marathi blog vishwa

Friday 29 March 2024

चिंता

मना सज्जना भाग २४ : चिंता

-सुधांशु नाईक

शुक्रवार २९/०३/२४

चिंता, काळजी या भावना आपल्याला कधी आणि कशा येऊन चिकटतात हे आपल्यालाच कळत नाही. जन्माला आल्यापासून सतत कसली ना कसली चिंता आपली पाठ सोडत नाही. दोन वेळचे जेवण, झोप, शिक्षण, नोकरी, घर संसार, दुखणी खुपणी, इतरांची आजारपणे, रोजच्या जगण्यातील स्पर्धा अशा अनेक गोष्टींच्या मुळे आपण वारंवार चिंतीत होत राहतो. माणसाने चिंतामुक्त राहावे असे कितीही आपण सांगितले तरी प्रत्यक्षात ते घडत मात्र नाही. 

आधी स्वतःच्या आयुष्याबद्दल आपण चिंता करत राहतो आणि जसे संसारी होऊन जातो तसे मग मुलं, आपला जोडीदार, आईबाप, आपल्यावर असलेली नोकरी-व्यवसायातील जबाबदारी या सगळ्याचे ओझे घेत जगतो. तुलनेने आपलं आयुष्य तसे बरेच सरधोपट असले तरी ज्यांना रोजच्या आयुष्यात जगण्यासाठीच संघर्ष करावा लागतो त्यांना या चिंता अक्षरशः जाळत राहतात. पण चिंता करून काही फरक पडतो का? ज्या कृती करणे क्रमप्राप्त असते ते तर आपल्याला करावेच लागते. भूतकाळात काय घडले याच्या विचाराने किंवा भविष्यात काय घडणार या काळजीने चिंताक्रांत होऊन बसणे हा मूर्खपणा आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात,

मना मानवी व्यर्थ चिंता वहाते

अकस्मात होणार होऊनि जाते...

जे घडणार आहे ते घडणारच. मात्र आपण चिंता करत बसल्याने हातात असणारा वर्तमानकाळ देखील वाया घालवतो याकडे समर्थ किंवा अन्य संत, विचारवंत वारंवार लक्ष वेधताना दिसतात. उद्याचा विचार करून, येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यानुसार आपल्या कृतीत सुधारणा करून कामाला लागणे त्यांच्या दृष्टीने महत्वाचे होते. नुसतेच चिंता करत हातावर हात धरून बसणे यात पुरुषार्थ नाही तर आल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी झडझडून कामाला लागणे त्यांना अपेक्षित होते.

समर्थ असोत किंवा आजच्या काळातील मानसशास्त्रज्ञ, हे सारे जण नेहमीच सांगतात की अति विचार करत न बसता पहिले पाऊल उचला. आधी आज, आत्ता कार्यरत व्हा. एकदा मार्गक्रमण सुरु केले की आपोआप पुढे वाटा सापडत जातातच. भूतकाळातील चुकांवर काम करावे आणि भविष्यात चुका होऊ नयेत, हाती घेतलेले काम तडीस जावे यासाठी अधिकाधिक बारकाईने नियोजन करणे म्हणूनच गरजेचे ठरते. अचूक यत्न केले तर आपल्या कृती अधिकाधिक सफाईदार होतात. आपोआप मग आत्मविश्वास वाढतो. कामाचे डोंगर उपसायला बळ मिळते. जेंव्हा आपण असे वागू लागतो तेंव्हा चिंतामुक्त होण्यासाठीची ती सुरुवात असते हेच खरे.

-सुधांशु नाईक (९८३३२९९७९१)

No comments:

Post a Comment