marathi blog vishwa

Friday 1 February 2013

एक नवीन लेखमाला...


सुचलं तसं ..
मनात सतत अनेक विचार येत असतात..कधी ती एखाद्या विषयावरील प्रतिक्रिया असते तर कधी असतो एखादा स्वयंभू विचार..केवळ आपलेच पेटंट घेऊन जन्मलेला..! तो विचार कधी सुस्पष्ट असतो तर कधी विस्कळीत. पण विचार मनात येणे आणि तो व्यक्त करावासा वाटणे हेच बहुधा जिवंतपणाचे लक्षण...म्हणूनच सुचलेलं काहीतरी शब्दात मांडायचा हा प्रयत्न..शक्यतो दर आठवडयाला एक लेख ..!

. जो जे वांछील तो ते लाहो...
किती वेळा ऐकली, वाचलीये हि ओळ. शाळकरी वयात तर बहुधा रोजच म्हटली होती प्रार्थना म्हणून. पण कधीच वेगळी वाटली नाही. काही जाणवलेच नव्हते कधी. आजची सकाळ उगवली तीच मुळी लताच्या दैवी आवाजात ज्ञानदेवांचे शब्द घेऊन.."ज्ञानेश्वर माऊली " ची ती सगळी गाणी संपली..पसायदान सुरु होते..आणि अचानक थांबलो..या ओळीवर..
दुरितांचे तिमिर जाओ I विश्व स्वधर्म सूर्ये पाहो II
जो जे वांछील तो ते लाहो I प्राणिजात...II

कोण म्हणतंय हे ?? कोण करतंय अशी प्रार्थना ? ज्ञानेश्वर? कोण ज्ञानेश्वर ? तर असा एक लहान मुलगा ज्याच्या आईवडिलांना प्रायश्चित्त म्हणून आत्महत्या करायला लावली..कुणा शत्रूने नव्हे तर त्यांच्याच जातीतील वेद्विद्यासंपन्न ब्राम्हण मंडळीनी..! एक असा अगदी छोटा मुलगा ज्याला भर दुपारी उन्हातून माधुकरी साठी दारोदारी हिंडावे लागले..आणि लोक संन्याशाची पोरं म्हणून गलिच्छ भाषेत टिंगल करत..कधी अंगावर राख शेणाचे गोळे मारत..अगदीच भिक्षा दिली तर खराब गोष्टी देत..ज्या वयात मुलं वेगवेगळे खेळ खेळतात, गल्लीतील सगळी मुले मिळून धुडगूस घालतात..हसतात, रडतात, मनसोक्त आवडीचा खाऊ खातात तिथे या इवल्याशा लेकराच्या नशिबी काय होते तर पूर्ण बहिष्कार..! गावातल्या लोकांकडून वाळीत टाकले जाणे !! ज्या वयात छान छान कपडे घालून मिरवायचे..त्या वयात इतर मुले त्याच्या अंगावरचा पंचा फाडायला जात..आणि असे किती तरी..कसे सहन केले असेल त्या मुलांनी ...
एवढच नव्हे तर ज्या ज्या तऱ्हेने शक्य होते तसा ज्ञानेश्वर आणि त्यांच्या तीन भावंडांचा छळ करण्यात आला. शुद्धिपत्र आणण्यासाठी या चिमुकल्यांना पैठण पर्यंत चालत पाठवले गेले. तिथे ही काही स्वागतासाठी पायघड्या घातलेल्या नव्हत्या..! सगळे त्रास "मागच्या पानावरून पुढे.." असे चालूच होते..!

फार लहान वयात हे इतके सगळे भोगूनही मनाचे इतके विशालपण कसे ?? जगात "अरे ला कारे " करणे, छोट्या छोट्या गोष्टींसाठी जीवावर उठणे असेच प्रकार जास्त. पाहावे तेंव्हा प्रत्येक गोष्ट स्वतः लाच फक्त कशी मिळावी याचाच अट्टाहास...दुसऱ्याच्या घरात अंधार असला तरी चालेल पण माझे घर झगमगले पाहिजे, खेडेगावात load shedding झाले तरी चालेल, पण शहरे मात्र गरज नसलेल्या होर्डिंग ने चमचमणारी हवीत.. हीच सर्व साधारण मनोवृत्ती..आणि आजची नव्हे तर युगानुयुगे चालत आलेली..!
मग अशा वेळी वयाची अवघी पंचविशी देखील गाठलेला हा मुलगा इतकं भव्य दिव्य कसे काय बोलून जातो ?? शब्दांवर प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला त्यातही जाणवते की ज्ञानदेव तिथे एखाद्या कुटुंबाला, जातीला, धर्माला वा समाजाला पाहिजे ते मिळावे म्हणून प्रार्थना करत नाहीत..तर ते म्हणतात, "समस्त प्राणीमात्राना हवे ते मिळावे.." आणि हेच त्या युवकाचे थोरपण आहे...

अर्थात ज्ञानेश्वर प्रतीकात्मक आहेत..गेल्या शेकडो वर्षात अशी अनेक लहान मोठी माणसे झाली, सगळ्या जाती-धर्मातून जन्मली, त्यांचेही विचार असेच..! मन इतके मोठे व्हावे की सारे विश्व एकाकार भासावे...समाजात स्वार्थांध प्रवृत्ती असणारच पण मनाचा मोठेपणा दाखवणारे लोक निर्माण होणे आणि त्यांनी समाजाला दिशा दाखवणे गरजेचे असते. अर्थात यासाठी कुणी महामानव जन्माला येण्याची वाट कशाला पाहायला हवी ?ज्या ज्या कामात आपण बुडालेले असतो तिथे , किंवा रोजच्या रुटीन व्यवहारात जरी ही मनाची भव्यता अंगी बाळगायचा प्रयत्न केला तरी आपण स्वतःच्या दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करू शकतो.
अगदी साधे उदाहरण घ्या..एखाद्या चौकात आपण गाडीवरून येतो..नेमका त्याचवेळी दुसरा तिथे आलेला असतो..आपण जोरजोरात होर्न वाजवतो..आरडाओरडा करतो..कधी वादावादी करतो... कसेतरी घुसून निघून जातो.. पुढचा अर्धा तास आपण चिडचिड करतो..अस्वस्थ असतो..! मात्र आपण स्वतः घुसून पुढे जाण्याऐवजी जर थांबलो, हसून त्याला जाण्याबद्दल इशारा केला तर तोही स्मितहास्य करून "thanks " म्हणून निघून जाईल आणि तुम्हाला स्वतःलाच एक निर्व्याज समाधान मिळेल. पुढचे क्षण आनंदात जातील..

एखादी गोष्ट आपल्याबरोबर दुसऱ्याला मिळावी किंवा आपल्याआधी त्याला मिळावी असे जर आपण विचार करू लागलो तर आपोआप सुखशांती मिळू लागेल. आणि प्रत्येक जण जर असाच विचार करू शकला तर मग ज्ञानदेवांच्या भाषेतच सांगायचे तर.."भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे..".! हे दिवस येणे इतुके सुलभसाध्य नाही..पण त्यासाठी पहिले पाऊल तर टाकूया का..?

---सुधांशु नाईक , बहारीन. (nsudha19@gmail.com)

2 comments:

  1. Aajchya jagaatala navin arth...Duritanche timir jao.. je atyant garib ahet,(mazyasarkhe) jyanche fakt Swiss banket account ahet tyanchya aayushyatala andhar dur hovo...Sarv vishwavar fakt maza dharm raajy karo... jyala je have te, (tyat fakt mi ani mich)labho...

    Aatmyasi takile maage, gatichi tulana nase....

    ReplyDelete