marathi blog vishwa

Monday 4 December 2023

मन रानात गेलं गं...

#सुधा_म्हणे: 200  मन रानात गेलं गं..

04 डिसेंबर 23

मन आपले किती चंचल. प्रत्येक प्रसंगी वेगवेगळे. जशी माणसे बदलतात तशा भावभावना बदलतात. जशी आसपासची परिस्थिती बदलते तशा आपल्या चित्तवृत्ती बदलतात. निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर आपण मुक्त मनाने, प्रसन्नचित्ताने वागू लागतो. मनातले तरंग, विकार शांत झाल्याची जाणीव होत राहते. त्या निसर्गाशी एकरूप झालो की आपोआप मनात गाणे उमलू लागते..!

आपण शहरातील लोक कायमच गावकडील मातीला, झाडा-फुलांना, वाहत्या झऱ्याना, नदी-ओढयाना आठवत राहतो. रोजरोज जंगलात जाता आले नाही तरी मनाने फेरफटका मारून येतो. शहरातील गर्दी, वाहने, गोंगाट, ट्रॅफिक जॅम या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जेंव्हा संजय पाटील यांचे शब्द जेंव्हा अजय अतुलची रचना लेऊन श्रेया घोषालच्या आवाजात कानावर येतात तेंव्हा जिथे गर्दीत असतो आपण तिथे पावले थबकतातच. आणि रानात गेलेले मन अलगद गुणगुणू लागते;

मन रानात गेलं गं, पानापानांत गेलं गं

मन चिंचेच्या झाडात, आंब्याच्या पाडात गेलं गं..

गावातील लोकाना रोजचे निवांतपण सवयीचे असते. तसेच सगळे काही रिकामे बसलेले असतात असेही नसते. त्यांची त्यांची कामे एका विशिष्ट लयीत सुरूच असतात. शहरात राहणाऱ्या आपण माणसांनी आपलीच लय अतिद्रुत करून घेतल्यामुळे मग शांतता हवीशी वाटू लागते. रानातील चिंचेची, आंब्याची झाडे त्यांची घनगर्द सावली हवीशी वाटू लागते. चिंचेची चार पाने, कच्च्या कैऱ्या, बोरे झाडावरून तशीच नुसतीच खाण्यातील मज्जा हवीशी वाटू लागते. मन पुढे गात राहते..

सर्राट ह्या आभाळी उंच-उंच जाऊ गं

वाऱ्याचं पंख होऊ गं

थर्राट पाण्यामंदी चिंब-चिंब न्हाऊ गं

ढगाचा झोका होऊ गं..

गावाकडे किंवा भटकंतीसाठी एखाद्या दिवशी डोंगरात गेल्यावर माथ्यावर दिसणारे निळे निळे आभाळ किती तरी दिवसात आपण नीट पाहिलेच नव्हते ही जाणीव होते. कुठेतरी वाहणाऱ्या ओहोळातील स्वच्छ पाण्यात, एखाद्या झऱ्यात बसून चिंब चिंब व्हावेसे वाटते. असे सगळे करता आले की मग आपण आपले वय विसरून जातो. एखाद्या तळयाकाठी बसून शांतपणे पक्ष्यांचे किलबिलाट ऐकत बसतो. आकाशातील ढगामध्ये विविध आकार शोधू लागतो.

एखाद्या दिवसापुरती जरी शांतता, स्थिरता मिळाली तरी जणू पुनर्जन्म झाल्यासारखे वाटत राहते. ही किमया निसर्गाची. हा अनुभव माझाच नव्हे तर सगळ्यांचा असतो, तरीही आपण जंगले, झाडे, पाणवठे, नद्या, तलाव हे सारे विकासाच्या नावाखाली का नष्ट करत सुटलो आहोत? मला हा प्रश्न अस्वस्थ करतोय, तुम्हाला काय वाटते ?

-सुधांशु नाईक (9833299791)

(मंडळी, या वर्षी गुढीपाडाव्याच्या दिवशी सुरू केलेल्या लेखमालेचा हा 200 वा लेख होता. तुम्ही सर्वानी जे सतत प्रोत्साहन दिले, प्रसंगी चुका दाखवून दिल्या, नवे विषय सुचवले त्यामुळे हे घडू शकले. या वर्षाअखेरीला ही लेखमाला थांबेल. तुम्ही जे प्रेम दिले आहे त्याबद्दल ऋणी आहे.)

No comments:

Post a Comment