marathi blog vishwa

Saturday 20 January 2024

प्रभाते मनी राम चिंतीत जावा...

मना सज्जना... भाग : 06
प्रभाते मनी राम चिंतीत जावा...
सुधांशु नाईक
शनिवार 20/01/24
अवघ्या दोन दिवसांवर देशात एक मोठी गोष्ट घडणार आहे. पुन्हा एकदा प्रभू रामचंद्राचे निर्माण झालेले मंदिर अयोध्येत सर्वांसाठी खुलं होत आहे. गेली पाच सहाशे वर्षे अनेकदा अयोध्येने परकीय आक्रमणे अनुभवली. प्रचंड विध्वन्स आणि रक्तरंजित इतिहास अनुभवला. आपलं स्वातंत्र्य, आपला धर्म जपायला हजारो लोकांनी प्राणार्पण केले होते. त्यातील अनेकांची नांवेही आपल्याला ठाऊक नाहीत. हे सगळं लोकांनी का केलं तर राम आपल्या मनात युगानुयुगे वसला आहे म्हणून.
इथला माणूस सकाळी उठला की एकमेकांना भेटताना राम राम म्हणायचा. इथला माणूस मरताना देखील राम राम म्हणायचा. इतकंच नव्हे तर कधी आपल्या आयुष्याचा, रोजच्या रुटीनचा कंटाळा आला तरी “सध्या जगण्यात राम उरला नाही..” असं म्हणायचा. राज्य कसं हवं तर रामाने केलं तसं सुखदायी हवं असं लोक कायम म्हणत आले. आणि हे काही 50,100 वर्षं घडलं नाहीये तर किमान 4 हजार वर्षं इथल्या लोकांनी राम असा मनाशी धरून ठेवला आहे. हे खूप विचार करण्यासारखे आहे.
राम का इतका पूजनीय आहे? आपण अगदी जवळचं माणूस असल्यासारखं रामाला एकेरी संबोधन का करतो? कारण रामाने सतत दुसऱ्याचा विचार केला. सर्व सामान्यांना सुख मिळावे याचा विचार केला. प्रसंगी आपले सुख बाजूला ठेवून त्याने इतरांचे मन राखायला मोठे त्याग केले. ऋषीं मुनींच्या पूजेत, यज्ञ यागात विघ्ने आणणाऱ्या अनेक राक्षसांचे पारिपत्य रामाने केले. पुन्हा राम कोणत्या मोहात अडकला नाही. स्वतःचेच राज्य इतरांना देणे असो किंवा जिंकलेला भाग स्वतःच्या उपभोगासाठी न वापरणे हे फार अवघड असते.
दुसऱ्यासाठी चंदनासारखं झिजणे सर्वांनाच जमत नाही. ज्याला जमतं तो रामासारखा पुरुषोत्तम होऊ शकतो. म्हणूनच समर्थ मनाचे श्लोक लोकांना शिकवताना म्हणतात,
मना चंदनाचे परी त्वा झिजावे
परी अंतरी सज्जना निववावे…
रामाने उदंड अभ्यास केला. शस्त्र आणि शास्त्रपारंगत असा राम सर्व थोर लोकांपुढे कायम नम्र राहिला. आईबाप, गुरुजन, सज्जन माणसे यांच्यापुढे राम सदैव नतमस्तक राहिला. लोकांच्या अडीअडचणीत मदतीला धावला. समाजातील नावाडी असो किंवा एखाद्या देशाचा राजा असो, रामासाठी सगळी माणसं समान होती. भेदभाव त्याने कधी केला नाही.
 रावणाने एकेकाळी सर्वत्र अहंकारी होऊन अनन्वित अत्याचार केले होते. अन्यायाच्या निवारणासाठी त्याने रावणाचा वध केला पण शत्रूच्या चांगल्या गुणांचाही आदर करणारा राम होता. रामाने बंधुता, पुत्र कर्तव्य, राजाचे कर्तव्य करताना कधीच दिरंगाई केली नाही. लोक कल्याणसाठी राम सदैव तत्पर राहिला म्हणून आज हजारो वर्षे प्रभू रामचंद्र म्हणून पूजनीय आहे. आईने सांगितलेल्या राम कृष्णाच्या गोष्टी ऐकून शिवाजी महाराजांच्यासारखं अनेकांनी स्फूर्ती घेतली. सतत कार्यतत्पर होऊन नवीन विश्व घडवून दाखवले.
म्हणूनच पुन्हा एकदा समर्थांच्या शब्दांचा आधार घेतं असं सांगावेसे वाटते, 
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥
तुमच्या माझ्या सर्वांच्या आयुष्यात सदैव ‘राम’ असू दे हीच प्रार्थना! 
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

No comments:

Post a Comment