marathi blog vishwa

Sunday 15 November 2020

पुस्तक परिचय # करुणाष्टक :- व्यंकटेश माडगूळकर

पुस्तक परिचय या लेखमालेतील हे पुस्तक एका सुप्रसिध्द कलावंताचं. मराठी साहित्यक्षेत्रात ज्यांनी आपला अमीट असा वेगळा ठसा उमटवलाय त्या व्यंकटेश माडगूळकर यांचं. मला अतिशय भावणारा हा लेखक. ग्रामीण जीवन, कलाक्षेत्र, परदेश, वन्यजीवन आदिंबाबत समर्थपणे अन् सहजसोप्या भाषेत लिहिणं हे त्यांचं वैशिष्ट्य. 
त्यांच्या अनेक गाजलेल्या पुस्तकांसोबतच एक हळवं, स्वानुभवाचं पुस्तक आहे करुणाष्टक. बहुतांश रसिकांनी माडगूळकरांची विविध पुस्तके वाचलेली असतात करुणाष्टक मात्र कित्येकांनी वाचलेलं नसतं. का ते माहीत नाही. ज्यांनी वाचलंय त्यांच्या काळजात नक्की या पुस्तकानं घर केलं असेलच. पूर्वी हे पुस्तक मॅजेस्टिकनं प्रकाशित केलेलं. आता मेहतांनी त्याची नवी आवृत्ती आणलीये. त्याविषयी...

“करुणाष्टक - व्याकूळ करणारा अस्वस्थ अनुभव...!”
 - सुधांशु नाईक

करुणाष्टक म्हटलं की मराठी माणसाला समर्थ रामदासस्वामी यांची करुणाष्टके आठवतात. “ तुजवीण रामा मज कंठवेना...” अशा शब्दांतून ओसंडणारी त्यातली आर्तता मनाला भिडलेली असते. तीच भावना हे पुस्तक वाचतानाही मन भरून राहते.

करुणाष्टक हे अवघ्या १५७ पानांचं लहानसं पुस्तक. अगदी पहिल्या २-३ पानांपासूनच थेट काळजाला भिडतं. 

“करुणाष्टक” ची नायिका आहे या थोर भावंडांची आई. दारिद्र्याने हे कुटुंब देशोधडीला लागलं, त्याचीच ही कहाणी.
मराठीत आईवरच्या कविता खूप आहेत पण आईवरची पुस्तकं कमीच आहेत. त्यातलं हे एक महत्वाचं.
चार भावंडं, आई-बाप आणि आजी असं हे कुटुंब घर सोडून निघतं तिथूनच कहाणी सुरु होते. जिथं अनेक वर्षे वावरलो ते सारं असं सोडून जाताना होणारी उलघाल वाचक म्हणून आपल्यालाही अस्वस्थ करु लागते. ती आजी तर प्रथमच गाव ओलांडून दूर देशी निघालेली. ती भयंकर अस्वस्थ आहे. त्यात ते मिरजेच्या रेल्वे स्टेशनवर येतात. तिथं ते रूळ ओलांडताना सगळ्यांचीच तारांबळ उडते. आपल्याला रेल्वे चिरडून तर जाणार नाही ना असं जे अजाण बालकांना वाटतं, अगदी तसं या खेडुतांना वाटतं. शेवटी रूळ ओलांडताना आजी पडतेच. मग कसेबसे तिला उचलून बाजूला आणतात. तिचं ते भेदरलेपण, तुटलेपण मांडताना माडगूळकर म्हणतात, “ या प्रसंगानंतर मुळे उघडी पडलेल्या वेलीसारखी आजी सुकत सुकत गेली...” आणि अंगावर काटा येतो..!!

व्यंकटेश माडगूळकर हे उत्तम चित्रकार. प्राणी,पक्षी, वनस्पती अशा निसर्गात रममाण झालेले. उत्तम निरीक्षण शक्ती तर त्यांच्याकडे होतीच पण पाहिलेलं सारं नेमक्या व मोजक्या शब्दांत मांडायचं त्यांचं कसबही अफाट होतं. अनेक छोट्या छोट्या गोष्टी नोंदवत ते शब्दांतून जणू चित्र तयार करत जातात. नवं गाव, माणसं, त्यांचं वागणं, त्या सगळ्याशी एक हाती झुंजत आई कशी अफाट कष्टत रहायची याचं चित्र मांडत राहतात.  नव्या गावात पाण्याचे फार हाल असायचे. इथल्या ओढ्यात खड्डे करून लहान झऱ्यातून पाणी काढावं लागे. मग घरापर्यंतच्या चढावरून ते पाणी आणून घरी भरावे लागे. 
याबाबत एक प्रसंग ते सांगतात, “ या पाणी भरण्याचा आईने धसकाच घेतलेला. कधीही मध्यरात्री जग येताच ती ओढ्यावर जायला निघायची. घरात घड्याळ नव्हतंच. आभाळ पाहून अंदाज घ्यायचा, दिशा उजळल्याहेत, डोळ्यांना थोडं दिसतंय असं बघून बाहेर पडायचं. मात्र कधी हा अंदाज साफ चुकायचा. किट्ट काळोखात फक्त बेडक्यांचे आवाज येत. बिचारी आई एकटीच झऱ्याशी बसून पाणी भरायची. जड घागरी घेऊन धापा टाकत घरी यायची. बऱ्याच वेळानं पहाटवारे सुटायचे आणि मग हिच्या लक्षात यायचं की आपण तीन वाजायच्या सुमारासच ओढ्यावर जाऊन आलो...”हे सारं वाचताना आपण त्यात कधी गुंतत जातो ते कळतच नाही. 

एका प्रसंगात ते वडील, ज्यांना ते दादा म्हणत त्यांच्याविषयी ते फार आत्मीयतेने लिहितात. ते म्हणतात,“ इथं आल्यावर दादांना दम्याचा जास्त त्रास होऊ लागला. तरीही ते दूरवरच्या एका विहिरीवरून पाणी आणायचे. ती चव त्यांना आवडायची. मग एकदा मी पाणी आणायचं व त्यांना चकित करायचं ठरवलं....” असं म्हणत ते तो प्रसंग रंगवू लागतात. होतं काय तर रहाटावरून दोर सोडून घागर भारून घेताना लहानग्या व्यंकटेशाची चड्डी अचानक विहिरीत पडते, मग ती आणायला तो  पाण्यात उडी मारतो. मात्र वर परत कसं यायचं हे कळत नाही. शेवटी घरात आल्यावर घागर जागेवर नाही हे पाहून घाबरे घुबरे दादा विहिरीकडे येतात, त्यांना वर काढतात....
माडगूळकर हा खूप साधासा प्रसंग अशा काही खुमारीने रंगवत सांगतात की आपण तो प्रसंग जणू पाहू लागतो. आणि शेवटी ते म्हणतात, “ पुढे असा गर्तेत पडण्याचा उद्योग मी आयुष्यात आणखी काही वेळा केला, पण  दादा तेंव्हा मरून गेले होते... आणि आई सतत दूर होती.मला कुणीही शेंदून वर घेतलं नाही...”

अचानक असं वाक्य समोर येतं की वाचता वाचता आपणही ब्रेक लागल्यासारखे थांबतो. विचार करू लागतो. काळजात काहीतरी खूप टोचत रहातं.

कालांतराने शिक्षणासाठी दूर जाऊन राहिलेला मोठा भाऊ लेखक / कवी म्हणून मान्यताप्राप्त ठरला, तरी घराचं दारिद्र्य काही लवकर उणावले नव्हते. किंबहुना तो दहावी नापास होऊन प्रथम जेंव्हा घरी आला आणि आई कशी कडाडली ते सांगत म्हणतात, “ तुम्हाला कशी परिस्थितीची जाणीव नाही रे? जेंव्हा तेंव्हा गोष्टींची पुस्तकं नाकाला लावून बसतोस लाज कशी वाटत नाही? तुमच्यासाठी किती हाडाची काडे करतो आम्ही? अपेशी तोंड दाखवायला आलासच का? त्यापेक्षा तिकडं राहिला असतास, माधुकरी मागून जेवला असतास, रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास करून पास होऊन माझ्यापुढे आला असतास तर तुझा अभिमान वाटला असता...!”...

 आणि भाऊ घराबाहेर पडला तो काही बनूनच मग पुन्हा समोर आला...!

पुढे ४२ च्या लढ्यात व्यंकटेश माडगूळकर सहभागी झालेले. त्यामुळे पुन्हा घरदार सोडून भटकत राहिले. त्यांची आई  कायमच चिंता करत राही. आपली मुलं काहीबाही करू लागली आहेत हे पाहून साठीनंतर पुन्हा त्यांचे आईबाप मूळ गावी परतले. तिथेच जुन्या पडक्या वाड्यात राहिले. शिक्षकी पेशा असलेला भाऊ त्यांचं पाहू लागला. मात्र तिथं राहायचं सुख नशिबी नव्हतंच. देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि लगेच नंतर गांधीजींची हत्या झाली. गावचं घर जाळले गेले. पुन्हा हे सगळे मोठ्या भावाकडे जाऊन राहिले. मात्र वडिलांची जगण्यावरची वासनाच उडाली. भावाने गावातले घर जमेल तसं पुन्हा पत्रे घालून उभं केलं मात्र शेवटी वडील गेलेच. 
तिथून पुढची तीस वर्षांची वाट आई मग एकटीनेच चालत राहिली. तिची आठ मुलं म्हणजे जणू वेगवेगळ्या समस्या होत्या. कोडी होती. ती आपापल्या परीने सोडवत राहिली. तिचा जावई अकाली गेला. दोन्ही मुली अपघातात गेल्या. एक अन्य  मुलगा जो शिकून मोठा झाला त्याला मोठ्या राजकारणामुळे बदनाम केलं गेलं. त्याची निंदा-नालस्ती झाली. कर्तृत्ववान म्हणून नावाजलेला, महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेला थोरला मुलगाही मोठ्या आजाराने ग्रासला गेला. आईच्या डोळ्यातली झोप यामुळे कशी उडालेली हे वाचताना आपणही ती वेदना जगू लागतो.

अचानक आयुष्याच्या शेवटच्या दिवसात “आदर्श माता” म्हणून तिचा जाहीर मोठा सत्कार समारंभ ठरतो. आजवर कुणी तिचा कधी वाढदिवसही साजरा केलेला नसतो. साठी, पंचाहत्तरी वगैरे काही साजरं झालेलं नसते. अशा वेळी हा सत्कार म्हणजे तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा सुवर्णक्षण असतो...

मात्र ......

 नियती या आईला तो एक सत्कारसुद्धा, त्याचा अपार आनंदही भोगू देत नाही. सोबत भल्या मोठ्या दु:खाचं दान देते.  हे वाचताना आपणही उरी तुटत राहतो...!
आपल्या आईच्या जीवनाविषयी लिहिताना माडगूळकर म्हणतात, “ तिचा प्रवास हा परिस्थितीच्या वाळवंटातून केलेला जीवन प्रवास होता. डोक्यावर आग ओकणारा सूर्य आहे. अचानक आडवे येत मार्ग खुंटवणारी वाळूची टेकाडे आहेत. धुळीची वादळे आहेत. तहान तहान आहे. जराशी हिरवळ आणि पाणी ही आहे... पुष्कळ काहीबाही आहे...”

या थोर कुटुंबाची प्रसिध्दी, नावलौकिक आपण पाहिलाय. मात्र सगळ्याला पुरून उरलेलं जे कारुण्य आहे ते मला अंतर्बाह्य व्याकूळ करून टाकतं. डोळ्यांना ओलं व्हायला तेवढं निमित्त पुरेसे असतं...!! 
सुधांशु नाईक, कोल्हापूर ( 9833299791)🌿

No comments:

Post a Comment