marathi blog vishwa

Thursday, 7 December 2023

मन मनास उमगत नाही...

#सुधा_म्हणे: मन मनास उमगत नाही...

07 डिसेंबर 23

मराठी गाणी आठवायला गेले की मला वारंवार सुधीर मोघे आणि सुरेश भट यांच्याच रचना जास्त आठवतात. त्यांचे लेखनच वेगळे. अंतर्मनात खोलवर कुठेतरी थेट बाणासारखे घुसणारे. कधीच शब्दबंबाळ नसलेले. मोजकेच शब्द आणि भरून राहिलेला केवढातरी मोठा आशय. 3,4 शब्दांच्या ओळी आपल्यावर असे काही गारुड करतात की आपण त्यात पार बुडून जातो. याच ओळी पहा ना;

मन मनास उमगत नाही

आधार कसा शोधावा !

स्वप्नातिल पदर धुक्याचा

हातास कसा लागावा?

सुधीर मोघे यांच्या या कवितेला श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केले होते. श्रीधर फडके हे संगीतकार म्हणून खूप वेगळे आणि प्रयोगशील. स्पष्ट बोलायचे तर बाबूजींच्या छायेमुळे त्यांच्यातील हा प्रयोगशील संगीतकार लोकानी फारसा जाणून घेतलाच नाही. सतत त्यांच्याकडून बाबूजींच्या प्रकारच्या रचनांची अपेक्षा सर्वसामान्य माणूस करत राहिला. पण श्रीधरजी किती वेगळे आहेत ते अशा रचनांमधून चटकन उमगते. 

शब्दांचे सामर्थ्य ठसवण्यासाठी त्यांनी अगदी मोजकी वाद्ये वापरुन या कवितेला संगीत दिले आहे. भजनात किंवा अभंगात आपण जशी टाळ वाजवतो, तसा तालाच्या मात्रेवर हलकीशी टाळ वाजते आणि अवघ्या गाण्याला एक पवित्र पवित्र गंध देऊन जाते.

मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेले

मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवघडलेले

मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ

मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल..

मनाबद्दल कितीही लिहिले तरी ते त्यापासून दशांगुळे वरच उरते असे जाणवते. या कवितेत सुधीर मोघे शब्दांचे सामर्थ्य किती परिणामकारक वापरुन घेतात असे वाटते. थेंबांचे आकाश, लाटा, नक्षत्रांचे रान, आवर्त , काळोखाची गुंफा, तेजाचे राऊळ.. अशी एकएक प्रतीके वापरत गाणे पुढे जाते तेंव्हा एक चित्रमय रूप नजरेसमोर उमटत राहते.

चेहरा-मोहरा ह्याचा , कुणि कधी पाहिला नाही

धनि अस्तित्वाचा तरिही, ह्याच्याविण दुसरा नाही

असे जेंव्हा सुधीर मोघे सांगून जातात तेंव्हा केवढे मोठे वैश्विक सत्य यामधून समोर आले आहे असे वाटून जाते. गाणे संपल्यावर एक अनामिक शांतता भरून राहते. निर्विकार मनासारखाच या शांततेलादेखील चेहरा नसतो. गाणे ऐकता ऐकता आपल्या मनाकडे आपण तटस्थपणे कधी पाहू लागतो हे कळतच नाही. मन आणि बुद्धी जेंव्हा हातात हात घेऊन चालू लागतात तेंव्हा आपल्याला जाणवते की परिपूर्ण होण्याच्या वाटेवर आपण पहिले पाऊल टाकले आहे. ही वाट सुंदर असते आणि अवघडदेखील. सर्वाना या वाटेवर चालायचे बळ मिळू दे हीच प्रार्थना करावीशी वाटते. 

-सुधांशु नाईक (9833299791)

Wednesday, 6 December 2023

धुंद होते शब्द सारे...

#सुधा_म्हणे: धुंद होते शब्द सारे..

06 डिसेंबर 23

सुरेख अशी मराठी भावगीते सुरुवातीला आपल्याला रेडिओमुळे ऐकायला मिळाली आणि त्यानंतर आलेल्या अनेक सुंदर चित्रपटांमुळे देखील. कित्येकदा एखादा चित्रपट लक्षात राहत नसे पण गाणी लक्षात राहायची कारण त्यातील भाव-भावना या अगदी आपल्या मनातील असायच्या. उत्तरायण हा असाच अनेकांच्या लक्षात राहिलेला चित्रपट. शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी यांचा सहज अभिनय पाहताना आपण त्या कथेसोबत कधी एकरूप होऊन जातो हे कळतही नाही. आयुष्यात आठवणी दाटून येतात आणि मनात गहिरे तरंग उमटत राहतात. 

एकमेकांच्या सोबत जगताना कित्येक छोट्या छोट्या गोष्टी आपला एक खास असा अमीट ठसा आपल्या आयुष्यावर उमटवून जातात आणि मन सहजतेने गुणगुणू लागते;

धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना

वार्‍यासंगे वाहता, त्या फुलापाशी थांब ना
सइ ये, रमुनी सार्‍या या जगात रिक्त भाव असे परि
कैसे गुंफु गीत हे?
धुंद होते शब्द सारे !

आयुष्यात आठवणी दाटून येतात आणि मनात गहिरे तरंग उमटत राहतात. एकमेकांच्या सोबत जगताना कित्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जीव अडकून जातो. जगायला दोन वेळचे जेवण आणि माथ्यावर असलेल्या छप्पराइतकेच असंख्य आठवणी देखील आवश्यक असतात. जगणे सोपे करतात त्या आठवणी. आठवणीतील त्या त्या प्रसंगी कधी लहान गोष्टी असतात, कधी वस्तू असतात तर कधी ओंजळीत दिलेली ताजी ओली फुलं..! कधी एखादा प्रसंग आठवतो. त्यावेळी भरून आलेले आभाळ आठवते, दारी बहरलेला निशिगंध किंवा प्राजक्त आठवतो आणि आकाशीचे टिपूर चांदणेही आठवते. ते सगळे जगणे परत घडणार नसते पण मनाच्या पडद्यावर सुरू असलेल्या चित्रपटावर हे सगळं स्वच्छ आणि सुष्पष्ट दिसत राहते. आयुष्याला एक गंध मिळून जातो.

मेघ दाटून गंध लहरुनि बरसला मल्हार हा
चांदराती भाव गुंतुनी बहरला निशिगंध हा
का कळेना काय झाले, भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा, विश्रांत हा, शांत हा !

भरून आलेले आभाळ, मातीचा गंध, चांदणी रात्र, बहरलेला निशिगंध, हव्याहव्याशा जिवलगाची आयुष्याच्या अखेरपर्यंत असलेली साथ आणि आयुष्याच्या या टप्प्यावर शांतता, विश्रांती मिळते ती हवी. आपल्याला यापेक्षा आणि कुठे वेगळं काय हवं असतं?

-सुधांशु नाईक (9833299791)

Tuesday, 5 December 2023

मन तळ्यात मळ्यात...

#सुधा_म्हणे: मन तळ्यात मळ्यात..

05 डिसेंबर 23

लहानपणी आपण “तळ्यात की मळ्यात” हा खेळ खूप वेळा खेळलो आहोत. आयुष्यात सुद्धा किती वेळा अशी तळ्यात की मळ्यात सारखी परिस्थिती उद्भवते आणि आपण गोंधळून जातो. नेमके काय करावे हे कळत नाही. कधी नोकरीची संधी असो की एखाद्या विवाहेच्छुक मुलीसाठी एकावेळी दोन स्थळे एकदम येणे असो, आपल्याला तळ्यात जावे की मळ्यात जावे असे वाटणे घडतेच. आपापल्या क्षेत्रात कार्यरत असताना देखील विविध पर्याय वापरुन पाहत असतो आपण. प्रत्येकवेळी जे हवे ते मिळतेच असे नाही. त्या दोन्ही गोष्टी आनंद देणाऱ्या असतील तर फारसे नुकसान नसते. मात्र जेंव्हा काही कारणामुळे दोन पर्यायांपैकी हवी असलेली गोष्ट मिळणार नसते तेंव्हा मात्र मन कासावीस होऊन जाते.

रोजच्या सगळ्या धावपळीत मग आपल्यात अनेक त्रुटी निर्माण होत असतात. अनेकदा डिप्रेशन सारख्या मानसिक समस्यादेखील उद्भवतात. पण “तळ्यात की मळ्यात” या खेळाचा अनुभव घेतला की सगळं काही स्वीकारायची मानसिक तयारी नक्कीच तयार होते. या सगळ्यावर मात करता येते जर तुमच्या जिवलगाची तुम्हाला खंबीर साथ असेल तरच. 

आयुष्यात जीवाला जीव देणारे मित्र आणि आपल्या सुख-दुःखात साथ देणारा जिवलग सखा किंवा सखी असणे ही गोष्ट म्हणूनच फार अप्रूपाची ठरते. मनातले सारे संभ्रम तिथे संपतात. अशा जिवलगासाठी मग ओठावर संदीप खरे यांची अलवार कविता येते जी शैलेश रानडे यांनी गायली होती;

मन तळ्यात, मळ्यात,

जाईच्या कळ्यांत..

मन नाजुकशी मोतीमाळ,

तुझ्या नाजुकशा गळ्यात

आयुष्य हे किती अगम्य. उद्या काय घडणार आहे हे आज ठाऊकदेखील नसते आपल्याला. एखाद्या मृगजळासारखे असणारे आयुष्य आपले मानून जगत राहतो. आपण पाच पंचवीस वर्षांचे नियोजन करत बसतो. हसतो, गातो, खेळतो भांडतो आणि रडतो देखील. अनिश्चित असे आयुष्य मग त्या व्यक्तीच्या सोबत वेगळे भासू लागते. मनातील संदेह बाजूला जाऊन मन गाणी गुणगुणू लागते.

ऊरी चाहुलींचे मृगजळ

वाजे पाचोळा उगी तशात

इथे वार्‍याला सांगतो गाणी, माझे राणी

आणि झुळुक तुझ्या मनात….

माझ्या नयनी नक्षत्र तारा

आणी चांद तुझ्या डोळ्यांत….

आपल्या प्रिय व्यक्तीच्या डोळ्यातील चंद्र पाहत पाहत, तिच्या साथीने माणसे आयुष्याची वाट किती सहजपणे चालत राहतात ना? प्रत्येक वळणावर जे जे प्राक्तन असेल ते ते सहज स्वीकारून पुढे जात राहतात. ज्याना अशी सुरेख सोबत मिळाली आहे त्यांच्या आयुष्याचेच सुरेल गाणे होऊन जाते. सगळ्यांच्या आयुष्याची सुंदर गाणी व्हावीत यासारखी सुखद गोष्ट दुसरी असू शकत नाही. बरोबर ना?

-सुधांशु नाईक (9833299791)

Monday, 4 December 2023

मन रानात गेलं गं...

#सुधा_म्हणे: 200  मन रानात गेलं गं..

04 डिसेंबर 23

मन आपले किती चंचल. प्रत्येक प्रसंगी वेगवेगळे. जशी माणसे बदलतात तशा भावभावना बदलतात. जशी आसपासची परिस्थिती बदलते तशा आपल्या चित्तवृत्ती बदलतात. निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर आपण मुक्त मनाने, प्रसन्नचित्ताने वागू लागतो. मनातले तरंग, विकार शांत झाल्याची जाणीव होत राहते. त्या निसर्गाशी एकरूप झालो की आपोआप मनात गाणे उमलू लागते..!

आपण शहरातील लोक कायमच गावकडील मातीला, झाडा-फुलांना, वाहत्या झऱ्याना, नदी-ओढयाना आठवत राहतो. रोजरोज जंगलात जाता आले नाही तरी मनाने फेरफटका मारून येतो. शहरातील गर्दी, वाहने, गोंगाट, ट्रॅफिक जॅम या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जेंव्हा संजय पाटील यांचे शब्द जेंव्हा अजय अतुलची रचना लेऊन श्रेया घोषालच्या आवाजात कानावर येतात तेंव्हा जिथे गर्दीत असतो आपण तिथे पावले थबकतातच. आणि रानात गेलेले मन अलगद गुणगुणू लागते;

मन रानात गेलं गं, पानापानांत गेलं गं

मन चिंचेच्या झाडात, आंब्याच्या पाडात गेलं गं..

गावातील लोकाना रोजचे निवांतपण सवयीचे असते. तसेच सगळे काही रिकामे बसलेले असतात असेही नसते. त्यांची त्यांची कामे एका विशिष्ट लयीत सुरूच असतात. शहरात राहणाऱ्या आपण माणसांनी आपलीच लय अतिद्रुत करून घेतल्यामुळे मग शांतता हवीशी वाटू लागते. रानातील चिंचेची, आंब्याची झाडे त्यांची घनगर्द सावली हवीशी वाटू लागते. चिंचेची चार पाने, कच्च्या कैऱ्या, बोरे झाडावरून तशीच नुसतीच खाण्यातील मज्जा हवीशी वाटू लागते. मन पुढे गात राहते..

सर्राट ह्या आभाळी उंच-उंच जाऊ गं

वाऱ्याचं पंख होऊ गं

थर्राट पाण्यामंदी चिंब-चिंब न्हाऊ गं

ढगाचा झोका होऊ गं..

गावाकडे किंवा भटकंतीसाठी एखाद्या दिवशी डोंगरात गेल्यावर माथ्यावर दिसणारे निळे निळे आभाळ किती तरी दिवसात आपण नीट पाहिलेच नव्हते ही जाणीव होते. कुठेतरी वाहणाऱ्या ओहोळातील स्वच्छ पाण्यात, एखाद्या झऱ्यात बसून चिंब चिंब व्हावेसे वाटते. असे सगळे करता आले की मग आपण आपले वय विसरून जातो. एखाद्या तळयाकाठी बसून शांतपणे पक्ष्यांचे किलबिलाट ऐकत बसतो. आकाशातील ढगामध्ये विविध आकार शोधू लागतो.

एखाद्या दिवसापुरती जरी शांतता, स्थिरता मिळाली तरी जणू पुनर्जन्म झाल्यासारखे वाटत राहते. ही किमया निसर्गाची. हा अनुभव माझाच नव्हे तर सगळ्यांचा असतो, तरीही आपण जंगले, झाडे, पाणवठे, नद्या, तलाव हे सारे विकासाच्या नावाखाली का नष्ट करत सुटलो आहोत? मला हा प्रश्न अस्वस्थ करतोय, तुम्हाला काय वाटते ?

-सुधांशु नाईक (9833299791)

(मंडळी, या वर्षी गुढीपाडाव्याच्या दिवशी सुरू केलेल्या लेखमालेचा हा 200 वा लेख होता. तुम्ही सर्वानी जे सतत प्रोत्साहन दिले, प्रसंगी चुका दाखवून दिल्या, नवे विषय सुचवले त्यामुळे हे घडू शकले. या वर्षाअखेरीला ही लेखमाला थांबेल. तुम्ही जे प्रेम दिले आहे त्याबद्दल ऋणी आहे.)