#सुधा_म्हणे: तीर्थ विठ्ठल.. क्षेत्र विठ्ठल..
05 सप्टेंबर
23
जनमानसाने
प्रथमच इतके क्रौर्य पाहिले होते. उत्तर भारतात तर हलकल्लोळ माजला होता. ज्या
ईश्वरावर श्रद्धा ठेऊन, अत्यंत प्रामाणिकपणे ज्याची भक्ती केली त्या देवतांचीच
मंदिरे धडाधड उद्ध्वस्त होत होती. कुणी कुणाकडे पहायचे अशीच भयानक अवस्था. गावे
लुटली जात होती, स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे निघत होते. जीव वाचवायला लोक
धर्मांतराला सामोरे जात होते अथवा विहिरीत उड्या टाकून किंवा जोहार करून अग्नीत स्वतःचाच
बळी देत होते. अशा वेळी “ही वेळ ही जाईल.. पुन्हा इथे सुख शांती नांदेल” असे
सांगून लोकाना धीर देण्यासाठी ही संतमंडळी पुढे आली. महाराष्ट्रातून थेट पंजाब
पर्यन्त जाऊन नामदेवांनी सुरुवातीला ज्ञानोबांच्या सोबत पदयात्रा केली. लोकांच्या
मनाला उभारी देण्यासाठी कृतिशील राहिले. ज्ञानोबानी समाधी घेतल्यावरदेखील नामदेव
पुनःपुन्हा पंजाब पर्यन्त जात राहिले. त्यांचे कार्य इतके मोठे की शिखांच्या
पवित्र अशा गुरु ग्रंथसाहेब मध्ये त्यांच्या काही रचनाना स्थान देण्यात आले.
“देवा तुज
आम्हीं दिधलें थोरपण । पाहें हें वचन शोधूनियां ॥
नसतां पतित
कोण पुसे तूतें । सांदीस पडतें नाम तुझेंच॥“
नामदेवांचे
शेकडो अभंग उपलब्ध आहेत. किती बोलावे तितके कमीच. मात्र आपले आयुष्य कसे विठ्ठलमय
झाले आहे हे सांगणारा त्यांचा हा अभंग मुख्यत: गाजला तो पं.भीमसेनजींच्या
गायनामुळे.
तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल । देव
विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ॥१॥
माता विठ्ठल, पिता विठ्ठल । बंधु विठ्ठल,
गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल ।निधान विठ्ठल,
निरंतर विठ्ठल ॥३॥
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला ।म्हणुनि कळिकाळा पाड नाही ॥४॥
आई-बाप, बंधु –गुरु सगळे काही विठ्ठलमय झाल्यावर जे आत्मभान येते तेंव्हा “नामा म्हणे मज विठ्ठल सापडला..” म्हणजे काय ते उमगू शकते. ज्यावेळी भीमसेनजी ही ओळ गातात तेंव्हा अंगभर रोमांच उठतात, मनात, डोळ्यासमोर दिसणारा जिवलग प्रत्यक्ष दिसावा म्हणून ते सूर जणू आकांत मांडतात असे वाटते. नामदेवांचे देखील अवघे विश्व त्या जिवलगात गुंतले आहे. त्याने दर्शन दिल्याशिवाय मी अन्नदेखील स्पर्शणार नाही असे म्हणणारे नामदेव भक्तीची उच्चतम पातळी गाठतात.
ज्यावेळी विठ्ठल भेटतो, त्याचे सगुण साकार रूप समोर दिसते तेंव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. त्या जिवलगाच्या दर्शनाने, स्पर्शाने अवघ्या चिंता दूर होऊन जातात. जगणे धन्य झाले असे वाटू लागते आणि आयुष्य समर्पित करण्यासाठी तन मन आतुर होऊन जाते..!
-सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)
No comments:
Post a Comment