#सुधा_म्हणे: माझे माहेर पंढरी...
04 सप्टेंबर
23
संत एकनाथ हे एक अद्भुत व्यक्तिमत्व होते. लोकमानस उमजून घेत भारुड, गवळण, अभंग आदि रचना करत त्यांनी सोप्या भाषेत अध्यात्म लोकांच्या गळी उतरवले. त्यांचे गुरु जनार्दन स्वामी हे देवगिरीच्या किल्ल्यात बादशाहीत नोकरीला होते. जातीने ब्राह्मण असूनही जातीभेद मानू नये अशा विचाराने एकनाथ वागत. त्यांची सात्विक वर्तणूक, विद्वत्ता, भारतभर केलेले भ्रमण या सगळ्याचा परिपाक त्यांच्या लेखनातून सहजपणे सामोरा येतो.
एकीकडे सामान्य लोकाना उमगेल अशा पद्धतीने त्यांनी विविध गद्य पद्य रचना केल्या तर त्याचवेळी भावार्थ रामायण आणि एकनाथी भागवतसारखे ग्रंथही लिहून एक मोठा ठेवा प्राकृत भाषेतून लोकांसाठी खुला केला. सोळाव्या शतकातील संत एकनाथांचे अस्तित्व हे ज्ञानेश्वर – नामदेव यांची परंपरा तुकाराम – रामदास यांच्याशी जोडण्यात महत्वाचे ठरते. समाजाच्या हिताच्या गोष्टी ते एका वेगळ्या प्रकारे सांगत रहातात. त्यामुळे सर्व जाती-धर्मातील लोक त्यांना सहज आपलेसे करता आले. त्यांच्या रचनेतील माधुर्य आणि सहजपण चटकन दिसते ते या अशा अभंगातून.
माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी
बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई
पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू
माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा
एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण
माझे माहेर पंढरी ...
माहेर. स्त्रीच्या भावविश्वातील सर्वात नाजुक अशी जागा. तिचे अवघे आयुष्य तिथे सुरू झालेले असते. तिथली माणसे, तिथला परिसर, तिथली झाडे माडे या सगळ्याशी तिचे एक अतूट भावनिक नाते जोडले गेलेले असते. लग्न होऊन सासरी आल्यावर तिची अवस्था जणू अशी असते की एखादे झाड उपटून आणून दुसरीकडे रुजवावे. संपूर्ण आयुष्य जणू नव्याने सुरू करावे लागते आणि त्यात जर योग्य अशी साथ मिळाली नाही तर प्रत्येक दिवस माहेरची सय येणे अपरिहार्य होऊन जाते. संसारातील तापत्रय सोसताना अशा स्त्रीला आपल्या जिवलगांचे मनातले अस्तित्वच आधार देत राहते. शरीराने इथे असणारी ती मनाने मात्र आपल्या जिवलगांच्या सोबत असते.
माहेरवाशिणीच्या भावनेला भक्तीचा रंग देत संत एकनाथ आपल्या शब्दातून सुरेख आध्यात्मिक उंचीवर घेऊन जातात. माहेरची प्रत्येक गोष्ट जशी तिच्यासाठी सर्वोत्तम असते तसेच माझी पंढरी, माझे विठ्ठल रखुमाई, पुंडलीक आणि चंद्रभागा आहेत हे सांगणेच किती मधुर आहे. राम फाटक यांनी दिलेल्या उत्कृष्ट संगीताने, आणि भीमसेनजींच्या हृदयापर्यंत भिडणाऱ्या स्वरांमुळे हा अभंग जास्त लोकप्रिय झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
-सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)
No comments:
Post a Comment