marathi blog vishwa

Friday, 2 February 2024

उत्तम श्रोते होऊया...

मना सज्जना...भाग : 09
उत्तम श्रोते होऊया..
- सुधांशु नाईक
शुक्रवार 02/02/24
रोजच्या व्यावहारिक आयुष्यात आपण खूप गोष्टी करत राहतो. त्यासाठी समाजात वावरावे लागते. आपली इच्छा असो वा नसो, अनेकांशी चर्चा करावी लागते. काम करावे लागते, काम करवून घ्यावे लागते. प्रत्येक वेळी होणारे संभाषण हे आपल्याला रुचेल, हवे असेल तसेच असेल असे घडत नाही. कित्येकदा असे घडते की समोरची व्यक्ती आपल्याला काय नेमकं सांगायचे आहे ते समजून न घेताच बोलत राहते. आपल्या मनाने ती व्यक्ती विविध अर्थ काढत राहते आणि मग आपलेच मन अस्वस्थ होऊन जाते. कित्येकदा पूर्ण अभ्यास न करताही माणसे बोलत राहतात. त्यामुळे मॅनेजमेंटच्या क्षेत्रात, शिक्षणक्षेत्रात आणि समुपदेशन क्षेत्रात श्रोता होणे फार गरजेचे ठरते.
उत्तम श्रोता होणे हे फार मोठे कौशल्य आहे. A Good listener gains half of the knowledge by careful listening while other half can be gained by deep thinking process असे म्हणतात. आपल्या संस्कृतीतदेखील उत्तम श्रवण, मनन आणि चिंतन या गोष्टीना अतिशय महत्व दिले आहे. डॉक्टर, वकील, समुपदेशक, मानसोपचार तज्ञ आदि सर्वाना समोरच्या माणसाचे सारे काही नीट ऐकून घ्यावे लागते. कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी शांतचित्ताने श्रवण करणे गरजेचे असते.
एकदा का आपण श्रोत्याची भूमिका स्वीकारली की समोरच्या व्यक्तीची भाषा, शब्द संग्रह, देहबोली, त्या विषयातील त्याचा अभ्यास हे सारे आपल्याला अधिक बारकाईने न्याहाळता येते, ऐकता येते. आपल्या मनातील शंका नष्ट होतात. नव्या ज्ञानाकडे मन चटकन वळते.
एखाद्या क्षणी ऐकलेला एक उत्तम विचार आपले आयुष्य बदलायला कारणीभूत ठरतो. कधी तो विचार एखाद्या मित्राने सांगितलेला असतो, कधी शिक्षकानी सांगितलेला असतो तर कधी आई वडीलानी सांगितलेला असतो. अनेकदा लहानपणी ऐकलेली एखादी गोष्ट मनात कायमची ठसून जाते. कधी ती दानशूर शिबी राजाची असते, कधी राम-कृष्णाच्या पराक्रमाची असते, कधी एकमेकाना मदत करणाऱ्या मित्रांची असते. मन लावून आपण जे ऐकतो त्याचा मनावर खोलवर ठसा उमटतो आणि आपल्या आयुष्यावर त्याचा बरा वाईट परिणाम होतो.
अनेक ज्येष्ठ व्यक्तींची चरित्रे, मनोगते, भाषणे जेंव्हा आपण ऐकतो तेंव्हा लहानपणी ऐकलेली एखादी गोष्ट,एखाद्या व्यक्तीचे बोलणे याची आठवण सांगितलेली आहे हे लक्षात येते. उत्तम श्रोता झाल्याने आपलेच भले होते त्याची शेकडो उदाहरणे देता येतील. म्हणूनच समर्थ म्हणतात,
श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय तुटे
श्रवण होता पालटे, पूर्वगुण आपुला .. ||7-8-5
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जे काही गुण अंगी बाणवावे लागतात त्यात “उत्तम श्रोता होणे” हा गुण नक्कीच समाविष्ट करायला हवा असे मला वाटते.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

No comments:

Post a Comment