marathi blog vishwa

Tuesday, 5 September 2023

तीर्थ विठ्ठल.. क्षेत्र विठ्ठल...

#सुधा_म्हणे: तीर्थ विठ्ठल.. क्षेत्र विठ्ठल..

05 सप्टेंबर 23

 संत ज्ञानेश्वरांच्या सोबत इये महाराष्ट्रदेशी जो विठ्ठलभक्तीचा मेळा रंगला त्यात अनेक संतांच्या सोबत अग्रणी होते ते संत नामदेव. लहानग्या नामदेवाच्या भाबड्या भक्तीची कथा सर्वाना ठाऊक असते पण ते त्या पलीकडे खूप काही होते. महाराष्ट्रात तर त्यांनी ज्ञानदेव आणि इतरांच्या सोबत काळात अथक दौरे केले. साऱ्यानी केलेल्या या प्रयत्नामुळे दिंडयापताका घेऊन भजन कीर्तनी रंगणारे समूह निर्माण झाले. त्या काळात महाराष्ट्रावर उत्तरेतून आलेल्या, तिथे अतिशय हाहाकार माजवलेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाची गडद छाया होती.

जनमानसाने प्रथमच इतके क्रौर्य पाहिले होते. उत्तर भारतात तर हलकल्लोळ माजला होता. ज्या ईश्वरावर श्रद्धा ठेऊन, अत्यंत प्रामाणिकपणे ज्याची भक्ती केली त्या देवतांचीच मंदिरे धडाधड उद्ध्वस्त होत होती. कुणी कुणाकडे पहायचे अशीच भयानक अवस्था. गावे लुटली जात होती, स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे निघत होते. जीव वाचवायला लोक धर्मांतराला सामोरे जात होते अथवा विहिरीत उड्या टाकून किंवा जोहार करून अग्नीत स्वतःचाच बळी देत होते. अशा वेळी “ही वेळ ही जाईल.. पुन्हा इथे सुख शांती नांदेल” असे सांगून लोकाना धीर देण्यासाठी ही संतमंडळी पुढे आली. महाराष्ट्रातून थेट पंजाब पर्यन्त जाऊन नामदेवांनी सुरुवातीला ज्ञानोबांच्या सोबत पदयात्रा केली. लोकांच्या मनाला उभारी देण्यासाठी कृतिशील राहिले. ज्ञानोबानी समाधी घेतल्यावरदेखील नामदेव पुनःपुन्हा पंजाब पर्यन्त जात राहिले. त्यांचे कार्य इतके मोठे की शिखांच्या पवित्र अशा गुरु ग्रंथसाहेब मध्ये त्यांच्या काही रचनाना स्थान देण्यात आले.

 
नामदेव विठ्ठलभक्तीत दंगलेले असले तरी त्यांची भक्ती डोळस होती माझ्यासारखे पतित लोक आहेत म्हणून देवा तुला मोठेपण मिळते आहे. अशी उत्कट भक्ती करणारे कुणीतरी आहे म्हणूनच तुलाही अस्तित्व आहे. असे कुणी नसते तर तुला कुणीच भजले नसते. त्यामुळे तू आम्हावर कृपा करायलाच हवी असे सांगताना ते म्हणतात,

“देवा तुज आम्हीं दिधलें थोरपण । पाहें हें वचन शोधूनियां ॥

नसतां पतित कोण पुसे तूतें । सांदीस पडतें नाम तुझेंच॥“

नामदेवांचे शेकडो अभंग उपलब्ध आहेत. किती बोलावे तितके कमीच. मात्र आपले आयुष्य कसे विठ्ठलमय झाले आहे हे सांगणारा त्यांचा हा अभंग मुख्यत: गाजला तो पं.भीमसेनजींच्या गायनामुळे.

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ॥१॥
माता विठ्ठल, पिता विठ्ठल । बंधु विठ्ठल, गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल ।निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ॥३॥
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला ।म्हणुनि कळिकाळा पाड नाही ॥४॥

आई-बाप, बंधु –गुरु सगळे काही विठ्ठलमय झाल्यावर जे आत्मभान येते तेंव्हा “नामा म्हणे मज विठ्ठल सापडला..” म्हणजे काय ते उमगू शकते. ज्यावेळी भीमसेनजी ही ओळ गातात तेंव्हा अंगभर रोमांच उठतात, मनात, डोळ्यासमोर दिसणारा जिवलग प्रत्यक्ष दिसावा म्हणून ते सूर जणू आकांत मांडतात असे वाटते. नामदेवांचे देखील अवघे विश्व त्या जिवलगात गुंतले आहे. त्याने दर्शन दिल्याशिवाय मी अन्नदेखील स्पर्शणार नाही असे म्हणणारे नामदेव भक्तीची उच्चतम पातळी गाठतात. 

ज्यावेळी विठ्ठल भेटतो, त्याचे सगुण साकार रूप समोर दिसते तेंव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. त्या जिवलगाच्या दर्शनाने, स्पर्शाने अवघ्या चिंता दूर होऊन जातात. जगणे धन्य झाले असे वाटू लागते आणि आयुष्य समर्पित करण्यासाठी तन मन आतुर होऊन जाते..!

-सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)




Monday, 4 September 2023

माझे माहेर पंढरी...

 #सुधा_म्हणे: माझे माहेर पंढरी...

04 सप्टेंबर 23

संत एकनाथ हे एक अद्भुत व्यक्तिमत्व होते. लोकमानस उमजून घेत भारुड, गवळण, अभंग आदि रचना करत त्यांनी सोप्या भाषेत अध्यात्म लोकांच्या गळी उतरवले. त्यांचे गुरु जनार्दन स्वामी हे देवगिरीच्या किल्ल्यात बादशाहीत नोकरीला होते. जातीने ब्राह्मण असूनही जातीभेद मानू नये अशा विचाराने एकनाथ वागत. त्यांची सात्विक वर्तणूक, विद्वत्ता, भारतभर केलेले भ्रमण या सगळ्याचा परिपाक त्यांच्या लेखनातून सहजपणे सामोरा येतो. 

एकीकडे सामान्य लोकाना उमगेल अशा पद्धतीने त्यांनी विविध गद्य पद्य रचना केल्या तर त्याचवेळी भावार्थ रामायण आणि एकनाथी भागवतसारखे ग्रंथही लिहून एक मोठा ठेवा प्राकृत भाषेतून लोकांसाठी खुला केला. सोळाव्या शतकातील संत एकनाथांचे अस्तित्व हे ज्ञानेश्वर – नामदेव यांची परंपरा तुकाराम – रामदास यांच्याशी जोडण्यात महत्वाचे ठरते. समाजाच्या हिताच्या गोष्टी ते एका वेगळ्या प्रकारे सांगत रहातात. त्यामुळे सर्व जाती-धर्मातील लोक त्यांना सहज आपलेसे करता आले. त्यांच्या रचनेतील माधुर्य आणि सहजपण चटकन दिसते ते या अशा अभंगातून.

माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी

बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई
पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू
माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा
एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण
माझे माहेर पंढरी ...

माहेर. स्त्रीच्या भावविश्वातील सर्वात नाजुक अशी जागा. तिचे अवघे आयुष्य तिथे सुरू झालेले असते. तिथली माणसे, तिथला परिसर, तिथली झाडे माडे या सगळ्याशी तिचे एक अतूट भावनिक नाते जोडले गेलेले असते. लग्न होऊन सासरी आल्यावर तिची अवस्था जणू अशी असते की एखादे झाड उपटून आणून दुसरीकडे रुजवावे. संपूर्ण आयुष्य जणू नव्याने सुरू करावे लागते आणि त्यात जर योग्य अशी साथ मिळाली नाही तर प्रत्येक दिवस माहेरची सय येणे अपरिहार्य होऊन जाते. संसारातील तापत्रय सोसताना अशा स्त्रीला आपल्या जिवलगांचे मनातले अस्तित्वच आधार देत राहते. शरीराने इथे असणारी ती मनाने मात्र आपल्या जिवलगांच्या सोबत असते. 

माहेरवाशिणीच्या भावनेला भक्तीचा रंग देत संत एकनाथ आपल्या शब्दातून सुरेख आध्यात्मिक उंचीवर घेऊन जातात. माहेरची प्रत्येक गोष्ट जशी तिच्यासाठी सर्वोत्तम असते तसेच माझी पंढरी, माझे विठ्ठल रखुमाई, पुंडलीक आणि चंद्रभागा आहेत हे सांगणेच किती मधुर आहे. राम फाटक यांनी दिलेल्या उत्कृष्ट संगीताने, आणि भीमसेनजींच्या हृदयापर्यंत भिडणाऱ्या स्वरांमुळे हा अभंग जास्त लोकप्रिय झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

-सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)



Saturday, 2 September 2023

कवी सुधांशु आणि देव माझा विठू सावळा...

#सुधा_म्हणे : कवी सुधांशु आणि देव माझा विठू सावळा.. 

02 सप्टेंबर 23

विविध संतांच्या रचना या जितक्या प्रासादिक, मनात खोलवर उतरणाऱ्या, रुजणाऱ्या आहेत तशाच शेकडो सुरेल रचना आपल्या इथल्या अनेक कवींनीही केल्या आहेत. भावभोळ्या रचना लिहिण्यामध्ये असलेले एक अग्रगण्य कवी म्हणजे कवी सुधांशु. हणमंत नरहर जोशी उर्फ कवी सुधांशु हे आपल्या लोभस कवितांच्यामुळे लोकप्रिय झाले आणि त्याहून जास्त लोकप्रियता त्यांना मिळाली ती त्यांच्या दत्तभक्तीपर गीतांमुळे. 

औदुंबर या दत्तक्षेत्री जन्मलेला हा माणूस अंतर्बाह्य मृदु मुलायम होता. सुधांशु म्हणजे चंद्रासारखा शीतल होता. सर्वांशी असलेल्या प्रेमळ वर्तणूकीमुळे सर्वांचा आवडता होता. त्यांचे निसर्ग प्रेम, दत्त भक्ती त्यांच्या गीतामध्ये अगदी सहजपणे दिसत राहते. कौमुदी, भाव सुधा, अनाहत असे त्यांचे लेखन वाचताना आपण भान हरपून जातो. आणि तीच गत होते त्यांची भक्तिगीते ऐकताना. आर. एन. पराडकर यांनी गायलेली “दत्त दिगंबर दैवत माझे..” आदि भक्तीगीते आणि “इथेच आणि या बांधावर..” सारखी भावगीते अफाट लोकप्रिय झाली. त्यांची गोडी इतकी की आजही प्रत्येक गुरुवारी आकाशवाणीवर त्यांचे एकतरी गीत ऐकू येतेच. आज ज्या रचनेविषयी मला सांगावेसे वाटते ती मात्र दत्ताविषयीची नव्हे तर विठ्ठलाविषयीची रचना आहे.

पंढरपूरमधल्या त्या सावळ्याचे वेड लागले की जीवनच बदलून जाते. त्याचे साजरे गोजरे रूप इतके लोभसवाणे आहे की किती प्रेम करावे तरी कमीच भासावे. हा विठू खूप साधा आहे. त्याच्या अपेक्षा फार थोड्या. भावुक होऊन त्याला साद द्यावी, जवळ जावे त्याच्या इतके पुरते त्याला. त्याच्या आसपास गोळा झालेली मंडळी भजन कीर्तनी रंगून जातात. मात्र जास्त आनंदाने हाच फुलून येतो, त्यांच्या हव्याहव्याशा सहवासात समाधानाने डोलत राहतो. असा आनंदमेळा सुरू असल्याने मग अवघी पंढरी नगरी जणू वैकुंठ बनून राहते.

देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझिया गळा

विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी

भीमेच्या काठी डुले, भक्तीचा मळा..

साजिरे रूप सुंदर, कटी झळके पीतांबर

कंठात तुळशीचे हार, कस्तुरी टिळा..

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो

रंगून जाई भक्तांचा पाहुनी लळा..

आपल्याला हव्या असणाऱ्या या तृप्त आनंदी वातावरणाची सगळ्यांना फार ओढ असते. ते तसे जगणे आता लाभेल का ठाऊक नाही मात्र सुमन कल्याणपूर यांच्या भावविभोर आवाजात हे गीत ऐकताना तो समाधानी विठ्ठल आपल्या नजरेसमोर सगुण साकार होऊन जातो आणि अवघा देह सुखिया झाला असे नक्कीच वाटत राहते.

-सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)



Friday, 1 September 2023

निर्गुणाचा संग...

#सुधा_म्हणे: निर्गुणाचा संग...

01 सप्टेंबर 23

संत परंपरेतील अनेक संत मंडळीच्यामध्ये गोरोबा कुंभार यांचे नाव देखील अग्रगण्य आहे. आपल्या आयुष्यातील दैनंदिन कामे करताना आपल्या मनातील दैवतासोबत तन्मयतेने एकरूप होऊन जाणे म्हणजे काय याचे एक उदाहरण म्हणजे गोरोबा. त्यांचे जगणेच विलक्षण होते.

देवाची भक्ती करण्यासाठी कुठेतरी जंगलात, गुहेत, एकांत स्थळी बसायला हवे. खडतर तपश्चर्या करायला हवी असे सगळे समज लोकांच्या मनात असताना त्याला छेद देणारे जगणे कसे असते हेच ही संत मंडळी आपल्या जगण्यातून शांतपणे दाखवत राहिली. आपले काम करताना नामस्मरण करत राहणारी जनाबाई, चोखोबा असो की गोरा कुंभार यांना जगण्याचे खरे मर्म उलगडले होते असे वाटते. विविध पंथ, उपासना या सगळ्यात न अडकता त्यांनी आपला भक्तिमार्ग भाव भोळ्या तऱ्हेने जपला. समोर सगुण रूपात विठ्ठल दिसत असला तरी जगाचा कारभार सांभाळणारे ते ईशतत्व काही वेगळे आहे याची स्पष्ट जाणीव त्यांना होती. 

त्यामुळे एका छोट्या गावातील एका कोपऱ्यात गाडगी मडकी बनवताना विठ्ठल भजनात तल्लीन होणारे गोरोबा म्हणतात,

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी ।
तेणें केलें देशोधडी आपणियाशी ॥१॥
अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें ।
एकलें सांडिलें निरंजनीं, मायबापा ॥२॥
एकत्व पाहतां अवघें लटिकें ।
जें पाहें तितुकें रूप तुझें, मायबापा ॥३॥
म्हणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा
तुम्हा आम्हा ठावा कैसे काय, मायबापा ॥४॥

गोरोबांच्या बाबत त्यांनी मुलाला काम करताना पायदळी तुडविले, त्यानंतर भावुक होऊन घेतलेल्या शपथेखातर जगत असताना, दोन्ही पत्नीच्या सोबत असताना त्यांनी स्वतःचे दोन्ही हात तोडले होते आदि कथा / दंतकथा समाजात सांगितल्या जातात. मात्र त्यापेक्षा मला महत्वाचे वाटते ते त्यांचे तन्मयतेने विठ्ठलाच्या प्रेमात अपार बुडून जाणे. सगुण साकार रुपाकडून निर्गुण निराकाराकडे जात राहणे.

त्यामुळे सगुण भक्तीकडून निर्गुण भक्तीकडे नेणारे त्यांचे अभंग अधिक अभ्यासले जावेत असे वाटते. अंतर्यामी एकीकडे निर्गुणाची ओढ असताना निसर्गात भरून राहिलेली ईश्वराची अनादि अनंत रुपे आपल्याला खुणावत राहतात. मनाला कोणत्याच बंधनात न जखडता हे प्रत्येक रूप आपल्याला निरखता येते. आनंद देत रहाते. 

सर्व दुःख –कष्ट, यातना विसरायला सहाय्यभूत होते असे सांगणारे गोरोबा. जळी स्थळी काष्ठी आपल्या सख्याचा विचार करत,  त्या सख्या पांडुरंगासोबत एकरूप झालेले गोरोबा सर्वाना प्रिय झाले. आपल्या प्रिय अशा देवतेसाठी, व्यक्तीसाठी उत्कटतेने तन्मयतेने स्वत्व विसरलेली माणसे म्हणूनच आपल्याला कायम सुंदर भासत राहतात..!

-सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)