जगावेगळं या फेसबुक पेजसाठी मी लिहित असलेल्या " इतिहासाच्या पोतडीतून" या लेखमालेतील हा लेखांक ६ वा.
- सुधांशु नाईक
मिठावरील कर आणि शिवशाही...!
मीठ म्हटलं की आपल्याला गांधीजींचा दांडी येथील सत्याग्रह आठवतो. मिठासारख्या अगदी लहानशा गोष्टीला सगळ्यांच्या आयुष्यात फार महत्व. तरीही मिठाचे उत्पादन, त्याची विक्री याकडे आपलं फारसं लक्ष नसतंच. मात्र प्रत्यक्ष शिवाजीमहाराजांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिठाचे स्वराज्यातील कोकण प्रांतात अधिक उत्पादन व्हावे यासाठी बारकाईने लक्ष दिले. मिठावरील आयात कर ( Import tax) कसा हवा याबाबत स्पष्ट आदेश दिले होते. जगभर अशा प्रकारच्या करवसुलीची सुरुवात होण्यापूर्वी... सुमारे ३५० वर्षांपूर्वी. किती वेगळी गोष्ट ही ..! त्याविषयीचा हा लेख.
कोकणाला शिवाजी महाराजांनी नेहमीच खास महत्व दिले. कोकणाला ते “नवनिधी” असं म्हणायचे. म्हणजे नवीन निर्मिती करणारी भूमी. स्वराज्याच्या सुरुवातीच्या दिवसात महाराजांनी कल्याण-भिवंडीवर हल्ला चढवला. त्यानतंर आपला सागरी किनारा सुरक्षित करायला थेट नौका-बांधणीचे काम हाती घेतले तेही वयाच्या अवघ्या २५-२६ व्या वर्षी..! केवढी ही दूरदृष्टी. कारण त्याकाळात देशातील महत्वाचा व्यापार हा विजयदुर्ग, खारेपाटण, राजापूर जवळील जैतापूर ( तेच ते भावी अणुप्रकल्पामुळे चर्चेत आलेलं), दाभोळ, चौल, कल्याण, वसई, गोवा आणि सुरत अशा विविध बंदरांमधून सगळा कोकण प्रांत परदेशांशी जोडला गेलेला. त्यामुळे कोकणावर ताबा हवा तर उत्तम नौदल / आरमार असायलाच हवं असं हे धोरण होतं.
त्यामुळे राजांनी कल्याण-भिवंडी, पेण- पनवेल ताब्यात घेतलं. आणि मग पुढच्या टप्प्यात दाभोळ बंदर आणि आसपासचा मुलुख. मधला चौल चा प्रांत पोर्तुगीजांकडे होता तर मुरुड-जंजिरा सिद्दीकडे. शिवाजीराजांच्या काळापूर्वीच या परिसरात इंग्रज, फ्रेंच, डच यांची व्यापारी केंद्रे होती. त्याला तत्कालीन कागदपत्रात “वखारी” असा उल्लेख आहे. राजापूरला इंग्रजांची वखार, वेंगुर्ल्यात डच मंडळींची वखार होती.
हळूहळू या सर्व भागांवर मराठा सत्तेचा वचक दिसू लागला. सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग सारख्या प्राचीन जलदुर्गाना बळकट केलं गेलं. तर सिंधुदुर्ग, रत्नदुर्ग, जयगड, खांदेरी, सिद्दीच्या जंजिरा समोरचा पद्मदुर्ग, बाणकोटचा हिंमतगड आदि नवे दुर्ग तयार झाले. आरमारात अनेक नवी गलबते, गुराबा, सपाट तळाच्या लहान होड्या हे सारं निर्माण झालं. जिथं एकेकाळी पोर्तुगीज परवाने “कार्ताझ” घेऊन मालवाहतूक करावी लागे, तिथं आता मराठा आरमाराचा दरारा निर्माण झाला. मराठा परवाने असल्याविना व्यापार करता येईना. आजवर सिद्दी, आदिलशहा, पोर्तुगीज, इंग्रज या साऱ्यांनी स्थानिक लोकांना फार त्रास दिलेला. नारळ, पोफळी, आंबा, फणस, काजू, कोकम, भात, नाचणी, मिरी-लवंग-जायफळ असे मसाल्याचे पदार्थ आदि सर्व उत्पादनांसाठी कोकणी माणूस फार मेहनत करे. मात्र पुरेसे संरक्षण नसल्याने त्याचं फार नुकसान होई. शिवाजीराजांचा अंमल सुरु झाल्यावर अनेक प्रकारे लोकांना मदत मिळाली. प्रसंगी शेतीसाठी, बी-बियाणासाठी कर्ज, वस्तुरूपाने शेतसारा भरायची सवलत यामुळे लोकांना आश्वासक असा आधार मिळाला. इथलं उत्पादन वाढू लागलं. लोक स्वावलंबी होऊ लागले. त्यामुळे मालाच्या विक्रीतून स्वराज्यालाही धन मिळू लागलं. देशावरील बाजारपेठा या विविध घाट-वाटांनी कोकणाशी जोडल्या गेलेल्या. कोकणात उतरणारे ते सर्व घाट, बंदरे, महत्वाची नाकी हे सारं आता मराठ्यांच्या ताब्यात आले. त्यामुळे लुटालूट कमी झाली. व्यापार वाढला.
तरीही एक महत्वाचा घटक अजूनही चाचपडत होता. तो घटक होता मीठ उत्पादकांचा. मीठ हे रत्नागिरी-रायगड परिसरातील विविध सागर किनाऱ्यांवरील विविध मिठागारांत तयार व्हायचं. ते देशातील बाजारपेठा तसेच थेट युरोप- आफ्रिका-अरबस्तानात जाई. मात्र तुलनेनं उत्पादन कमी होतं. सुरुवातीच्या काळात जेंव्हा सिद्धीचे लोक मिठाच्या या जहाजांना त्रास देत, लुटालूट करत तेंव्हा एकदा मोरोपंत पेशव्यांनी शिवरायांना सुचवले होते की, आपण इंग्रजांची जहाजे भाड्याने घेऊ. त्यांचं निशाण दिसलं की सिद्दी त्रास देणार नाही. मात्र मतलबी इंग्रजांनी मराठा व्यापाराला मदत करायचे नाकारले. तेंव्हा मग हा व्यापार जिद्दीने मराठी आरमाराने आपल्या ताब्यात घेतला. मराठा आरमार, मराठ्यांची व्यापारी जहाजे मस्कत, बसरा, एडन आदि परदेशी बंदरापर्यंत जाऊ लागली. खास मिठाच्या व्यापाऱ्यासाठी वेगळी जहाजं तयार केली गेली.
तरीही एक महत्वाची गोष्ट अजूनही त्रास देत होती मिठाच्या व्यापाराला. स्वराज्यात तयार होणाऱ्या मिठापेक्षा बारदेशात पोर्तुगीज अंमल असलेल्या प्रदेशातील मीठ हे जास्त स्वस्त होते. तिथला उद्योग ही मोठा होता. त्यामुळे सातारा, कोल्हापूर, निपाणी, हुबळी, बेळगाव, मिरज, सांगली आदि देशावरील बाजारपेठेतील व्यापारी हे स्वराज्यातून तिकडे जात आणि तिथलं मीठ घेत. या गोष्टीमुळे स्वराज्यातील तयार मिठाला जमेल त्या किंमतीला, प्रसंगी नुकसान सोसून विकावे लागे. म्हणून बरेच जण मीठ उत्पादनात पुरेसे लक्ष ही देत नव्हते. याकडे मग शिवाजीमहाराजांनी लक्ष दिले. आणि एक नवी सूचना दिली.
आपल्या देशातील उत्पादनाला संरक्षण देण्यासाठी, व्यापार वाढवण्यासाठी तशाच प्रकारच्या परदेशी उत्पन्नावर जास्त जकात किंवा आयात कर लावावा असं १९ व्या शतकात (१८२५ च्या सुमारास) जर्मन-अमेरिकन अर्थतज्ञ फ्रेडरिश लिस्ट याने सुचवले होते.
मात्र त्यापूर्वी १६७१ मध्ये, म्हणजेच जवळपास दीडशे वर्ष आधी शिवाजीराजांच्या स्वराज्यात हे धोरण सुचवले गेले, अंमलात आणले गेले होते ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे.
१६७१ मध्ये कुडाळचा सुभेदार नरहरी आनंदराव याला लिहिलेल्या पत्रात शिवाजीमहाराज म्हणतात, “ तुम्ही घाटी जबर जकात बैसविणे. बारदेशात मीठ विकते त्याचा हिशेब प्रभावलीकडे संगमेश्वरकडे मीठ विकते त्याने कित्येक जबर पडते. ते मनास आणून त्या अजमासे जकाती जबर बैसविणे. की संगमेश्वरी मीठ विकले जाईल, घाट पावेतो जे बेरीज पडेल त्या हिशेबे बारदेशीच्या मिठास जकाती घेणे. संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महाग पडेल ऐसा जकातीचा तह देणे.
जरी जबर जकातीचा तह नेदा (म्हणजे दिला नाही तर) मुलाहिजा कराल म्हणजे मग कुल उदमी खलक बारदेशी वोहोडेल. कुल बंदरे पडतील. ये गोष्टीचा जरा उजूर न करणे. ये गोष्टीत साहेबाचा बहुत फायदा आहे. मिठाचा मामला कर्द लाख रुपये यावयाचा मामला आहे. लिहीले प्रमाणे अंमल करणे...”
मंडळी, किती स्पष्ट शब्दांत हा आदेश आहे पहा. या महाराजांनी बारदेशच्या मार्गावरील जकात नाके जे आहेत तिथला कर वाढवायला सांगितला आहे. यामुळे दोन गोष्टी शक्य झाल्या. एक म्हणजे कर वाढल्यामुळे बारदेशमधून देशातील बाजारपेठेत येणारे मीठ महाग झाले. त्यामुळे व्यापारी आपसूकच स्वराज्यातील मिठागारांकडे वळतील. यामुळे रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील मिठाची चांगली विक्री सुरु होईल. चांगली विक्री होऊ लागली की इथल्या उत्पादकांना प्रोत्साहन मिळेल. असं न झालं तर इथले सर्व व्यापारी बारदेशात जातील आणि इथली सर्व मिठागरे बंद पडतील. हे होऊ नये म्हणून त्यांनी एक साधा उपाय केला... फक्त परकीय प्रदेशातून येणाऱ्या मिठावरील कर वाढवला. मीठ ही जीवनावश्यक गोष्ट. केवळ स्वराज्यातील बाजारपेठाच नव्हे तर मोगली, आदिलशाही आणि परदेशी बाजारातही त्यामुळे आपल्या स्वराज्यातील मिठाची मागणी वाढली. उत्पादनाची विक्री होऊन करही मिळू लागला. तसेच तरीही जे व्यापारी बारदेशातूनच मीठ आणत असतील त्यावर जास्त कर लावल्याने जास्त धन त्या करातून मिळू लागले.
आपल्याला शिवाजी महाराज म्हटलं की फक्त चौथीच्या पुस्तकातील हाती तलवार घेऊन, सोबत सहकारी घेऊन घोड्यावर बसून लढाईला निघालेले महाराज आठवतात. प्रसंगी स्वतः जीव धोक्यात घालून महाराजांनी लढायात नेतृत्व केलंच, मात्र त्याचबरोबर रयतेच्या सुखासाठी शेती, फलोत्पादन, बंदरातील व्यवसाय, पशुधनाला सहाय्य अशा ज्या अनेक बारीक गोष्टीत लक्ष घातले, त्यातीलच ही एक महत्वाची गोष्ट होती..! अशा गोष्टीमुळेच स्वराज्यातील सर्वसामान्य माणसाला शिवाजीमहाराज हे आपला जवळचा माणूस वाटू लागले.
मिठाचा मामला हा कर्द लाख रुपयांचा मामला आहे हे महाराजांचं वाक्य लक्षात ठेवण्यासारखं आहे. नुसता इतिहास म्हणून नव्हे तर सदैव आपल्या देशातील उत्पादनाला मदत करताना हा सगळाच मामला लक्षात घ्यायला हवा. परदेशी वस्तूंच्या आयातीबाबत धोरण ठरवतानाही आपल्या शासनाने याचं अनुकरण करायला हवं असं मला प्रकर्षानं वाटतं.
सुधांशु नाईक
९८३३२९९७९१
nsudha19@gmail.com
संदर्भ :-
शिवकालीन पत्रसारसंग्रह
अशी होती शिवशाही – अ. रा. कुलकर्णी
फोटोसौजन्य: गुगल
No comments:
Post a Comment