' जगावेगळं' या पेजसाठी मी लिहित असलेल्या "इतिहासाच्या पोतडीतून" या मालिकेतील हा लेखांक ८ वा - सुधांशु नाईक.
पराक्रमी चिमाजीअप्पा...
बाजीराव पेशवे यांच्या संपूर्ण कारकिर्दीत हिंदवी स्वराज्य हिंदुस्थानभर व्हावे यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केले त्यासाठी राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, उदाजी पवार आदि सरदारांसोबत नेहमीच समर्थ साथ दिली ती त्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी. बाजीरावांच्या बद्दल आपल्या बऱ्यापैकी माहिती असते मात्र चिमाजीअप्पा यांच्याविषयी अनेकांना फारसं माहिती नसतं. आज जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याविषयी या लेखातून....
बाजीराव आणि चिमाजीअप्पा. यांना जणू राम-लक्ष्मणाची जोडी म्हणूनच ओळखले जात होते. तेजतर्रार, दिलदार आणि तडफदार म्हणून आपण बाजीरावांकडे पाहतो तर चिमाजीअप्पा म्हणजे शांत, धीरोदात्त, मुत्सद्दी, अपूर्व नियोजन करणारं, फडावरील कामावर अत्यंत बारीक लक्ष ठेवणारं, एकावेळी अनेक आघाड्यांमध्ये सुसंगती निर्माण करणारं व्यक्तिमत्व होतं. बाजीरावांचा अकाली मृत्यू झाला आणि काही काळात तसंच अचानक चिमाजीअप्पांनाही अकाली मृत्यूने ओढून नेलं. तसं झालं नसतं तर.....
पण इतिहासाला जर तर मंजूर नसतात.
इ.स. १७०३ च्या सुमारास बाळाजी विश्वनाथ आणि राधाबाई या दाम्पत्याला दुसरा मुलगा झाला. त्याचे नाव ठेवले अंताजी. मात्र चिमणाजी या नावाने सर्व बोलावत त्याला. त्याच चिमणाजी ला इतिहास आज पराक्रमी चिमाजीअप्पा म्हणून ओळखतो. अप्पांचं आपल्या मोठ्या भावावर फार प्रेम. जणू सतत भावाची काळजी करणारा तो दुसरा लक्ष्मणच. बाजीराव, पेशवे झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात अप्पा सातारा दरबारात मुतालिकी करायचे. पहिल्यांदा निजामाचा पराभव करून, जेंव्हा बाजीराव प्रथम सातारला आले तेंव्हा त्यांचं स्वागत करताना अप्पांना धन्य धन्य वाटले होते.
१७२७ मध्ये जेंव्हा करवीरकर संभाजीराजे छत्रपती आणि निजामाने पुण्यावर आक्रमण केले तेंव्हा सातारकर शाहू महाराजांना घेऊन चिमाजीअप्पा सुरक्षेच्या कारणस्तव पुरंदर गडावर जाऊन राहिले होते. बाजीरावांनी केलेल्या व्युहरचनेत नंतर निजाम अडकला आणि पुढे पालखेडच्या लढाईत पराभूत झाला.
त्यातच निघाले माळव्याचे राजकारण. जिथे मुख्यतः अप्पांनी पराक्रम गाजवला. काय होते हे राजकारण?
मध्यंतरीच्या काळात बाजीरावांनी १७२२ मध्येच माळव्यात धार येथे उदाजीराव पवार यांची नेमणूक केली होती व नंतर उज्जैनचा मोगल सुभेदार दयाबहाद्दर याचा पराभव केला होता. त्यावेळी जयपूर नरेश सवाई जयसिंहासोबत बाजीरावांनी संधान बांधलेले. दयाबहाद्दरचा पराभव केल्यानंतर तिथे गिरधरबहाद्दर ची नेमणूक केलेली जयपूर नरेश यांनी. माळव्यात अधिक राज्यविस्तारासाठी मराठे उतरल्यावर त्याने मदत करावी ही अपेक्षा होती. मात्र त्याने निजामाप्रमाणे माळव्यात स्वतंत्र कारभार थाटायचे उद्योग सुरु केले. सवाई जयसिंहाचे उपकार तो विसरला. मराठ्यानाही जुमानेसा झाला.
या काळात ग्वाल्हेरला शिंदे आणि इंदौरला होळकरांच्या नेमणुक बाजीराव पेशव्यांनी केलेली. आणि ते दक्षिणेत मोहिमेवर गेले.
इकडे मोगल गिरीधर बहाद्दरला रसद पुरवू लागले. आणि त्याच्या पारीपत्याची जबाबदारी अप्पांच्यावर आली. शिंदे होळकर आणि उदाजी पवारांच्या फौजाही त्यांच्यासोबत आल्या आणि सगळे माळव्यात दौडू लागले. धामनोद, मांडवगड, अमझेरा, नालच्छा या प्रदेशात लढाई जुंपली. मोठे युध्द सुरु झाले.
अप्पा थेट गिरधरबहाद्दरला जाऊन भिडले. तलवारीच्या एका घावात अचानक गिरधर बहाद्दर ठार झाला. तोच पडला म्हटल्यावर मोगली सैन्य पळून गेले. मराठा सैन्याने अप्पांचं अपार कौतुक केलं. शाहुमहाराजांच्याकडून खास कौतुकाचे पत्र आले. या मोहिमेत माळव्याच्या प्रांतातील वर्चस्वासह सोबत महसूल ही मिळाला. त्यामुळे बाजीराव आणि अप्पा यांच्याविरोधात कट करणाऱ्या सातारा दरबारातील ब्राह्मण विरोधकांची तोंडे बंद झाली.
चिमाजीअप्पांच्या मुत्सद्दीपणाची झलक लवकरच यानंतर पाहायला मिळाली. मराठ्यांनी माळवा जिंकल्यानंतर काही महिन्यांनी राजा छत्रसाल आणि बुन्देलखंडचे राजकारण झाले. शिवछत्रपतींच्या आदर्शानुसार काम करून स्वतंत्र राज्य उभे केलेल्या या राजाच्या मदतीला बाजीराव धावून गेले. यशस्वी झाले आणि परत येताना यावनी मस्तानीसोबत लग्न करून घरी घेऊन आले. त्यावेळी शनिवारवाड्याचे काम सुरु होते. पेशव्यांचे कुटुंब धडफळे यांच्या वाड्यात राहत होते. तिथे जागा कमी आहे या सबबीखाली अप्पांनी मस्तानी बाईसाहेबांचा मुक्काम दुसरीकडे करवला आणि केवळ बाजीरावांना वाड्यात आणले.
या संपूर्ण मस्तानी प्रकरणात राऊ-मस्तानीच्या खालोखाल जर कुणाची मानसिक कुचंबणा झाली असेल तर ती अप्पांची. एका बाजूला भावावर जीवापाड प्रेम, त्याचवेळी तितकीच तीव्र मातृभक्ती आणि रूढी-परंपरेवरील विश्वास. पराक्रमी भावाची हिंदुस्तानभर स्वराज्य विस्तार करण्याची स्वप्नं सत्यात यायला हवीत तर त्याला दुखावून चालणार नाही हे जसं कळत होतं तसंच परंपरेची बंधनं मोडवत नव्हती.
त्यात स्वतःची तोळामासा तब्येत. सतत येणारी आजारपणे. त्यात अजून एक घटना त्यांच्या आयुष्यात घडली. शके १६५२ मध्ये, ४ ऑगस्ट १७३० ला त्यांची पत्नी रखमाबाई यांना मुलगा झाला. हे बाळ म्हणजेच थोर शूरवीर सेनानी सदाशिवराव भाऊ. ज्यांनी दिल्लीचे तख्त फोडले. शिवरायांचे स्वप्न साकारण्यासाठी.
मात्र या बाळंतपणातून रखमाबाईची तब्येत ढासळली. शेवटी ३१ ऑगस्टला त्या गेल्याच. जेमतेम एक महिन्याच्या त्या लहानग्या सदाशिवची काळजी मग राऊच्या पत्नी काशीबाई यांनीच घेतली. पत्नीच्या मृत्यूनंतर खिन्न असूनही अप्पा कामाला लागले. फडावरच्या कामाला शिस्त लावली. येणाऱ्या महसुलातून योग्य खर्च व्हावेत यासाठी आखणी केली. स्वतः सातारच्या दरबारातील मुतालिकीची कामं करत होते. बाजीरावांचा ज्येष्ठ पुत्र नानासाहेब त्यांच्यासोबत राहून कामकाजाचे धडे घेत राहिले.
या काळातच बाजीरावांनी गुजरातेत दाभाड्यांची मोहीम पूर्ण केली. ते पुन्हा पुण्यात आल्यावर मातोश्रीकडे गेले. राधाबाई म्हणाल्या, “ राऊ, तुम्ही तुमच्याच संसाराकडे पाहू नका केवळ. अप्पा कडे पहा. सदाशिव आता सव्वा वर्षाचा झाला. आम्ही रोज अप्पाला सांगतो दुसरं लग्न करूया तर तो तयार नाही. तुम्ही तरी सांगून पहा...”
मग राऊ अप्पांशी बोलत बसले. आपण दुसरं लग्न केलं आणि जर मुलाला सापत्न वागणूक मिळाली तर ते वाईट ठरेल या उद्देशाने हळव्या मनाचे अप्पा दुसरं लग्न करायला तयार नव्हते. मात्र राऊनी समजूत काढली. उत्तम स्थळ निवडू असं आश्वासन दिलं. राधाबाईंनी अलिबागच्या थत्ते सावकारांची कन्या अन्नपूर्णा हिला अप्पांची दुसरी म्हणून पसंत केलीच होती. ती अप्पांनाही पसंत पडली आणि विवाह झाला. यानंतरच सारे २२ जानेवारी १७३२ मध्ये रथसप्तमीच्या मुहूर्तावर नव्याने बनलेल्या शनिवारवाड्यात राहायला गेले. तिथेही बाजीरावांनी आपल्या लाडक्या भावाच्या नावे एक बाग वसवली. तिचं नाव होतं चिमणबाग...!
अन्नपूर्णाबाईनीही लहानग्या सदाशिवचा फार मायेने सांभाळ केला. त्यामुळे घराच्या जबाबदारीतून अप्पांना स्वस्थता मिळाली. पुढची २-३ वर्षे बाजीराव कोकणात, उत्तरेत असे विविध मोहिमांवर असताना प्रकृती अस्वास्थ्यामुळे अप्पा मात्र शनिवारवाड्यातून कामकाज करत राहिले. विविध सुभ्यातील सारावसुलीकडे लक्ष देत राहिले.
मात्र त्यांचे बारीक लक्ष नेहमीच बाजीरावांच्याकडे असायचं. त्यांच्या मोहिमांसाठी रसद पुरवठा सुरळीत राहावा, पैशाची चणचण मोहिमेवर जाणवू नये यासाठी ते उस्तवार करत राहायचे. विविध सावकारांकडून घेतलेल्या कर्जाचा हिशोब सांभाळायचे. त्यातील पै न पैचा योग्य विनियोग होईल याकडे कटाक्ष ठेवत. बाजीरावांना मनस्ताप होऊ नये म्हणून मनाविरुद्ध असूनही मस्तानी महालाची सुरक्षा, तिथली व्यवस्थाही नीट होतेय की नाही याकडे लक्ष देत.
नोव्हेंबर १७३६ मात्र अप्पा कोकणात उतरले. आधीच्या लढाईत बाजीराव, प्रतिनिधी यांनी सिद्दी सात याकुतखान याला पायबंद घातला होता. १६८९ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेलेला राजधानीचा गड याच सिद्दीच्या ताब्यात होता. तो शेवटी प्रतिनिधींनी एल्गार करून याच मोहिमेत मिळवला. मात्र सिद्दीचा पुरता बिमोड करता आला नाही. जंजिरा वगळता सर्व कोकणवर ताबा मिळवून बाजीराव १७३४ ला पुण्यात आले आणि उत्तरेतील राजकारणात गुंतले. त्यामुळे सिद्दी सात चा बंदोबस्त करायची जबाबदारी अप्पांच्यावर आली.
सरखेल कान्होजींचे पुत्र आणि नंतरचे सरखेल अशा सेखोजी आंग्रे यांचाही याच दरम्यान मृत्यू झाला. आणि कोकणात सिद्दीचा पुन्हा धुमाकूळ सुरु झाला. सेखोजीनंतर मानाजी आंग्र्यांना शाहुमहाराजांनी सरखेलपद बहाल केले. तेही अप्पाच्या मदतीला आले.
१७३६ च्या या मोहिमेत अप्पांनी उदंड पराक्रम दाखवला आणि थेट सिद्दीसात यालाच ठार केले. जंजिरा, पद्मदुर्ग आणि उंदेरी हे तीन किल्ले वगळता सर्व मुलुख मग शाहुमहाराजांच्या स्वाधीन केला सिद्दीच्या वारसाने. आता तो मराठ्यांचा मांडलिक बनला. आजही जंजिरा हा जलदुर्ग पाहायला जाणाऱ्या हजारो पर्यटकांना हा इतिहास मात्र कुणीच सांगत नाही... हीच आपली शोकांतिका आहे.
याच सिद्दी सातने एकेकाळी पेशवे आणि शाहुमहाराजांच्या गुरुस्थानी असलेल्या ब्रह्मेंद्रस्वामींना त्रास देत चिपळूणजवळचे परशुराम मंदिर उध्वस्त केले होते. त्यामुळे सर्वांनी चिमाजीअप्पांचे कौतुक केले. एवढी मोठी मोहीम यशस्वी झाली तरी जंजिरा दुर्ग स्वराज्यात आला नाही याची खंत मात्र अप्पा नेहमी बोलून दाखवत राहिले. हे त्यांचं मोठेपण..!
१७३७ च्या निजामाविरुद्धच्या भोपाळ मोहिमेत मात्र अप्पा पुन्हा बाजीरावांच्या सोबत गेले. बाजीरावांनी पुढे मुसंडी मारली आणि तापीच्या दक्षिणेकडे पिछाडीवर नाकेबंदी करत अप्पा थांबले. निजामाला बाजीरावांच्या सोबत लढाईत मदत करायला निघालेला निजामपुत्र नासिरजंग याची त्यामुळे काहीच मात्रा चालली नाही. चिमाजीअप्पांनी त्याला वरणगाव- खरगोण प्रांतात रोखून धरले. शेवटी या भोपाळच्या युद्धात बाजीरावांनी निजामाला असा काही धुतला की पुढची काही वर्षं तो अगदी शांत बसून राहिला. या विजयामध्ये पिछाडीवर जय्यत तयार होऊन लढलेल्या चिमाजीअप्पाचा मोठा वाटा होता..!
या मोहिमेनंतर मग जाणून घेऊ त्यांच्या आयुष्यातील ती सर्वाधिक गाजलेली मोहीम..! अर्थातच वसईचे युध्द.
खरतर केवळ वसईचे युध्द आणि पोर्तुगीजांचा पाडाव यावर मोठा लेख होईल. ते अनेकांनी लिहिलंही आहेच. मात्र त्यापूर्वी चिमाजीअप्पांनी काय काय केलं हे सगळं आज या लेखाच्या निमित्ताने मुद्दाम सांगतोय कारण लोकांना वसईच्या युद्धाव्यतिरिक्त चिमाजीअप्पांनी केलेले पराक्रम माहितीच नाहीत.
ठाणे, भिवंडी या प्रांतात पेशव्यांचे सरदार होते गंगाजी नाईक अणजूरकर. सध्या ठाणे ते अहमदाबाद या हायवेवर जो अंजूरफाटा लागतो तेच ते हे अणजूर.
१७२२ पासून ते या परिसरातील पोर्तुगीजांच्या वाढत्या हालचाली, त्यांचे अत्याचार याविषयी सतत कळवत होतेच. इथे मोठी मोहीम उघडायला हवी याविषयी सांगत होते. ख्रिश्चन मिशनरी या भागातील गरीब कोळी, भंडारी, खारवी आदि समाजातील लोकांना जबरदस्तीने पकडून वसईच्या किल्ल्यात नेत आणि तिथे जबरदस्तीने त्यांचे धर्मांतर करत. याबाबत अनेकदा पोर्तुगीज गव्हर्नरला ताकीद दिली गेलेली. मात्र परिणाम होत नव्हता.
शेवटी अप्पांनी निर्वाणीचा संदेश पाठवला, “ यापुढे हे प्रकार असेच सुरु राहिले तर मराठा सैन्य थेट किल्ल्यात घुसेल. तुमच्या देवळांच्या घंटांचे ध्वनी आमच्या मंदिरात वाजू लागतील...” तरीही गव्हर्नरने ऐकले नाही.
मग प्रत्यक्षात मोहीम सुरु झाली ती १७३८ मध्ये. चिमाजीअप्पांनी आपले शब्द खरे करून दाखवले..!
वसईच्या जवळचे विविध प्रदेश जिंकून जानेवारी १७३९ मध्ये वसईला वेढा घातला अप्पांच्या फौजांनी. तीन चार महिने झाले तरी किल्ला दाद देत नव्हता. पोर्तुगीज नेटाने प्रतिकार करत होते. मुंबईकडून किंवा गोव्याकडून कोणतीही रसद मिळत नसतानाही लढत होते.
शेवटी अप्पा प्रचंड संतापले. सैन्याच्या समोर उभे राहिले आणि त्वेषाने म्हणाले, “ तीन तीन महिने लढून जर तुम्हाला हा साधा एक कोट जिंकता येत नसेल तर एका तोफेला मला बांधा. तोफेला बत्ती दिल्यावर माझे मस्तक आत जाऊन पडेल असे करा. मगच माझे समाधान होईल...”
आणि मराठे संतापले. रातोरात योजना ठरली. तटबंदीखाली खणून सुरुंग पेरण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोर्तुगीजांच्या ध्यानीमनी नसताना एक प्रचंड बुरुज आकाशात उडाला. शेकडो लोक ठार झाले. तिथून मराठे सैन्य आत घुसलं. त्याचवेळी दुसऱ्या बुरजाजवळ सुरुंग उडाला. त्यात अनेक मराठेही ठार झाले. मात्र मराठ्यांनी शौर्याची पराकाष्ठा केली. ५ मे १७३९ रोजी शेवटी वसई ताब्यात आली. मुंबई सोडल्यास गोव्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरून पोर्तुगीजांचे उच्चाटन झाले.
नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रचंड अत्याचार केलेल्या त्या पोर्तुगीज गव्हर्नरला आणि त्यांच्या उरलेल्या सैन्याला अप्पांनी जीवदान दिले. त्यांचे सामान-सुमान घेऊन किल्ला सोडून जायला सांगितले. ते सगळे तिथून निघून गेल्यानंतरच मराठे किल्ल्यात शिरले...!
हा सगळा इतिहास पोर्तुगीजांनी त्यांच्या लिस्बनच्या मुख्य ऑफीसला कळवलेला आहे हे नोंद घेण्यासारखे आहे.
ही नीतीमत्ता शिवरायांनी निर्माण केली आणि मराठ्यांनी नेहमीच जपली याचा मला फार अभिमान वाटतो...!
अप्पा वसईत लढत असताना बाजीरावांनी इचलकरंजीकर घोरपडे ( त्यांचे मेव्हणे) यांना थेट गोव्यावर स्वारीला धाडले. जेणेकरून पोर्तुगीजांचे पूर्ण उच्चाटन व्हावे. मात्र ते तिथे हल्ला करणार तोच वसईत तह झाल्याचे कळले आणि गोवा ताब्यात यायचा राहून गेला.
शिवरायांनी, शंभूराजांनी गोवा ताब्यात घ्यायचे प्रयत्न केले होते. त्यानंतरच्या काळातला हाही प्रयत्न फोल गेला. आणि शेवटी १९६१ पर्यंत गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला. त्रास देत राहिला. शेवटी मोठी कारवाई झाल्यानंतरच भारतातून पोर्तुगीजांचे कायमचे उच्चाटन झाले. जर अप्पांनी जशी वसई घेतली तसंच गोवा घेतला गेला असता तर ?? असो.
४ सप्टेंबर ला अप्पा मोठा विजय घेऊन पुण्यात पोचले. लूट तर होतीच मात्र आपले शब्द खरे करत त्यांनी वसईतील चर्चमधल्या घंटा काढून आणल्या होत्या. वसईच्या मोहिमेतून आणलेल्या या अजस्त्र घंटा नाशिक, पुणे, सातारा परिसरातील अनेक मंदिरातून आजही पाहायला मिळतात. त्यांच्या त्या विजयाची तीच आज जिवंत आठवण. रोज निनाद्णारी.
यानंतर मात्र पेशवाईला धक्का बसला...! २८ एप्रिल १७४० रोजी थोर पराक्रमी बाजीराव पेशव्यांचं निधन झालं. आधीच ढासळलेली तब्येत घेऊन निर्धाराने काम करत असलेल्या अप्पांना हा मोठा धक्का होता. मस्तानीबाई आणि एकूणच जे काही घडलं त्यात त्यानांही मनाविरुद्ध पडावे लागले. त्यांचीही कुचंबणा झाली. आणि याच प्रसंगांमुळे राऊ शेवटी खचले हे वास्तव स्वीकारताना त्यानाही किती मानसिक यातना झाल्या असतील त्याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. तरीही ते काम करत राहिले.
२५ जून रोजी नानासाहेब यांना पेशवाईची वस्त्रे शाहुमहाराजांच्या हस्ते बहाल करण्यात आली. त्याप्रसंगी अप्पांचाही मोठा सन्मान केला गेला. पावसाळ्यात त्यांनी पुन्हा प्रबळ होऊ लागलेल्या शत्रूंना तंबी देणारी पत्रे पाठवली. ते लिहितात, “ राव गेले. परंतु कुल फौजा व रावांचा आशीर्वाद आमच्या व चिरंजीव नानांच्या पाठीशी आहे....”.
ऑक्टोबर मध्ये नवी मोहीम सुरु करायची होती पण अप्पा आजारी पडले. आणि १७ डिसेंबर १७४० रोजी त्यांचे निधन झाले. एक करारी, शूर, स्वामीनिष्ठ आणि प्रेमळ व्यक्तिमत्व कायमचे काळाच्या पडद्याआड गेले.
आज सुमारे ३०० वर्षानंतर हे सारं अभ्यासताना त्यांचा मोठेपणा प्रकर्षाने जाणवतो. आणि त्याचबरोबर जाणवतं आपलं खुजेपण.
पुण्यातील चिमाजीअप्पांची समाधी कुठे आहे असं विचारलं तर ७० % पुणेकरांना देखील ते सांगता येत नाही तिथं बाकीच्यांची काय कथा? तसंच ज्या वसईच्या लढाईमुळे चिमाजी अप्पा हे नाव जगभर दुमदुमले त्या वसईच्या किल्ल्यात आज अनैतिक प्रकारांना ऊत आलेला आहे. वसई आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक लहानमोठे दुर्ग हल्ली प्रेमवीरांच्या लीलांनी रंगलेले असतात. अनेक किल्ले तर अतिक्रमणात गेलेले. अनेक किल्ल्यांच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साठलेले. कित्येक ठिकाणी २०-२० फूट उंचीची झुडुपे वाढलेली. कित्येक ठिकाणी जाण्याचा मार्ग कोणता हेच कळेनासे झालेलं. गडावरील पाण्याची टाकी, मंदिरे, बुरुज आदि अवशेष अस्तंगत होऊ लागलेले. तर कित्येकांनी तिथले दगड उचलून आपापली बांधकामं केलेली. सर्व काही जणू विस्मृतीत जात होते....
त्या सगळ्याला पुन्हा प्रकाशात आणले ते आमचे मित्र आणि वसईचे तरुण तडफदार अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी. “किल्ले वसई मोहीम” या संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे ते आणि त्यांची टीम दुर्ग संवर्धन करतात. ते त्यांच्या परीने या परिसरातील इतिहासाला उजाळा देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. दरवर्षी १७ डिसेंबरला ते वसई परिसरात चिमाजीअप्पांची स्मृती जागवण्यासाठी विविध उपक्रम करत असतात.
त्यांचा दुर्ग अभ्यास हा थक्क करणारा तर आहेच मात्र त्याचसोबत ते परिसरातील केळवे- माहीम, अर्नाळा, तारापूर, दातिवरे, तांदूळवाडी अशेरीगड आदि विविध धारातीर्थांचा इतिहास अनेकांपुढे आणत आहेत. शेकडो पर्यटकांना उत्तम प्रकारे भटकंती कशी करावी, दुर्ग संवर्धन कसे करावे याची माहिती देत आहेत. वसईचा किल्ला हा जणू त्यांचा श्वास बनला आहे. मात्र त्यांच्या कामात वारंवार अनेक अडचणी निर्माण केल्या जातात. त्यांना एकटे पाडायचे प्रयत्न केले जातात. गडांवर अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमवीरांना त्यांच्याकडून सतत प्रबोधनात्मक मार्गाने अटकाव होत असतो, मात्र हेही अनेकांना पाहवत नाही.
हे सगळं पाहिलं की एकूणच व्यवस्थेविषयी चीड दाटून येते मनात. त्यामुळे हा लेख वाचणाऱ्या सर्व वाचकांना असे नम्र आवाहन करावेसे वाटते की किमान एकदा तरी वसईचा किल्ला, अर्नाळ्याचा भक्कम जलदुर्ग जरूर पहा.
आमचे मित्र श्रीदत्त राऊत दर रविवारी वसईच्या दुर्गात कार्यरत असतात. ते तुम्हाला सर्व माहिती मोठ्या आपुलकीने देतील. मात्र नुसती माहिती न घेता त्यांच्या कामात तुम्ही खारीचा वाटा जर उचललात तर आणि तरच चिमाजीअप्पांचं नाव गौरवाने घेण्याचा आपल्याला अधिकार असेल असे वाटते. श्रीदत्त राऊत यांचा मोबाईल क्रमांक आहे ९७६४३१६६७८.
वाचकहो, सध्याची कोरोना संकटाची परिस्थिती निवळली की ना चुकता अवश्य वसईला जा. श्रीदत्त राऊत यांच्यासोबत इथला किल्ला पहा, चिमाजीअप्पांनी केलेल्या कार्याचे स्मरण करा, आपला दैदिप्यमान इतिहास समजून घ्या !
सुधांशु नाईक, कोल्हापूर.
(९८३३२९९७९१)
संदर्भ ग्रंथ :
- पेशवे दफ्तर – रियासतकार सरदेसाई.
- पुण्याचे पेशवे – अ रा. कुलकर्णी
- पेशवे घराण्याचा इतिहास – प्रमोद ओक
- अजिंक्य योद्धा बाजीराव- जयराज साळगावकर
- पेशवे – श्रीराम साठे
- पेशवाई – कौस्तुभ कस्तुरे