marathi blog vishwa

Saturday, 25 July 2020

लेखांक ७ : शिवाजी महाराजांचे अखेरचे पत्र

' जगावेगळं' या पेजवरील " इतिहासाच्या पोतडीतून" या माझ्या लेखमालेतील हा लेखांक  ७ वा.
- सुधांशु नाईक.

शिवाजी महाराजांचे अखेरचे पत्र...

शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळापासून लिहिलेली अनेक पत्रे. पहिले पत्र साधारण १६४५ मधले. तर त्याच्या निधनापूर्वी काही दिवस लिहिलेलं एक पत्र शेवटचं ठरलं. कुणाला लिहिलेलं हे पत्र आणि त्यात काय लिहिलं होतं याविषयी जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल...
१६८०. छत्रपती शिवाजीराजांच्या आयुष्यातील शेवटचं वर्ष. मात्र या पूर्वीची जवळपास चार वर्षं ही अत्यंत धामधुमीची होती. जुलै १६७८ मध्ये महाराज दक्षिण दिग्विजयानंतर रायगडावर परत आले. जवळपास दोन-अडीच वर्षे ते पार तंजावरपर्यंत दौडत होते. स्वराज्याची ही एक फार मोठी मोहीम होती. ते रायगडावर परतले पण त्यांना विश्रांती मात्र मिळालीच नाही.... या दोन वर्षात काय घडले ते पाहूया आधी...कारण ही सगळी धावपळ प्रत्यक्ष शिवाजीमहाराजांनीच या पत्रात लिहिली आहे... काय घडलं या दोन वर्षात...?

महाराज रायगडावर आले आणि काही महिन्यात शंभूराजे नाराज होऊन डिसेंबर १६७८ मध्ये मोगलांचा सरदार दिलेरखान याला जाऊन मिळाले. आणि त्यांनी स्वराज्यावर हल्ला केला. भूपाळगड घेतला. नंतर ते विजापूरची आदिलशाही संपवायला तिकडे निघाले.

एकेकाळी हीच आदिलशाही शिवरायांचा प्रमुख शत्रू होती. आदिलशाही प्रांत जिंकायला सुरुवात करून त्यांनी स्वराज्याची निर्मिती सुरु केली होती. मात्र आता वेगळे राजकारण घडत होते. एकेकाळी जो सिद्दी मसूद महाराजांना पकडायला पन्हाळगड ते विशाळगड धावला होता, ज्याला बाजीप्रभू देशपांडे आणि बांदलांच्या तुकडीने प्राण पणाला लावून अडवले होते, तोच सिद्दी मसूद आता आदिलशाहीचा वजीर होता... आणि त्याने महाराजांना साकडे घातले की आदिलशाहीवर मोगल चालून येत आहेत... आदिलशाही वाचवा..!

आणि जगावेगळ राजकारण करत महाराज आदिलशाहीच्या मदतीला धावले. प्रत्यक्ष शंभूराजे दिलेरखानासोबत होते. मात्र मराठ्यांनी मोगलांना चांगला प्रतिकार केला. मराठ्यांच्या प्रतिकारामुळे मोगलांनी माघार घेतली. यामुळे आदिलशहाने महाराजांचे आभार मानले. त्यांना भरपूर नजराणा पाठवला. सिद्दी मसूद-आदिलशहा यांच्याशी महाराजांनी तह केला आणि जो दक्षिणेतील मुलुख नुकताच महाराजांनी जिंकला होता त्याला आदिलशहाने मान्यता दिली.

त्यानंतर मग दिलेरखानाच्या आक्रमणाची धार कमी करायला महाराज मोगलांच्या वऱ्हाड प्रांतावर चालून गेले. जालना ही मोगलांची मोठी बाजारपेठ. औरंगाबादच्या अगदी जवळची. प्रत्यक्ष मोगल शहाजादा तिथे मुक्कामाला होता. तरीही धाडसाने महाराजांनी थेट जालन्यावर स्वारी केली. जालना लुटलं. मोगली सरदार रणमस्तखान लढायला आला. त्याचा पराभव करून त्यालाच कैद केले. मात्र अधिक मोठी फौज पाठीवर आल्यावर महाराजांनी तिकडून परतीचा रस्ता धरला. बहिर्जी नाईक यांच्या मदतीने मध्येच मोगली फौजांना चकवले आणि आडवाटेवर असलेल्या पट्टागड या ठिकाणी जरा विश्रांती घेतली. या सगळ्या धामधुमीचे त्यांना कष्ट पडत होते आणि अजूनही संभाजीराजे मोगलांच्याकडे आहेत याची चिंता मनाला पोखरत होती. 

महाराज तिकडून रायगडला परत आले. महाराजांच्या सगळ्या हालचाली बादशहा औरंगजेबाला समजत होत्या. चिडलेल्या बादशाहने मग “संभाजीराजांना कैद करून दिल्लीला पाठवा” असा हुकुम दिलेरखानाला गुप्तपणे कळवला. मात्र ही गोष्ट संभाजीराजांना समजली. या  दरम्यान त्यांचे आणि दिलेरखानाचे खटके उडत होते. शेवटी आपली चूक लक्षात येऊन शंभूराजांनी येसूबाईच्या सह मोगली छावणीतून पळ काढला. त्यांच्या मागावर मराठ्यांची तुकडी होतीच. पळालेले शंभूराजे विजापूरच्या आश्रयाला गेले. आणि मग सिद्दी मसूदने त्यांना पुन्हा मराठ्यांच्या तुकडीकडे सोपवले. मोठ्या वेगाने पाठलाग करणाऱ्या मोगलांना चकवत शंभूराजे पन्हाळगडावर पोचले ते जानेवारी १६८० ला.! महाराजांची एक मोठी चिंता मिटली. महाराज रायगडावरून निघाले आणि पन्हाळगडावर पोचले. 
महाराज पन्हाळगडी पोचले. त्यांची आणि शंभूराजांची भेट झाली. सगळ्या गोष्टीवर चर्चा काय झाली हे तसं शब्दशः इतिहासाला ठाऊक नाही. मात्र “स्वराज्याची विभागणी करावी, जुने स्वराज्य राजारामासाठी ठेऊन कर्नाटकात निर्माण होत असलेलं नवे राज्य तुला देतो, तुझ्या कर्तबगारीने तू स्वराज्य अजून वाढव. आपण देवभक्ती करत बसतो..” अशा अर्थाचं काही महाराज बोलले. मात्र स्वराज्याच्या विभागणीला शंभूराजांनी नकार दिला. आपली चूक कबूल केली. तेंव्हा महाराजांनी “रायगडावर जाऊन राजारामाची मुंज आणि लग्न करतो. मग काही काळाने पुन्हा येतो...तेंव्हा बोलू” असं सांगून पन्हाळगड सोडला. जनार्दनपंत, उमजीपंत आदि कारभारी शंभूराजांच्या सोबत ठेवले. रायगडला परत जाताना महाराज वाटेत सज्जनगडावर गेले. त्यांनी समर्थ रामदासस्वामी यांचे दर्शन घेतले आणि मग रायगडावर गेले. 

रायगड-पन्हाळगड-विजापूर-जालना-पट्टागड-रायगड-पुन्हा पन्हाळगड-मग सज्जनगड मार्गे रायगड... ही सगळी घोडदौड, त्यातील युद्धं, राजकारण हे सारं थक्क करणारं आहे.

शंभूराजे जरी मोगलांकडून स्वराज्यात परत आले असले तरी राजांनी त्यांना सोबत रायगडावर नेले नाही. मात्र त्यांचा शंभूराजांविषयीचा राग निवळला होता हे ज्या पत्रातून स्पष्ट होतं तेच आहे महाराजांचे हे शेवटचं पत्र...! हे पत्र त्यांनी फेब्रुवारी –मार्च १६८० मध्ये लिहिलं आहे आपले सावत्र बंधू आणि तंजावरचे एकोजीराजे भोसले याना... या लेखात वर उल्लेखलेली सर्व धामधूम त्यांनी स्पष्ट शब्दांत लिहिली आहे, मात्र ती लिहिताना आपण किती मोठं काम करतो आहोत हा अविर्भाव जराही दिसत नाही.. ही सहज भाषा महाराजांचं मोठेपण अधिक अधोरेखित करणारी आहे.;
या शेवटच्या पत्रात शिवाजीमहाराज जे काय लिहितात, त्यातील काही मजकूर वाचा त्यांच्याच शब्दांत...;

श्रीयासह चिरंजीव अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजेश्री महाराज व्यंकोजी राजे यासी प्रती सिवाजी राजे आशीर्वाद. येथील कुशल जाणोन स्वकुशल लेखन करणे. उपरी तुम्ही पत्र पाठवले ते पावले. तुमचे कुशल कलोन संतोष वाटला. असेच क्षण क्षण आपले कुशल लेखन करून पाठवीत जाणे. 

विशेष ए प्रांतीचे वर्तमान... दिलेरखान विजापूरची पातशाही कमकुवत देखोन जोरावरी धरून विजापूर घ्यावे या मतलबे विजापुरावरी चाल केली. भीमा नदी उतरोन शहरानाजिक येऊन भिडला. हे वर्तमान खान आलिशान मसउदखान यांनी आम्हास लिहिले की, गनीम जोरावरी बहुत धरली आहे. एऊन मदत केली पाहिजे. त्यावरून आम्ही तेच क्षणी स्वार होऊन मजली दर मजली पनाळीयास आलो. सारी कुळ जमेती जमा करून खासा लष्करानिशी विजापुरी सन्निध गेलो. विचारे पाहता गनीम कट्टा.. त्याहिमधे पठाण जाती...हट्टी, याशी हुन्नरेच करून खजील होऊन नामोहरम होय तो हुनर करावा ऐशी तजवीज केली की. त्याचे मुलखात फौजाचा पैसावा करून ओढा लावावा. त्यावरून दिलेरखानास ती गावचे अंतरे सोडून भीमा नदी उतरोन तहद जालनापूर पावेतो मुलुख तख्तताराज करीत चाललो. जालानापुरास जाऊन चार दिवस मुकाम करोन पेठ मारिली. बहुत मालमता हाती लागली. जालानापुरास म्हणजे औरंगाबादेहून चार गावे दूर, ते जागा शहाजादा असता त्याचा हिसाब न करता पेठ लुटली. सोने,रूपे,हत्ती घोडे याखेरीज बहुत मत्ता सापडली. ते घेऊन पठागड तरकीस स्वार होऊन कूच करून येता, मधे रणमस्तखान, आसफखान व जबितखान असे आणिक पाचसात उमराऊ आठ-दहा हजार स्वारानिशी आले. त्यास शह्बाजीच्या हून्नरे जैशी तंबी करून ये, तैशी तंबी करून घोडे व हत्ती पाडाव करून पटीयास आलो. मागती लष्कर मुलुकात धुंदी करावयास पाठवले. राजश्री मोरोपंत प्रधान यास बागलाण आणि खानदेश प्रांती सत्तावीस किले मोगलांचे आहेत ते व मुलुख काबीज करायला पाठवले. आम्ही पटीयास मुकाम केला. 
मोरोपंत त्याणी अहिवंत किल्ला घेतला. अहिवंत म्हणजे जैसा काही पनाळा, त्याचेबरोबरी समतुल्य आहे. दुसरा तो नाहवा गड. बागलाणच्या दरम्यान मुलुखात आहे. तो कठीण.. तोही घेतला. हे दोनी किले  पुरातन जागे कबज केले. त्या किल्ल्यावरही बहुत मालमत्ता सापडली व त्याचबरोबर जमेत होती ते मुलकात पाठवून धामधूम केली. कितेक मुलुक कबज केला. 
दिलेरखानासही ऐसे कळोन आले की, येथे राहिल्याने आपली शाही कुल बुडवतील हे जाणून विजापूर सोडून दिवसास कोस दोन कोस मजली करून चालला. खान अलिशानेही बहुतच शर्त केली. जैसा कोट राखावायासी शर्थ करून ये, तैसी करून कोट राखीला. आम्ही या प्रकारे विजापुरीचे सहाय्य द्रव्याने व सेनेने करून ज्या उपाये गनीम उखळून ये, त्या उपाये उखळून विजापुरीचे अरिष्ट दूर करून विजापूर रक्षिले. ते प्रसंगी खान आलीशानाचा सुलुख जाला. या करारबावेमध्ये  होसकट, व बंगळूर व अरणी व चंदावूर (तंजावर) आदि तुमिचे निसबती आम्ही आपणासी लाऊन घेतली. 

या उपरी दिलेरखान कारबळ ( कोप्पळ ?) प्रांताकडे गेला. आमचीही सेना पाठीवरी गेली आणि आम्ही विजापुरास जातो. कारबळ प्रांताकडे राजश्री जनार्दनपंत ठेविले. त्यांनी पुंड पाळेगारनी फिसाहती केलेली. त्यास मारून काढिले व हुसेनखानाचा भाऊ कासीमखान दोन तीन हजार स्वारानिसी आला होता. त्यास व त्याचे कबिला  व हुसेनखानाचे दोघे लेक असे दस्त केले. याउप्पर दिलेलखान, सर्जाखान व हुसेनखान येतो हे कळोन गनिमावर गेले. जागाजागा गनिमास गोशमाला देऊन तिकडूनही मारून काढिला. सांप्रत खान भीमानदी उतरून पेडगावास गेला. गनिमास ऐसे केले जे मागती विजापूरची वाट न धरावी ऐसा खट्टा केला.

चिरंजीव राजश्री संभाजीराजे मोगलाईत गेले होते त्यास आणावयाचा उपाय बहुत प्रकारे केला. त्यासही कळो आले की ये पातशाहीत, अगर विजापूरचे अगर भागानगरचे पातशाहीत आपले मनोगतनुरूप चालणार नाही. ऐसे जाणोन त्यांनी आमचे लिहिण्यावरून स्वार होऊन आले. त्याची आमची भेट जाली. घरोब्याचे रीतीने जैसे समाधान करून ये, तैसे केले. हे सविस्तर वर्तमान तुम्हास कळावे म्हणून लिहिले.... कळले असावे...

इतिहासात रस घेणाऱ्या वाचकहो, शिवरायांच्या पराक्रमी कारकीर्दीमुळे एकेकाळी ज्या आदिलशाही विरुद्ध त्यांनी स्वातंत्र्याचा लढा पुकारला, ती आदिलशाही स्वतःला वाचवायला शिवाजी महाराजांना बोलावत होती. आणि तीच आदिलशाही वाचवायला महाराज धावून जातात..! केवढं वेगळे हे राजकारण..!

दक्षिणेत आमचं आम्ही पाहून घेऊ पण दिल्लीच्या बादशहाला दक्षिण प्रांतात हातपाय पसरून द्यायचे नाहीत यासाठी शिवाजी महाराज किती धावपळ स्वतः निभावून नेतायत, प्रसंगी शत्रूला आपला मित्र बनवून टाकतात. संपूर्ण मोगलाई संपवून टाकायला विविध मित्र जोडतात. हे सगळं राजकारण अभ्यासण्याची गरज आहे. या दीर्घ पत्रातून ते ज्या व्यंकोजीराजांना सगळा वृत्तांत कळवतात तेही एकेकाळी शत्रुत्वच निभावत होते. प्रसंगी कुडाळ प्रांतात स्वराज्यावर चालून आले होते. महाराजांच्या दक्षिण दिग्विजय स्वारीत फारसे सहकार्य करत नव्हते. तरी त्यांना सामोपचाराने आणि प्रसंगी कडक शब्दांत फटकारून महाराजांनी त्यांना आपलेसे केलं.

राजांच्या या शेवटच्या पत्रात ते ज्या आत्मविश्वासाने स्वतःच्या कार्याबद्दल साधेपणाने लिहितात ते पाहून असं वाटतं की अजून १५-२० वर्षांचे आयुष्य शिवाजी महाराजांना मिळाले असते तर इतिहास कसा घडला असता असं वाटत राहतं. मात्र इतिहासाला जर---तर मंजूर नसतात हेच खरं..!

सुधांशु नाईक, कोल्हापूर.
९८३३२९९७९१
nsudha19@gmail.com

संदर्भ :- 
शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड २

1 comment: