marathi blog vishwa

Saturday 8 February 2014

“ पयलं नमन – वेड लागले मला वेड लागले.... ”

गेल्या वर्षी “सुचेल तसं” या नावाने लेखमाला लिहिली होती. या वर्षी आता सुरु करतो लेखमाला एका नव्या नावाने – मनापासून...”

 
 
रोजच्या आयुष्यात आपण जे काही करतो ते मनापासून असतंच असं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात मात्र तरी एक गोष्ट असतेच, अत्यंत खास. आवडती. कुणाला लहानग्या वयातच रंगांची दुनिया भुलवून टाकते. तर कुणाला स्वरांची. कुणी एखाद्या खेळाचं वेड डोक्यात भरवून घेतो तर कुणी असतो अगदी मनापासून गुंड. एखादी जन्मजात आवड तर कधी परिस्थितीने देऊ केलेलं एखादं वळण यामुळे “ती आवडती गोष्ट” त्याच्या आयुष्याला एक अर्थ देऊन जाते. तो त्याचा खाजगी कप्पा असतो, स्वतःला रमवायचा. तेही अगदी मनापासून...! अनेकदा आपल्यातली “ती स्पेशल गोष्ट” आपल्याला ठाऊक असते, तर अनेकदा नसतेही. जगण्याच्या धबडग्यात आपल्या मनातलं “ते हवंहवंसं आयुष्य” कधी हरवतं, कधी एका वळणावर अचानक गवसतं तर कधी पार तोंड फिरवून दूर निघून जातं. नशीब कुणाच्या पदरात काय दान देऊन जाईल हे जरी आपल्याला माहीत नसलं तर मिळालेलं दान जपायची सुबुद्धी मात्र फार कमी जणांना असते. इथे मला कुमारजींचा किस्सा सांगावासा वाटतो.
त्या “टीबीच्या – क्षयाच्या” आजाराने त्यांना पार खिळखिळे करून टाकले होते. अवघा हिंदुस्थान गाजवलेला हा गायक देवास सारख्या छोट्या गावात अंथरुणाला खिळून होता. सगळा मानसन्मान, सगळे कौतुक करणारे दूरदूर. पत्नी-भानुमती शाळेत  नोकरी करायची, त्यावर, आणि काही उदार मनाच्या मित्रांच्या सोबतीवर जीवन कसंबसं चालू होतं. एखादा माणूस मनाने खचून त्यातच संपून गेला असता. एक तर त्यांचं शिक्षण काही नाही, संगीत साधनेव्यतिरिक्त इतर कोणता उद्योग माहीत नाही. अशावेळी मोठा धीर गोळा करून “आजारी कुमारजी” विमा-एजंट म्हणून काम करायच्या उद्देशाने बाहेर पडले. परिचिताच्या घरी गेले. त्यांच्या तोंडावरच खाड्कन दार बंद करण्यात आलं. मनात अखंड संताप..पण सांगायचे कुणाला ? त्याक्षणी ते आपल्याच मनाला म्हणाले, “कुमार मायनस म्युझिक इक्क़्वल टू झिरो...”. राखेतून भरारी घेणाऱ्या पक्ष्यासारखे तिथून ते पुन्हा उसळी मारून वर आले. आजारावर तर मात केलीच पण संगीत क्षेत्रात नवनिर्माण केले. आपलीच जुनी प्रचलित गायकी साफ पुसून नवी गायकी प्रस्थापित केली. नवा विचार मांडला.
प्रत्येकाला हे जमतच असं नाही. तेवढी प्रसिद्धी, सन्मान, धन-दौलत मिळतेच असंही नाही. आपलं प्रेयस आणि आपलं रोजच काम एकच असलं तर सोन्याहून पिवळे. हजारो वादक, नर्तक, खेळाडू, गायक, अभिनेते, लेखक यांना अनेकदा नशिबाने ते साधतंही. मात्र प्रत्येकाच्या बाबतीत हे शक्य होईल असं नाही. तरीही आपल्यातलं ते “देणे ईश्वराचे” प्रत्येकाने जरूर जपले पाहिजे.
माझा एक मित्र आहे. अखंड कामात बुडालेला असतो. पण बासरी हा त्याचा खरा श्वास आहे. वेळ मिळेल तेंव्हा मायेने ती बासरी काढतो. डोळे मिटून शांतपणे त्या सुरात तल्लीन होऊन जातो. ते शांत, सुंदर असे काही क्षण त्याला उर्जा देऊन जातात, पुन्हा कार्यरत होण्याची. ते जणू त्याचं “ब्याटरी चार्जिंग” असतं ! दुसरा एक मित्र, त्याला व्यसन हिमालयाचं. दरवर्षी भरपूर राबायचा. वार्षिक सुट्टीतले २५-३० दिवस थेट हिमालयात ट्रेकिंगला जायचा. कुठली कुठली शिखरे पादाक्रांत करून यायचा. आता त्याने स्वतःची एक छोटी पर्यटन संस्थाच सुरु केलीय. आयुष्यातलं ते प्रेयस त्यानं पकडून ठेवलं होतं. आणि एका वळणावर नियतीने त्याला त्याच्या आवडत्या विश्वात “शिफ्ट” केलं. हे असं घडणार यावर आपला विश्वास असायला हवा. आणि त्यासाठी जरूर प्रयत्न केले पाहिजेत.
प्रत्येकाला असं वेड हवं कसलं तरी.. मलाही वेड आहे पुस्तकांच्या दुनियेचं. संदीप खरेच्या भाषेत सांगायचं तर “वेड लागलं मला वेड लागलं...”शब्दांचं वेड !


लहानपणापासून हे जे “शब्दांचं वेड” लागलं, ते उत्तरोत्तर वाढतंच गेलं. जे पुस्तक, मासिक, साप्ताहिक हाती पडलं ते वाचत गेलो. त्या दुनियेत स्वतःला हरवण्यातली मजा काही वेगळीच...! आणि त्यातच एका क्षणी लिहिता झालो. खूप लिहिलं आजवर, अनेक विषयांवर. शेकडो सुहृदांनी छान प्रतिसाद दिला, कित्येक जाणकारांनी योग्य सूचना दिल्या. गाण्यात जशी एक लय असते, तशीच शब्दांनाही. मीही अशीच एक लय पकडून ही लेखमाला लिहिण्याचं ठरवलंय, कोणत्या विषयाच्या बंधनात न अडकता विचारांच्या, भावनेच्या भरात जे मनापासून लिहून होईल, तेच सगळ्यांसमोर, ब्लॉग मधून मांडणार आहे. आवडून घ्याल ही अपेक्षा..!
( पुढच्या आठवड्यात “valentine Special” काहीतरी...)
-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)

 

No comments:

Post a Comment