marathi blog vishwa

Friday, 2 February 2024

उत्तम श्रोते होऊया...

मना सज्जना...भाग : 09
उत्तम श्रोते होऊया..
- सुधांशु नाईक
शुक्रवार 02/02/24
रोजच्या व्यावहारिक आयुष्यात आपण खूप गोष्टी करत राहतो. त्यासाठी समाजात वावरावे लागते. आपली इच्छा असो वा नसो, अनेकांशी चर्चा करावी लागते. काम करावे लागते, काम करवून घ्यावे लागते. प्रत्येक वेळी होणारे संभाषण हे आपल्याला रुचेल, हवे असेल तसेच असेल असे घडत नाही. कित्येकदा असे घडते की समोरची व्यक्ती आपल्याला काय नेमकं सांगायचे आहे ते समजून न घेताच बोलत राहते. आपल्या मनाने ती व्यक्ती विविध अर्थ काढत राहते आणि मग आपलेच मन अस्वस्थ होऊन जाते. कित्येकदा पूर्ण अभ्यास न करताही माणसे बोलत राहतात. त्यामुळे मॅनेजमेंटच्या क्षेत्रात, शिक्षणक्षेत्रात आणि समुपदेशन क्षेत्रात श्रोता होणे फार गरजेचे ठरते.
उत्तम श्रोता होणे हे फार मोठे कौशल्य आहे. A Good listener gains half of the knowledge by careful listening while other half can be gained by deep thinking process असे म्हणतात. आपल्या संस्कृतीतदेखील उत्तम श्रवण, मनन आणि चिंतन या गोष्टीना अतिशय महत्व दिले आहे. डॉक्टर, वकील, समुपदेशक, मानसोपचार तज्ञ आदि सर्वाना समोरच्या माणसाचे सारे काही नीट ऐकून घ्यावे लागते. कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी शांतचित्ताने श्रवण करणे गरजेचे असते.
एकदा का आपण श्रोत्याची भूमिका स्वीकारली की समोरच्या व्यक्तीची भाषा, शब्द संग्रह, देहबोली, त्या विषयातील त्याचा अभ्यास हे सारे आपल्याला अधिक बारकाईने न्याहाळता येते, ऐकता येते. आपल्या मनातील शंका नष्ट होतात. नव्या ज्ञानाकडे मन चटकन वळते.
एखाद्या क्षणी ऐकलेला एक उत्तम विचार आपले आयुष्य बदलायला कारणीभूत ठरतो. कधी तो विचार एखाद्या मित्राने सांगितलेला असतो, कधी शिक्षकानी सांगितलेला असतो तर कधी आई वडीलानी सांगितलेला असतो. अनेकदा लहानपणी ऐकलेली एखादी गोष्ट मनात कायमची ठसून जाते. कधी ती दानशूर शिबी राजाची असते, कधी राम-कृष्णाच्या पराक्रमाची असते, कधी एकमेकाना मदत करणाऱ्या मित्रांची असते. मन लावून आपण जे ऐकतो त्याचा मनावर खोलवर ठसा उमटतो आणि आपल्या आयुष्यावर त्याचा बरा वाईट परिणाम होतो.
अनेक ज्येष्ठ व्यक्तींची चरित्रे, मनोगते, भाषणे जेंव्हा आपण ऐकतो तेंव्हा लहानपणी ऐकलेली एखादी गोष्ट,एखाद्या व्यक्तीचे बोलणे याची आठवण सांगितलेली आहे हे लक्षात येते. उत्तम श्रोता झाल्याने आपलेच भले होते त्याची शेकडो उदाहरणे देता येतील. म्हणूनच समर्थ म्हणतात,
श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय तुटे
श्रवण होता पालटे, पूर्वगुण आपुला .. ||7-8-5
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जे काही गुण अंगी बाणवावे लागतात त्यात “उत्तम श्रोता होणे” हा गुण नक्कीच समाविष्ट करायला हवा असे मला वाटते.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Friday, 26 January 2024

कार्यरत होऊया…!

मना सज्जना... भाग : 07
कार्यरत होऊया… 
- सुधांशु नाईक
शुक्रवार 26/01/24
आपल्या मनाची मोठी गंमत असते. जोवर आपण काही ना काही काम करत असतो तोवर मन अगदी गपगुमान असतं. बऱ्यापैकी एकाग्रतेने आपण आपली कामं करत असतो. मात्र जरा कुठं रिकामपणे बसलो, निवांत बसलो की मग मनात शेकडो विचार येत राहतात.
विविध माणसं, गावं, कित्येक आठवणी असं काय काय मनात पिंगा घालत राहतं. कुठून कुठली आठवण येईल आपल्याला हे काही सांगता येत नाही. कोणतं काम आठवेल हे सांगता येत नाही. विचारांच्या गलबल्यात मन अगदी पतंगसारखं हेलकावत राहते. म्हणूनच तर idle mind is devil's workshop..! असं इंग्रजीत किंवा “ रिकामं मन सैतानाचेच..” असं मराठीत म्हटलं जाते.
मनाला जितकं वेसण बांधायला जाऊ तितकं ते अधिकच उधळते असं अनेक तत्ववेत्ते, अध्यात्मिक जाणकार लोक सांगतात. मनाला उलटं मोकळं सोडा, मनात येणारे विचार तटस्थपणे पहायला शिका असं सांगितलं जातं. इतकं सोपं असतं का हे?
जेंव्हा मन रिकामं असतं तेंव्हा अशा मोहाना अधिक चटकन बळी पडत असावं. जेंव्हा आपण खूप कामात असतो तेंव्हा आपण म्हणतोच ना, “ अगदी तहान भूक विसरून गेलो बघ हे काम करताना…” पण तेच आपण अगदी रिकामे आहोत, आणि रस्त्यावरून जाताना एखाद्या गाडीवर कुणी गरमगरम वडा किंवा भजी तळत असेल तरी आपलं मन लालचावते. डाएट वगैरेची सगळी बंधने आपण काही दिवस फक्त पाळतो आणि असं दिसलं की पटकन वडापावची ऑर्डर देतो. वडापाव हे एक प्रातिनिधिक उदाहरण झालं. असे कितीतरी प्रकारचे मोह आपल्याला भुरळ घालत असतात.
जेंव्हा माणूस अशा मोहात अडकते तेंव्हा मग कामाकडे, अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागते. त्यामुळे घरात कुणी विद्यार्थी असेल तर त्याने इतकाच वेळ टीव्ही पाहावा इत्यादी बंधने घातली जातात.
समाजात देखील आपण पाहतो, जे तरुण भरपूर अभ्यासात रमले आहेत, जे तरुण नोकरी धंद्यात कष्ट करताहेत ते स्वतःची एक नवीन जागा निर्माण करून दाखवतात, त्याचवेळी काही रिकामटेकडे युवक मात्र गल्लीच्या तोंडाशी अचकट विचकट गप्पा मारत वेळ फुकट घालवतात. आज जगातील सगळ्यात जास्त युवाशक्ती आपल्या देशात आहे असं मानलं जाते. या सगळ्या युवशक्तीची मने विधायक विचाराने प्रेरित झाली तर अजून कितीतरी मोठे काम आपण करून दाखवू शकतो. मनाला विधायक कार्यात गुंतवले की स्वतः आणि इतरांसाठी देखील ते हितकारक असते हे माहिती असल्यामुळे समर्थ म्हणतात;
अखंड कामाची लगबग
उपासनेस लावावे जग
लोक समजोनी मग,
आज्ञा इच्छिती ||
आजच्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने अशा कार्यरत लोकांच्या झुंडीच्या झुंडी देशहित जपायला कार्यरत होवोत हीच प्रार्थना.
-सुधांशु नाईक(9833299791)🌿

Saturday, 20 January 2024

प्रभाते मनी राम चिंतीत जावा...

मना सज्जना... भाग : 06
प्रभाते मनी राम चिंतीत जावा...
सुधांशु नाईक
शनिवार 20/01/24
अवघ्या दोन दिवसांवर देशात एक मोठी गोष्ट घडणार आहे. पुन्हा एकदा प्रभू रामचंद्राचे निर्माण झालेले मंदिर अयोध्येत सर्वांसाठी खुलं होत आहे. गेली पाच सहाशे वर्षे अनेकदा अयोध्येने परकीय आक्रमणे अनुभवली. प्रचंड विध्वन्स आणि रक्तरंजित इतिहास अनुभवला. आपलं स्वातंत्र्य, आपला धर्म जपायला हजारो लोकांनी प्राणार्पण केले होते. त्यातील अनेकांची नांवेही आपल्याला ठाऊक नाहीत. हे सगळं लोकांनी का केलं तर राम आपल्या मनात युगानुयुगे वसला आहे म्हणून.
इथला माणूस सकाळी उठला की एकमेकांना भेटताना राम राम म्हणायचा. इथला माणूस मरताना देखील राम राम म्हणायचा. इतकंच नव्हे तर कधी आपल्या आयुष्याचा, रोजच्या रुटीनचा कंटाळा आला तरी “सध्या जगण्यात राम उरला नाही..” असं म्हणायचा. राज्य कसं हवं तर रामाने केलं तसं सुखदायी हवं असं लोक कायम म्हणत आले. आणि हे काही 50,100 वर्षं घडलं नाहीये तर किमान 4 हजार वर्षं इथल्या लोकांनी राम असा मनाशी धरून ठेवला आहे. हे खूप विचार करण्यासारखे आहे.
राम का इतका पूजनीय आहे? आपण अगदी जवळचं माणूस असल्यासारखं रामाला एकेरी संबोधन का करतो? कारण रामाने सतत दुसऱ्याचा विचार केला. सर्व सामान्यांना सुख मिळावे याचा विचार केला. प्रसंगी आपले सुख बाजूला ठेवून त्याने इतरांचे मन राखायला मोठे त्याग केले. ऋषीं मुनींच्या पूजेत, यज्ञ यागात विघ्ने आणणाऱ्या अनेक राक्षसांचे पारिपत्य रामाने केले. पुन्हा राम कोणत्या मोहात अडकला नाही. स्वतःचेच राज्य इतरांना देणे असो किंवा जिंकलेला भाग स्वतःच्या उपभोगासाठी न वापरणे हे फार अवघड असते.
दुसऱ्यासाठी चंदनासारखं झिजणे सर्वांनाच जमत नाही. ज्याला जमतं तो रामासारखा पुरुषोत्तम होऊ शकतो. म्हणूनच समर्थ मनाचे श्लोक लोकांना शिकवताना म्हणतात,
मना चंदनाचे परी त्वा झिजावे
परी अंतरी सज्जना निववावे…
रामाने उदंड अभ्यास केला. शस्त्र आणि शास्त्रपारंगत असा राम सर्व थोर लोकांपुढे कायम नम्र राहिला. आईबाप, गुरुजन, सज्जन माणसे यांच्यापुढे राम सदैव नतमस्तक राहिला. लोकांच्या अडीअडचणीत मदतीला धावला. समाजातील नावाडी असो किंवा एखाद्या देशाचा राजा असो, रामासाठी सगळी माणसं समान होती. भेदभाव त्याने कधी केला नाही.
 रावणाने एकेकाळी सर्वत्र अहंकारी होऊन अनन्वित अत्याचार केले होते. अन्यायाच्या निवारणासाठी त्याने रावणाचा वध केला पण शत्रूच्या चांगल्या गुणांचाही आदर करणारा राम होता. रामाने बंधुता, पुत्र कर्तव्य, राजाचे कर्तव्य करताना कधीच दिरंगाई केली नाही. लोक कल्याणसाठी राम सदैव तत्पर राहिला म्हणून आज हजारो वर्षे प्रभू रामचंद्र म्हणून पूजनीय आहे. आईने सांगितलेल्या राम कृष्णाच्या गोष्टी ऐकून शिवाजी महाराजांच्यासारखं अनेकांनी स्फूर्ती घेतली. सतत कार्यतत्पर होऊन नवीन विश्व घडवून दाखवले.
म्हणूनच पुन्हा एकदा समर्थांच्या शब्दांचा आधार घेतं असं सांगावेसे वाटते, 
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥
तुमच्या माझ्या सर्वांच्या आयुष्यात सदैव ‘राम’ असू दे हीच प्रार्थना! 
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

Friday, 19 January 2024

आधी कष्ट मग फळ…

मना सज्जना... भाग : 05
आधी कष्ट मग फळ…
- सुधांशु नाईक
शुक्रवार 19/01/24
आपले मन किती उदंड विचार करत असते ना? जणू तिन्ही लोकांत भरारी मारत असते मन. कधी कोणते विचार करेल आणि त्यानंतर कोणती कृती करायला आपल्याला भाग पाडेल हे कधीकधी सांगताही येत नाही. मनात विचार येतो म्हणजे तो मेंदूत विचार तयार होतो, त्याआधी किंवा नंतर विशिष्ट संप्रेरके स्त्रवतात, मेंदूत केमिकल लोचे होतात त्यामुळे शरीरातील अवयवांना आज्ञा मिळते वगैरे सगळं आता विज्ञानाने सिद्ध केले आहे.ते आपल्याला माहितीही असतं पण जेंव्हा एखादं काम करायची वेळ येते तेंव्हा आपण चटकन ते करायला सुरुवात करतोच असं नाही. 
उत्साह, निराशा, राग, मत्सर, लोभ आदि सगळ्या भावना आपल्या कृतिमध्ये अडसर ठरू शकतात हे शास्त्रज्ज्ञानी आणि प्राचीन काळात ऋषीं मुनी, संतांनी सांगितलं आहे. या सगळ्यांत एक महत्वाची एक गोष्ट त्यांनी नोंदवली ती म्हणजे कृती करण्यातील आळस.
आपण कितीदा ठरवतो की हे असं काही करूया, या दिवसापासून करूया.. इतकेच नव्हे तर मनात स्वप्नांचे इमले रचतो. शेखचिल्लीसारखी कित्येक स्वप्नं पहातो. कृतीची वेळ आली की मात्र आपल्याला कुणीतरी हे सगळं करून द्यावे असं वाटते. दरवेळी काही कारणे देऊन आपण कृती टाळतो. इतरांना दोष देतो. आपणच आळस करतो आहोत याकडे मात्र दुर्लक्ष करतो. मानसशास्त्रात त्याला “डिफेन्स मेकॅनिझम” म्हणतात. आपल्या हातून कृती होत नाही म्हणून इतरांना दोष देणे, परिस्थितीला दोष देणे आदि प्रकार त्यात केले जातात.
‘आळसे कार्यभाग नासतो…’ आदि सुविचार माहिती असले तरी अंगातला आळस झटकून टाकणे ही मोठी गोष्ट. ती चटकन घडत नाही. त्यातही आपल्याला कष्ट न करता आयते काहीतरी मिळावे ही अनेकदा आपली मानसिकता असते. कमी कष्टात भरपूर पगार देणारी नोकरी, अभ्यास न करता परीक्षेत पास होण्याची हमी हे सगळं आपल्याला हवं असतं. जेंव्हा आपण आळस झटकून टाकतो तेंव्हा आपल्याला समोर सगळं लख्ख दिसू लागतं.

आपल्याला जे काम करायचे आहे त्याचा नीट अभ्यास करणे, त्यासाठी नियोजन करणे आणि नियोजनानुसार कृती केली तर यश नक्की मिळू शकते. या देशात अनेक थोर राजे, उद्योजक निर्माण झाले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमधूनच वाटचाल केली. आधी अपार कष्ट केले, प्रसंगी कित्येकदा अपयशाचा धीराने सामना केला मग हळूहळू त्यांना त्यांची योग्य वाट सापडली.
 समर्थ तर 400 वर्षांपूर्वी सांगून गेलेत;
आधी कष्ट मग फळ, कष्टची नाही ते निरफळ |
साक्षेपेवीण केवळ, वृथापुष्ट ||

इंग्रजीत देखील work, work, work until you achieve your goal ! असं म्हटलं जातं. कर्तृत्ववान व्यक्तीसाठी नवनवीन डेस्टिनेशन सतत तयारच असतात. या देशातील तुम्ही, आम्ही सगळेच जेंव्हा कष्ट करू, कर्तृत्व दाखवू तेंव्हा त्याची फळे आपोआप फक्त आपल्यालाच नव्हे तर सम्पूर्ण समाजाला, देशाला नक्की मिळतील असं मला वाटते.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿