marathi blog vishwa

Sunday, 4 October 2020

जादूची पेटी : किस्सा 7 ज्येष्ठ व्यक्तींच्या अशाही कथा

#जादूचीपेटी या उपक्रमांतून गेले तीन आठवडे विविध लोकांशी बोलतो आहे. अनेकांच्या खरंच गंभीर समस्या ऐकताना मलाच शब्द सुचेनासे होतात. मग जमेल त्या मार्गानं त्यांना इतरांशी जोडून द्यायचे प्रयत्न करतो. ज्यांच्या समस्या या मुख्यत: मानसिक दडपणाच्या आहेत, कोरोनाच्या भीतीबाबत आहेत त्यांना माझ्या शब्दांचा दिलासा देत रहातो.
ज्या समस्या मलाही अंतर्मुख करतात त्यात ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या समस्या सर्वात जास्त प्रमाणात आहेत.  9833299791 या नंबरवर ते काॅल करतायत, संवाद साधतायत. ज्येष्ठ नागरिकांबाबत दोन गोष्टी गेल्यावेळी सांगितलेल्या, आजही दोन अगदी परस्परविरोधी किस्से..

#जादूचीपेटी #ज्येष्ठनागरिक #07

यातली एक गोष्ट तर माझ्या परिचयातील व्यक्तीबाबतची. माझा एक स्नेही व त्यांची पत्नी ( त्यांची नावं अनिकेत व अश्विनी आहेत असं समजूया) माझ्याशी बोलत होते त्यांच्या वडिलांविषयी. 
अनिकेत एमआयडीसीतील एका नामवंत कंपनीत मॅनेजर आहे तर अश्विनी एका मोबाईल कंपनीच्या आॅफिसात पार्ट टाईम 5,6 तास काम करते. घरी त्याचे वडील एकटेच व या दोघांचा 7वीतला मुलगा. असं मर्यादित कुटुंब. मात्र सततच्या भांडणांनी तणावात धुमसतय घर. कारण अनिकेतचे बाबा. त्यांनी एका कंपनीत पुण्यात अनेक वर्ष अॅडमिन आॅफिसरची नोकरी केलेली. मग रिटायर्ड झाल्यावर सगळे कोल्हापुरात दाखल झालेले. अनिकेतनं स्वत:च्या कर्तृत्वावर आपलं स्थान मिळवलेलं. वडिलांचा फारसा सपोर्ट नाही. त्यात त्यांना दारुचं व्यसन. त्यावरुन घरी आई व वडिलांची भांडणं सतत त्यांनं पाहिलेली. तो कायम दारुपासून दूरच राहिला त्यामुळे. 
अनिकेत सांगत होता, " 7 वर्षांपूर्वी हार्टफेलनं अचानक आई गेली अन् मग वडिलांना जणू मोकळं रान मिळालंय रे. रोज पितात. संध्याकाळी एकतर कुणा मित्राकडे जाऊन बसतात किंवा घरीच हाॅलमध्ये मोठमोठ्यानं टीव्हीवर गाणी लावायची व एकटंच पीत बसायचं. मुलाचा अभ्यास असतो, हिची काही कामं असतात, फोन सुरु असतात, कुणी येत जात असतं याचं कसलं भान नाही त्यांना. वर वेगवेगळ्या हाॅटेलमधून मनाला येईल ते मागवायचे. ते तसंच टेबलवर कसंही पडलेलं असतं. त्यांच्या खोलीत जाऊन काय ते करा असं ही एकदा म्हणाली तर अंगावरच आले. हे माझंही घर आहे मी हाॅलमध्येच बसणार, बघू कोण मला हलवतो ते.. अशी भाषा.."

अश्विनी मग सरसावली.." त्यांचं तोंड पाहिलं तरी माझ्या डोक्यात तिडीक जाते. मी आॅफिसला निघाले की यांचं तोंड सुरु होतं.. निघाली हिराॅईन हिंडायला. कुठं जाते काय करते देव जाणे. तो सकाळी 9 ला गेला रात्री 8 ला येतो. हिची मजा..
कितीवेळा सांगितलं अहो काहीही काय बोलता. मी कुठं जाते, काय करते हे पहा येऊन एकदा. सकाळी 10 ला अंकितचा क्लास असतो, त्याला सोडते मीच..त्याचा डबा मीच करते.. मग 11 ला शाळेत मीच सोडते.. 5 वाजता परत त्याला आणायचं. पटकन् खायला देऊन ज्युदोच्या क्लासला सोडते. मग घरी येतो दोघेही सोबत. मग घरचं स्वैपाक पाणी. यांचं जेवण बनवून ठेवलेलं असतं. पण अनेकदा ते तसंच व यांनी शेजारच्या हाॅटेलमधून काही मागवून ठेवलेलं असतं. अर्धवट उरलेलं अन्न धड फ्रीजमधे ठेवत नाहीत. निम्मं सांडलेलं, निम्मं खराब... घरभर पसारा... नकोच वाटतं मला घरी यायला खरंतर.. वर यांची बडबड. सतत केवळ मला टोमणे मारत असतात. खरंतर 10 वर्षांपूर्वी यांचं मोठं आजारपण झालेलं. तेव्हा सगळी सेवा, अगदी शी शू काढण्यापासून मी केलेली. पण आता त्यांना कसली जाणीवच नाही. सतत मला टोमणे मारुन काय मिळतं त्यांना देव जाणे. वर इतरांसमोर, नातेवाईकांसमोर माझी विनाकारण बदनामी सुरु असते ती वेगळीच.  मी शक्यतो कधीच त्यांना काहीच बोलायला जात नाही. आमचे नातेवाईक कधी कुणी आलेच घरी तर जाताना म्हणतात, अगं तू छान आहेस की आम्हाला वेगळंच वाटलेलं..."
आता या लाॅकडाऊनमध्ये तर दिवसभर त्यांची घरातली बडबड, चिडचिड ऐकून दोघांनाही प्रचंड त्रास झालाय. एका बाजूला मुलाशी गोड बोलणारे हे वडील सून व नातवाशी मात्र फटकून वागतात. सतत बोलायला निमित् शोधतात. काही कारणानं जर अनिकेत अश्विनीवर ओरडला तर लहान मुलासारखे खूष होतात. त्यांचं भांडणं व्हावं हीच जणू इच्छा... यामुळे अश्विनीची मनस्थिती बिघडलीये. दोघांच्यातलं नवरा बायकोचं नातं, शरीरसंबंध यातही अंतर पडत चाललंय. कशातून आनंद मिळत नाही अशी गत. तिनं मध्यंतरी तर काही दिवस डाॅक्टरांकडून होमियोपॅथीची ट्रीटमेंटही घेतलेली..

हे सगळं  सांगतानाही त्या दोघांना कसंतरी होत होतं. त्यांच्या घरी काहीतरी सुरु असतं इतकंच आम्हाला माहिती. पण हे हाताबाहेर जाणं योग्य नव्हतं. खरंतर इतका छान संसार आहे मस्त मजेत रहावं, प्रेमानं चांगलं बोलावं तर ते या काकांना का करायचं नाही याला उत्तर नाही. घराबाहेर सर्वांशी छान वागणारे काका घरात मात्र वाईट वागताहेत. त्यांना या उतारवयात एकटं सोडणं, कुठेतरी वृध्दाश्रमात ठेवणं या दोघांना नको वाटतं म्हणून तेही सहन करतायत अन् आपल्या चांगल्या दिवसांची माती करुन घेतायत. काकांच्या मित्रामार्फत, नात्यातील काही ज्येष्ठ व्यक्तींमार्फत काकांना समजुतीच्या चार गोष्टी सांगायचे प्रयत्न करुनही झालेत पण पालथ्या घड्यावर पाणी. आता शेवटी कधीतरी जास्त काही बोलले तर मी तरी कायमचं घर सोडून दुसरीकडे राहीन नाहीतर त्यांनी वृध्दाश्रमात जाऊन राहावं. माझा संसार विस्कटू नये त्यांनी ही अश्विनीची अपेक्षा योग्यच आहे. सध्यातरी सगळं धुमसतंय. दोघेही सहन करतायत पण ही मंडळी अशी एकत्र न  रहाणं हाच जणू यावरचा कटू उपाय आहे. हे सगळं नकोसं वाटतं पण नाईलाज झालाय...

तर दुसरी गोष्ट यापेक्षा जरा वेगळी आहे रामचंद्र जोशीकाका-काकूंची. तेच परवा बोलत बसलेले. जोशीकाका म्हणजे एकदम नीटनेटका माणूस. पापभीरु माणूस. रस्त्यात पायात किडामुंगी आली तरी त्यावर पाय न देता बाजूनं जाणारा. ते व त्यांची बायको आपल्या आपल्यात छान रमलेले. पहाटे उठून फिरणं, मग घरातील केरवारे, रो हाऊस समोरच्या मोकळ्या जागेतील लहानशी बाग नीट करणे हे सगळं होईपर्यंत मुलगा सून झोपलेलेच असतात. मुलाचा एक चांगला व्यवसाय आहे तर सून घरीच बसून त्यांची अकौंटस वगैरेची कामं पहाते. प्रसंगी आॅफिसातही जात येत असते. दोन्ही मुलांपैकी 1 काॅलेजला तर दुसरा शाळेत. त्यांच्या स्कूलबसेस वगैरे सगळंही आजी- आजोबांनीच जास्त माहिती. सुनेचा व त्यांचा जणू 36 चा आकडा आहे. 
घरात सकाळी किचनमध्ये काम करताना चुकून हातातून एखादं भांडं सांडलं तरी आभाळ कोसळल्यासारखं तांडव करते सून. घरातील 1 वस्तूही इकडे तिकडे उचलून ठेवलेली तिला पसंत नसते. स्वैपाकाला येणा-या बाईला आम्ही काहीही फर्माईश केलेली तिला चालत नाही. कधी काही खावंसं वाटलं तरी सांगायला मन संकोचतं. त्यात लाॅकडाऊनमुळे 5 महिने घरी बायका येत नव्हत्या. काही किचनमध्ये करु गेलं तरी हिची धुसफूस चालू. तरी बरं हिला आम्ही आॅर्डरी सोडत नाही. 
आमच्या लेकाला तर ताटाखालचं मांजर करुन ठेवलंय. घरात वयात येणारी मुलं आहेत पण यांचं जे सुरु असतं ते पाहून आम्हालाच कानकोंडं होतं. तिच्या सौंदर्यापुढं त्याच्यातला पुरुष पार नामोहरम झालाय पहा. तिच्याशिवाय राहायला नको म्हणून तो तिच्या शब्दाला अवाक्षरही विरोध करत नाही. उलट आम्हालाच म्हणतो, नशीब समजा तुम्हाला इतरांसारखं वृध्दाश्रमात रहावं लागत नाही हे... ना आमच्या औषधांकडे त्यांचं लक्ष, ना आमच्या आवडीनिवडींकडे. स्वत: उठून किचनमध्ये काही करु गेलं तर तेही नकोसं तिला.
काकू म्हणाल्या, ' यांना भजी फार आवडतात हो. मध्ये एकदा मीच सगळ्यांसाठी भजी करते म्हटलं तर अंगावरच आली. कोरोनाच्या या दिवसांमध्ये तेलकट खाऊ नका असं डाॅक्टर बोंबलतायत, तुम्हा वयस्कर लोकांना तेवढंही समजत नाही का हल्ली. भजी नाही खाल्ली 2 महिने तर मराल काय? असं म्हणाली ही... यांच्या तर डोळ्यात पाणीच आलं. म्हणाले, मी मेलो तरी चालेल पण परत भजीचं नाव काढणार नाही. या वयात अशा अपेक्षा तरी किती उरल्याहेत पण त्या क्षुल्लक गोष्टींसाठी मनं मारत जगण्यापेक्षा या कोरोनानं मरण तरी पदरी द्यावं.. कुणाला आपण नकोसे झालो असलो तर तिथं राहू नये हेच खरं...

काकांना व काकूंना मी वेगळं काय सांगणार होतो.? जमेल तितकं दुर्लक्ष करा, नका मनाला लावून घेऊ इतकच सांगू शकत होतो. लाॅकडाऊन मुळे ते कुठेही घराबाहेर किंवा नातेवाईकांकडे परगावी जाऊ शकले नव्हते. आॅक्टोबर नंतर कुठेतरी 2,3 महिने हिंडून या. तुम्हालाही तुमची स्पेस मिळेल व त्यांच्यापासून दूर राहिल्याचं समाधान...इतकच बोललो.

माणसं एकमेकांच्या जवळ असूनही द्वेष, मत्सर, इगो, ईर्षा हे सगळं का मनाशी धरुन बसतात हेच उमगत नाही. प्रेमानं आनंदानं रहावं, जे काही आपल्याकडे आहे ते छान सर्वांनी शेयर करावं, या संकटकाळात भांडणं शक्यतो टाळून आनंदानं वागून एकमेकाला धीर, दिलासा व आधार द्यावा असं का वाटत नसेल या माणसांना? असा प्रश्न मलाच पडतोय. 
मात्र जरा मनमोकळं बोलल्यानं या मंडळींना जरा बरं वाटलं. माझ्याकडून मी इतकंच तर सध्या करु शकत होतो...यापेक्षा जास्त काही करता येत नाही ही खंत मात्र जरुर वाटते.

तुम्हालाही तुमच्या मनातली व्यथा, ताण तणाव कुणाशी बोलता येत नसतील तर अवश्य आपल्या #जादूचीपेटी उपक्रमांतर्गत मला 9833299791 या नंबरवर काॅल करा किंवा nsudha19@gmail.com यावर पत्र लिहा. तुमच्या मनातील चिंतेची जळमटं दूर करायचे जरासे प्रयत्न करुया.

आनंदी जगूया, इतरांना आनंद देऊया.
- सुधांशु नाईक, कोल्हापूर (9833299791)🌿

Wednesday, 30 September 2020

#जादूचीपेटी : किस्सा क्र 6 ज्येष्ठ नागरिक समस्या


#ज्येष्ठनागरिक #भाग पहिला
नमस्कार मित्रहो. जादूची पेटी या मोफत उपक्रमातून लोकांनी मनमोकळा संवाद साधावा, आपल्या मनातील निराशा, उद्वेग झटकून पुनश्च धीरानं जगण्याला सामोरं जावं हीच आमची इच्छा. त्यासाठी 9833299791 या क्रमांकावर काॅल करा किंवा nsudha19@gmail.com यावर पत्र लिहा असे आवाहन केले त्याचा लाभ घेत खूप वेगवेगळ्या वयोगटातील स्त्री व पुरुषांचे काॅल येतायत. कोरोनाग्रस्त किंवा भीतीनं घाबरलेल्यांचे काॅल येतायत. 
यातच महत्वाचा एक घटक आहे ज्येष्ठ नागरिकांचा. एकतर कोरोनासंकटाच्या पहिल्या दिवसापासून सतत सांगितलं जातंय की ज्येष्ठ नागरिकांना याचा जास्त धोका, ब्लडप्रेशर व शुगर असलेल्यांना जास्त धोका... या ज्येष्ठांनी कुठेही बाहेर पडू नये वगैरे वगैरे.
 त्यामुळे आधीच हजारो ज्येष्ठ व्यक्ती प्रचंड मानसिक ताण सहन करतायत. घरात सतत 6 महिन्याचा जणू बंदिवास... मग घरातले ताणतणाव...
ज्येष्ठ नागरिकांना सतत प्रचंड दडपणाला सामोरं जावं लागतंय. किती वेगवेगळ्या समस्या आहेत ज्येष्ठांच्या. त्यापैकी अगदी दोन परस्परविरोधी उदाहरणं, त्यांच्याशी झालेला संवाद हाच आजच्या लेखाचा विषय...

1 :- एकाकी पण चिडखोर असे देशमुख काका

देशमुख काका. सरकारी नोकरीतून उच्चपदावरुन निवृत्त झालेत 5,6 वर्षांपूर्वी. त्यांना दोन मुली व 1 मुलगा. मुलींची लग्नं झालीयत. मुलगा खाजगी नोकरीत चांगल्या पदावर. सून शिक्षिका. त्यांना 1 मुलगा. म्हटलं तर सगळं छान स्थिरस्थावर असा संसार. सोबतीला सेवाभावी अशी बायको. पण घरचे सगळे यांना वैतागलेत. कारण यांचा संतापी स्वभाव व सतत घरातली धुसफूस.
मुलगा व सून वैतागून त्यांच्याविषयी बोलत होते...

खरंतर सगळे त्यांची काळजी घेतात पण यांची सदैव हुकूमशाही वृत्ती. एकेकाळी ज्या अधिकारानं आॅफिसला तालावर नाचवलेलं तसं घरच्यांना नाचवायची वृत्ती. मुलगा तुलनेनं दुर्लक्ष करतो. कधी जास्तच घरात आरडाओरडा करु लागले तर बोलतोही. पण सुनेचा व बायकोचा कोंडमारा अधिक. 
अन् यांच्यामुळे सासू व सुनेत खटके सुरु झालेत. आपल्या नव-याचं चुकतं हे कळतं पण नवरा कुणाचं ऐकत नाही तर इतरांनी माझ्यासारखं गप्प बसावं ही त्यांची वृत्ती... तर सून म्हणते रोज हगल्या मुतल्या कोणत्याही कारणावरुन हे काहीही बोलणार, माझ्या आईबाबांचाही प्रसंगी उध्दार करणार... का ऐकून घ्यायचं मी? बरं मी सगळी कामं करते, स्वैपाकातही सासूला कामाला लावत नाही फारसं... तरी रोज उठून काही कारणं काढून हा माणूस मला शिव्या देतो. कधी पदार्थांवरुन, कधी एखाद्या वस्तूवरुन, कधी टीव्हीवर अमुकच सिरीयल पाहते म्हणून.. कशाहीवरुन सतत आरडाओरडा करतात.. कोणताही पदार्थ केला की नावं ठेवायची. सतत कुठल्या तरी हाॅटेलातून काहीतरी आणून खायचे. या 6 महिन्यात हाॅटेलं बंद, बाहेर जाता येत नाही मग रोज चिकन करा, मटन करा सांगतात. ते तरी कुठं मिळतंय...

पण आम्ही वीकली 1/ 2 दा तरी त्यांना द्यायचो. मग त्याला नावं ठेवायची.. हे कमी म्हणून.वर सतत यांना खायला काही लागतं. चिवडा, लाडू, काजू-बदाम, फळं असं सगळं घरी असतं. तेही कधी आमच्या मुलांनी त्या डब्यातून घेऊन काही खाल्लं की यांचा संताप.. लगेच म्हणणार, " आपल्या पोरांना तेवढं घाला..मला उपाशी मारा..". शोभतं का हे असं बोलणं? आमच्या घरी शेजारीपाजारी देखील हल्ली फारसे येत नाहीत. सरळ म्हणतातच, ते तुमचे बाबा आमच्यासमोरच तुम्हाला काहीतरी ओरडतात..ते बरं वाटत नाही... यांच्यासोबत 1 दिवस रहाणंही नकोसं झालंय. कितीही समजून सांगितलं तरी यांचा हेकेखोर व संतापीपणा कमीच व्हायला तयार नाही.

देशमुख काकांचा हा असा प्रश्न तर यादव काकांची कथा वेगळीच.

 2 :- भीतीनं गांगरलेले यादवकाका

यादवकाका. एका खाजगी बॅन्केतील निवृत्त कर्मचारी. साधा शांत स्वभाव. आपण भलं व आपलं काम बरं. पत्नीचं 4 वर्षापूर्वी निधन झालंय. यांना 2 मुलं व 1 मुलगी. सगळे आपल्या संसारात सुखी. घरात दोन नाती. एका मुलाकडे हे कोल्हापुराजवळच्या तालुक्याच्या ठिकाणी रहातात. काकांना देवाधर्माचं वेड जरा जास्त. पण गेले काही महिने देवळं बंद. जवळच्या शंकराच्या मंदिरातील पूजा, तिथले उत्सव हे सगळं काका हौसेनं मॅनेज करायचे. आता एकदम त्यांना रिकामपण आलंय. त्यात त्यांचे जे काही मित्र होते त्यापैकी दोघांचा मृत्यू त्यांना चटका लावून गेलाय. एकदम घरी गप्प गप्प बसून असतात. तोंडात " पांडुरंगहरी.." किंवा विठ्ठल विठ्ठल सदैव. मध्येच "ओम नम:शिवाय" चा जोरजोरात जप करु लागतात. एकटेच बसून रडतात. कुणी काही विचारपूस करु गेलं की काबरेबावरे होतात. काही नाही.. काही नाही म्हणत रुममध्ये गप्प बसून राहतात. जेवणातही धड लक्ष नसतंय. मन कुठेतरी कसल्यातरी विचारात.. रात्री झोपेतही अचानक ओरडत उठतात... मला भीती वाटतेय.. मी मरेन बहुदा असं म्हणतात..

त्यांच्या सर्व तपासण्या झाल्याहेत. ब्लडप्रेशर व्यतिरिक्त काही फारसा त्रास नाही त्यांना. डाॅक्टरांनीही समजावलंय की काका तुम्ही खंबीर एकदम फिट आहात...पण ते मात्र मनात मरणाची भीती घेऊन बसलेत.
त्यांची काळजी करुन मुलगा व सून अस्वस्थ. दोघेही काकुळतीने बोलत होते... वडिलांनी साधं तरी कष्टाचं जीवन जगलंय. त्यांना कसला त्रास होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेतोय, जपतोय. पण आई गेल्यापासून ते एकाकीच झालेत. मित्रांबरोबर सकाळ संध्याकाळ फिरुन येत. देवळात रमायचे. पण आता तेही विस्कटल्यासारखं झाल्यानं त्यांची विक्षिप्त वागणं वाढलंय. खूप कसल्यातरी विचारात एकटेच बडबडत असतात. कधी रात्री अपरात्री उठून बसतात. खोलीतच मोठ्यानं रामरक्षा वगैरे म्हणतात.  विचारलं की घाबरतातच एकदम... गप्प होतात... तुम्ही बोलाल का त्यांच्याशी?
###
मी बोललो. दोन्ही काकांशी बोललो. यादवकाकांना खरंतर मृत्यूची प्रचंड भीती वाटत होती. मुलगा व सून किंवा अन्य कुणाबद्दल त्यांना तक्रार नव्हती. आपण कोरोनानं गेलो तर कुणीही अंत्यसंस्कारही करणार नाहीत. मला शेवटच्या क्षणी मुलं, नातवंडं या कुणाचं तोंडही पहायला मिळणार नाही.. नकोय असलं मरण.. असं सांगून ते बोलता बोलता रडलेच चक्क. 
काकांना म्हटलं, " मी तुमच्या मुलाच्या वयाचा. मी काही तुमची समजूत काढू शकत नाही. तुम्हाला सल्ला देण्याइतका मी मोठा नव्हे. पण काका प्रेमानं इतकं सांगू शकतो की तुम्ही देवाधर्माचं इतकं सगळं करता मग मरणाला का घाबरता? आज तुम्ही वयाच्या सत्तरीत पोचलाय. सगळं छान झालंय तुमचं. मुलं व सुनाही छान आहेत. त्यांचाही संसार नीट सुरु आहे. मग खरंतर तुम्ही तृप्त असायला हवं. आपल्याकडे पूर्वी वानप्रस्थासारखी पध्दत होती. तुम्ही खरंतर तसंच वागताय. मुलगा व सुनेच्या संसारात ढवळाढवळही करत नाही. मग फक्त मरणाची भीती कशाला? उलट उद्या मरण येणार आहे असं समजून आजचा दिवस छान आनंदात घालवावा असं म्हणतात जाणती माणसं. 
तुम्ही छान नातवंडासोबत खेळा, मुलगा व सुनांसोबत गप्पा मारा, छान पूजा अर्चेत वेळ घालवा... जुनी गाणी आवडतात तुम्हाला.. दिवसभर रेडियोवर विविध भारती ऐका...मस्त जाईल तुमचा दिवस. रात्री झोपताना दिवस छान गेला म्हणून आपण देवाला हात जोडतोच... त्यातही कोरोनाची भीती नकोच. आता बरेच वेगवेगळे उपचार सुरु झालेत. 90 टक्के लोक बरे होतायत. तुम्ही नीट काळजी घ्या, समजा ताप वगैरे आलाच तर 1 दिवसही फुकट न घालवता डाॅक्टरांचा सल्ला घेतला तर काहीच होणार नाही तुम्हाला... 
काका म्हणाले, " खरंय हो. माझं मलाच कळतंय सगळं पण सुधरत नाही. कितीही मनाला धीर द्यायचा प्रयत्न केला तरी रिकामं बसलं की मनात तेच विचार येतात. मग भीती वाटू लागते. 

मी म्हटलं, " काका, मनाला एकटं सोडूच नका आता. घरच्या सर्वांशी छान बोलत रहा. अगदी घरी सूनबाई किचनमधे काम करत असेल तर तुम्हीही खुर्ची घेऊन बसा तिथं. गप्पा मारत. नातींसोबत खेळा. त्यांचा अभ्यास घ्या. तुमच्या दुस-या मुलाला-सुनेला- नातवाला काॅल करा... मित्रमंडळी इतके दिवस भेटू शकत नव्हती. आता हळूहळू लाॅकडाऊन संपतोय. तुम्ही भेटू शकता मित्रांना. उत्साहानं पण सगळी काळजी घेऊन भेटा. मस्त काही आवडते पदार्थ खा... असा दिवस एन्जाॅय करा की उद्याची सकाळ पहाण्यापूर्वी जरी मरण आलं तरी हसतमुखानं जावंसं वाटेल... हे फक्त तुमच्यासारख्या सिनियर्स साठी नव्हे तर प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचं आहे. आजचा दिवस आपला...तो आनंदात जावा म्हणून जे करायचं ते करुया."

काकांच्या परिसरातच राहणा-या इतर काही मित्रांनीही आता त्यांना नियमित काॅल करायचं ठरवलंय. एकमेकाला धीर देत ते यातून बाहेर पडतील असे वाटते.

देशमुख काका व त्यांचा मुलगा सून यांच्याशीही बोललो. देशमुख काका प्रचंड गर्विष्ठ तर आहेतच पण इतरांना कस्पटासमान वागवणं हे जणू रक्तात भिनलंय त्यांच्या. आज शहरात विविध ज्येष्ठ नागरिकांचे ग्रुप आहेत. त्यातही फारसे ते कुठे नसतात. विचारलं तर म्हणाले, " ही मंडळं सतत रडगाणी गातात. लोअर मिडलक्लास वाले सगळे. " 

यांच्या सुपिरिएरिटी काॅम्प्लेक्सला हाताळणं अवघडच. शेवटी त्यांना सांगावं लागलं की तुम्ही घरच्याशी नीट वागणारच नसाल तर या तुमच्या स्वत:च्या  घरात तुम्ही एकटेच रहा, हे सगळे नवीन घर घेऊन भाड्यानं राहतील. तुमची काळजी घेतायत ते, पण रोज उठून तुम्ही शिव्या दिलेलं कोण ऐकेल. तुमचा मुलगा व सून हेही चुकत असतीलच कधीतरी. तेच योग्य व तुम्हीच दोषी असं नसेलही प्रत्येक वेळी. पण तुम्ही सिनियर आहात. बाप आहात. तुम्हीच मन मोठं करुन त्यांना समजून नको घ्यायला? तुमची बायकोही तुमच्यावर चिडते, मुलगा, सून, मुलगी सगळे तुम्हालाच शिव्या देतायत. काय कमवलं आपण आयुष्यात याचा काका विचार करायला हवा...
 तुम्ही आॅफिसमध्ये जे अधिकारपद भोगत होता त्याला धाक म्हणून लोक सलाम मारायचे. तुम्हाला आता कोण तिकडचं विचारतही नाही मग कशाला इतका ताठरपणा? आणि आपल्याच मुलाबाळांशी प्रेमानं, मन मोठं करुन वागायला तुम्हाला कमीपणा का वाटतो? उलट तुम्ही प्रेमानं 2 शब्द बोलून पहा...मग समोरचे 4 शब्द प्रेमानं बोलतील. पण याक्षणी त्यांना तुमची नव्हे तर तुम्हाला त्यांची गरज आहे हे लक्षात ठेवायला नको का? 

काकांना पटत तर होतं पण त्यांचा इगो, अहंकार त्यांना स्वत:लाच कंट्रोल करता येत नाही हे दिसत होतं. मी यापुढे नीट वागायचा प्रयत्न करेन असं ते म्हणाले पण घडेल याची खात्री वाटली नाहीच. मुलगा व सुनेलाच शेवटी म्हटलं की तुम्ही एकदा ठामपणे काही दिवस जवळच वेगळं घर करुन रहा. तुमची कमतरता त्यांना जाणवू दे. यामुळे काय गैरसोयी होतात तेही त्यांना कळूदे. त्यांच्या 2 वेळच्या जेवणाचे व नाश्त्याचे डबे तुम्ही देत रहा व दिवसातून एकदा येऊन चौकशी करुन जा... पाहायचं काही दिवसानं फरक पडतो का काही...जर नरमले तर पुन्हा सगळे रहा एकत्र आनंदानं..

याव्यतिरिक्तही ज्येष्ठांच्या अनेक समस्या आहेत. काहीजणांना घरात खरंच वाईट वागणूकही मिळतेय त्याविषयी पुढच्या लेखात...त्यांनी खरंच मन घट्ट करुन वृध्दाश्रमाचा पर्याय स्वीकारायला हवाय.

शहरात अनेक ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. तिथल्या मंडळींनीही आपल्या विविध मेंबर्सशी व त्यांच्या कुटुंबियांशी सतत सध्या संपर्क ठेवायला हवा. प्रत्यक्ष भेटी जरा अवघडच पण किमान फोनवरुन बोलणं, ज्येष्ठ नागरिकांना आॅनलाईन माध्यम शिकवून त्यांना ग्रुप काॅलिंग करायला लावणं हे असं काही व्हायला हवंय.
ज्या मंडळींना वाचनाची आवड असेल त्यांच्यासाठी घरच्यांनी किंवा तरुण मुलांनी समोर बसून पुस्तकं वाचून दाखवावीत, आॅनलाईन पुस्तक वाचनाचा आनंद द्यावा असे सुचवावेसे वाटते. 
सध्या कोरोनामुळे सर्वात जास्त घाबरलेला समूह ज्या ज्येष्ठांचा आहे. त्यांना आपणच धीर देऊया. गाणी, गप्पा, पुस्तकव्चन असे काही उपक्रम करुन ज्येष्ठ नागरिकांना आनंद देऊया.

ज्या ज्येष्ठ नागरिक समूहाला असं काही पुस्तक अभिवाचन ऐकायचं असेल तर मी स्वत: त्यांच्यासाठी ते करु शकतो. तसेच अन्य लोकही करु शकतात. ज्या ज्येष्ठ नागरिकांना माझ्याशी मनमोकळं बोलायचंय ते मला #जादूचीपेटी उपक्रमासाठी 9833299791 या नंबरवर कधीही  काॅल करु शकतातच! 
बोलत राहूया. एकमेकाला धीर देत राहूया...
- सुधांशु नाईक, कोल्हापूर(9833299791)🌿

Thursday, 24 September 2020

जादूची पेटी उपक्रमाची दै. सकाळ कडून दखल

#जादूचीपेटी हा उपक्रम स्वयंस्फूर्तीने समाजातील घाबरलेल्या, गोंधळलेल्या लोकांना धीर देण्यासाठी सुरु केला. त्याला अनेकांचा छान प्रतिसाद लाभत आहे.
या उपक्रमाप्रमाणेच समाजात सकारात्मक काम सुरु रहावं, विविध लोकांनी एकमेकांना सहकार्य करत, धीर देत या संकटकाळातून समाजाला पुढे नेत रहावं हीच इच्छा मनात होती. त्यामुळे या समुपदेशनातील अनुभव व माझं मनोगत याबाबत सोशल मिडियात लिहीत गेलो. 
या सकारात्मक अशा लहानशा उपक्रमाला दै. सकाळमधूनही प्रिन्ट व यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रसिध्दी देण्यात आली. याबद्दल Sambhaji Manohar Gandmale  Bhikaji Checher व दै. सकाळ टीमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.

समाजात आनंद पसरवूया. एकमेकांना धीर देऊया. अडचणींवर मात करत माणुसकीची नाती घट्ट जपूया. 
ज्यांना कुणाला काही मानसिक त्रास, ताणतणाव असेल ते अवश्य 9833299791 या आमच्या नंबरवर काॅल करु शकतात. किंवा nsudha19@gmail.com यावर पत्र लिहू शकता. 
🙏

सकाळनं यूट्यूबवर जो विडियो दिलाय त्याची लिंक ही ;

https://youtu.be/lEVdw0L8f_A

जादूची पेटी किस्सा 5 :- स्किल्स डेव्हलपमेंट क्षेत्रावरही संकट

या वर्षभरातील अचानक आलेल्या संकटांच्या मालिकेनं समाजमनात प्रचंड अस्वस्थता, नैराश्य पसरलंय. अनेक क्षेत्रातील उद्योग बंद पडलेत. माणसं मुकी मुकी झालीयत. सगळ्यांनाच काही ना समस्या. कुणी कुणाशी काय बोलायचं असं झालंय अनेकांना. पण मंडळी बोलायला हवं एकमेकांशी. धीर द्यायला हवा. 
भले आपण पैसे, वस्तूरुपानं मदत करु शकणार नाही पण " मी तुमच्यासोबत आहे, या संकटांतून एकत्र तरुन जाऊया" हा विश्वास देणं गरजेचं. त्यासाठीच सुरु केलाय आपण #जादूचीपेटी हा उपक्रम. लोकांना मानसिक धीर, प्रेम देण्यासाठी. ज्यांना कुणापाशी मन मोकळं करता येत नाहीये त्यांनी अवश्य आम्हाला काॅल करा 9833299791 या नंबरवर किंवा पत्र लिहू शकता nsudha19@gmail.com या मेल आयडीवर....
या कोरोना काळात अनेकांचे उद्योगधंदे विस्कळीत झालेत,अनेकांचं काम गेलंय, काहीजण आधीच अडचणीत होते त्यात हे परत मोठं संकट. यावर मात करायची तर अंगी असलेली स्किल्स वापरुन काही काम करायला हवं असं अनेक मार्गदर्शक मंडळी सांगतील. पण प्रत्यक्ष स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रात किती भयावह परिस्थिती आहे याबाबतचा माझ्याच एका मित्राशी झालेला हा संवाद. स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रात आम्ही कार्यरत होतो पण या 2 वर्षात या क्षेत्रात भयंकर प्रश्न आहेत. हा संवाद परिस्थितीचं गांभीर्य, भयानक रुप अधोरेखित करणारा...

#जादूचीपेटी # 05

" गुडमाॅर्निंग सुधांशु. प्रवीण बोलतोय. कसे आहात..पूर्ण बरे झालात ना?"
गुडमाॅर्निंग प्रवीण. आहे बघा आता ठीक. लढलो कोरोनाशी... काय म्हणतंय ट्रेनिंग सेंटर...?"

" बंदच की सगळं. ना सरकारी बॅचेस ना खाजगी बॅचेस. मोठा गाजावाजा करुन योजना सुरु केल्या.  लाखो रुपये खर्चून सेंटर्स बनवायला लागली. विद्यार्थ्यांकडून फी न घेता सरकारी अनुदानावर शिकवायचं. इतकं काम देऊ, हा प्लान तो प्लान.. सगळं झालं सांगून. प्रत्यक्षात हाती धुपाटणंच. खर्च तेवढे प्रचंड. ना सरकारी काम करता येतंय ना खाजगी. थकलेली भाडी, लोकांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. तुम्हाला माहितीये काही जणांनी राज्यात आत्महत्याही केल्याहेत. भयंकर झालंय सगळं. काय करू काय सुचत नाहीये..

" प्रवीण, हे कोरोनाचं जाऊद्या. पण तसंही गेली 2 वर्षं केंद्र व राज्य सरकारी पातळीवर स्किल डेव्हलपमेंट क्षेत्राकडे पूर्ण कानाडोळाच केला गेला हे सत्य. या क्षेत्रात काम करणारे आपण बरेचजण सरकारी योजनेतून भरपूर काम मिळेल या विचारांनं निर्धास्त होऊन शासनाच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलो हे चुकलंच. एकतर मुलांना फुकट शिकवणे हा निर्णय घ्यायलाच नको होता. त्यामुळे काय झालं की मुलं फुकट मिळतंय म्हणूनच कोर्सला येऊ लागली. पैसे देऊन त्याच कोर्सची जी ट्रेनिंग आपण पूर्वीपासून प्रामाणिकपणे सगळे करत होतो ती बंद पडली मग. सरकारच्या अनुदानाचे निकष पहाता या योजनेत " मुलांनी ट्रेनिंग नंतर नोकरी काही मुदतीत पूर्णवेळ केली तर अमुक एक रक्कम ( 30, 40 टक्के वगैरे) मिळेल" या निकषाचा मोठा फटका स्किल्स सेंटर्सना बसला कारण एकतर  बरीच मुलं नोकरी करायला तयार नव्हती, सर्टिफिकेट घेऊन पुन्हा निवांत हिंडत बसायची, त्यात काहीजण नोकरीवर गेलेच तर पूर्ण कायम होत नव्हते व अनेकांना नोकरीच मिळत नव्हती.
ट्रेनिंग सेंटर्सचं बजेट कोलमडायला मग सुरुवात झाली. त्यातच सरकारच्या प्रायरिटीज या 3 वर्षात बदलल्या. सुरुवातीला कौशल्य योजनांना भरपूर निधी मिळाला पण यात प्रचंड कपात होत गेली. सर्व निधी अन्य क्षेत्राकडे वळवला गेला. किरकोळ निधी या क्षेत्राकडे. ज्या ट्रेनिंग सेंटर्सना दरमहा 300, 400 मुलांचं ट्रेनिंग द्यायचं होतं तिथं कसंबसं 30,50 मुलांपर्यंतची मंजुरी मिळू लागली. खर्च तितकेच राहिले व कमाई शून्य होऊ लागली.
या क्षेत्रात मग काही संघटना उभ्या राहिल्या. मुंबई/ दिल्लीपर्यंत निवेदनं, आंदोलनं हेही झालं पण हाती अजूनही ब-यापैकी शून्यच आहे.

" बरोबर सुधांशु. पण आता काय करायचं ? हेच सुचेना."

" तुमच्या कदाचित लक्षात असेल की एकदा ब-याच संस्थांची मिटिंग झालेली. त्यात एक मुद्दा मांडलेला की सरकारी मदतीवर जराही विसंबून न रहाता काही करता आलं तर करायला हवं. या क्षेत्रात किंवा अन्य आवडीच्या क्षेत्रात. नुसतंच जागेचं भाडं, काॅम्प्युटर्स आदि उपकरणांचे खर्च वाढवत बसण्यापेक्षा कुठं थांबायचं हे ठरवायला हवं. सरकार अधूनमधून एकदम नवी योजना, नवे निकष असं काहीतरी पुढे करतं अन् जरा चलनवलन सुरु झालं की परत आडवा दांडा. पैसे मिळत नाहीतच पण खर्च वाढत रहातोय.. बहुदा कुणाला तेव्हा ते पटलं नव्हतं...."

तसंच प्रवीण आता कोरोनाचं संकट. जगभरची अस्थिरता यामुळे ट्रेनिंग अॅन्ड डेव्हलपमेंट या क्षेत्रात प्रचंड बदल होणार. मुळात नोक-याच नाहीत. घराघरात पैसे कमी होतायत. त्यामुळे पैसे देऊन स्किल्स शिकायला कमीच लोक येणार. बरचसं आॅनलाईन व फ्री असं सुरु झालंय. ज्याच्याकडे खरंच काही भन्नाट कोर्स असेल त्याच्याकडेच पैसे देऊन मुलं शिकायला येतील. पण त्याचीही गॅरंटी सध्या देता येत नाही. सरकारही सर्वाधिक गरजेच्या अशा शेती, आरोग्य, रस्ते/ पाणी/ वीज आदि क्षेत्रातच जास्त निधी वळवणार या सगळ्याचा विचार करता " स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रातील संस्थांनी" कुठं थांबायचं याचा निश्चित आराखडा ठरवायला हवा. झालं नुकसान तेवढं पुरे अजून परत स्वत: च्या लायबिलिटीज वाढवू नयेत. भाड्यानं जागा घेतल्या असल्यास त्या परत देऊन टाकाव्यात किंवा सरकारी योजनेची आशा सोडून लहान जागेत शिफ्ट व्हावं. लहानप्रमाणात खाजगी कोर्स, 10वी, 12 वी किंवा इंजिनियरिंग/ अकौंटन्सी/ JEE वगैरेचे क्लासेस यात लक्ष द्यावं. पुढील दीडदोन वर्षं अधिक आव्हानात्मक असणार आहेत. कमीत कमी खर्च करुन आपण दोन वेळचं जेवून जगू कसं शकू यावर लक्ष द्यायला हवं.
इतकंच नव्हे तर प्रसंगी किराणा, भाजी किंवा अन्य दुकान चालवणे, आॅनलाईन ट्रेडिंग, काही मेडिकल प्राॅडक्टस् चं मार्केटिंग सेल्स, मेडिकल क्षेत्रासाठी आॅनलाईन किंवा खाजगी ट्रेनिंग्ज असं काही वेगळं करायला हवं तरच जिवंत रहाता येईल.
" बरोबर आहे. हे सगळं कळतंय पण अजूनही जीव तुटतोय. 20,22  लाख घालून जे सेंटर उभं केलं ते बंद करायचं याचं दु:ख फार आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आगामी खर्च शून्य करायचे असतील तर याला पर्याय नाहीच. करायला लागणार.. कारण आता सरकार आपल्याला या क्षेत्रात  मदत करेल या आशेवर रहाण्यात काहीच अर्थ उरला नाही हेच सत्य.."

मंडळी, आम्ही स्वत: ज्या क्षेत्रात कार्यरत त्याच क्षेत्रातील ही भयावह परिस्थिती. म्हटलं तर कुणाचीच चूक नाही..म्हटलं तर सगळीच गणितं चुकलीयत.  राज्यभर हजारो स्किल ट्रेनिंग सेंटर्स अशी बंद पडलीयत. तिथल्या कित्येक कर्मचा-यांची नोकरी गेलीच. मालकालाच जिथे पैसे मिळत नाहीत तिथे त्यांना कुठून पगार.. ?

Change is inevitable...थोडक्यात  बदल हा अपरिहार्य असतो हे जगप्रसिध्द वाक्य. कधी स्वत: हून बदल करावा लागतो तर कधी परिस्थिती आपल्याला वाकवून, मोडून बदलायला भाग पाडते. जे बदललतात ते टिकायची शक्यता जास्त असते. आपण सर्वांना या संकटकाळात टिकायचंय. म्हणून जे काही झालं ते मागे सोडून नवं काही करायला हवंय. खर्च त्वरीत कमी करुन किमान तुटपुंजं काही कसं कमवता येईल याचे अन्य पर्याय शोधायला हवेत असं मला वाटतं.
याक्षणी या समस्येवर तसं ठोस उत्तर इतकंच असू शकतं असं मला वाटतं. 
परिस्थितीनं हताश होऊन जीव मात्र कुणी गमवू नका, एकमेकांशी बोलूया, एकमेकांना धीर देऊया... जगायला बळ देऊया.

ज्यांना आमच्यापाशी मनमोकळा संवाद साधायचाय ते कधीही 9833299791 या नंबरवर काॅल करु शकतात. काॅलिंगची सेवा मोफतच आहे. ज्यांना काही जास्त समुपदेशन, मानसोपचार यांची गरज असेल त्यांना त्या पध्दतीची ट्रीटमेंट योग्य व्यक्ती किंवा संस्थांमधून देण्याची आपण नक्की व्यवस्था करु.

मन मोकळं बोलूया. तणावातून बाहेर पडूया.
- सुधांशु नाईक, कोल्हापूर( 9833299791)🌿