#सुधा_म्हणे: मन मनास उमगत नाही...
07 डिसेंबर 23
मराठी गाणी आठवायला गेले की मला वारंवार सुधीर मोघे आणि सुरेश भट यांच्याच रचना जास्त आठवतात. त्यांचे लेखनच वेगळे. अंतर्मनात खोलवर कुठेतरी थेट बाणासारखे घुसणारे. कधीच शब्दबंबाळ नसलेले. मोजकेच शब्द आणि भरून राहिलेला केवढातरी मोठा आशय. 3,4 शब्दांच्या ओळी आपल्यावर असे काही गारुड करतात की आपण त्यात पार बुडून जातो. याच ओळी पहा ना;
मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा !
स्वप्नातिल पदर धुक्याचा
हातास कसा लागावा?
सुधीर मोघे यांच्या या कवितेला श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केले होते. श्रीधर फडके हे संगीतकार म्हणून खूप वेगळे आणि प्रयोगशील. स्पष्ट बोलायचे तर बाबूजींच्या छायेमुळे त्यांच्यातील हा प्रयोगशील संगीतकार लोकानी फारसा जाणून घेतलाच नाही. सतत त्यांच्याकडून बाबूजींच्या प्रकारच्या रचनांची अपेक्षा सर्वसामान्य माणूस करत राहिला. पण श्रीधरजी किती वेगळे आहेत ते अशा रचनांमधून चटकन उमगते.
शब्दांचे सामर्थ्य ठसवण्यासाठी त्यांनी अगदी मोजकी वाद्ये वापरुन या कवितेला संगीत दिले आहे. भजनात किंवा अभंगात आपण जशी टाळ वाजवतो, तसा तालाच्या मात्रेवर हलकीशी टाळ वाजते आणि अवघ्या गाण्याला एक पवित्र पवित्र गंध देऊन जाते.
मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवघडलेले
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा
मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल..
मनाबद्दल कितीही लिहिले तरी ते त्यापासून दशांगुळे वरच उरते असे जाणवते. या कवितेत सुधीर मोघे शब्दांचे सामर्थ्य किती परिणामकारक वापरुन घेतात असे वाटते. थेंबांचे आकाश, लाटा, नक्षत्रांचे रान, आवर्त , काळोखाची गुंफा, तेजाचे राऊळ.. अशी एकएक प्रतीके वापरत गाणे पुढे जाते तेंव्हा एक चित्रमय रूप नजरेसमोर उमटत राहते.
चेहरा-मोहरा ह्याचा , कुणि कधी पाहिला
नाही
धनि अस्तित्वाचा तरिही, ह्याच्याविण दुसरा नाही
असे जेंव्हा सुधीर मोघे सांगून जातात तेंव्हा केवढे मोठे वैश्विक सत्य यामधून समोर आले आहे असे वाटून जाते. गाणे संपल्यावर एक अनामिक शांतता भरून राहते. निर्विकार मनासारखाच या शांततेलादेखील चेहरा नसतो. गाणे ऐकता ऐकता आपल्या मनाकडे आपण तटस्थपणे कधी पाहू लागतो हे कळतच नाही. मन आणि बुद्धी जेंव्हा हातात हात घेऊन चालू लागतात तेंव्हा आपल्याला जाणवते की परिपूर्ण होण्याच्या वाटेवर आपण पहिले पाऊल टाकले आहे. ही वाट सुंदर असते आणि अवघडदेखील. सर्वाना या वाटेवर चालायचे बळ मिळू दे हीच प्रार्थना करावीशी वाटते.
-सुधांशु नाईक (9833299791)
No comments:
Post a Comment