जगावेगळं या फेसबुक पेजसाठी मी लिहीत असलेल्या "इतिहासाच्या पोतडीतून" या लेखमालेतील हा लेखांक ५ वा.
- सुधांशु नाईक.
मोगली शहजाद्याची कोकण स्वारी आणि रामघाट
१६८० मध्ये संभाजी महाराजांनी स्वराज्याची जबाबदारी पेलली. त्यानंतर काही महिन्यात औरंगजेबाचा एक पुत्र अकबर हा पित्याविरुद्ध बंड करून उठला. ते बंड अयशस्वी झालं. तो मग १६८१ मध्ये थेट संभाजीराजांच्या आश्रयाला आला. आणि त्यापाठोपाठ स्वराज्य पूर्ण बुडवायला प्रत्यक्ष आलमगीर औरंगजेब दक्ख्खन मध्ये उतरला. त्याच्यासोबत प्रचंड मोठं सैन्य, अनेक राजपूत-मोगली सरदार होते आणि सोबत शहजादे देखील. यापैकीच एक होता शहजादा शहाआलम. त्याच्या एका स्वारीची ही कहाणी...
संभाजीराजांनी स्वराज्याची जबाबदारी शिरावर घेतली. त्यानंतरच्या काळातील एकूण धामधूम ही विस्मयकारक आहे. सिद्दी, पोर्तुगीज, आदिलशाही, इंग्रज आणि प्रत्यक्ष आलमगीर औरंगजेब हे चारी बाजूने स्वराज्य संपवायला सज्ज झालेले. त्यांच्यासमोर होते अवघ्या पंचविशीतले तरुण छत्रपती शंभूराजे. मात्र या सर्व आक्रमणावर शंभूराजे असे काही तुटून पडले की शत्रू सगळीकडे पिछाडीवर गेला. १६८१ मध्ये शहजादा अकबर दुर्गादास राठोड यांच्यासह स्वराज्यात दाखल झाला. बापाविरुद्ध अयशस्वी बंड केलेला अकबर आता जीव वाचवायला धावत आलेला. खरंतर ही मोठी जोखीम. मात्र काही दूरदृष्टी ठेऊन शंभूराजांनी त्याला आश्रय दिला. पाली-सुधागड परिसरात त्याची व्यवस्था केली. एकेकाळी स्वराज्याचे सरसेनापती असलेले, आणि नंतर मोगलांकडे जाऊन पुन्हा स्वराज्यात परत आलेल्या नेताजी पालकर यांच्याकडे त्यांच्या आदरातिथ्याची जबाबदारी दिल्याचा एक उल्लेख इतिहासात सापडतो. मात्र स्वतः शंभूराजांनी लगेच भेट घेणे टाळले. एकूण सगळा अंदाज घेऊन मग त्यांनी अकबराची भेट घेतली आणि त्याला विविध स्वाऱ्यामध्ये आपल्या सोबत घ्यायला सुरुवात केली.
एव्हाना मोगली सैन्याचे विविध तोलामोलाचे सरदार स्वराज्यावर चौफेर तुटून पडले होते. बागलाण, खानदेश, कल्याण-भिवंडी पासून कोल्हापूर प्रांतापर्यंत अनेक ठिकाणी घमासान लढाया सुरु होत्या. प्रत्यक्ष शंभूराजे, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासह अनेकांनी दैदिप्यमान असा पराक्रम गाजवला. मोगलांना कोणत्याच लढाईत यश मिळाले नाही. औरंगजेबाला वाटले होते की शिवाजीराजांच्या मृत्युनंतर स्वराज्याचा चुटकीसरशी घास घेता येईल, पण... ते घडले नाही. मोगलांच्या सोबतच संभाजीराजांच्या सैन्याने चौलजवळ, वसई-डहाणू पट्ट्यांत पोर्तुगीजांना दमवले. जंजिरेकर सिद्दीची कोंडी केली. १६८२-८३ च्या सुमारास मग शंभूराजांनी थेट गोव्यावर स्वारी केली. गोवा संग्राम आणि तिथे शम्भूराजांसह मराठी सैन्यानं दाखवलेलं शौर्य हा एका स्वतंत्र पुस्तकाचाच विषय आहे. या दरम्यान शहजादा अकबर हाही प्रसंगी काहीवेळा मराठ्यांसोबत असल्याचे उल्लेख आहेत. गोव्यातील पोर्तुगीज, वेंगुर्लेकर डच यांच्याशी या दरम्यान वाटाघाटी सुरु होत्या.
उत्तर कोकण, बागलाण आदि प्रांतात आलेलं अपयश लक्षात घेऊन आलमगीर औरंगजेबानं मग दक्षिण कोकणावर स्वारी करायचं ठरवलं. विजापूरकर आदिलशहा, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी आदि साऱ्यांनी अन्य प्रांतातून येणाऱ्या मराठा सैन्याला अटकाव करावा आणि शाहजादा शहा आलम याने दक्षिण कोकणवर स्वारी करून हा प्रांत जिंकावा असं हे नियोजन. स्वतः औरंगजेब यावेळी अहमदनगरच्या आसपास थांबला.
मात्र घडले काही विपरीतच. गोव्यात मोठी धामधूम उडवून शंभूराजांनी पोर्तुगीजांना चांगलीच अद्दल घडवली. गोवा त्यांच्या हातून जाता जाता थोडक्यात वाचला. त्यामुळे शंभूराजांच्या विरोधात थेट युद्धात सहभागी होणे म्हणजे पुन्हा नव्याने प्राणसंकट ओढवून घेणं इतकं पोर्तुगीजांना आता नक्की कळले होतं. शंभूराजांनी ज्या तडफेनं मोगली सैन्याचं पहिलं मोठं आक्रमण मोडून काढलं त्यामुळे इंग्रजांचेही धाबे दणाणले. औरंगजेब आणि मोगलांनी आणलेल्या मोठ्या फौजफाट्यापुढे आता मराठे मोडून पडतील अशी पत्र पाठवणारे सुरत आणि मुंबईकर या २-३ वर्षातील शंभूराजांचा पराक्रम पाहून शांत झाले. त्यांनी वरकरणी तटस्थ राहण्याचे धोरण स्वीकारलं.
शहाआलम जवळपास ६०-७० हजारांचा फौजफाटा घेऊन सप्टेंबर १६८३ मध्ये रामघाट मार्गे गोव्याकडे निघाला. रामघाट हा पारगड –तिलारी जवळून गोव्यात उतरणारा त्या काळातील मोठा प्रसिद्ध मार्ग. हल्लीच्या कोल्हापूर जिल्ह्याचे हे दक्षिण टोक. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरचे. संपूर्ण मार्ग हा दाट झाडीने, डोंगर दऱ्यानी भरलेला. आजही या प्रांतात आपण गेलो तर इथलं जंगल पाहता येतं. त्याकाळी सुमारे ३५० वर्षांपूर्वी ते कसं असेल याची कल्पना येते.
या सर्व प्रवासात मोगली सैन्याला वाटेत अनेक ठिकाणी मराठ्यांच्या तुकड्यांनी छापे घालून त्रस्त केले. मोगली सैन्य ही मराठा अंमल असलेल्या भागातून जाताना लुटालूट करत होते. जाळपोळ करत होते त्यामुळे स्थानिक लोकांची सहानुभूतीही त्यांना मिळेना. त्यात मुख्य मार्गावरील बऱ्याच लोकांचे मराठ्यांनी स्थलांतर केलेलं. त्यामुळे तशी फारशी झळ मराठ्यांना लागली नाही. त्यामुळे अधिक त्वेषाने मराठे मोगलांवर झडप घालत होते. तरीही मोठ्या नेटाने शहा आलम आणि ते सैन्य गोव्याजवळ पोचलं. मोगली सैन्यानं थेट पोर्तुगीजांच्या आरमाराची नासधूस सुरु केली. त्यामुळे पोर्तुगीज देखील बिथरले. मग वकिलांमार्फत वाटाघाटी. एकूणच सगळा अंदाज घेत पोर्तुगीजांनीही प्रत्यक्ष युद्धात उतरण्याचे टाळले. त्यांनी जमेल तसा रसद पुरवठा करायला तेवढी तयारी दाखवली.
डिचोली, कुडाळ, बांदा आदि ठिकाणांची मोगलांनी नासधूस केली. लुटालूट केली. मात्र त्यांना फार मोठे यश कुठेच मिळेना. हा दक्षिण किंवा तळकोकणातला भाग अनेक खाड्यानी भरलेला. त्यामुळे भरतीच्या काळात बरेच ठिकाणी खारे पाणी खूप आतवर येई. अनेक विहिरीपर्यंत उतरे. जी जी गोड्या पाण्याची तळी, विहिरी पाणवठे होते ते मराठ्यांनी ताब्यात घेतलेले. मोगलांच्या सैन्याला जो रसद पुरवठा होई तो देखील वाटेत मधल्यामध्ये मराठ्यांची तुकडी लुटून नेई. सुरतेहून खास सागरी मार्गाने रसद पुरवठा करायचा प्रयत्न झाला. मात्र मराठ्यांच्या आरमाराने आणि विविध जलदुर्गांवरील शिबंदीने रसद पुरवठा करणारी जहाजेही लुटली. मराठ्यांना ज्या भागातून तात्पुरती माघार घ्यायची वेळ येई तेंव्हा जाता जाता मराठे तिथल्या पाणवठ्यात विषारी पदार्थ, मेलेली जनावरे वगैरे टाकून ठेवत. अन्न-धान्याची उपासमार त्यात पिण्याच्या पाण्याचे हाल. अवघ्या २-३ महिन्यातच मोगली फौजेत दाणादाण उडाली.
एव्हाना ज्या अकबराला पकडायची मुख्य कामगिरी शहा आलमवर होती त्या अकबराला पकडणेही त्याला शक्य झाले नाही तोही रायगडकडे निसटून गेला. मराठ्यांच्या ताब्यातील प्रदेश जिंकून घेणेही जमेना. त्यात रोगराई पसरली. वेगुर्ला ते गोवा हा प्रांत पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात... त्यामुळे गोव्यातूनही कसली मदत मिळेना. शेवटी त्यानं पुन्हा रामघाटमार्गे परत जायचं ठरवलं. लहानशी साधी एखादी चकमकही जिंकू न शकलेल्या या भल्या मोठ्या फौजेची मराठ्यांनी पुन्हा लांडगेतोड सुरु केली.
धड खायला अन्न नाही, पाणी नाही आणि त्यात भर म्हणून दुषित पाण्यामुळे अनेकांचे जीव घेणारी कॉलरा सदृश साथ.. आणि या सर्वावर कडी करत सतत वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून तिखट हल्ले करणाऱ्या मराठ्यांच्या तुकड्या...मोगली सैन्याचे अगदी हालहाल झाले. जवळपास बहुतेक सारं सैन्य गारद झालं. पागेत चांगले घोडेही उरले नाहीत. घाटमाथ्यावर पोचून तो विजापूरकडे वळला.
तिथं वाटेत एका गावात छावणी टाकली. जवळपास ६०-७० हजारांचं सैन्य गारद झालं होतं. हजारो घोडे, उंट मृत्युमुखी पडले होते. त्याने शेवटी मला आता सहज परत यायलाही जमणार नाही, मदत करा असा निरोप आपल्या बापाला औरंगजेबालाच पाठवला. एप्रिल १६८४ मध्ये शेवटी औरंगजेबाने रुहुल्लाखानाला पाठवले. सोबत २० हजार अश्रफी, १०० घोडे, ५०० उंट पाठवले. तेंव्हा कुठे हताश झालेला मोगली शहजादा अहमदनगरच्या छावणीत दाखल झाला.
कोणत्याही युद्धात शत्रूकडून आक्रमण झाल्यावर प्रतिकारासाठी आपल्याकडे किमान दुप्पट सैन्य तरी असावे असा एक साधा संकेत असतो. इथं मराठे आधीच विविध ठिकाणी सुरु असलेल्या युद्धात गुंतले होते. प्रत्यक्ष छत्रपती शंभूराजे, सरसेनापती हंबीरराव, कवी कलश, रुपाजी भोसले, म्हळोजी घोरपडे आदि सगळे अनेक ठिकाणी झुंजत होते. त्यामुळे शहा आलम च्या सैन्याला समोरासमोर तोंड द्यायला कोणतीही फारशी मोठी तुकडी नसताना मराठ्यांनी हा प्रतिकार केला होता. औरंगजेबाच्या मोठ्या मुलासाठी ही मोठी नामुष्की होती. आणि त्यामुळे औरंगजेब त्याच्यावर नाराज झाला.
मराठ्यांना आपण सहज जिंकू शकत नाही हे औरंगजेबाला आता कळून चुकलं होतं. त्यामुळे इथून पुढच्या काळात मग औरंगजेब विजापूरची आदिलशाही आणि भागानगरची कुतुबशाही बुडवायला निघाला. या दोन्ही सत्ता खूप जुन्या. मात्र अवघ्या १-२ वर्षात औरंगजेबानं त्या नेस्तनाबूत केल्या. त्या काळातही मराठे मात्र झुंजत राहिले. मोगलांना कुठेच फारसे विजय मिळू न देता..!
मंडळी, रामघाट परिसर, तिलारी, तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा याला शिवाजी महाराजांनी ज्या गडाची किल्लेदारी दिली तो याच परिसरातील महत्वाचा असा पारगड हा सगळा भाग हल्ली पर्यटनासाठी प्रसिद्ध होत आहे. इथलं जंगल, धबधबे लोकांना आकर्षित करत आहेत. मात्र या परिसरात झालेल्या अशा पराक्रमाच्या कथा आपल्याला ठाऊक नसतात. रामघाटाच्या परिसरातील घाट चढून येणाऱ्या सैन्याला पाणी मिळावे म्हणून तयार केलेली प्राचीन विहीर आजही पाहता येते. या विहिरीच्या संवर्धनासाठी, तसेच परिसरातील पारगड, कलानिधीगड, गंधर्वगड आदि गडकोटांच्या स्वच्छतेसाठीही लोकांनी पुढे यायला हवे आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या परिसरात शत्रूला नामोहरम केले, प्रसंगी बलिदान दिले तिथला इतिहास सांगायला हवा आणि विविध अवशेषांचे जतन करायला हवं.
सुधांशु नाईक
(९८३३२९९७९१)
nsudha19@gmail.com
संदर्भ :-
शिवपुत्र संभाजी – डॉ. सौ. कमल गोखले
छत्रपती संभाजीराजे – वा. सी. बेन्द्रे
( सोबतचे छायाचित्र : पारगड-रामघाट परिसरातील एका प्राचीन विहिरीचे आहे.)
No comments:
Post a Comment