marathi blog vishwa

Sunday 19 May 2013

ती - एक मनस्वी गडवेडी...

“सुचेल तसं” लेखमालेतील लेखांना मिळणारा तुमचा प्रतिसाद व प्रेमळ सूचना अशाच सुरु राहोत, पुढचा लेख पुन्हा एकदा भटकंतीशी नातं जोडणाऱ्या एका आगळ्या-वेगळ्या व्यक्तिमत्वाविषयी..
ती मनस्वी. मुक्त स्वच्छंद जगणारी. पानाफुलांवरच नव्हे तर निसर्गातील किड्यामुंग्यांवर देखील प्रेम करणारी. चालताना पायाखाली आलेलं इवलसं फूल देखील जपणारी. चिंब पावसात भिजणारी. ऐन वैशाख वणव्यात देखील जंगलातून भटकणारी. कधी कुण्या ग्रुपमधून तर कधी एकटीच..!
 
तिच्या बरोबर फिरणं हा एक सुखद अनुभव असतो सगळ्यांसाठी...दूर कुठे एखाद्या झुडुपात लपलेल्या Giant spider पासून झाडावरच्या एखाद्या चिमुकल्या ऑर्किडपर्यंत सगळीकडे तिची नजर फिरायची. हे सगळं नुसतं सोबत्यांना दाखवण्यात समाधान न मानता त्या सगळ्याची इत्यंभूत माहितीही देऊन मोकळी व्हायची ती..!
अशातच कधी भर पावसात एकदा राजमाची आणि एकदा राजगड करून आली ती...! आणि मग हे तटा-बुरजांची लेणी मिरवणारे, उध्वस्त अवशेष ही सन्मानानं अंगा –खांद्यावर बाळगणारे गडकोट तिचे सोयरे बनले.
इवल्याशा पूर्णगडापासून ते अवाढव्य अशा मांडवगडापर्यंत, केरळातल्या वायनाडपासून हिमालयातील गिरीशिखरापर्यंत, आणि भूजच्या वाळवंटी किल्ल्यापासून ते आसामपर्यंत ती मग फिरफिर फिरली. पण मैत्र जुळलं ते राजगड –रायगड या वाटेवर, राजमाचीवर आणि हिमशिखरांवर ..!
 
तिला कसली भीती वाटायचीच नाही. कुणी काही म्हटलं तर थेट उत्तरायची,हा निसर्ग, या डोंगर दऱ्या हेच माझे जिवलग...त्यांच्या सोबत असताना समजा मी जरी मेले, कुठे दरीत कोसळले तरी मजेत मरेन..तुम्ही मंडळी काळजी नका करू माझी..भूत होऊन नाही बसणार कुणाच्या खांद्यावर..!
तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न तर अनेकांनी केला. पण तिला लग्नच करायचं नव्हतं. भटकंतीच्या आड येणारी कोणतीही गोष्ट तिला मंजूर नव्हती.
----------
एकदा असंच तिच्या मनात आलं, पुण्यातून आपल्या घरातून थेट उठली भल्या पहाटे आणि निघाली रायगडाकडे..कुठून तर बोराट्याच्या नाळेच्या वाटेनं, तेही एकटीच..!
रस्ता तर तिच्या पायाखालचाच होता, अनेक वेळा हा ट्रेक केलेला.. वाटेतल्या वस्त्या, माणसं हीही ओळखीची..सगळ्यांना अचंबा वाटला.
“बाई गं, खुली की काय...एकट्यानं कशापायी चाललीस गं? सोबत दिऊ का धाकट्या भीमाला लिंगाण्यापत्तूर..? वाटेत कुण्या ओळखीच्या गाववाल्या वहिनीनं विचारलं.
हिनं हसून फक्त मान हलवली.. म्हणाली,
“वयने, अगं वाट माहितेय मला, आणि इथं नाही येत कुणी बिबट्या..मला खायला..तू नुको काळजी करू..मी जाईन नीट..”
शेवटी पोचली रायगडाजवळ नीट..
पायथ्याला विठ्ठलदादा (आवकीरकर) च्या घरात जेंव्हा ही रात्री शिरली, तो आणि त्याची बाईल थक्क झाले तिला असं रात्री बेरात्री एकटीलाच आलेलं पाहून.
“ अनेकदा अप्पा आलवते असं रातच्याला एकलेच...पण ते तर पुरुष माणूस..तू बाईमाणूस. कशापायी असं येडं धाडस केलंस? रानात कुठं किडा मुंगी, जनावर काही चावलं असतं म्हणजे..”
गरम गरम दुधाचा पितळी ग्लास घेऊन येत विठ्ठल म्हणाला...
“जाऊ दे रे दादा..मीही अप्पांचीच लेक समज. आणि आले न आता इथं..मग झोपते छान..उद्या मग चल माझ्याबरोबर..आपण वाघ दरवाज्याचा कडा चढून जाऊया गडावर..”
असं म्हणत पट्कन तिथंच आपली स्लीपिंग ब्याग पसरून शहाणी झोपून सुद्धा गेली दोन मिनिटात..
दुसऱ्या दिवशी दोघे कडा चढून गेले गडावर सकाळ सकाळीच..
गडावर बाजारपेठेच्या मागे विठ्ठलाचा झाप. तिथं सुलोचनाताईशी गप्पा मारत बसून राहिली, चुलीवर तापवलेलं गरम दूध पीत.. विठ्ठल पुन्हा आपल्या कामाला गडाखाली निघून गेला.
 
दुपारनंतर ही मग गडावर भटकायला निघाली. सुरुवात केली भवानी टोकापासून. खांद्यावर कॅमेरा, गळ्यात दुर्बीण, अंगात ढगळ टी-शर्ट आणि खाली एक थ्री फोर्थ जीन्स..! तिला पाहून कुणालाच वाटलं नसेल की या बाईची चाळीशी उलटून गेलीय..!
गडावर रोप वे झाल्यापासून शनिवार- रविवार हल्ली प्रचंड गर्दी उसळते..म्हणूनच ती बुधवार धरून आली होती..शांत शांत रायगड अनुभवायला. पण तरीही तुरळक पर्यटक मंडळी होतीच..बहुतेक जण परतीच्या मार्गाला लागलेले.
बाजारपेठेजवळ ताक दही, लिंबू पाणी विकणाऱ्या माम्याही आता परतून गेलेल्या. संध्याकाळच्या त्या सोनेरी किरणात रायगड वेगळाच रंगला होता.
 
बाजारपेठेजवळ ती एका पडक्या घरात शिरली. नेहमीच्या नजरेनं काही अवशेष पहात..तेवढ्यात तिला जाणवली आणि २-३ माणसांची चाहूल..ती मागे वळून पाहीपर्यंत कुणीतरी तिला मागून जोरात मिठी मारून पकडलं. तिघं जण होते ते. २०-२२ वर्षाचे..फिरायला आलेले. मगापासून तिच्या मागावर होते.. ती एकटीच आहे हे हेरून योग्य संधीची वाट पाहत होते. त्या पडक्या घरातल्या त्या कोपऱ्यात तिघांनी तिला घट्ट पकडली..
क्षण दोन क्षण ती भांबावली..मग सावरली..
एक मिनिट, थांबा, एक मिनिट..तुम्हाला काय हवंय ते समजू शकते मी..पण मित्रांनो, ही ती जागा नव्हे..आपण दुसरीकडे जाऊ या का...?”
तिच्या अनपेक्षित पवित्र्याने ते गडबडले..सुस्तावले..
“संभ्या, म्हटलं नव्हतं तुला लेका, चालू माल हाय हा..! उगाच भटका लागलीय होय एकटीच..” दोस्ताशी बोलताना  मग तिच्यावरची पकड न सोडवताच त्यातला एकजण म्हणाला,
“ए भवाने, उगा शानपना नाय दाखवायचा..तूबी मजा मार..अन आमालाबी मजा करू दे..बोल कुठं नेतीस?”
“असं करा..तुम्हाला वाघ दरवाजा, कुशावर्त तलाव माहितेय का? बारा टाकी, दारूकोठारा कडे जाणारा रस्ता..काही माहितेय का?
“नाय बा. आम्ही सगळे पयल्यांदा आलोय इथं..तूच दाखव..पण पळून जायचा प्रयत्न केलास तर खबरदार..”
“मित्रा, ठीक आहे पळून नाही जाणार....चला माझ्या बरोबर..”
ती त्यांना घेऊन वाघ दरवाज्याचा रस्ता चालू लागली.
सोबत येणाऱ्या त्यांचं अचकट विचकट बोलणं सुरु होतं. दुर्दैवानं वाटेत कुणीही दिसलं नाही..हाक मारायला..
 मग पायऱ्या उतरून ती कुशावर्ताजवळ पोचली..तिथं तलावाच्या बाजूला एक छोटंसं देखणं पण एकाकी शिवमंदिर.
 
ती त्यांना म्हणाली,
“तिथं  पलीकडे दिसतायत त्या दोन समाध्या ? असं म्हणतात की एक समाधी आहे त्या पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांची. जे राजांचे सर्वात विश्वासू सहकारी होते.. तिथून पुढे वळून पूर्वेकडे चालू लागलं की वाटेत लागते समाधी काशीबाई राणीसाहेबांची. तिथलं वृंदावन आता मोडकळीस आलंय..आणि पार पलीकडे समोर त्या बामनवाड्याच्या पलीकडे दिसतय न ते जगदीश्वराचं मंदिर. त्याच्याच पुढ्यात आहे समाधी आपल्या शिवबा राजांची..
 
तुम्हाला इथं आणलं कारण ही जागा तुमच्यासाठी अगदी मोक्याची..! म्हणजे कसं, तर आपल्या राज्यात एकाही आई-बहिणीच्या अब्रूवर कुणी हात टाकू नये म्हणून राजांनी स्वराज्य बनवलं. इथल्या माय-बहिणीच्या मनात विश्वास जागवला. मोरोपंत असोत, नेताजी असो वा दौलतखानसारखा मुसलमान शिपाई..स्वराज्यातील एकाही स्त्रीची अब्रू जाऊ नये म्हणून यांनी आणि त्यांच्या नंतरही हजारो वीरांनी रक्त सांडलं, घाम गाळला तो याच गड-कोटांवर. तेंव्हा यांच्या समाध्यांसमोर तुम्ही लुटा माझी अब्रू..मनसोक्त...समजू दे त्यांना..हा महाराष्ट्र आता आपला राहिला नाही..इथंही पुन्हा मोगलाई आली आहे..आणि तुम्हालाही कसली भीती नाही.. कारण बलात्कार केला म्हणून हात पाय छाटणारा कुणी दुसरा शिवबा पुन्हा पुन्हा इथं जन्म घेणार नाहीये...”
असं म्हणत क्षणात तिनं आपला टी –शर्ट काढून बाजूला भिरकावला..जीन्स आणि अंतर्वस्त्रे ही फेकून देत ती क्षणात त्यांच्यासमोर पूर्ण नग्नावस्थेत उभी राहिली...कणखर आवाजात म्हणाली,
 “ हे पहा माझं शरीर. याचीच गरज आहे न तुम्हाला...पहा ही माझी योनी.. तुम्ही आणि मीच नव्हे तर हे अवघं विश्व इथूनच जन्माला आलंय.. मी नुसती एक स्त्री नव्हे तर जन्मदात्री आहे..जगत्जननी आहे..त्यामुळे.. म्हणूनच एकेकाळी याचं विश्वात लोक माता म्हणून आमची पूजा करायचे...
हे माझं पोट..तुमच्या सारख्या लाखो बाळांना “एक थेंब” होतात ना, तेंव्हापासून इथंच या गर्भाशयात सांभाळतो आम्ही स्त्रिया..तुम्हाला..! त्या नऊ महिन्यातला प्रत्येक क्षण करतो विचार तोही तुमच्या सारख्या बाळांचा..! तुम्ही सुखरूप जन्माला यावं म्हणून करतो उपास तापास.. करतो सगळे श्रम पण नाही होऊ देत तुम्हाला त्रास..
आणि तुम्ही मगाशी ज्याबद्दल अचकट विचकट बोलत होता नां, ते हे माझे स्तन...जन्मल्या बरोबर त्या इवल्याश्या जीवाला प्रचंड भूक लागलेली असते, ती भूक फक्त याचं स्तनातले दूध भागवू शकतं...जगातलं दुसरं कोणताही अन्न त्यांना आपण त्यावेळी देऊ शकत नाही असं आपलं विज्ञान सांगतं...आणि हे स्तन फक्त दूधच देत नाहीत त्या इवल्यश्या जीवाला, तर देतात एक अशी रोगप्रतिकार शक्ती की जी अजूनही औषधातून नाही मिळत...आणि त्या स्त्रीच्या, त्या स्तनपानाच्या जीवावर मग ते बाळ मोठं होतं असं तुमच्यासारखं बळकट..धडधाकट...दुसऱ्या स्त्रीची अब्रू लुटायला सज्ज झालेलं..”
बघता काय आता, या चालून पुढे..या वीरांच्या समाधीच्या साक्षीनं करून टाका माझ्या शरीराची विटंबना..भोगा पुन्हा पुन्हा हे शरीर.. तुमची वासना शांत होईपर्यंत..आणि मग माझा चोळामोळा झालेला देह ढकलून द्या या खालच्या दरीत...कारण उद्या उठून मी नाही जाऊ शकणार राजांच्या समाधी समोर मुजरा करायला...मलाच लाज वाटत राहील की माझ्याच लहान भावांकडून विटंबलेलं हे शरीर त्या राजाला कसं दाखवू ? ज्यानं आयुष्यभर स्त्रीची अब्रू सांभाळण्यासाठी आपलं शरीर कष्ट्वले होते....!”
 शांतपणे तिनं आपले हात डोळ्यावर घट्ट दाबून धरले इतक्यात त्यातला एकजण पुढे झेपावला.. आणि...
 तिच्या पायावर लोळण घेत रडत म्हणाला;
ताई, चुकलो..माफ कर मला..
दुसऱ्यानं पट्कन आपल्या स्याकमधून शाल काढली, तिच्या अंगावर टाकत म्हणाला;
“ताई, लाज वाटते आम्हाला आमचीच..खरंच आम्हाला माफ कर..आम्ही तिकडं तोंड करून उभं राहतो..तू कपडे घालून घे..”
 
तिघांनी डोळे पुसत आपली तोंडं पलीकडे फिरवली. तिनं शांतपणे आपले कपडे पुन्हा अंगावर घातले. मग त्यांच्या जवळ जात त्यांच्या पाठीवर हात ठेऊन म्हणाली..
“अरे आता रडू नका...कळली न चूक तुम्हाला...आणि तुम्ही माझ्या लहान भावासारखे..फक्त वाट चुकलावतात. वासनेच्या जंगलात भरकटला होतात.. तरी तुमच्यातला माणूस कुठतरी जिवंत आहे हे पाहून बरं वाटलं. खरं म्हणजे आज माझ्या अंगाला झोंबणारे हे तुमचे बळकट हात, आणि तुमच्या सारखी हजारो बळकट मुलं जेंव्हा  एखाद्या निर्लज्ज, हरामखोर माणसांची मानगूट पकडतील, त्याला शासन घडवतील  तेंव्हाच मला खरं आनंद होईल...आणि तेंव्हाच आपण राजांना मुजरा करायला ताठ मानेनं जाऊ असं वाटतं मला.. आता जास्त विचार नका करू..चला आता माझ्या सुलुताईच्या झापावर..”
 सुलुताई च्या झापावर येताच ती बाहेरूनच म्हणाली;
“ताई माझी भावंडं आलीयेत गं.. पहिल्यांदा शहाण्या माणसासारखी वागलीयेत ती..आज ती तुझी गावठी तांदळाची छान खीर करूया आपण चुलीवर त्यांच्यासाठी...”
 ------------
त्या झोपडीत मग मिणमिणत्या प्रकाशात चुलीवरच्या खिरीचा मस्त सुगंध दरवळू लागला आणि दूर उगवलेल्या चंद्राकडे पहात ती समाधानाने शांत बसून राहिली...!
 -    सुधांशु ाईक (nsudha19@gmail.com)

3 comments:

  1. काय वेडा बिडा आहेस की काय? कसलं लिहिलयंस? काटा-रोमांच-डोळ्यात पाणी..सगळं एकदमच.
    गोष्ट खरीये की कल्पास्तव?जे काय असेल ते...सुरेख आहे.आवडलं.फक्त ’ती’च्या त्या भाषणाचा भाग थोडा एडिट करता आला तर बघ.

    ReplyDelete
  2. सुधांशू , तुम्ही चांगला माणूस वाटता. पण श्वापदं वि. स. खांडेकरांची भक्त होऊ लागण्याची कल्पना जरा अशक्य कोटीतलीच वाटते.

    ReplyDelete
  3. थोडस मार्मिक शब्दांनी लहान करून दैनिकातून प्रकाशित व्हाव ! आजची परिस्थती फारच गंभीर आहे! योग्य परिणाम साधणारी आहे! म.वी. लाटकर,पुणे.


    ReplyDelete