marathi blog vishwa

Tuesday, 17 December 2019

मखमली स्वरांची देणगी लाभलेल्या रजनीताई


 झुंजणं, झगडणं, परिस्थितीनं पदरात टाकलेल्या दानानं हताश न होता स्वतःचं नवं विश्व घडवून दाखवणं खूप कमी जणांना जमतं. ज्यांना जमतं त्यांच्या अलौकिकत्वामुळे आपण स्तिमित होऊन जातो. अशा काही लोकांपैकीच एक होत्या रजनीताई...
झुंजणं, झगडणं हा तर त्यांचा जणू स्थायीभावच बनलेला. करणार तरी काय? १५ आॅगस्टला जेव्हा भारत स्वतंत्र होत होता तेव्हा कोकणातल्या तुरळ या एका लहानशा गावात ही चार वर्षांची चिमुरडी आजाराशी झुंजत होती. त्या पोलियोनं, त्या तापानं तिला जन्मभर पुरेल असं अधूपण दिलं अन् त्याचबरोबर झुंजत रहायची एक अजोड ताकद.
तेव्हापासून गेली सत्तर वर्षं ती चिमुरडी झुंजत होती..!

रजनी-करकरे देशपांडे. सत्तर वर्षांपूर्वी महानगरातही अपंग व्यक्तींचं जिणं भीषण होतं, तिथं लहान लहान गावांतल्या परिस्थितीबद्दल काय बोलायचं? वाढत्या वयाबरोबर या मुलीनं कायकाय अन् कसं सोसलं असेल याची कल्पनादेखील अंगावर काटा आणते अन् डोळ्यात पाणी.
मात्र एखाद्या जिवलगाला सहज सोबत मिरवावं तसं रजनीताईंनी हे पांगळेपण सोबत मिरवलं. कधीच त्याचा बाऊ केला नाही व त्याचा वापर करत कुणाची दया, करुणाही मिळवली नाही.
स्नेहल स्वभावाच्या रजनीताईंना दैवानं पांगळेपण जरूर दिलं मात्र सोबत तीन महत्वाच्या गोष्टीही दिल्या. कुशाग्र बुध्दी, अतुलनीय धैर्य अन् कंठातला सुंदर कोमल मखमली सूर. केवळ अन् केवळ या तीन गोष्टींच्या जोरावर मग त्या जग जिंकत निघाल्या.
आपल्या अपंगत्वाचा कोणताच बाऊ न करता त्यांनी शिक्षण तर पूर्ण केलंच पण गाण्याचं शास्त्रीय शिक्षणही आत्मसात केलं. पं. नामदेवराव भोईटे, पं. विश्वनाथबुवा पोतदार, पं. सुधाकरबुवा डिग्रजकर व नूतन गंधर्व अप्पासाहेब देशपांडे या गुरुवर्यांकडून त्यांनी संगीत शिक्षण घेतलं. पुढे संगीतकार दिनकर पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुगम संगीताचाही सूक्ष्म अभ्यास करून स्वतःच गाणं घडवलं.
सुधाकर बुवांचा किस्सा त्यांनी सांगितलेला एकदा.. म्हणाल्या, “गाणं शिकवा असं सांगत मी भेटायला गेले. बुवांनी नंतर ये सांगितलं. कित्येक दिवस मी जात होते. त्यांच्या जुन्या घरी माझ्या कुबड्या वगैरे सांभाळत जायचे. शेवटी जवळपास सहा महिन्यानंतर बुवांनी मला शिष्य म्हणून स्वीकारलं. ते जणू पाहत होते की ही मुलगी नुसती हौस म्हणून शिकू या म्हणते की ही चिकाटीने गाणं शिकेल..गाणं पेलू शकेल..! मी अपंग आहे यासाठी मला खास सवलत द्या असं मीही कधी म्हटलं नाही आणि बुवांनीही कधी तसं वागवलं नाही.”
आपण कितीही प्रगतीच्या गप्पा मारल्या तरी आजही समाजात अपंग व्यक्तीची कुचेष्टा होतेच किंवा त्यांना उगाच केविलवाण्या दयार्द्र नजरांना सामोरं जावं लागतं. रजनीताई काखेत कुबडी घेऊन या दोन्हीविरुध्द नेहमीच कणखरपणे उभ्या राहिल्या.

आपल्या काॅलेजच्या दिवसांविषयी सांगताना एकदा म्हणालेल्या, " तुम्हाला सांगते सुधांशु, अख्खं काॅलेज, म्हणजे मुलं आणि शिक्षक सगळेच  घाबरायचे मला. काय बिशाद कुणी वेडंवाकडं वागेल. मी सरसावून तयारच असे. मीच नाही तर अन्य कुणाशीही कुणी वावगं वागलेलं मी कधीच सहन केलं नाही." नेहमी कोमल सूर गाणारा त्यांचा गळा अशावेळी तीव्र सुरांचं कडकडीत सौंदर्यही सहज दाखवून जायचा.
त्यांचा स्वभाव तर एकदम रोखठोक. 'एक घाव दोन तुकडे'वाला. वागण्या-बोलण्यातलं व्यंग त्यांना चटकन् समजतं, अन् मग थेट मुळावरच घाव. " उध्दटासी व्हावे उध्दट" असं आचरण असलं तरी त्यांच्याइतकी माया करणं फारच कमी लोकांना जमतं.
गेली काही वर्षे तर त्या अंथरुणालाच खिळून होत्या. तरीही शेकडो परिचितांचे वाढदिवस वगैरे सगळं त्यांना मुखोद्गत. त्या त्या दिवशी त्या व्यक्तीचं कौतुक होणारच. एकेकाळी आपल्या सुरेख अक्षरात त्यांचं पत्र वेळेवर मिळून जायचं. पत्रात प्रेम, सुरेख अक्षरासोबत एखादं फूल, मस्त लहानशी वेलबुट्टी वगैरे काही चित्रही असायचं. विविध माणसांच्या आवडीनिवडी ही त्यांनी अचूक टिपून ठेवलेल्या. त्यानुसार घरी तो अमकातमका पदार्थ केला की त्या माणसाच्या घरी रजनीताईकडून हमखास डबा पोचणारच. पूर्वी स्वैपाकघरात स्वत: पदर खोचून निगुतीनं सारं करायच्या. प्रत्येक गोष्टीत खरं म्हणजे त्या अति चिकित्सकच. या पदार्थाच्या फोडणीत हिंग हवं म्हणजे हिंगच घालणार तिथं कधीच लसणाची फोडणी असणार नाही इतकं त्यांचं परफेक्शन. अंथरुणाला खिळल्यानंतर ओट्याजवळ उभं राहून करता येईना. मात्र अनिता त्यांच्या सुचनेनुसार जेंव्हा स्वैपाक करायची तेंव्हा कुठला डबा कुठे आणि कुठली गोष्ट किती प्रमाणात घालायाचीये याकडे त्यांचं दूरवरूनही  लक्ष असायचं.
**
खाणं अन् गाणं यावर मनापासून प्रेम. मध्यंतरी  एकदा  अचानक  त्यांच्याकडे  गेलो. त्यांना आणि पीडीना आवडतात म्हणून जाताना  गरमागरम  बटाटेवडे नेलेले. त्या दिवशी काहीतरी बिनसलं होतं त्यांचं... तब्येतीची तक्रार होतीच. वडा आवडतो म्हणून पहिला घास घेतला. तिखट नव्हतं पण त्यांना सोसेना. डोळ्यात पाणीच आलं त्यांच्या.
वैतागून म्हणाल्या, “ सगळं सगळं नकोसं झालंय मला आज. मगाशी तर अनिताला म्हणत होते मी, चल बाहेर पड. पलीकडे रंकाळ्याजवळ घेऊन चल. जीवच देते आता..”


गंमतीनं मी म्हटलं," ताई, अहो, जीव द्यायचाय ना, मग रंकाळा कशाला? किती घाण झालंय तिथे पलीकडे. वास मारतोय हल्ली पाण्याला. तुम्हाला चांगल्या निसर्गरम्य ठिकाणी नेतो आम्ही, तिथं हवंतर करा विचार मग जीव द्यायचा. इतकं झकास जगल्यावर मृत्यूही छान असू दे ना...."
क्षणभर विनोदावर हसल्या त्या. म्हणाल्या, “ तुम्ही विनोद करून माझा मूड चेंज करायचा प्रयत्न करताय हे उमगतंय हो. पण नकोसं झालंय खरंच सगळं. मला हिंडायला- फिरायला खूप आवडायचं, ते देवानं बंद करून टाकलं. चमचमीत, तिखट खायला आवडायचं त्यावर बंधनं आली. सततच्या औषधांमुळे तोंड आलेलं असतंय. गाणं म्हणजे तर जीव की प्राण. मात्र आता गातानाही दम लागतो. हे असं आडव पडून पडून ताकदच गेली माझी. मगाशी शिकायला आलेल्या काहीजणी. “ सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू...” ही ओळ म्हणतानाही खूप दमले मी. शेकडो वेळा म्हटलं असेल हे गाणं. आता गाताही येईना हो नीट. कसं जगू हो आता सुरांशिवाय.. ?”
पण मग मुक्तपणे रडत राहिल्या काही वेळ. आम्ही शांतपणे त्यांना मोकळं होऊ देत राहिलो.... काय करणार होतो आम्ही?
***
त्यांनी आपल्या आयुष्यात मात्र इतरांच्या अडचणींवेळी नेहमीच धावून जात मदत केली. त्या व त्यांची मैत्रीण नसीमादीदी हुरजूक यांनी " अपंगांच्या मदतीसाठी व स्वावलंबी बनण्यासाठी असलेल्या संस्थेचं" स्वप्न पाहिलं. एकेकाळी अपंगत्वाचा घाला बसल्यावर रजनीताईनी नसीमादीदीना मानसिक बळ दिलं. पुढे त्या दोघींनी मिळून अनंत अडचणींवर मात करत " हेल्पर्स आॅफ दि हॅन्डिकॅप्ड" या संस्थेची उभारणी केली. त्या संस्थेचा आज वटवृक्ष झालाय. संस्थेच्या माध्यमातून अनेकांना नाजूक क्षणी मदत मिळत गेली व स्वत:चं अपंगत्व जमिनीत गाडून अनेक गुणवंत आज समाजात धीराने काम करु लागले.
संस्था उभी करण्यासाठी रजनीताई आपलं अपंगत्व सोबत घेऊन भारतभर हिंडल्या. शब्दशः हजारो मैफिली केल्या. आपल्याला मिळालेल्या सुरेल स्वराचे बळ वापरून त्यांनी लाखो रुपये जमवले संस्थेसाठी. त्यातही कुठे मिरवायचा हट्ट नसायचा. कुठल्याही स्पेशल ट्रीटमेंटची त्यांनी कधीही अपेक्षा केली नाही.  सगळ्या कामात रजनीताईंना कधीही कौतुकानं मिरवताना आम्ही पाहिलं नाही. आज किरकोळ कामं करुन पदव्या-पुरस्कार पदरात पाडून घेणारी मंडळी पाहिली की हे मोठेपण अधिकच भव्य वाटू लागतं. गायिका रजनी करकरे-देशपांडे व समाजसेविका रजनीताई या दोन्ही आघाड्यांवर त्या नेहमीच डौलानं कार्यरत राहिल्या. अनेकांना स्फूर्ती देत राहिल्या.

त्यांचं सर्वात मोलाचं काम कुठलं असेल तर अपंगाची लग्न जुळवणं. अपंगत्वाचे शेकडो प्रकार आहेत. मात्र याचा अर्थ असा नव्हे की त्यांचं सहजीवन असूच नये. दैवजात मिळालेलं एकटेपण भोगणं ही फार कठीण व वेदनादायी गोष्ट असते याचा प्रखर अनुभव असलेल्या रजनीताईंनी अनेक अपंगांचे, संस्थेच्या कार्यकर्त्यांचे संसार उभे करुन दिले. त्यापूर्वी त्यांना स्पष्ट व अत्यावश्यक सर्व समजावून देत उत्तम समुपदेशन केलं. त्याचं ऋण विसरणं अशक्यच.
तीच त-हा गाण्याची. अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी घडवताना त्यांच्याकडून कठोर मेहनत करुन घेतली त्यांनी. सर्वपरिचित कोसंबी बंधूंसारख्या अनेकांना त्यांनी केलेलं मार्गदर्शन भविष्यातील वाटचालीसाठी बळ देणारंच होतं.

इतरांचं सहजीवन फुलवणा-या, सुरांत रमलेल्या रजनीताईंचं भाग्य तरीही थोर म्हणायला हवं म्हणून पी. डी. देशपांडेंसारखा पती त्यांना लाभला. वयानं १६-१७ वर्षं लहान पीडींना लग्न करताना प्रखर विरोध सहन करावा लागला पण शेवटी प्रेम जिंकलं. संगीत, साहित्य, समाजकार्य अशा तिन्हीत रमणारा साथीदार व मित्रवर्ग यासह त्यांच्या सहजीवनाचे दिवस फार आनंदाचे होते ! त्यांचं सहजीवन हे अनेकांसाठी आदर्शवत असं होतं.
म्हणतात ना, “ काव्यशास्त्र विनोदेन कालौं गच्छति धीमताम..” तसं त्यांच्या सहजीवनात समानधर्मी मित्रांची साथ मिळाली आणि संगीत, साहित्य, समाजकार्य यांच्या साथीनं वाटचाल होत राहिली. म्हणूनच दिवस नव्हे तर सहजीवनाची ३२ वर्षै कशी गेली हे कळलंच नाही.

आता दिवस सरत नाही हे हल्ली हल्ली त्यांना जाणवू लागलं अंथरुणाला खिळल्यावर. तरीही काहीतरी करायची उर्मी असायचीय.
**

२०१७ च्या जानेवारीतलीच गोष्ट. माझी आई व सासरे कॅन्सरमुळे मृत्यूशय्येला खिळलेले. पहिलं कोण जाणार अशी जणू शर्यतच होती घरात. आमची प्रचंड धावपळ सुरु होती व अचानक संध्याकाळी पीडींना घेऊन रजनीताई दत्त म्हणून दारात उभ्या.
थक्क होऊन मी पीडींना म्हटलं, " अहो, त्यांची तब्येत बरी नाही, कशाला त्रास देत घेऊन आला त्यांना?"
ताडकन् रजनीताई म्हणाल्या, " त्यांनी मला नव्हे, मी आणलंय त्यांना. आज सकाळी उठल्यावर ठरवलेलं आज तुमच्याकडे जाऊन यायचंच. इथं तुमच्यावर पहाडाएवढं संकट अन् मी घरात कशी बसून राहून हो?"

मग सर्वांशी गप्पा मारत बसल्या. त्यांनी काहीतरी गाऊन दाखवावं अशी इच्छा व्यक्त केली दोघांनीही. मग आईला आणि सास-यांना आवडणारं गाणं कुठलं ते विचारलं. मग ती गाणी सुरु झाली... मृत्युशय्येवर निजलेल्या त्या दोन जीवांना सुखाचे सुरेल चार क्षण द्यायला  जीव ओतून गात राहिल्या. गळा साथ देत नव्हता, दम लागत होता.. तरी त्या गात होत्या. हे पाहून आमच्या सर्वांचे डोळे डबडबले. त्यानाही भरून आलं..
डोळे टिपत म्हणाल्या, “ तुम्हाला मी काय देणार हो. तुम्ही काहीतरी मागितलं ते देऊ शकले याचा आनंद होतोय. फार बर वाटलं.”
त्यानंतर दहा दिवसांच्या आत दोघेही गेलेच. सहा-आठ महिन्याची जीवघेणी झुंज अखेर शांत झाली. पण त्या सर्व दिवसात जवळपास रोज रजनीताई फोनवरुन चौकशी करत होत्या. कुणाबरोबर तरी सूप, सार असं काहीबाही करुन पाठवत होत्या..! त्यांच्या अंथरुणावर त्या तिथे दूर असूनही त्यांचं सदैव आमच्यावर लक्ष होतं. हे असं त्यांनी बहुतेक सर्व परिचितांसाठी केलंच आहे.
त्यांना भटकंती खूप प्रिय. नातेवाईकांसोबत, संस्थेतील सहकार्यांसोबत, मित्र-मैत्रिणींसोबत त्यांनी उदंड प्रवास केला. कधी मैफिलींच्या निमित्ताने तर कधी खास टूरला जायचं म्हणून. प्रत्येक प्रवासाची आखणी करताना त्यातही ताई आघाडीवर. कुठे जायचं, काय करायचं, काय पाहायचं, काय खरेदी करायचं यासाठी त्यांचं सगळं नियोजन पक्कं असायचं. वेळेच्या बाबतीतही तितकंच काटेकोर वागणं. त्यामुळेच मृत्यूची वेळ ही चुकतेय अशी आशा आम्हाला वाटत असताना त्यांनी मात्र मृत्यूलाही फार ताटकळत ठेवलं नाही. तब्बल महिन्याभराची त्यांची तगमग आम्हालाच पाहवत नव्हती.

१५ ऑगस्ट हा दिवस त्यांच्यासाठी जणू खलनायकच ठरलेला. एकेकाळी १५ ऑगस्ट ला त्यांना अपंगत्व आलं. ती आठवण कायमची पुसून टाकायची या हेतूने पीडीनी मुद्दाम १५ ऑगस्टलाच लग्न केले. यापुढे लग्नाचा वाढदिवस म्हणून तो दिवस आनंदात घालवायचा म्हणून.. १५ ऑगस्ट २०१७  या दिवसानं मात्र पुन्हा धक्का दिला...! खरंतर एक दिवस आधी, 14 ऑगस्टला त्यांना आता खूप बरं वाटतंय म्हणून हॉस्पिटलमधून घरी सोडलेलं. संध्याकाळी मी केक घेऊन गेलो त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायला. खूप मस्त नेहमीच्या सुरात त्या छान गप्पा मारत बसल्या होत्या. जीवावरचं संकट टळलं याचा आम्हालाही आनंद होता. मात्र तो आनंद क्षणभंगुर ठरला. दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांना खूप त्रास झाला आणि त्या बेशुध्द पडल्या. पुढचे १५ दिवस मग जीवन-मृत्युच्या सीमारेषेवरच राहिल्या. सदैव सुरेल गात-बोलत राहणाऱ्या त्या एकही शब्द बोलू शकत नाहीत हे पाहणं आमच्यासाठीही जीवघेणं ठरलं.
शेवटी सगळं संपलंच.

एकेकाळी रेडिओ-स्टार, प्रति-आशा अशा उपमांनी गौरवल्या गेलेल्या रजनीताई आयुष्यभर सुरेल-सुगंधी जगल्या. शेकडो लोकांना माया लावून गेल्या. शारीरिक-मानसिक-आर्थिक किंवा अन्य कोणताही अपंगत्व तुमच्या प्रगतीच्या आड येऊ शकत नाही याचं खणखणीत उदाहरण बनून गेल्या..! आजही अचानक कुठूनतरी “ जीवलगा राहिले रे दूर घर माझे...” कानी ऐकू येतं, आणि पाणावल्या डोळ्यासमोर आशाताईंच्या ऐवजी रजनीताई दिसू लागतात. त्यांचा प्रेमळ मखमली स्वर आठवतो... मग पुढचं सगळं सगळं धूसर धूसर होऊन जातं...!!
-    सुधांशु नाईक, कोल्हापूर. (९८३३२९९७९१)


*****

Saturday, 7 December 2019

एक होती आजी...


माझ्या लहानपणाच्या आठवणीतच एक चिमुकलं खेडेगाव आहे. आजूबाजूच्या विस्तीर्ण शेताच्या मध्यावर तिथे मातीचं एक घर. बाजूला लालबुंद फुललेला गुलमोहर अन समोर चिंचेचे गर्द सावली देणारं एक भलं थोरलं झाड. झाडाच्या पायाशी एक बैलजोडी बांधलेली, कुणी एखादं गडीमाणूस काही बाही काम करत तिथेच... अन त्या घराच्या कट्ट्यावर त्या चिंचेसारखीच मायेची गर्द सावली अशी बसलेली माझी आजी ....
आम्हाला दुरून येताना पाहूनच ती आनंदाने हरखून जायची. तिच्या पायाशीच बसलेला ‘खंड्या’ शेपटी हालवत आमच्याकडे येईपर्यंत ती आत जाऊन चुलीवर चहाच आधण ठेवायची. ‘आलात, बाबानो या.. रे... या.. हात-पाय धुवून घ्या, मागनं तुम्हाला चहा देते.’
तिच्या त्या मायभरल्या शब्दांनी सगळा शीण पळून जायचा. चहाबरोबरच एखादा चुरमुऱ्याचा किंवा मुगाचा लाडू हातावर मिळायचा...
बालपण ही मोठी मौजेची गोष्ट आहे नं ! लहान असताना आपल्याला लवकर मोठ होण्याची घाई झालेली असते अन मोठेपणी मात्र बालपणातल्या अनेक आठवणी मनात पिंगा घालत असतात, अस्वस्थ करतात तर कधी हेलावून सोडतात...


( हे प्रतीकात्मक क्षणचित्र इंटरनेटवर मिळालेलं) 
पूर्वी मुंबई इलाख्यात असलेलं पण नंतर कर्नाटकात गेलेल्या चिकोडीजवळचं हे चिंचणी गाव. इथे कधी काळी आमची शेतजमीन होती. काका चिकोडीत राहत असूनही आजी मात्र बहुतेक वेळा शेतात आजोबांच्या माघारीसुद्धा एकटी राहायची. किंबहुना ती तिचीच आवड होती.
मुळचा गोरापान रंग, वयानुसार पडलेलं सुरकुत्यांच जाळ अन अत्यंत प्रेमळ भाषा... आजीकडे कुणीही चटकन आकर्षित व्हायचंच.. चिपळूणला ती आली कि इथल्या सगळ्या बाळगोपाळांचा तिच्याभोवती गराडा असायचा पण इथे राहिली तरी तिचं मन कायम शेतात, गडीमाणसात, प्राण्यांच्यात गुंतलेलं असायचं. कुत्रामांजर, गाई-गुरं अशी सगळ्या प्राण्यांबद्दलची तिची आवडच बहुधा आमच्यात उतरलीय.
आजीचं संपूर्ण आयुष्यच तसं हलाखीत गेलं. खर तर तिचं माहेर श्रीमंत होतं. सगळीकडे सुबत्ता होती... पण सासरी आल्यावर सगळ दारिद्रही तिनं सोसलं. त्यात आजोबा म्हणजे जमदग्नीचा अवतार पण तिनं कुठेही कुरकुर केली नाही. त्याच्या संतापल्याच्या गोष्टीही ती नंतर आम्हा मुलांना हसत हसत सांगायची. सणासुदीलाही कित्येकवेळा घरात काही खायला नसायचं पण तिनं कधीच कुणापुढे पदर पसरला नाही... अन मुलांवरही असे संस्कार केले कि उपाशीपोटी सुद्धा ती अशी राहायची... जणू आत्ताच जेवून आली आहेत...
माझे मोठे काका नोकरीसाठी रंगून, काठमांडू, पोखरा, रांची, ग्वाल्हेर असे कुठेकुठे पोटासाठी भटकत होते तर दुसरे काका शेताकडे बघत गावात राहिले. आजोबांच्या माघारी आजीशेतातल्या घरात एकटीच राहिली. सगळं काहीमन घट्ट करून सोसत राहिली.
रिटायर्ड झाल्यावर मोठे काका देखील शेतातल्या घरात येऊन राहिले... घरात थोडीफार दुरुस्ती केली पण आजीला सुख नाहीच मिळालं. काकूकडून तर काही आरोप झाल्यावर ती खूपच दुखावली गेली. शिक्षणाला बाहेर पडलेले बाबा नंतर नोकरीसाठी सुद्धा बाहेरच राहिले त्यामुळे खरतर तिचा बाबांकडे ओढा कमीच...त्यामुळे आमच्याकडे अधेमध्ये आली तरी ती काही दिवसांपुरतीच राहत असे. 
पण १९८९-९० मध्ये मधल्या काकांच्या मृत्यूनंतर हट्टाने बाबा मग तिला चिपळूणला आमच्या घरी घेऊन आले... मग ती इथेही रुळली.
खरतर येताना ती एखाद्या निर्वासितासारखीच आली होती... गावाच्या घरच्या अनुभवांचे चटके सोसून शहाणी झाली होती... परक्यासारखीच रहायची सुरुवातीला. पण इथे मात्र तिचे आडाखे चुकले, आईने प्रेमाने तिची खूप सेवा केली अन ती पुन्हा खुशीत आली... मग घरच्या- दारच्या सर्वांवर अपार माया केली तिने.
माझ्यावर  तर तिचा जास्त जीव होता. कॉलेज संपल्यावर अवघ्या १८व्या वर्षी मी चिपळूण जवळ परशुराम लोट्यातील एका कंपनीत सर्व्हिसला लागलो... कधी दिवसाचे १६-१८ तास सुद्धा काम करावे लागे. मग आजीचा जीव कळवळायचा. ‘हिंडण्याफिरण्याचे वय हे... पोराला किती दगदग होते....’ असं सारखं म्हणायची... मी रात्री आल्यावर माझ्यासाठी गादी घालून ठेवायची... खरतर मी तिची गादी घालून द्यायची... पण मग म्हणायची, ‘ इथं घरात काय काम आहे? नुसतं बसून खातेय ना... जरा हालचाल हवी कि शरीराला.’
रात्री झोपल्यावर तिने चेहऱ्यावरून हात फिरवला नाही असं कधीच झालं नाही... सुरुवातीला आल्यावर गप्प गप्प राहणारी, विचारात हरवलेली आजी नंतर मात्र गाणी वगैरे म्हणायची. कितीतरी मराठी, कानडी गीत, अभंग तिला पाठ होते. देवाचे अभंग जरी ती म्हणायची तरी देवाचं नाव मात्र घ्यायची नाही... ‘काय माझ असं चांगलं केलंय देवाने म्हणून मी नाव घेऊ?’ असंच म्हणायची.
पण तिचा देव हा माणसांच्यात होता. स्वतः पुरेपूर दारिद्र्य भोगल्यामुळे गरीब, अडल्यानडल्या माणसांबद्दल तिला खूप कळवळा होता. स्वतःच्या ताटातली अर्धी भाकरीसुद्धा वाटून टाकण्याएवढी उदार वृत्ती होती अन कित्येकवेळा स्वतःचा घास तिने दुसऱ्याला दिलाही होता.
मला पहिला पगार मिळाल्यावर मी तिच्या हातावर त्यातले १००/- रुपये ठेवल्यावर तिचे डोळे पाणावले. ‘अरे तुझा काका एवढा म्हातारा झाला, पण कधी मला ५/- रुपये द्यावे असे त्याला वाटले नाही रे!’ असं थरथरत्या आवाजात बोलली... मला जवळ घेऊन म्हणाली, ‘हे ठेव रे तुझ्याकडे लागले तर मागून घेईन... असाच मोठा हो.’
तिला पैशाची हाव कधीच नव्हती पण कायम दारिद्र्यात राहिल्यामुळे पैशाचं आकर्षणही होतं... तिला पैसे लागायचे कशाला? तर कुणा गरिबाला देण्यासाठी... दारावर आलेल्या भिकाऱ्यालाही पटकन काहीतरी देऊन टाकायची. घरात आलेल्या कुणालाही काही देऊन टाकायची. घरात आलेल्या प्रत्येकाला  खायला घालावं असं कायम वाटायचं तिला. पण तिच्या याचं इच्छेमुळे एकदा काकूने तिला वाईट-साईट शब्दात बोलल्यामुळे तिची कुचंबणा व्हायची. एखाद्याची ओढग्रस्त अवस्था तिला कधीच बघवत नसे. ‘पैसा  काय रे आज आहे उद्या नाही, माणूस उपाशी रहायला नको’ असं म्हणायची. 

कुत्र्या मांजरावर पण तिचा खूप जीव. पूर्वी तर शेतात ‘खंड्या’ नावाचा कुत्रा होता. कायम तिच्याभोवती असायचा. जन्माचं दारिद्य्र, त्यात रूपाचं दान देवानं भरभरून दिलेलं पण एकटे राहतानासुद्धा तिला कधीच कसली भीती वाटली नाही... शहरात राहणारी माणसदेखील रात्री घराबाहेर पडायला घाबरतात पण त्या अंधारलेल्या खेडेगावात एक कंदील हाताशी घेऊन आजी बिनधास्त जगायची. कामसूपणा तर विचारायलाच नको. वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा एखादं छोट काम समोर आल्यावर ‘आता नको, नंतर करू’ असं ती कधीच म्हणाली नाही. सगळ कस झटपट! तिच्या हातालाही एक वेगळीच चव होती. शेतातल्या घरात हाताशी काही नसताना तिनं बनवलेली साध्या तिखटमिठाची आमटी-भाकरीसुद्धा तृप्त करून जात असे. 
शेवटपर्यत ती ठणठणीत राहिली. दिवाळीला पहिला बोनस मिळाल्यावर मी तिच्यासाठी एक साधी, छानसी साडी आणली होती. कितीजणांना तिने ती कौतुकाने दाखवली पण तिने ती साडी नेसावी असं नियतीच्या मनात नव्हतं. ती साडी तिच्या प्रेतालाच नेसवावी लागली शेवटी !!
सकाळी तेल लावून डोक्याला तिच्याकडून मसाज करवून घ्यायला मला आवडायचं. ती डोकं चोळत असतानाच कशी झोप येऊ लागायची. दिवाळीतही त्या दिवशी मला मस्त तेल लावून मसाज केला, आईलाही न्हायला घातलं... अन दुपारची जेवण उरकल्यावर तिला अॅटॅक आला. मेंदूतील यंत्रणा निकामी होऊन एक बाजू लुळी पडली, वाचा गेली... अन पुढचे आठ दिवस नुसती तिची तडफड होत होती. मुळात तिला दुसऱ्यांनी तिचं काही केलेलं आवडत नसे. ती नापसंती डोळ्यात दिसायची. त्या चार-पाच दिवसात आमची पण खूप धावपळ झाली... एक दिवस तिच्या बाजूला बसलो होतो.. थंडी होतीच.. अन माझा अंगावरचा टॉवेल खाली घसरला. तो परत खांद्यावर ठेवायला ती धडपडू लागली. एका हाताने स्वतः मृत्यूच्या दारात असतानाही दुसऱ्याची काळजी करणाऱ्या तिला पाहून भडभडून आलं...
पण ती गेली... खरंतर  आठच दिवसाची ती तडफड पाहताना तिने लवकर जावं असंच वाटत होतं. त्यानंतर गेल्या कित्येक वर्षात मग दिवाळीला काही अर्थच नाही उरला. घराघरातून फराळाचे पदार्थ, आकाश कंदील, फटाके, वगैरे सुरु झालं कि मला तडफडणारी आजी आठवते... मग दिवाळीतल्या सगळ्या मौजमजेकडे पाठ फिरवून मी डोंगरदऱ्यातून भटकत बसतो... पिसाटासारखा...!!!
-    सुधांशु नाईक, कोल्हापूर ९८३३२९९७९१
-    ( पूर्व प्रसिद्धी दै. सागर, चिपळूण)

Wednesday, 30 October 2019

उर्मट वाटणारा हळवा बुध्दिमंत

माणसं. भेटत असतात आपल्याला सर्वत्र. भली, बुरी, विक्षिप्त, साधीभोळी अशा सगळ्या प्रकारची. चांगली, वाईट  किंवा मिश्र गुणांची. गुणांसोबत अवगुणांची जोड असलेली. कशीही असली तरी मनावर एक चित्र कायमचं उमटवून जातात. ते त्यांचं चित्र असतं. त्यातले रंग खास त्यांचं व्यक्तित्व घेऊन आलेले. आजवर भेटलेल्या काही माणसांच्या गोष्टी सांगणारी ही माझी लेखमाला... 

त्यातील पहिला लेख  एका स्नेह्यांवरचा....

उर्मट वाटणारा हळवा बुध्दिमंत

चिपळूण मधून निघणारं दै. सागर हे वृत्तपत्र कोकणात बहुतेक ठिकाणी सर्वांना माहिती असलेलं. नाना जोशी अष्टपैलू आणि अष्टावधानी असं गुणवंत व्यक्तीमत्व. १९६० च्या दशकात त्यांनी हे वृत्तपत्र सुरु केलं. तिथं दिवाडकर काम करायचे. भालचंद्र दिवाडकर हे त्यांचं नाव. माझ्यापेक्षा खूप मोठे. वयाने, ज्ञानाने, अनुभवाने, वाचनाने आणि लेखनानेही. एक दोन नव्हे तब्बल ४५ वर्षे त्यांनी एकाच दैनिकात काम केले हीही आगळीवेगळी गोष्ट. “ मला लिहायला खूप आवडते... मी सागर साठी लिहू का” असं विचारत ते ४५ वर्षांपूर्वी सागर मध्ये आले आणि तिथेच रमले. मुख्य संपादक बनले. माझ्यासारख्या अनेक नवोदितांना लिहायला संधी देऊ लागले. खरं म्हणजे सागर च्या ऑफिसात जाणारा प्रत्येक जण तिथे दिवाडकर बसलेत असं दिसताच एकदम गंभीर होत असे. कारण ते खाड्कन कधी काय बोलतील याची शाश्वती नसे. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता ते समोरच्या अत्यंत तुसडेपणाने जागेवर गप्प करायचे. कुणी नवखा असेल तर “ कोण हा उर्मट, तुसडा, माणूसघाणा माणूस” असं वाटायचं त्याला.

माझी त्यांची भेट ही १९९७-९८ च्या सुमारास झालेली. चिपळूणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमात मी आपली नोकरी सांभाळून लुडबुड करायचो. त्यातूनच एकदा “दै. सागर” च्या ऑफिसात दिवाडकर भेटले. तिथल्या एका स्नेह्यानं मला लेखमाला लिहिण्याबाबत विचारलेलं. मात्र दिवाडकराना ते आवडलं पाहिजे तरच छापून येईल. त्यांनी “छापतो” असं सांगितलं तरीही ते छापून येईलच अशी आशा बाळगायची मात्र नाही... इत्यादि इत्यादि बरंच काही सांगितलेलं.  

मी गेलो. थेट त्यांना भेटलो. 
“ सर, नमस्कार. लेखमाला लिहायची इच्छा आहे...”
“ कशावर लिहिणार तुम्ही...राजकारण, कोकणच्या समस्या वगैरे दळण दळणार असाल तर नका लिहू..”
“ नाही...मी ते नाही लिहिणार. मी संगीतावर, संगीतातली, इतिहासातली आणि आसपास भेटलेली माणसे यांच्यावर लिहायचं ठरवलंय. निसर्गावर, विविध अप्रकाशित निसर्गरम्य ठिकाणांवर लिहायचं म्हणतोय..”
“ बरं.. परवा पहिला लेख आणून द्या. बरा वाटला तर छापू. तुमच्या लेखात मला वाटलं तर हवी तेवढी काट-छाट करू शकतो मी. तसंच जर आवडला नाही तर फेकून देणार. परत परत विचारायला यायचं नाही.. कधी छापणार हो म्हणत...”
“ ठीकाय सर...देतो तुम्हाला लेख.. तुम्हाला आवडलं तर छापा..”
दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी गेलो. त्या दरम्यान महमद रफीसाहेबांची पुण्यतिथी होती. मग “ तू काही आसपास है दोस्त” असा लेख त्यांच्यावर लिहिलेला. हा बहुदा आपला पहिला आणि शेवटचा लेख--- सागर मधला... असं समजून त्यांना गेलो.
“ सर लेख आणलाय.”
“ तिथं त्या फाईल मध्ये ठेवत जा. जरा वेळानं पाहतो.... जा तुम्ही...”
२ दिवसांनी आलेल्या दै. सागर च्या  “ रसिक” पुरवणीत तो लेख जसाच्या तसा छापून आला होता...! त्या लेखमालेला “प्राजक्ताची फुले” असं नाव द्यावे ही माझी विनंतीही मंजूर केलेली त्यांनी.  दर आठवड्याला ही लेखमाला छापली जाईल अशी नोंद लेखासोबत दिसत होती. 

२-३ दिवसानंतर पुढचा लेख घेऊन गेलो. तो एका सुंदर पण कमी गर्दीच्या पर्यटन स्थळाबाबत होता. 
“ लेख तिथं फाईल मध्ये ठेवत जा. मी माझ्या सवडीनं वाचत जाईन. मी नसलो तरी लेख तिथंच ठेवत जा. रफीवर लिहिलत परवा तुम्ही... रफीने गायलेलं बहादुरशाह जफरचं गाणं ऐकलंय का कधी..”
“ हो.. लाल किला सिनेमातलं ना.. न किसीकी आंख का नूर हू... संगीतकार एस. एन. त्रिपाठी होते.....”
“ अरे व्वा...” इतकंच म्हणताना त्यांच्या नजरेत झालेला बदल मीही टिपला.

तिथून पुढे मग मी लिहित गेलो. कित्येकदा नाना देखील आवर्जून बोलावून घ्यायचे. गप्पा मारत बसायचे. एकदा एक लघुकथा लिहिली. नेहमीप्रमाणे संध्याकाळी जाऊन फाईल मध्ये ठेऊन आलो. दुसऱ्या दिवशी घरी फोन. 
“जरा लगेच येऊन जा भेटायला..” 
मला वाटलं काहीतरी चुकलं. जरा घाबरत घाबरतच गेलो. दिवाडकर निवांत खुर्चीत रेलून बसलेले.
समोर माझी कथा पडलेली.
“ हा माणूस पाहिलाय का तुम्ही.. ज्यावर कथा लिहिलीये.” 
“ नाही हो.. असा माणूस मी पहिला नाहीये. मात्र विविध ऐकलेल्या गोष्टी, काही पाहिलेली माणसे यांचा आधार आहे त्याला. प्रसंग काही प्रमाणात खरेच आहेत.”
“ रडवलं तुम्ही आज मला. कित्येक वर्षानंतर असं भावोत्कट, तरल काही भिडलं मनाला.. लिहित राहा तुम्ही. तुमच्यामध्ये एक अत्यंत संवेदनशील माणूस दडलाय... त्याला मारू नका. जग खूप क्रूर आहे हो. तुम्ही लहान आहात खूप. खूप सोसायचंय तुम्हाला अजून... पण तरीही मनातलं हे हळवेपण जपा. चला आज तुम्हाला माझ्यातर्फे चहा..”
“ thank you सर...” मी म्हटलं.. 
लगेच खाड्कन म्हणाले.. “ ते सर वगैरे म्हणू नका हो.. नुसतं दिवाडकर म्हणा..”
त्यांच्या वयाचा मान राखत मग मी त्यांना “दिवाडकर काका” म्हणू लागलो.
आम्ही दोघं जवळच्या एका टपरीवर चहा प्यायला गेलो. पत्रकाराच्या हुषारीने ते गप्पा मारत अलगद माझ्याकडून माझी माहिती काढून घेत होते. मी काय करतो, काय वाचतो, काय ऐकतो हे सारं सारं...
तिथून मग आमच्यात एक वेगळाच दोस्ताना निर्माण झाला. 


-----
एकदा काहीतरी निमित्ताने घरी बोलावलेलं त्यांना. जेवायला आलेले. मोजकं जेवले.
“ अहो मला गावात सगळे टाकाऊ माणूस मानतात. माझ्या नादाला कोण फारसं लागतं नाही. मलाही ते बरं वाटतं. त्यामुळे लोक आपला वेळ खात नाहीत. निवांत लिहायला, वाचायला खूप वेळ मिळतो त्यामुळे. नाहीतर लोक उगीच वेळ घालवत बसतात आपला. वेळकाढू गप्पा मारत. त्यांना फक्त टाइमपास करायचा असतो...”
खरंच होतं ते. दिवाडकर कुणासोबत भरपूर वेळ गप्पा मारत बसलेत असं दृश्य दुर्मिळच होतं. एकदा सहजच कवी ग्रेस यांचा विषय निघाला.
ताड्कन उठलेच ते. मलाही बळजबरीनं उठायला लावलं.
“ चला.. पट्कन.. गाडीवर बसा.” त्यांनी एम-एटी सुरु केली. कुठे जातोय काही कळेनाच.
गावाबाहेर दूर डोंगराच्या कुशीत बांधलेल्या एका नव्या घरी पोचलो..
“समोर पहा... काय नाव घराचं...”
मी पाहिलं... “अरे व्वा.. मितवा.. ग्रेस च्या कविता संग्रहाचं हे नाव..!”
ते आनंदले. म्हणाले.. “ या.. हे माझं घर. आता तुमचंही घर. इथं समग्र ग्रेस आहे. तुम्हाला कधीही काही वाचावं वाटलं तर हक्कानं या. बिनधास्त वाचा.”
मग त्यांनी पत्नीसोबत, लेकीसोबत ओळख करून दिली. चहा पीत आम्ही सगळे गप्पा मारत बसलो. काकू ही म्हणाल्या, कितीतरी दिवसात कुणी आलंच नव्हतं घरी. तुम्ही आलात, आपण सगळे गप्पा मारत बसलोय... छान वाटतंय...!
ज्या माणसाला माझ्या घरासकट गावातली अनेक घरं तुसडा माणूस समजत होती तो माणूस मला आपल्या घरी घेऊन आला होता..! हे घर तुमचंही असं सांगत होता..!
मी कित्येकदा त्यांना म्हटलं, काका अहो मला नावाने हाक मारा हो. अहो जाहो नका करू. पण कधीही ऐकल नाही त्यांनी.
त्या दिवशी कवी ग्रेस, कुमारजी, शिवाजी महाराज, सावरकर आदि माझ्या विविध आवडत्या विषयावर ते माझ्यासोबत मनसोक्त बोलत होते. 
तसं पाहायला गेलं तर दिवाडकर जुन्यातले कट्टर मार्क्सवादी. अनेक गोष्टीवर कठोर प्रहार करणारे. ज्या प्रकल्पात मी काम करत होतो त्या एन्रोन प्रकल्पातील विविध समस्या, त्यामुळे परिसराची झालेली हानी यावर त्यांनी पुस्तक ही लिहिलेलं. मात्र त्यांची कठोर साम्यवादी विचारसरणी आयुष्य अनुभवताना मध्ये आली नाही.
संगीत, साहित्य, निसर्ग, माणसे हे सगळं ते उत्कटतेने अनुभवत राहिले. त्यांचं व्यक्त होणं कदाचित वेगळंच होतं, कित्येकांना न भावणारं होतं मात्र त्यांच्या प्रखर बुद्धीमत्तेविषयी कुणालाच शंका नव्हती.
एका दिवाळीत घरी एक पाकीट आले. त्यात दिवाळी ग्रीटिंग होतं. मला कुमारजी आवडतात हे लक्षात ठेऊन त्यांनी लेकीकडून छान चित्र काढून घेतलं होतं. 
त्याला शीर्षक होतं कुमारजींच्या धनबसंती रागातील बंदिशीचा मुखडा..” दीप की ज्योत जर रे..” आजही ती बंदिश कधी ऐकली की दिवाडकर, त्यांची लेक आणि ते ग्रीटिंग आठवत मला..!
----
पुढे मी चिपळूण सोडून कोल्हापुरात दाखल झालो दै. तरुण भारत ला. गावी गेलो की न चुकता भेटायला जात होतो. एकदा गेलो तेंव्हा कळलंच की त्यांच्या पत्नीला जीवघेणा आजार झालाय. दिवाडकर प्रथमच हळवे झालेले जाणवले.
“ ती बायको आहे माझी. आज न उद्या मारणार हे ठाऊक आहे. मी ते स्वीकारलं आहे. मात्र तिच्या वेदना पाहवत नाहीत हो... समोर असून काही करू शकत नाही मी...” असं ते थंड आवाजात जेंव्हा सांगत होते तेंव्हा माझेच डोळे भरून आले.
काही महिन्यांनी काकू गेल्याच. मग एकुलत्या एका लेकीला जपत ते एकुटवाणे जगत राहिले. दिवसरात्र कामात स्वतःला बुडवून घेत राहिले. सकाळपासून रात्री उशिरा पर्यंत वृत्तपत्राचे काम करताना विविध पुस्तकं लिहित राहिले.
आणि पुन्हा नियतीने अजून एक आघात केला. उत्तम संस्कार लाभलेली, हुषार, कलाकार अशा त्यांच्या लेकीनं भर दिवसा घरी गळफास लाऊन आत्महत्या केली. 
घरी आल्यावर आपल्या लाडक्या लेकीला तसं पाहताना त्या बापाला काय वाटलं असेल याची कल्पनाच करवत नाही.
त्यानंतर काही महिन्यांनी मी चिपळूण ला गेलेलो. मुद्दाम त्यांना भेटायला गेलो.
“ काय सांगू आणि काय बोलू हो... माझं अवघं कुटुंबच संपलं. भुतासारखा एकाकी उरलोय..” विचित्र खरखरत्या स्वरात ते म्हणाले आणि गदगदून रडू लागले. 
मलाही सुचेना की आपण यांचं सांत्वन कसं करावं...
जरावेळानं म्हणाले, “ किती गुणी होती लेक माझी. सगळ्या चांगल्या गोष्टी तिच्यासाठी हजर केल्या होत्या. लोक मला घाबरायचे. ती आजवर कधी घाबरली नव्हती. सगळ्या विषयावर मुक्त बोलायची माझ्याशी. त्या दिवशी तिला नेमकं कसला मानसिक त्रास झाला असेल, असं कोणतं दडपण आले असेल तिच्या मनावर की काही वेळापूर्वी फोनवर बोलतानाही मला तिनं हे असं काही करणार याचा थांगपत्ता लागू दिला नाही.. हरलो मी... माझ्या लेकीच्या आयुष्यात असं काय दुःख होतं की जे तिला माझ्याशी शेयर करावं वाटलं नाही. त्या दुःखापुढे तिनं हार मानून मृत्यू जवळ केला.. काय होतं ते मला कधीच कळणार नाही...”
त्यांच्यातल्या बापाचं ते आक्रंदन पाहताना मी अक्षरशः थिजून गेलो.
तिथून पुढे ते अधिकाधिक कामात गुंतून गेले. दै. सागर ला विविध अग्रलेख आणि “पडछाया” हे त्यांचं सदर यातून त्यांनी हजारो विषय हाताळले. कोणत्याही विषयाच्या मुळाशी जाण्याची त्यांची हातोटी जबरदस्त अशीच होती. त्यांच्यातला साक्षेपी संपादक सदैव जागृत असायचा. त्यांच्यातला रसिक सदैव प्रत्येक गोष्ट टिपायला उत्सुक असायचा. अनेक गरजू लोकांना कसलाही गवगवा न करता मदत करणारा तो एक हळवा सहृदयी माणूस होता आणि त्याचबरोबर आपल्या भोवती उर्मटपणाचे काटेरी कुंपण स्वतःच निर्माण केलेला तो एक बुद्धिमंत होता..! 
एकदिवस कळाले की त्यानाही मोठ्या आजाराने गाठले आहे. आणि फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांच्या मृत्यूचीही बातमी शेवटी आलीच. 
एकदा एका नातेवाईकाच्या मृत्युनं मी हळवा झालेलो तेंव्हा ते शांतपणे समजून घालत म्हणाले होते.. “जन्मलेला प्रत्येक जीव कधीतरी मरणार असतोच. मात्र जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात त्याचं आयुष्य कसं वळणे घेत जातं हे खरंच आपल्याला कळत नाही. आणि कळलंच तरी आपणही त्यासाठी खूप काही करू शकतो असंही नाही. आपण त्याची सेवा, सुश्रुषा वगैरे जे काही करतो ते केवळ आपल्या समाधानासाठी करतो. तुम्ही जमेल ते केलं त्यांच्यासाठी त्यातच समाधान माना... कुणाच्याही जन्मानं आनंदी होऊ नका.. कुणाच्याही मृत्यूनं खंतावू नका. रामदास म्हणतात तसा सदैव मृत्यूच आपल्या सोबत चालत असतो... आपल्याला तो दिसत नाही इतकंच.”
जिवलगांचे मृत्यू सोसताना त्यांना काय वाटलं असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही... आणि त्यांच्या मृत्यूनंतर एक अध्याय संपला यापेक्षा जास्त काही आता लिहिवत नाही..!
सुधांशु नाईक, कोल्हापूर( ९८३३२९९७९१ )