जगावेगळं या पेजवरील माझ्या " इतिहासाच्या पोतडीतून"– या लेखमालेतील हा लेखांक 04.
- सुधांशु नाईक
एका स्वामिनिष्ठेचा सन्मान...
शिवाजी महाराज म्हटलं की आपला ऊर अभिमानाने भरून येतो. एका लहानशा प्रदेशाने स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची ललकारी दिली आणि अवघ्या हिंदुस्तानात ते नाव दुमदुमू लागलं. हे स्वराज्य अनेकांच्या कष्टातून निर्माण झालं. अनेकांनी यासाठी बलिदान दिलं. शिवाजी महाराजांचं मोठेपण हे की त्यांनी या सर्वांच्या त्यागाची जाणीव ठेवली. 21 जून २०२० या दिवशी नुकतंच सूर्यग्रहण झालं. शिवकालातील एका सूर्यग्रहणाच्या दिवशी एक अभूतपूर्व घटना घडली, एका ज्येष्ठ व्यक्तीच्या स्वामिनिष्ठेचा राजांनी कसा सन्मान केला त्याविषयी...
शिवरायांनी जेंव्हा रोहिडा, तोरणा, पुरंदर आदि बलवान दुर्ग ताब्यात घेतले, राजगड सारख्या मोक्याच्या जागेवर राजधानीची निर्मिती सुरु केली तेंव्हा दूर कर्नाटकात मुक्कामी असलेल्या आबासाहेब शहाजीराजांनी यासाठी गुप्त पाठबळ द्यायला सुरुवात केली. त्यांनी काही मातबर माणसे कर्नाटकातून इकडे पाठवली. मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे जसे त्यात कान्होजी जेधे नाईक होते तसेच होते माणकोजी दहातोंडे, सोनोपंत डबीर. माणकोजी दहातोंडे हे बाजी पासलकर यांच्या माघारी स्वराज्याचे सरनौबत बनले तर सोनोपंत महाराजांचे विश्वासू मार्गदर्शक बनले. सोनोपंत हे अत्यंत बुद्धिवान. फार्सी भाषेचे ते जाणकार. निजामशाही, आदिलशाही, मोगलाई हे सगळं जवळून पाहिलेलं त्यांनी. त्यांचे अत्याचार पाहिलेले. कुणाची नियत कशी, कुणाशी कसं वागायला हवं कुणाशी राजनीतीचे कुठले डावपेच टाकायचे हे सगळं त्यांना नेमकं ठाऊक. प्रसंगी शहाजीराजांना अत्यंत अचूक आणि मार्मिक सल्ला देणारं हे निःस्वार्थी असं व्यक्तिमत्व.
सोनोपंत स्वराज्यात दाखल झाले आणि काही काळातच मोठं राजकारण निर्माण झालं. बलवान होऊ लागलेल्या शहाजीराजांची दोन्ही मुले शिवाजी आणि संभाजी यांच्यासह शहाजीराजांना संपवून टाकायचा कुटील डाव आदिलशहाने टाकला. शिवराय आणि संभाजीराजे या दोघांनी त्याला खणखणीत प्रत्युत्तर दिले. स्वराज्यावर चालून आलेल्या फत्तेखानाच्या मोठ्या सैन्याचा शिवरायांनी संपूर्ण पराभव केला तर बंगळूरवर चालून गेलेल्या फर्रादखानाला शंभूराजांनी हरवले. आदिलशहाने तर कपटाने शहाजीराजांना कैद करून ठेवलं होतं. या परिस्थितीत सोनोपंतांच्या मदतीनं महाराजांनी मोठी व्यूहरचना केली. एकेकाळी प्रत्यक्ष शाहजहान बादशाहाशी शहाजीराजांचा परिचय होता. काहीकाळ त्यांनी मोगलांची चाकरी केलेली. नंतर निजामशाही खांद्यावर घेत प्रसंगी त्यांनी बादशहाविरुद्ध लढताना मोठं शौर्य ही दाखवलेलं. त्यामुळे शहाजहान बादशहाचा मुलगा मुराद याच्याशी मग संधान बांधले. मुत्सदी डावपेच आखून मग शिवरायांनी शहजादा मुराद याला आदिलशाहीला फर्मान धाडायला उद्युक्त केलं. प्रत्यक्ष मोगलाईसोबत पंगा घेणं आदिलशाहीला परवडलं नसतं. मग सन्मानाने शहाजीराजांची मुक्तता केली गेली. यावेळी आदिलशहाने मात्र कोंढाणा किल्ला शिवाजीने परत द्यायला हवा अशी अट घातली.
शहाजीराजांचे तसे पत्र जेंव्हा शिवरायांना मिळाले तेंव्हा शिवराय अत्यंत चिडले. “एकेक गड जिंकून घेताना आमची माणसे कशी प्राण पणाला लावतात हे आबासाहेबांना कसं कळत नाही.. त्यांनी आम्हास ओळखले नाही. कर्नाटकात स्वतः एकतर गाफील राहिले आणि शत्रूकडून कैद भोगावी लागली...” असं काहीसं ते चिडून बोलू लागले... त्यावेळी शेजारी सोनोपंत उभे होते. त्यांचा पारा चढला. तरुण वयातील शिवरायांचे ते अविवेकी बोलणे ऐकून त्यांनी जागेवरच शिवरायांना सुनवायला सुरुवात केली..
स्पष्ट आणि खंबीर आवाजात सोनोपंत सांगू लागले, “राजे, तुम्ही काय बोलता आहात, एक तो कोंढाणा किल्ला काय की तुम्ही वडिलांची पुण्याई विसरलात... तुमचे वडील इतुके थोर की एकाच काय १० किल्ले देऊन टाकावेत. तुमच्या मनगटात ताकद आहे. तुम्ही सगळे किल्ले उद्या पुन्हा जिंकून घेऊ शकता.. मात्र वडिलांना गमावलेत तर ते परत मिळतील का.. याचा जरा विचार करा. अविचार करू नका. कोंढाणा द्यावा. वडिलांना मुक्त करून नंतर कर्तृत्व दाखवावे...” असं काही ते इतक्या तळमळीने बोलले की शिवरायांना आपली चूक उमगली. त्यांनी पट्कन सोनोपंतांचा हात धरला. म्हणाले, “ तुम्ही योग्य बोललात पंत. आम्ही चुकलो. अविचार करू पाहत होतो. तुम्ही रोखले हे उत्तम केलेत..” आणि महाराजांनी कोंढाणा आदिलशहाला देऊन टाकला. सोनोपंत, माणकोजी आदि मंडळींच्या सल्ल्यानं राजांनी हे राजकारण देखील जिंकून दाखवलं.
पुढे स्वराज्यविस्तार होत होता. या दरम्यान मुहम्मद आदिलशहा मरण पावला. आणि त्याच्या मुलाला अली याला गादीवर बसवून बडी बेगम सर्व कामकाज पाहू लागली. याचा महाराजांनी फायदा उठवला. जोरदार हालचाली करून बरेच किल्ले हस्तगत केले. थेट जावळीचे खोरेही स्वराज्यात आले. दाभोळ पर्यंत धडक मारून तो आदिलशाही प्रांत ही ताब्यात घेतला. या हालचालींमुळे मोगलांकडून काही कारवाई होऊ नये यासाठी सोनोपंत डबीर मोगली शहजादा औरंगजेब याच्याकडे निघाले. या काळात औरंगजेब दक्खनचा सुभेदार होता आणि आदिलशाही संपवावी यासाठी बिदरजवळ आदिलशाही सैन्यासोबत लढत होता.
सोनोपंतानी औरंगजेबाची भेट घेतली. खलिता सादर केला. त्यात काहीसं लिहिलेलं होतं की, “कोकण प्रांत आणि तिथले आदिलशाहीतले किल्ले आम्ही घेतले आहेत. आम्ही तुमचेच प्रतिनिधी म्हणून या मोहिमा पार पाडत आहोत. ताब्यात घेतलेल्या या भागासाठी आपली मंजुरी द्यावी.”
लढाईच्या धामधुमीत आधीच औरंगजेबाची बिकट अवस्था झालेली. आदिलशाही सरदार अफझलखानाने औरंगजेबाची चांगलीच नाकेबंदी केलेली. त्यात उत्तरेत शाहजहान बादशहाच्या आजारपणाच्या बातम्या. औरंगजेबाचे सगळे लक्ष तिकडे. त्याला आता बादशाहीचे वेध लागलेले. त्यामुळे त्याने त्वरित सोनोपंताना ही मंजुरी देऊन टाकली. हिजरी सन रजब १०६७ म्हणजेच एप्रिल १६५७ च्या या पत्रात औरंगजेबाने असं लिहिलंय की, “सांप्रत विजापुरकराकडील जे किल्ले, मुलुख, दाभोळ बंदर आणि दाभोळखालील मुलुख तुम्हाकडे आहे, त्यास आमची मंजुरी आहे. तुमच्यावर आमचा पूर्ण लोभ आहे..”
भाग आदिलशहाचा, जिंकला शिवरायांनी आणि त्यासाठी फुकटची मंजुरी मागून घेतली मोगलांची..! ही सगळी राजनीती फार अभ्यासावी अशीच.
सोनोपंत अजून स्वराज्यात परत देखील आले असतील-नसतील... तोवर अवघ्या आठवडाभरात स्वतः शिवरायांनी खास तुकडी सोबत घेऊन थेट जुन्नरवर धाड टाकली. जुन्नर हे मोगलांचे महत्वाचे ठाणे. तिथून सोने-नाणे, जवाहीर, कापडचोपड यांसह जवळपास सातशे उत्तम अरबी घोडे मराठ्यांनी लुटले. मग पुन्हा जाऊन अहमदनगरवर हल्ला केला. तिथला मोगली सुभेदार नौसीरखान शूर होता. तिथे महाराजांना फार काही करता आले नाही. माघार घ्यावी लागली. आठ दिवसांपूर्वी या मराठ्यांचा वकील गोडगोड बोलून जातो आणि लगोलग हे मराठे आपलीच मुख्य ठाणी लुटतात. प्रचंड चिडलेल्या औरंगजेबाने कारतलबखान, रायकर्णसिह, अब्दुल मुनीम आदि सरदार पाठवले आणि शिवाजीच्या मुलुखातील गावे जमीनदोस्त करा, लोकांच्या कत्तली करा, पुणे-चाकण आदि शिवाजीची ठाणी जिंकून घ्या असे आदेश दिले.
त्यापाठोपाठ लगेच पुन्हा शिवाजीराजांनी रघुनाथपंत कोरडे याना तातडीने पुन्हा औरंगजेबाकडे पाठवले आणि चुकून ही आगळीक घडल्याबद्दल क्षमा मागितली. पुनश्च असे घडणार नाही हे सांगताना लुटलेला माल परत देण्याबाबत मात्र चकार शब्द काढला नाही..!
दिल्लीकडे लक्ष लागलेल्या औरंगजेबाने मोठ्या मनाने माफी दिल्याचे पत्र दिले. त्यात म्हटले आहे की, “ तुमची अर्जदास्त रघुनाथपंत वकील यांचेबरोबर पाठवली ती आम्हास पावली. तुम्ही केलेली कृत्ये विसरण्याजोगी नाहीत. तथापि तुम्ही पश्चात्ताप व्यक्त केल्याने आम्ही माफ करत आहोत. पुन्हा ऐसी आगळीक ण घडावी.. इत्यादी..इत्यादी..
या सगळ्या घडामोडीत सोनोपंतांच्या मुत्सद्देगिरीचा महाराजांना चांगलाच उपयोग झाला.
नंतरच्या अफझलखान प्रकरणातही महाराजांच्या जवळ जे काही खास सल्लागार होते त्यात कान्होजी जेधे नाईक, माणकोजी दहातोंडे, गोमाजी नाईक पानसंबळ, कृष्णाजी नाईक पानसंबळ, रघुनाथ अत्रे, मोरोपंत, गोपीनाथकाका बोकील, नेताजी यांच्यासोबत ज्येष्ठ असे सोनोपंत डबीर नेहमीच होते.
इतकंच नव्हे तर नंतरच्या काळात जेंव्हा शाहिस्तेखानाची स्वारी झाली, तेंव्हा फार्सी भाषेचे उत्तम जाणकार असलेले सोनोपंत थेट शाहिस्तेखानाची भेट घ्यायला आणि काही मसलत करायला गेल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. मात्र तहाची बोलणी बहुदा फिसकटली असावीत. शाहिस्तेखानाची नंतर महाराजांनी मोठी फजिती केली आणि गेल्या काही वर्षात स्वराज्याची झालेली हानी भरून काढण्यासाठी थेट सुरतेवर स्वारी केली. सुरत ही मोगलांची सर्व मोठी व्यापारी पेठ. महाराजांना इथे करोडोची संपत्ती मिळाली. तिथून महाराज परत आले तर शहाजीराजांना देवाज्ञा झाल्याची वाईट बातमी.!
महाराज आणि सोबतच्या सहकाऱ्यांनी मोठ्या मिनतवारीने आऊसाहेबांचे मान वळवले. आणि सती जायला तयार झालेल्या जिजाऊ थांबल्या... स्वराज्याचं काम वाढत राहिलं..!
महाराजांच्या वाढत्या पराक्रमाने जिजाऊ समाधानी होत होत्या. त्यातच आता होणाऱ्या सूर्यग्रहणाच्या निमित्ताने आपण काही दानधर्म करावा असं त्यांना वाटलं.
क्रोधीनाम संवत्सर, इ.स. १६६५, पौष महिन्यातील अमावस्या. त्यादिवशी सूर्यग्रहण होते. क्षेत्र महाबळेश्वर येथे शिवाजी महाराज आऊसाहेब जिजाबाई यांच्यासह काही खास माणसांसोबत आले होते. सूर्यग्रहणाच्या निमित्ताने काही दानधर्म करावा अशी जिजाऊसाहेबांची इच्छा पूर्ण करायला. महाराजांनी ठरवलं की आपण आईची सुवर्णतुला करायची..! महाबळेश्वरचे वेदमूर्ती गोपाळभट हे महाराजांचे विश्वासू. त्यांच्या हस्ते ही सुवर्णतुला पार पडणार होती.. वेदमूर्ती गोपाळभट यांच्यासह बाकी ब्रह्मवृंद मंत्रविधी म्हणू लागला. एका मोठ्या तराजूच्या एका पारड्यात जिजाऊ बसलेल्या. आणि दुसऱ्या पारड्यात सोन्याच्या मोहरा टाकल्या जात होत्या... महाराज अत्यंत कृतकृत्य होऊन आऊसाहेबांची ही तुला पाहत होते. अत्यंत जीवावरच्या धामधूमीतून आज हे क्षण जिजाऊना दिसत होते. अत्यंत पराक्रमी असा पती निघून गेला, मात्र त्याच्या माघारी त्यापेक्षाही पराक्रमी अशा पुत्रानं त्यांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं होतं... हळूहळू ते स्वप्न आकार घेत होतं.! सुवर्णतुला पूर्ण झाली. त्यांच्या चेहेऱ्यावर समाधान विलसलं.
नंतर अचानक महाराज स्वतः पुढे होऊन अत्यंत ज्येष्ठ अशा एका व्यक्तीजवळ गेले. ते होते सोनोपंत विश्वनाथ डबीर. .! पंतांचे वय झालेले. अगदी थकलेले... महाराज कदाचित म्हणाले असतील, “ पंत, या असे पुढे या.. तुमचीही आज तुला करायची आहे. तुम्ही आजवर मला वडिलांची माया दिली. प्रसंगी योग्य सल्ला दिला. अवघड परिस्थितीत शत्रूसैन्यात जाऊन स्वतः वकिली करत मुत्सद्देगिरी केली... कोणत्याही गोष्टीचा लोभ न बाळगता स्वराज्याची निरपेक्ष सेवा केलीत. तुमचं कर्तब मोठं आहे...!”
शिवरायांनी ही इच्छा बोलून दाखवताच पंताना भरून आलं... आता ते सदरेवर काम करत नसायचे. तर त्यांचा मुलगा त्रिंबकपंत कामकाज पाहत होता. त्यालाही फार्सी भाषेचे उत्तम ज्ञान होते. त्यामुळे निवृत्त झालेल्या पंतांची तुला करावी असा मनसुबा शिवराय सांगतील असं खुद्द पंतानीही अपेक्षिले नसावे. हा त्यांच्यासाठी बहुमानच होता. फार मोठा बहुमान. पंताना जुने दिवस आठवू लागले. मनात राजांप्रती कृतज्ञता दाटली. डोळे आनंदाश्रूनी भरले. “शिवबा...” इतकेच उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडले. त्यांना पुढे बोलवेना. थरथरत पंत उठले. राजांनी त्यांना तराजूच्या पारड्यात बसवले. क्षेत्र महाबळेश्वरच्या त्या पवित्र भूमीत वृध्द सोनोपंतांची सुवर्णतुला होऊ लागली..! सोनोपंताना जे समाधान लाभलं त्यापेक्षा जास्त समाधान शिवरायांना लाभलं होतं.
दोन तीन हजार वर्षांच्या इतिहासाची पाने उलटू लागलो की अशा विविध सुवर्णतुलांबाबतच्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. मात्र आपल्याच एका सहकाऱ्याची, एका स्वामिनिष्ठ सेवकाची तुला करणारे शिवबाराजे बहुदा एकमेव असावेत असं वाटतं. अशा राजांसाठी मग लोक घरादारांवर निखारे ठेवतात. प्रसंगी आपल्या घरातलं काम बाजूला ठेवून स्वराज्यासाठी रक्त-घाम गाळत राहतात. धन्य ती सर्व माणसे आणि त्यांच्या स्वराज्यसेवेचा मान राखणारे ते शिवछत्रपती..!!
सुधांशु नाईक, कोल्हापूर.
(९८३३२९९७९१)
nsudha19@gmail.com
संदर्भ :-
शिवकालीन पत्र सार संग्रह
शककर्ते शिवराय – विजयराव देशमुख
राजा शिवछत्रपती – बाबासाहेब पुरंदरे
फोटो सौजन्य: गुगल
No comments:
Post a Comment