणून ठेवता येत..! टँकर वगैरे तर दूरच्या गोष्टी. काय करतील बिचारी जनावरं?
या वर्षी सर्वत्र दुष्काळाची विषण्ण छाया आहे. पण तरीही असं वाटतंय की भविष्यात काय वाढून ठेवलं आहे त्याचा अजून पुरता अंदाज आलेला नाहीये. पावसाच्या पाण्यासारखी अत्यंत मौल्यवान गोष्ट नीट जपून वापरायची अक्कल कधी येणार आहे आपल्याला?
सगळे मिडियातले लोक किंवा अन्य मोठे राजकारणी तावातावाने फक्त सांगणार की तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठीच घडणार आहे.... अरे पण ते घडू नये म्हणून तुम्ही काय करताय?

आपले ते थोर पाणीवाले बाबा राजेंद्र सिंहजी गेली अनेक वर्षे कंठशोष करतायत की महाराष्ट्रात्तील परिस्थिती भयानक आहे. इथे इतका पाऊस पडूनही जलसंधारण झाले नाहीये. अजूनही होत नाहीये. धरणांच्या मागे लागू नका. लहान लहान गाव पातळीवर कामं करून पाणी अडवा. राजेंद्रसिंहजी प्रमाणेच अण्णा हजारे, पोपटराव पवार अशासारखी मंडळी, काही ठराविक गावातून खरंच कार्यरत असणारी अनेक माणसे, संस्था यांच्याव्यतिरिक्त बाकी आपण सगळे काय करतो आहोत ?? की अगदी दुष्काळाची सावली आपल्या उंबरठ्यावर पडेपर्यंत आम्हाला जाग येणारच नाहीये?

इकडे तिकडे पाहिलं तर असं दिसतंय की आम्ही सगळे मस्त आपापल्या कामात, उत्सवी मौजमजेत किंवा मोबाईलमध्येच गुंतलो आहोत. आपल्या वागण्याला बेफिकीरीबरोबरच जे काही करायचे ते फक्त सरकारने करावं, आम्ही कर भरतोय ना?? अशा उद्दामपणाचीही थोडीशी झाक नक्कीच आहे.
मात्र याच महाराष्ट्रात गाव करील ते राव काय करील? अशी म्हण जन्माला आली होती हे बहुदा आजची पिढी विसरली असावी. त्यात त्यांचा काय दोष म्हणा? आम्ही त्यांना हल्ली मराठी शिकवतच नाही नं? मराठीतून शिक्षण म्हणजे कसं आउटडेटेड वाटतं नं??

इथे प्यायला पाणी नाहीये, शेतीला पाणी नाहीये, प्राणी-पक्षी यांना पाणी नाहीये तरी आमच्या जीवनात काही फरक पडणार आहे का? आम्ही पाणी कमी वापरायचे काही उपाय आपापल्या घरी अमलात आणणार का? आपल्या घरात, सोसायट्यामधून काही करणार का? काही अपवाद वगळता कुणी असं काही मनावर घेऊन करत नाहीये .
उलट  त्या अमक्या तमक्या मोठ्या बिल्डींगवाल्यांना /त्यांच्या स्विमीग पूलला पाणी मिळतंय, त्या पंचतारांकित हॉटेलला टबबाथ साठी पाणी मिळतंय मग मीच का काटकसर करायची? अशीच वृत्ती अनेक ठिकाणी दिसून येतेय.
आपल्या मस्तीतून, मिडियाच्या व सोशल मिडियाच्या आभासी दुनियेतून सगळ्यांना खडबडून बाहेर काढण्यासाठी काहीतरी चरचरीत घडायला हवंय हेच खरं.

-    सुधांशु नाईक (Nsudha19@gmail.com)

Saturday, 10 January 2015

“तिची” गोष्ट !

“रोजच आयुष्य जगताना संसारी बाईची तारांबळ होते. दुसऱ्याच्या सुखाचे क्षण वेचताना स्वतःकडे तिचं दुर्लक्ष होतं. कधीकधी सगळं काही नकोसं वाटू लागतं.  तरीही तिला सुट्टी क्वचितच मिळते आणि तिची एनर्जी कायम इतरांसाठीच खर्च होत राहते....”
पहाटेचे ५.४० वाजले. मोबाईलमधील घड्याळाचा गजर झाला. डोळ्यातील झोप आवरत ती उठून बसली. उठून बसतानाच पाठीतून सरसरत कळ गेली मस्तकापर्यंत. काल उशिरा दमून झोपताना पाठीला क्रीम/बाम लावायचं विसरलेलं आता पुन्हा जाणवलं. आज रात्री तरी याच्याकडून लावून घेऊ असं म्हणत तिनं विस्कटलेले केस नीट बांधले. बाजूला घोरत असलेल्या “त्या”च्या अंगावरचं पांघरूण नीट केलं. क्षणभर वाटलं तिला, “त्याच्या” कुशीत शिरावं. पण... दिवसभरातील पुढल्या कामाची लिस्ट आठवली.
स्वतःच्या इच्छेविरुद्ध ती उठली. गिझर चालू केला. तोंडात ब्रश ठेऊनच बाहेर आली. दूधवाला नुकतीच दुधाची पिशवी ठेऊन गेला होता. ते घेऊन घरात आली. तोंड धुवून मोठ्या लेकाला उठवायला मुलांच्या खोलीत शिरली.
रात्री अभ्यास केल्यावर तसाच पसारा करून दोन्ही मुलं झोपून गेली होती. तिने ती सगळी पुस्तकं नीट आवरून टेबलावर ठेवली. थोरल्याचा सकाळी ७.३० चा क्लास. त्याआधी त्याचं व धाकटीची स्कूलबस पावणे नऊ वाजता येणार. त्याआधी तिचं आवरलं पाहिजे. त्याप्रमाणे तिची गणितं सुरु रोज व्हायची. लेकाला उठवलं. त्याला तिथल्या बाथरूममध्ये ढकलून मग किचनमध्ये आली. दुधाच्या पिशवीतलं दूध पातेलीत ओतलं. ती पिशवी धुवून स्वच्छ करून ठेवली. मग घराचा केर काढला. नंतर ती बाथरूममध्ये शिरली. बाथरूम मध्ये शिरता शिरता तिच्या मनात विचार आलाच. “पूर्वी छोट्या घरात राहायचो तर एकच बाथरूम सगळ्यात मिळून वाटून घ्यावी लागे. आपला नंबर लागेपर्यंत शरीरेच्छा सुद्धा दडपावी लागे. आता किमान सकाळी बाथरूममध्ये तरी शांतपणा मिळतो हे ही नसे थोडके..!”
 
जरा वेळाने आवरून ती बाहेर आली. दूध गरम करायला ठेवलं. काल रात्रीच निवडून, कापून ठेवलेली भाजी फ्रीजमधून बाहेर काढली. ती कुकरला लावली. चपातीची कणिक मळून ठेवली. मग देवापुढं दिवा-उदबत्ती लावली. एव्हाना मुलगा आंघोळ उरकून आला. मग त्याला चहा लाडू आणि चिवडा असं काही खायला दिलं. भरभर आवरून तो कॉलेजला गेला. मग बेडरूम मध्ये जाऊन “त्याला” उठवलं. काल रात्री तो उशिरा टूरवरून आलेला. त्यामुळे जरा जास्त थकलेला. “तरी आजच्या मिटींगसाठी जायला पाहिजेच ऑफिसला” असं म्हणणाऱ्या त्याच्याशी बोलत असतानाच तिनं छोटीला उठवून तिचं आवरायला सुरुवात केली. तिला सगळं नीट, पटपट नाही आवरता येत. सारखं मागे लागून सांगून करून घ्यावं लागतं. नाहीतर मग उशीर होतो. स्कूलबसवाला मामा चिडून कधी तसाच निघून जातो. तसं आज नको व्हायला म्हणून तिच्या मागे मागे लागतं सगळं आवरून झालं. छोटीसाठी पट्कन तिनं २ चपात्या केल्या. डबा भरून ठेवला. तिला सकाळी फक्त होर्लीक्स घातलेलं दूध आवडतं. पण ते नेमकं संपलंय, आणि काल संध्याकाळी गडबडीत दुसरी बाटली आणायची राहून गेली हे आता लक्षात आलं. मग छोटीची कशीबशी समजूत काढली. आज “बाबासोबत मी पण चहा पिणार, sandvich खाणार” या अटीवर छोटीने तह मंजूर केला. इतक्यात तो आला आंघोळ करून. तिनं तोपर्यंत त्याचे कपडे, सॉक्स, टाय सगळं नीट जागेवर आहे नं हे नजरेनं पाहून घेतलं. शक्यतो तो रात्रीच सगळं नीट पाहून ठेवतो, पण काल रात्री उशिरा टूरवरून आला होता नं...!
 
 
तिनं त्याना ब्रेड-ओम्लेट दिलं. एकीकडे छोटीशी बोलत, एकीकडे हातात पेपर घेऊन तो  बसला चहा-नाश्ता करत.
छोटीचा चहा-नाश्ता संपेतो स्कूल बस आलीच. “चल गं, बूट घाल पट्कन. मामा जातील हं निघून.” असं सांगत तिचं दप्तर आपल्या खांद्याला लावून एका हातानं तिला जरा ओढतच ती लिफ्टमधून खाली गेली. तिला सोडून परत घरी आली. “हुश्श..” करत दोन मिनिटं बसून राहिली.
एव्हाना “तो” ऑफिसला जायला तयार झालेला.
“आज मला कदाचित उशीर होईल हं घरी यायला. परवाच्या कॉन्फरन्सचं ट्रायल प्रेझेन्टेशन करायचंय आज. तेंव्हा तुम्ही माझी जेवायला वाट नका पाहू, मी उशिरा येऊन जेवेन.”
“अरे, किती दगदग करून घेतोस, जरा वेळच्या वेळी येत जा नं घरी. आठवड्यात शक्यतो एकही संध्याकाळी घरी नसतोस तू. हल्ली रोज तुझं उशिरा येणं त्यांना नाही रे सहन होत.. मुलं आठवण काढतात रे नेहमीच संध्याकाळी अभ्यास करताना, जेवताना..”
“काय करू मग? नोकरी सोडून घरी बसू? माहितेय नं तुला बाहेरच्या जगात कसली जीवघेणी स्पर्धा चाललीये ती. एकदा आत शिरलं की मध्येच थांबता येत नाही. त्या लोकलमध्ये कसं आपण गर्दीच्या लोंढ्याबरोबर ढकलले जातो तसं जात राहायचं फक्त. आणि नोकरी सोडून काय करू? हे घराचं लोन कसं फेडायचं? भावनेच्या आहारी जाऊन कसं चालेल एवढं साधं कसं समजत नाही तुम्हा बायकांना??”
“असं टोकाला जाऊन काय बोल्तोयस? आणि मी पण छोटी नोकरी करून हातभार लावतेयच नं? तसं तुझ्यावाचून काही अडत नाही मुलांचं, पण त्यांच्या मनानं एकदा विचार करून बघ इतकंच म्हटलं मी..”
आता उगाच शब्दाला शब्द वाढवत बसलो तर उगाच दिवसभर मन कल्लोळत राहील हे समजून दोघांनी तो विषय बंद केला. तो म्हणाला, “तुला मी सोडू जाताजाता की तू नंतर जाणार स्कूटीवरून?”
त्याचा डबा त्याच्या हातात देत ती म्हणाली, “तू जा पुढे. मी नंतर येईन. माझी मैत्रीण, ती कालिंदी पण येणार आहे आज. कालच सुट्टीवरून आलीय ती परत.”
तो निघून गेला. अचानक समोरच्या कोपऱ्यात लक्ष गेलं तिचं. तिथे नटराजाची ४ फुट उंच मूर्ती होती. तिच्यावर कोळीष्टकं जमली होती.  (ती ओडिसी नृत्य करायची तेंव्हा तिला एका कार्यक्रमात ही मूर्ती भेट मिळालेली. एकेकाळी चांगल्या समीक्षकांनी तिला गौरवलेलं. पण “त्याच्या” प्रेमात पडली. लग्न झालं आणि या संसारात ती गळयाइतकी बुडून गेली. जेंव्हा पैसे कमवायला काही करायची गरज निर्माण झाली तेंव्हाही तिला नृत्य आठवलंच नाही..! तिनं तिच्या कॉमर्सशी संबंधित अकौंटंटची नोकरी तेंव्हा पत्करली.)
गेले आठवडाभर कामवाली बाई आलेली नाही. घरात सगळीकडे पसारा झालाय. कितीतरी गोष्टी कराव्याश्या वाटतायत पण वेळ पुरतच नाहीये. गेल्या काही वर्षातलं जगणं आठवलं. “त्या” च्या कर्तबगारीमुळे त्याला मोठ-मोठ्या ऑफर्स येत गेल्या. नोकरीत तो उच्च पदाला पोचला. सुरुवातीला वन बीएचके, मग टू बीएचके, गेल्या २ वर्षापूर्वी घेतलेलं हे थ्री-बीएचकेचं घर, गाडी, घरातील वस्तू यातच सुख-समाधान मानत बसलो. ज्या अपार्टमेंट मध्ये राहायचं तिथल्या इतरांप्रमाणे आपण प्रत्येक वस्तूच्या मागे लागायचं. कारण सगळ्याजणींच्यात चर्चा चाले नं. मग ते हप्ते, त्यासाठी दोघांना हवी अधिक पगाराची नोकरी...सगळं मेलं दुष्टचक्रच हे.. कसं आपण अडकलो?
अचानक तिला जाणवलं, कामावर जायची वेळ होत आलीये. चपाती-भाजीचे चार घास गडबडीत तिनं पोटात ढकलले. स्वतःचा डबा सोबत घेतला. दुपारी मुलगा घरी येईल त्याच्यासाठी टेबलवर जेवण झाकून ठेवलं.
सगळीकडचे लाईट बंद केले. दरवाजा लॉक करून ती बाहेर पडली.
मुख्य रस्त्यावर येण्यापूर्वीच ट्राफिक. त्रासून त्यातूनच वाट काढत निघाली. वाटेत कालिंदीला पिकअप करून ऑफिसला कशीबशी वेळेत पोचली ती. लेटमार्क अगदी थोडक्यासाठी वाचवला तिनं.
 
 
आपल्या टेबलावर येऊन बसली. पण काहीच करावंसं वाटेना. विलक्षण मानसिक थकवा आला तिला. गेले काही दिवस आयुष्यात एक उदास पोकळी निर्माण झाल्यासारखं उगाच वाटत होतं. आज तर सगळं नकोसं वाटू लागलंय. किती आयुष्याची फरफट करायची? धड मुलांशी बोलायला वेळ मिळत नाही, नवऱ्याची सोबत मिळत नाही आणि मिळाली की ती अगदी “तेवढ्या”पुरती. गेल्या ५-१० वर्षात सगळं झपाट्यानं बदललं खरं. पण आयुष्य का आणि कसं यंत्रवत झालं? एकेकाळी “त्याच्या”सोबत कॉलेज व नंतर नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसात छोट्याछोट्या गोष्टीत किती आनंद शोधायचो आपण. “युवा मंचद्वारे आजूबाजूच्या वाईट घटनांच्या निषेधार्थ रस्त्यावर शांततामय निदर्शनं करायचो आपण. मग आता का आपल्याला आनंदाचे क्षण का सापडत नाहीयेत? का आपल्याला समस्या दिसत नाहीयेत? आता कशाचंच काही कसं वाटेना झालंय? कशाला माणूस म्हणायचं स्वतःला? काय करतो आपण, मनसोक्त माणसासारखे जगायला? प्रश्न...प्रश्न..प्रश्न. या प्रश्नांनी तिचं डोकं भंडावून सोडलं.
इतक्यात बॉसने तिला बोलावल्याचा निरोप आला. ती समोरच्या क्युबिकलकडे गेली.
“ दोन दिवसानंतर हेड ऑफिसमध्ये ऑडीट असणार आहे. त्यासाठी तुम्ही या ऑफिसचे सर्व फायनान्शियल डिटेल्स, इतर रिपोर्टस  नीट तयार करून आजच तिकडे पाठवून द्या..” बॉसने सांगितलं. मग ती पूर्ण कामात बुडून गेली. दुपारचा डबासुद्धा तिनं तिथं टेबलावरच संपवला.
मध्येच मुलाला फोन करून तो घरी आल्याची खात्री करून घेतली. मुलीच्या शाळेत फोन केला. तिच्या प्रगतीची चौकशी केली. या सगळ्या खरंतर तिच्या रोजच्या दिवसभरातील गोष्टी. पण अशा सगळ्याचाच आज तिला मनस्वी तिटकारा आला. एका भयंकर न्युनगंडानं तिचं मन झाकोळून गेलं. येत्या १-२ दिवसात हे वर्ष संपून जाईल. कितीही समस्या असल्या समाजात, तरी ३१ डिसेंबर जोरात पार्ट्या होतील सगळीकडे. मग पुन्हा नवीन वर्ष सुरु होईल. लोकं अशीच डोळे मिटून धावत राहणार.पण आपल्या आयुष्याचं काय? ते असंच राहणार की.. शी..काय झालंय आपल्या आयुष्याचं हे? तिला प्रथमच स्वतःचीच घृणा वाटू लागली.
संध्याकाळी घरी परतताना वाटेत तिनं स्कूटी सर्विसिंगला दिली. त्याला सकाळी ९ पर्यंत ती घरी आणून द्यायला सांगितलं. आणि मग ती चालत चालत येऊ लागली. आज नवरा घरी उशिरा येणार, इथून पुढे जाऊन स्वैपाक करायचा, तो रात्री उशिरा जेवल्यावर मग कधीतरी झोप मिळणार असा विचार करत चालताना तिला अधिकच थकवा आला. पण करणार काय ? घरात आणायच्या वस्तूंची यादी आठवली. वाटेत त्या वस्तू, दुसऱ्या दिवसासाठी भाजी, मुलीचं होर्लीक्स असं काही काही घेत-घेत परत येताना तिला जरा उशीरच झाला. घरी येऊन पहाते तर आज नवरा चक्क तिच्या आधीच आला होता..!
मुलांना काही खायला देऊन त्यानं खेळायला पाठवलं होतं. आणि तो स्वतः संध्याकाळी मस्त “राजमा मसाला”  बनवायच्या तयारीला लागला होता.
ती सोफ्यावर बसली. हातातल्या पिशव्या तशाच ठेवल्या. तो जवळ आला. म्हणाला “दमलीस ना?”.
आणि ती कोसळली. अक्षरशः गदगदून रडूच आलं तिला.
 
तो गडबडला. त्यानं तिला जवळ घेतलं.
“अगं, काय झालं? कुणी काही बोललं का? ऑफिसमध्ये काही झालं का? गप,गप..रडू नको. डोळे पूस बघू आधी. हे पाणी पी...”
भावनावेग संपून गेल्यावर ती सावरली.
“नाही रे. कुणी काहीच नाही बोललं. मलाच सगळं नकोसं वाटू लागलंय. किती तारांबळ करून घ्यायची रे आपण.. किती बेकार बनलंय रे हे रोजचं जगणं. एका छताखाली राहतो आपण म्हणून फक्त कुटुंब म्हणायचं का? महागाई वाढलीय, गरजा वाढल्याहेत हे सगळं खरं. पण आपण या सगळ्यात अमाप वेगानं वाहून चाललोय असं वाटू लागलंय. आणि इतके दिवस प्रवाहासोबत जातोय असं वाटत होतं. पण आता वाटतंय आपण या प्रवाहाच्या वेगाने भरकटत तर नाही न?  भयानक वेगानं दुसरीकडंच कुठं पोचू असं वाटू लागलंय. धीर सुटलाय आणि दमलेय मी आता... फक्त माझंच नव्हे तर तुझंही हल्लीच वागणं असं आहे हे जाणवलंय का तुला? भीती वाटतेय रे आता सगळ्याची...” तिला पुढं काही बोलताच येईना.
त्यानं शांतपणे तिला कुशीत घेतलं. म्हणाला, “हो गं, जाणवलंय मला हे केंव्हाच. पण म्हणून काय करूया? सगळं सोडून कुठं जायचं? कसं राहायचं? या प्रवाहात वाहतोय आपण हे खरंच. पण धीर का सोडायचा? आणि धीर सोडला तर आपणच बुडून जाण्याची भीती आहे गं. त्यापेक्षा डोकं शांत ठेऊ. या वाहताना सोबतचे काठ दिसत राहतात दोन्ही बाजूचे. एखादं उत्तम ठिकाण सापडेल नं आपल्याला. तिथं सावकाशपणे बाजूला यायचं. पण तोपर्यंत प्रवाहाला आपल्यावर शिरजोर होऊन नाही द्यायचं. सगळं ठीक होणारेय. काही काळजी करू नकोस.. उठ, तोंड धुऊन ये स्वच्छ. मी भाजी आणि कोशिंबीर करतो. तू आज मस्त पराठे कर. इतक्यात मुलं येतीलच...”
 
तो असं म्हणेपर्यंत मुलं आलीच. “आई...” म्हणत तिला बिलगली.
“बाबा, यावर्षी ३१ डिसेंबरला काय करणारेय आपण, आपण कुठं पार्टीला जायचं?” मुलानं विचारलं.
“यावर्षी नो पार्टी. आपण ट्रीपला जाणार सगळे. उद्या रात्री निघायचं. मस्त जंगल भ्रमंतीला. मी आज रिझर्वेशन करूनच आलोय. आणि “हिच्या” बॉसला गपचूप पटवून मी सुट्टी पण मंजूर करून घेतलीय. सरप्राईज आहे ना? त्यामुळे आता आपण चार दिवस जंगलात मस्त तंबूत राहायचं. अगदी मोबाईलची रेंजसुद्धा नाही अशा ठिकाणी.” ती आश्चर्यानं त्याच्याकडं पहात राहिली...!
 
तो पुढं म्हणाला, “ या निसर्ग भ्रमंतीने आपण नवीन वर्षाची वेगळीच सुरुवात करायची. आणि तुम्हा सगळ्यांसाठी मी नवीन वर्षाचा संकल्प पण सुचवणार आहे. तोही बघा तुम्हाला आवडेल, पण नीट करायचं हं सगळं. या हिरोला टेनिस खेळायला आणि नाटकात काम करायला आवडतं ना, मग त्याने त्यापैकी एक काहीतरी शिकायला सुरु करायचं. छोटीला ओरिगामी आणि इकेबाना पुष्पसजावट करायला आवडते, तर तिने आता जपानी भाषा पण शिकायला सुरुवात करायची. इथे आपल्या गावात नुकतेच जपानी, जर्मन व फ्रेंच भाषा शिकायची सोय झालीय त्याचा फायदा घ्यायचा. आणि आमच्या बायकोने पुन्हा “ओडिसी” नृत्याचा सराव-अभ्यास सुरु करायचा आणि या वर्षअखेरीपर्यंत नोकरीतून हळूहळू बाहेर पडायचं. करणार नं तुम्ही सगळे ?”
“ आम्ही करू रे...पण  बाबा तू काय करणारेयस ते का नाही सांगितलंस ?”
“माझं काम सुरूच राहणारेय. आणि आज मला २ चांगले सहाय्यक अधिकारी मिळालेत. त्यामुळे मी आता रोज लवकर घरी येणार आणि रात्रीची भाजी-आमटी मी करणार आणि तुमच्या सोबत थोडा जास्त वेळ घालवणार...!”
“हेय्य..” मुलं आनंदानं चित्कारली. उत्साहानं घरातलं वातावरण बदलून गेलं.
पट्कन ती उठून निघाली.
“कुठं चाललीस गं आई” मुलीनं विचारलं.
“ट्रीपची तयारी नको का करायला.. हा तुमचा बाबा, अगदी शेवटच्या क्षणी सांगणार. कधी भरायचं सामान सगळं?”
जेवण, सामानाची बांधाबांध, मग भांडी आवरणे हे सारं होईपर्यंत उशीर झालाच. मुलांना जंगलात राहिलेल्या जिम कॉर्बेटची गोष्ट सांगता सांगता तोही तसाच झोपून गेला. जरा वेळाने ती झोपायला आली. अंथरुणावर बसली न आठवलं की मुलांच्या कानटोप्या, सॉक्स हे सारं भरायचं राहिलं. परत उठली. कपाटातील त्या वस्तू शोधून काढून सामानात ठेवल्या. मग झोपयला आली.
 
लाईट बंद करून झोपताना पाठीतून कळ आलीच.
“सगळ्याच्या नादात आजही दुखण्याकडे पाहायचं राहूनच गेलंय, उद्या सकाळी तरी याच्याकडून पाठीला क्रीम लावून घ्यायला हवं...” मिटल्या डोळ्यांनी झोपेच्या अधीन होताना हाच विचार तिच्या मनात पुन्हा येऊन गेला..!
-  सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)

Tuesday, 16 December 2014

चिमण्यानो, परत फिरा, घराकडे...

लहान मुलींच्या लैंगिक शोषणाबद्दल जागतिक अहवाल असं सांगतो की किमान ६०% प्रकरणातील पुरुष हा त्या मुलीच्या परिचयाचा असतो. दुर्दैवाने हे कटू सत्य आहे की, स्वतःला प्रगत समजणाऱ्या तथाकथित पांढरपेशा समाजापासून अडाणी व अशिक्षित समाजापर्यंत सर्व थरातून मुलीचे लैंगिक शोषण हे जवळच्या ओळखीच्या माणसाकडून होते. हे थांबवायला हवं.


सुमित्रा. नेपाळ मध्ये उच्च माध्यमिक शाळेत शिकणारी. आई-बाप मोल मजुरी करणारे. घरी तिच्या व्यतिरिक्त आणि ३ बहिणी २ भाऊ. दहावी झाल्या-झाल्या बापानं सांगितलं, “पोरी, बास बाई आता तुझं शिक्षण. यापुढे तुला शिकवायला पैसे नाहीत माझ्याकडं. चार कामं कर. तेव्हढंच चार पैसे मिळतील, तुझं लगीन होईपर्यंत.” पण तिला शिकायचं होतं. मोलकरणीसारखं न राबता मोठ्या पगाराची नोकरी करायची होती. छान हौसे-मौजेत राहायचं होतं. मग आई-बापाशी वादावादी सुरु झाली.

त्यातंच एक दिवस मुंबईतून तिची मामे-बहिण गावाकडे आलेली. तिचं नटणं-मुरडणं, झकपक कपडे याची भूल पडली तिला. अल्लड कोवळं भिरभिरतं वय ते. बहिणीच्या बोलण्याला भुलली. चक्क नेपाळमधून पळून आली मुंबईला तिच्याबरोबर. बहिणीच्या घरात काही दिवस राहिली. तिचा नवरा बाहेर काही काम करे. एकदिवस त्यांच्या ओळखीची एक बाई आली. बहिणीने सांगितलं हीच तुला काम देईल, जा. “काही दिवस छोट्या चाळीत धुणी-भांडी करायचं काम कर. हजार रुपये मिळतील महिन्याचे. मग हळू हळू नोकरी शोध,” असं ती बाई म्हणाली.

सुमित्रा तिच्या घरी पोचली.

इंद्रधनुषी स्वप्न पाहणाऱ्या तिच्या फुलपंखी आयुष्यात मग अक्षरशः नरकयातना आल्या. कदाचित नरकयातना कमीच असतील..! त्या वेश्यावस्तीत या कोवळ्या मुलीवर एका दिवसात किती बलात्कार व्हावेत त्याची गणतीच नाही. कित्येक महिन्यानंतर अगदी योगायोगाने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने तिची व अन्य ५-६ नेपाळी युवतींची सुटका झाली. या संस्थेतून त्या संस्थेत असं करत करत त्यांना सुखरूप नेपाळला पोचवले गेले. मात्र तिच्या घरच्यांनी तिला घरी घेतले नाही. आता ती नेपाळच्या प्रसिद्ध अशा “माईती फौडेशन” च्या पंखाखाली सुखरूप आहे.

हे असं रोज सर्वत्र का घडतंय याचा आपण विचार करणार? कधी?

वेश्या व्यवसाय हा जगात नवीन नाही. पण वेश्या व्यवसायात लहान मुलामुलींना अडकवण्याच्या प्रकारात गेल्या काही वर्षात जबरदस्त वाढ झाली आहे. नेपाळसह भारत, बांगलादेश, थायलंड, फिलिपिन्स असे आशियाई  देश आज जगभरात अत्यंत कुप्रसिद्ध आहेत ते या child Trafficking साठी. हजारो लहान लहान मुली या देशातून परदेशी पाठवल्या जातात. यापैकी कित्येकींना जबरदस्तीने पकडून, अपहरण करून तर कित्येकींना गोड बोलून फसवून जगभर पाठवले जात आहे. कधी कुणाची तरी नातेवाईक मुलगी यात फसवली जाते तर कधी अनोळखी मुलीचे अपहरण करून तिला त्यात अडकवले जाते. असे फसवणाऱ्या लोकांच्यात त्या मुलीच्या आई-बापापासूनचे अनेक नातेवाईक सामील आहेत. प्रत्येकाची कारणे फक्त वेगळी. जगभरच्या तमाम पुरुषांच्या विकृत वासनातृप्तीसाठी केवळ या मुलीच नव्हे तर लहान लहान मुलेसुद्धा राबवली जात आहेत. हे सर्व भयानक आहे. सामान्य माणसाच्या विचारापलीकडले आहे.

मध्यंतरी एका कार्यक्रमात चर्चा सुरु असताना एक प्रतिष्ठित गृहस्थ म्हणाले, “वेश्या वस्ती आहे म्हणून आमच्या घराच्या मुली-बाळी सुखरूप आहेत”. त्यांचे वक्तव्य अनुदार आहेच कारण आपल्या सुखासाठी जो समाज दुसऱ्याच्या आयुष्याचा नरक बनवतो, तो माणूस नव्हेच. त्यामुळे त्यांच्या विचारांना तीव्र विरोध केला गेलाच. मात्र त्याही पुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते की दुर्दैवाने आपल्या मुली-बाळी सुखी राहण्याचे दिवसही आता झपाट्याने बदललेत. आज माजोरी पुरुषत्व जे समाजात थैमान घालतेय ते फार फार चिंताजनक आहे आणि यावर वेळीच उपाय केले नाहीत तर परिस्थिती अक्षरशः हाताबाहेर जाणार हे नक्की.

सगळ्यात मोठी चिंता वाटते ती मिडियाची. इतक्या उथळपणे या गोष्टीची चर्चा केली जाते की त्यामुळे सत्ताधीशांवर दबाव निर्माण होतंच नाही. अपवाद “निर्भया” सारख्या बलात्कारांच्या काही प्रकरणांचा. समाजातील प्रतिष्ठित लोकं “मेणबत्ती मोर्चा” काढून प्रचंड काहीतरी केल्याचं समाधान मिळवतात. तरीही ठराविक दिवसांनी अशा अत्याचारांच्या बातम्या येतंच राहतात. टीव्हीवर थोर थोर विचारवंत तावातावाने फक्त चर्चा करतात. पेपरची पाने लेखांवर लेख छापून भरली जातात. पाने नंतर कचऱ्यात टाकली जातात. टीव्हीचे च्यानेल बदलले जातात. पुन्हा सगळं जैसे थे. पुढे काय ? काही नाही. पुन्हा येरे माझ्या मागल्या...!

आज तथाकथित सुखमय जीवनाची झिंग चढलेल्या आपल्या मनांना जाग कधी येणार? या समस्यांच्या मुळाशी आपण कधी पोचणार?


एखाद्या घरातील छोटी मुलगी आपल्या घरी /शाळेत किंवा ओळखीच्या माणसांच्या घरी निरागसपणे खेळत असते. तिला अजून सेक्स काय हे माहितीही नसतं. शरीर व मन त्यासाठी तयार झालेलं नसतं. अशावेळी आपल्याच परिवारातील, आसपासचा ओळखीचा कुणीतरी, शाळेतला कुणीतरी किंवा एखादा अनोळखी माणूसही त्या मुलीला ( किंवा मुलालासुद्धा) काही आमिष दाखवून चक्क आपले खेळणे बनवतो. स्वतःची विकृत भूक भागवून घेतो. त्या धक्क्यातून जर जगली वाचलीच तर ती मुलगी आयुष्यभर तो तसला प्रसंग विसरू शकत नाही. अशा हजारो मुली मग एकतर मोडून पडतात व आयुष्य संपवून घेतात किंवा वेश्यावस्तीत आणून पोचवल्या जातात. हे कितीही भयानक असलं तरी दुर्दैवाने आज वास्तव बनलंय.

“मग काय करायचं? आपल्या मुलांना घरात कोंडून ठेवायचं का ?” असं कदाचित उद्विग्नपणे विचारावं असं तुम्हालाही वाटेल. पण रागाच्या भरात, भावनेच्या भरात वागून हे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी स्वतःपासून काही कृती सुरु करायला हवी. बहुसंख्य मुलांच्या बाबतीत “बालपणीचा काळ सुखाचा” असतो आणि तो तसाच “सुखाचा” असावा यासाठी मुलांचे आईबाप व शिक्षक हेच अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतात. आपल्या मुलांच्या आवडी-निवडी, हट्ट पुरवताना त्यांना बऱ्या-बाईट गोष्टींची जाणीव करून देणं अतिशय गरजेचं बनलं आहे.

लहान मुलांचं शोषण करणारी माणसे ही काही आकाशातून पडत नाहीत. त्यांना गोष्टीतल्या राक्षसासारखे जास्त हात, शिंग असलं काही नसतं. ती तुमच्या आमच्यासारखीच माणसं असतात फक्त त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटलेला असतो. इथे थोडंसं विज्ञानाचा आधारसुद्धा जरुरी आहे. मुळात स्त्री आणि पुरुष यांची शारीरिक रचना अतिशय भिन्न आहे. त्यांची मानसिकता, त्यांच्यातील हार्मोन्स (संप्रेरके) ही भिन्न आहेत. त्यामुळे चित्रपटातील एखादं अश्लील गाणं किंवा मासिकातले फोटो पाहून जसं एखादा पुरुष उद्दीपित होऊ शकतो आणि बलात्काराची इच्छा बाळगतो तसं दुसरा पुरुष करेलच असं नाही. तो अनेकदा दुर्लक्ष करून मोकळा होईल. किंवा आपल्या कायदेशीर जोडीदाराशी संबंध ठेऊन मनातील कामभावनेचा निचरा करेल.


प्रत्येक माणसाच्या मनातील “केमिकल लोचा” काही वेगळी समीकरणं बनवतो. आणि यामध्ये मेंदूचा मोठा सहभाग असतो. म्हणूनच सर्व मुलांना जर त्यांच्या उमलत्या वयात या सर्वांचं योग्य शिक्षण / लैंगिक शिक्षण मिळालं तर मोठेपणी त्यांच्या प्रतिक्रिया चांगल्या असू शकतात. त्या तशाच चांगल्या हव्यात. अन्यथा माणूस म्हणून त्याची गणना कशी करायची? “आहार, निद्र, भय आणि मैथुन” या चार आदिम भावना सर्व प्राण्यांमध्ये असतातच. मात्र माणसाला त्यापुढे जाऊन संवेदनशीलता, परस्पर सहकार्याची आणि समतेची जाणीव, बंधुत्व अशा प्रेरणांचे वरदान मिळाले आहे. मात्र या प्रेरणा लहापणापासून विकसित व्हाव्या / कराव्या लागतात. त्या जाणीवा तशा विकसित झाल्या तरच त्याच्या मध्ये माणूसपण निर्माण होतं. आणि मगच त्याच्याकडून आपण नेहमी चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा ठेऊ शकतो.

उदाहरण घेऊ एखादं. लहान मुलांना मुळात नवीन समजून घ्यायची उत्सुकता जास्त असते. ती विचारतातच तुम्हाला, “माझा जन्म कसा झाला? लग्न म्हणजे काय? माझी मैत्रीण अमुक तमुक आहे, तिच्याशी माझं लग्न होईल का? आम्हालापण छान बाळ होईल का? इ.इ.” त्या प्रश्नांची त्यांना समाजातील अशा भाषेत उत्तर दिली पाहिजेत. इथे काहीतरी बोलून त्यांना टाळू नये. तसं टाळण्याने मग काय होतं, की मुलं स्वतःहून उत्तर शोधू पाहतात. आणि जर अशावेळी त्यांच्या हातात अयोग्य पुस्तकं, चित्रपट, ब्ल्यू फिल्म्स असं काही सापडलं की मग त्या मुलाची विचारक्षमता त्या पद्धतीने विकसित होते.

याउलट त्या मुलाच्या आई-वडिलांनी किंवा शिक्षकांनी जर त्याला, “एक ठराविक वयाचा टप्पा गाठल्याशिवाय लग्न करता येत नाही. त्यासाठी आधी खूप शिकायला लागतं. स्वतः कमवावे लागते. प्रत्येक मुलाने मुलीचा, व मुलीने मुलाचा आदर केला पाहिजे. एकमेकांचं स्वातंत्र्य जपलं पाहिजे. आज शाळकरी असणारी मुलगी उद्या जशी कुणाची तरी आई असणार आहे, तसाच मुलगा सुद्धा कुणाचा तरी बाप असणार आहे” असं समजावलं तर त्याच्यावर अधिक योग्य संस्कार होऊ शकतात. तसंच प्रत्येक मुलगी ही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, तिच्या मनाविरुद्ध आपण वागायचं नाही हे शिकवलं पाहिजे. त्यामुळे ते मूल “पुरुषत्वाचा” बुरखा बाजूला करून माणूस म्हणून जगू शकेल. यामुळे मग ज्या-ज्यावेळी त्याच्या सभोवतीची परिस्थिती त्याच्या मनात कामवासना निर्माण करेल, तेंव्हा त्याची “सत्सद्विवेकबुद्धी” त्याला वाईट कृती करण्यापासून रोखत राहील.

आज सुदैवाने सेक्स-एज्युकेशनची मोकळेपणाने चर्चा होते. मात्र हल्ली मुलांचं लवकर वयात येणं लक्षात घेता हे शिक्षण वयाच्या १०-१२ व्या वर्षापासून सुरु व्हायला हवे. मुलींना पाळीविषयी, स्वतःच्या अवयवांविषयी शास्त्रीय माहिती दिली पाहिजे. आजकाल भरपूर प्रकारचं शिक्षण, त्यानंतरची नोकरी- व्यवसायातील स्पर्धा यामुळे मुलांचं लग्नाचं वय पुढे गेलं आहे. त्यामुळे सुरक्षित लैंगिक संबंध, कामभावनेचा नैसर्गिक निचरा करणारे हस्तमैथुनासारखे उपाय सांगितले पाहिजेत. कामभावनेचा निचरा करण्याचा “बलात्कार” हा मार्ग नव्हे हे प्रत्येक मुलाला शिकवलं गेलंच पाहिजे. तरच प्रत्येक स्त्री कडे भोगवस्तू म्हणून पाहण्याची पुरुषी वृत्ती कमी करता येईल.

अर्थात हे सर्व आदर्श परिस्थितीचे चित्र आहे. आणि समाजातील पुरुष-प्रधान संस्कृती पाहता सर्व मुलांना असं उत्तम शिकवलं जाईल अशी अपेक्षा करणं वास्तवाला धरून नाहीच. मात्र सर्वत्र आई-वडील आणि शिक्षकांसाठी कार्यशाळा (workshops) घेतली गेली तर काहीप्रमाणात सुधारणा नक्कीच होऊ शकते.

लहान मुलींच्या लैंगिक शोषणाबद्दल जागतिक अहवाल असं सांगतो की किमान ६०% प्रकरणातील पुरुष हा त्या मुलीच्या परिचयाचा असतो. दुर्दैवाने हे कटू सत्य आहे की, स्वतःला प्रगत समजणाऱ्या तथाकथित पांढरपेशा समाजापासून अडाणी व अशिक्षित समाजापर्यंत सर्व थरातून मुलीचे लैंगिक शोषण हे जवळच्या ओळखीच्या माणसाकडून होते. हे थांबवायला हवं. कधी एखादा काका, चुलत भाऊ, मामा, मामेभाऊ, भावाचा मित्र आणि कित्येक प्रसंगात प्रत्यक्ष बाप आपल्या मुलीचं शोषण करताना सापडला आहे. ती लहान मुलगी या सगळ्या आपल्या आधी जन्मलेल्या माणसांची मानसिकता कशी बदलवू शकेल? ते अशक्य आहे. त्यामुळे कोणत्याही लहान मुलांच्या बाबतीत काही वाईट घडू नये म्हणून आपणच काळजी घ्यायला हवी.

 

प्रत्येक घरातील आईला वाटत असतंच की शाळा, क्लास किंवा कॉलेजसाठी बाहेर गेलेली आपली मुलं सुखरूप घरी परत यावीत आणि मग प्रत्येक संध्याकाळी या गाण्याच्या ओळी नेहमीच काळजावर सुरी चालवून जातात;

दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर,
अशा अवेळी असू नका रे आईपासुन दूर
चुकचुक करिते पाल उगाच, चिंता मज लागल्या...

या चिमण्यांनो, परत फिरा घराकडे अपुल्या, जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या....

  लहानग्या मुलांना भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागू नये म्हणून काय केलं पाहिजे हे आता आपण शिकवलंच पाहिजे. त्यासाठी पुढील काही छोटे छोटे उपाय आपण निश्चित अंमलात आणू शकतो;

१.      प्रत्येक वेळी आपल्या लहान मुलीला कोणत्याही वेळी, कोणत्याही पुरुषासोबत कधीही एकटे सोडू नका. समजा आई स्वैपाकात मग्न आहे आणि घरातील शाळकरी मुलगी काका, मामा, आजोबा किंवा शेजारचे काका यांच्यासोबत आहे, तरी अधून मधून तिच्याकडे लक्ष द्या. ते दोघं ज्या खोलीत असतील तिथे चक्कर मारा.

२.      आपल्या मुलीला तिच्या अवयवांची माहिती करून द्या. तसेच तिला असे सांगा की, “जर कुणी काका- मामा किंवा अन्य मुलगा तिच्या छातीवरून, पाठीवरून, मांड्यावरून हात फिरवत असेल, तिच्या शू च्या जागी मुद्दामहून हात लावत असेल, तर त्याला तसे मुळीच करू देऊ नका”. सतत सांगूनही तो माणूस ऐकत नसेल तर त्यानं असं करताच “अगदी मोठ्याने ओरडायचं, कुणालातरी बोलवायचं” असं मुलींना सांगा. त्यामुळे मुलगी जेंव्हा अशी मोठ्याने ओरडेल तेंव्हा तिची आई-बाप, शिक्षक किंवा अन्य कुणी पट्कन तिथे येऊ शकेल आणि त्यामुळे एखादा कटू प्रसंग टाळता येईल. आपली मुलगी जेंव्हा अशी मोठ्याने ओरडेल, किंवा अन्य कुणी मुलगी कुठेही अशी ओरडताना आढळली, तर हातातले काम सोडून प्रथम तिच्याकडे जा. तिला काही त्रास नाही ना हे विचारा.

३.      अनेकदा मुलं सांगतात, की मला अमुक एक काका आवडत नाहीत. ते त्रास देतात. तेंव्हा अशा गोष्टी हसण्यावारी नेऊन त्याकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित तो माणूस काय करतोय हे मुलांना समजत नसेल. त्यांना सांगता येत नसेल.

४.      अनेक घडलेल्या घटना असं सिद्ध करतात की लहान मुलांनी आपल्या काका, मामा, तर कधी प्रत्यक्ष बापाविरुद्ध आईकडे किंवा अन्य कुणा मोठ्या माणसाकडे वारंवार तक्रार केली होती. ते आपल्याशी नीट वागत नसल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले आणि त्यातून मग पुढे अजून जास्त भयंकर प्रकार घडत गेले.

५.      अनेक घरात मुलं सांभाळायला बाई ठेवलेली असते. तिथे अशा घटना घडल्या आहेत की ती बाई किंवा घरात येणारा तिचा प्रियकर हेसुद्धा मुलीचं/ मुलांचं शोषण करतात. आणि घाबरलेली मुलं रात्री आपल्या आई-बापाला काही सांगू शकत नाहीत. त्यामुळे आपल्या घरात असं मुलं सांभाळायला कुणी असल्यास कधीतरी अचानक घरी या. आपल्या मुलाला नीट सांभाळलं जातंय का याची खात्री करा.

६.      आपल्या मुलांना सांगा की कोणत्याही ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीकडून घराबाहेर आईस्क्रीम, चौकलेट, खाऊचे पदार्थ घ्यायचे नाहीत. जरी त्यांनी दिले तरी आधी घरी आईला किंवा शाळेत शिक्षकांना दाखवल्याशिवाय खायचे नाहीत हे सतत रोज सांगा. त्यांच्या मनावर कोरलं जाईपर्यंत सांगत राहा. कधी गोष्टीतून सांगा.

 “एका मुलीनं असं दिलेलं आईस्क्रीम खाल्लं, मग तिला झोप आली. त्यानंतर जेंव्हा तिला जाग आली तेंव्हा तिला दुसऱ्या गावी नेऊन तिथे तुरुंगात ठेवलं होतं. नंतर तिला भिकारी बनवलं” अशी एखादी गोष्ट त्यांना जास्त परिणामकारक रित्या समजू शकेल. त्यामुळे असा खाऊ देणाऱ्यापासून आपली मुलगी कायम सतर्क राहील.

७.      आपल्या नात्यातील, ओळखीतील कुणी व्यक्ती, रिक्षामामा, स्कूल बस चा ड्रायव्हर, शाळेतील शिक्षक, शेजारील मुलगा असं कुणीही आपल्या किंवा दुसऱ्यांच्या मुलांशी चाळे करताना आढळले  तर त्यांना स्पष्ट शब्दांत समज द्या. जर फरक दिसला नाही तर सरळ पोलिसात तक्रार दखल करा.

८.      आपल्या मुलांची शाळा, परिसरातील शाळा या ठिकाणी अशा विषयांवर कार्यक्रम केले जातील, मुलांना जागृत करणारे कार्यक्रम केले जातील यासाठी प्रयत्न करा.

असे अनेक उपाय प्रत्येकाला सांगता येतील. अंमलात आणता येतील. प्रत्येकाने आपल्याला शक्य होईल असं योगदान दिलं पाहिजेच. पण याचबरोबर जर कुणा लहानग्याचं आयुष्य वाईट चक्रात सापडलं असेल तर त्यालाही तिथून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

मग लहान मुलांच्या लैंगिक शोषणाची ही अत्यंत भयानक गोष्ट आपण निश्चित रोखू शकू. आजची लहान मुलं पुढे जाऊन देशाचं भविष्य घडवणार आहेत त्यामुळे त्यांचं वर्तमान सुरक्षित असेल आणि त्यांना प्रगतीसाठी चांगलं वातावरण मिळेल याची आपणच काळजी घेतली तर त्यांनाही “हे जीवन सुंदर आहे” असं निश्चित असं वाटू लागेल...!

-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)