इतिहास, साहित्य, संगीत, प्रवास, मानसिक स्वास्थ्य आणि माणसं यांच्याविषयी काही मनापासून सांगणारा हा माझा ब्लॉग...!! त्यासोबतच काही प्रासंगिक लेखनही. जरुर वाचत रहा. प्रतिक्रियाही कळवत रहा.
Saturday, 19 August 2023
क्षेमालागी जीव उतावीळ माझा...
Friday, 18 August 2023
पैल तो गे काऊ कोकताहे...
#सुधा_म्हणे: पैल तो गे काऊ कोकताहे..
18 ऑगस्ट 23
आजही अनेक ठिकाणी सकाळी दारातील झाडावर कावळा ओरडणे हे पाहुणा येण्यासाठी सुचिन्ह मानले जाते. त्याकाळी तर संदेशवाहनासाठी मर्यादित साधने उपलब्ध असताना घरात मनावर दगड ठेऊन आपापली जबाबदारी निभावून नेणाऱ्या स्त्रिया आपल्या प्रिय व्यक्तीची वाट पाहत. दूरदेशी गेलेला प्रियकर, पती, पुत्र, भाऊ, वडील यांच्या वाटेकडे त्या स्त्रीचे डोळे लागलेले असायचे. सर्वजण अशा संकेतांशी त्यामुळे चटकन जोडले जात.
मनाच्या तरल, हळुवार अवस्थेत असताना, त्या विरहार्त मनांना अशा संकेतांमुळे किती समाधान होत असेल त्याची कल्पना देखील किती सुखावह आहे. त्या कृष्णासाठी, त्या विठ्ठलासाठी इथे ती देखील डोळ्यात प्राण आणून वाट पाहते आहे. किती काय मनाशी योजले आहे तिने. तो आला की असे करू, तसे करू, त्याला काहीतरी छान खायला करू, त्याचा शीण दूर होईल असे काही करू.. किती स्वप्न असतात एखाद्या विरहिणीच्या मनात. मग ती प्रेयसी असो, पत्नी असो. ज्यावेळी त्याच्या येण्याची वार्ता घेऊन असा एखादा शुभशकुन होतो तेंव्हा ते विरहार्त मन अतिशय आनंदून जाते.
ज्ञानेश्वरांची भाषा इथे फार लडिवाळ, हळुवार होऊन जाते. ती इतकी मुलायम होते की रुक्ष असा “कावळा” हा शब्द सुद्धा तिथे काऊ बनून येतो. ज्या कावळ्याकडे आपण कधी फारसे पाहतदेखील नाही (एका प्रसंगाचा अपवाद वगळता) त्या काऊचे लाड करायला मग तिच्या मनात माया दाटून येते. त्या मनोहारी गोपाळाला भेटायला अधीर झालेली ती म्हणते,
पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकूनगे माये सांगताहे ॥ १ ॥
उडरे उडरे काऊ, तुझे सोन्याने
मढविन पाहु ।
पाहुणे पंढरीराऊ घरा कैं येती ॥ २ ॥
दहिभाताची उंडी लाविन तुझे तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥ ३ ॥
दुधे भरुनी वाटी लावीन तुझे वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥ ४ ॥
आंबयां डाहाळी फळे चुंबी रसाळी ।
आजिचेरे काळीं शकुन सांगे ॥ ५ ॥
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे ।
भेटती पंढरीराणे शकुन सांगे ॥ ६ ॥
ज्या कावळ्याला
सुरेख रूप नाही, सुरेख आवाज नाही तरीही तो कावळा तिच्यासाठी जगातील सुंदर गोष्ट बनून
जातो कारण तिच्या पंढरीच्या येण्याची शुभवार्ता घेऊन तो आला आहे.
तुझी पाऊले
सोन्याने मढवीन, दहीभाताचे सुरेख घास तुला भरवेन पण माझा पंढरी मला भेटू दे आज तो
येऊ दे. इतकाच शकुन तू फक्त सांगत रहा. त्या
काऊला सांगताना आनंदून गेलेल्या त्या विरहिणीचे ज्ञानेश्वरांनी रेखाटेलेले चित्र
फार मनोरम आहे.
हे गीत असो
किंवा “ज्ञानेश्वर माऊली” या अल्बम मधील विविध रचना असोत, त्या तयार करताना
हृदयनाथ मंगेशकर यांनी लतादिदीच्या दैवी स्वरासोबत बासरी, पखवाज आदि वाद्यांचा
इतका सुरेख वापर केला आहे की त्यामुळे या मूळ रचनेतील कोमलता, तो गोडवा काळजाला
इतका अधिकाधिक भिडत जातो की त्याचे वर्णन करताना मग आपल्यालाच शब्द अपुरे पडून जातात.
- सुधांशु नाईक( nsudha19@gmail.com )
Thursday, 17 August 2023
अवचिता परिमळु....झुळकला अळुमाळु ..
#सुधा_म्हणे: अवचिता परिमळु...
17 ऑगस्ट 23
संत ज्ञानेश्वरांच्या विराण्या ही अतिशय मधुर अशी गोष्ट.
नाथपंथी संप्रदायाचा अनुग्रह लाभलेल्या ज्ञानोबांची मानसिकताच मुळी हळवी. उपमा –
उत्प्रेक्षा – आलंकारिक भाषेतून ते एखादा विषय असा उलगडत जातात की जाणवलेली गोष्ट इतरांना
समजाऊन सांगणे हे केवळ एक रुक्ष शिक्षण बनत नाही तर तो जाणिवानुभव बनतो. ती
अनुभूती “ये हृदयी ते ते हृदयी..” अशी पोचते. दीर्घकाळ मनात रेंगाळत राहते.
एखाद्या स्वर्गीय सुगंधासारखी. या सुगंधाला देखील त्यांच्या लेखनात एक अलवार स्थान
लाभले आहे. कृष्ण भेटीसाठी आतुर आतुर अशी ती राधा. वाऱ्याची झुळूक आणि कुठूनतरी अवचित
आलेला तो सुगंध.. क्षणार्धात ती त्या गोपाळाच्या चाहुलीने मोहरून येते. हा त्याचाच
गंध आहे हे तिला ठाऊक आहे.
त्याच्या दर्शनासाठी
अतिशय अधीर अधीर असूनही, आपण असं वेड्यासारखे धावलो तर इतरांना कसे वाटेल याचा विचार
करत, स्वतःला कसेबसे आवरत--सावरत ती बाहेर येते आणि तो दूरवर दिसताच जागीच
खिळल्यासारखी उभी राहते.. भान हरपून. तो पीतांबरधारी तिला क्षणभर दिसतो आणि एकदम
पुन्हा गायब होतो. त्याचा सुगंध तर येतोय पण तो पुन्हा का दिसत नाहीये,
ज्याच्यामुळे मला अतीव सुख मिळते तो माझा वनमाळी कुठे गेला या विचाराने तिच्या
मनात एकदम काहूर उठते. अस्वस्थ होऊन “ त्याची माझी भेट घडवून द्या” म्हणून
काकुळतीने ती सख्याना विनवू लागते.
अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु । मी म्हणे गोपाळु आलागे माये ।
चांचरती चांचरती बाहेरी निघालें । ठकचि मी ठेलें काय करु ॥ १ ॥
मज करा का उपचारु अधिक ताप भारु । सखिये सारंगधरु भेटवा का ॥
तों सावळा सुंदरु कासे पीतांबरु । लावण्य मनोहरु देखियेला ।
भरलिया दृष्टी जंव डोळा न्याहाळी । तव कोठे वनमाळी गेलागे माये
॥ २ ॥
बोधोनि ठेले मन तंव जालें अने आन । सोकोनि घेतले प्राण माझेगे
माये ।
बापरखुमादेविवरु विठ्ठल सुखाचा । तेणें कायामनेंवाचा वेधियेलें
॥ ३ ॥
ऊकाराचा इतका परिणामकारक वापर अन्य कोणत्या कवीने, संतांनी कधीच केला नसावा. परिमाळू, अळुमाळू, रुणुझुणू, घुणघुणा असे शब्द वापरत ज्ञानोबा तीव्र विरहाची भावना इतकी लोभस करतात की प्रत्येक शब्द जणू मोगऱ्याच्या फुलासारखा कोमल होऊन जातो. त्या प्रत्येक शब्दाचा टोकदारपणा नाहीसा होऊन जातो. तो शब्द मधाळ बनून जातो. ती जाणीव, तो विरह, भेटण्याची ती असोशी हे सगळं सगळं मधुर मधुर होऊन जाते. त्या सावळ्या प्रियतमाची तिला लागलेली ओढ आपल्याला देखील आर्त करते.
तो माझा सावळा सुंदर आता अधिक वेळ न घालवता सामोरा यावा. त्याच्या मनोहारी रूपाला मला डोळे भरून मनमुक्त पाहू दे. त्याच्या संगतीत इतक्या सुखाची अनुभूती येते की मी माझी उरतच नाही. त्याने जणू माझे प्राण हरण केले आहेत. हे माझे आयुष्य आता माझे उरलेय कुठे ? अभिषेकी बुवा मधुर मुलायम गाताना जसे म्हणतात “ शब्दावाचून कळले सारे.. शब्दांच्या पलिकडले..” तशीच तर ही अवस्था. काया-वाचा-मनाने एकत्र आल्यावर आपण आपले राहतच नाही. त्याचे होऊन जातो.
तिच्या
तनामनात सामावून गेलेल्या, तिच्याशी एकरूप झालेल्या त्या प्रिय विठ्ठलासोबत असणारे
तिचे हे नाते प्रीती- भक्ती सगळ्यापार पोचलेले असते. जिथे तनमन आणि आत्म्याचे मीलन
होते तिथे मग द्वैत उरतेच कुठे? हे शरीर - हे मन - हे जीवन त्याला अर्पण करण्यापलीकडे हाती काहीच उरत नाही.
- - सुधांशु नाईक,(nsudha19@gmail.com)
Wednesday, 16 August 2023
घनु वाजे घुणघुणा...
#सुधा_म्हणे: घनु वाजे घुणघुणा..
16 ऑगस्ट 23
ईश्वर भक्तीत
रमलेल्या संत सज्जनांची त्या दर्शनासाठीची व्याकुळता आणि आपल्या प्रियकराला
भेटण्यासाठीची एखाद्या विरहिणीची ओढ ही एकसारखीच. तिथं असते फक्त समर्पणाची उत्कट
असोशी. आणि मग त्यांना त्या प्रेयसाच्या दर्शनाव्यतिरिक्त काही काही सुचेनासे
होते. सुरेख अशा निसर्गरम्य ठिकाणी खरेतर मानवी मन हे आत्यंतिक आनंदाची अनुभूति
घेत असते. मात्र जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण सतावते, विरह असह्य होतो
तेंव्हा आसपासचा सुंदर निसर्ग, प्रसन्न वातावरण हे सुद्धा नकोनकोसे भासू लागते. जगातील
कोणतीही उत्तम गोष्ट प्रिय व्यक्तीच्या सहवासाच्या ओढीपुढे क्षुल्लक भासू लागते. किंबहुना
त्या सर्व सुंदर गोष्टीमुळे प्रियकरासाठी ती अधिक आसुसून जाते. मिलनोत्सुक राधेची ती
आर्त विरहवेदना लतादीदीच्या आवाजात मग काळजाला भिडत जाते..
ज्ञानेश्वरांची
ही विराणी जणू असंच सांगणारी.. कृष्णदर्शनासाठी, त्याच्या मिलनासाठी आर्त झालेल्या
राधेत परकाया प्रवेश करून ज्ञानोबा लिहीत आहेत अशी नाजुकता त्यांच्या शब्दा-शब्दातून
उमलली आहे..
घनु वाजे
घुणघुणा । वारा वाजे रुणझुणा । भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा कां ॥१॥
चांदवो
चांदणें । चापेवो चंदनु । देवकी नंदनु । विण नावडे वो ॥२॥
चंदनाची चोळी
। माझें सर्व अंग पोळी । कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा कां ॥३॥
आकाशात ढग आहे पण तो पावसाचा नसून, शांत घुणघुण करणारा आहे. वारा वेगवान नाहीये तर रुणझुणता प्रसन्न आहे. सुरेख शीतल चांदणे आहे आणि चंदनाचा थंडावा देणारी वस्त्रे आहेत तरी तिची विरहव्यथा या सगळ्यापार आहे. हे सगळे उपचार तिला अधिकच त्रास देतायत. इतके सगळे उपाय सख्यानी केले तरी तिच्या शरीरातील विरहाग्नी शांत होत नाहीये.
त्याने याक्षणी आता फक्त जवळ यावे यापरते काही नको असे तिला वाटते आहे. “वेगी भेटवा..” या दोन शब्दातून भेटीची ती तीव्र ओढ जणू जिवंत झाली आहे.
सुमनाची सेज । सीतळ वो निकी । पोळे आगिसारिखी । वेगीं विझवा कां ॥४॥
तुम्हीं
गातसां सुस्वरें । ऐकोनि द्यावीं उत्तरें । कोकिळें वर्जावें तुम्हीं बाइयांनो ॥५॥
दोन शरीराचे
मीलन होताना पुष्पशय्या असावी असा सर्वसामान्य संकेत. त्या नाजुक, शांत शय्येवर
चित्तवृत्ती अधिक बहरून याव्यात अशी त्यामागील धारणा. इथे मात्र त्या पुष्पशय्येवर
ती एकटीच. त्याच्या विरहामुळे तर ती शय्या तिला अग्निसमान भासू लागली. कोकीळ
पक्ष्याच्या सुरेल आवाज, सुरेख गाणाऱ्या तिच्या सख्या हे सारे सारे तिला आज रिझवू
शकत नाही. तिच्या तनामनाला आता केवळ त्याच्या सहवासानेच तृप्तता येऊ शकते अशी ही
विरहिणी. आणि मग एक क्षण असा येतो, ती “तो” होऊन जाते. ते एकरूप होऊन जातात. आरशात
पाहू जावे तर स्वतःऐवजी तिला तिथे केवळ तोच दिसू लागतो.
दर्पणीं
पाहातां । रुप न दिसे वो आपुलें ।
बापरखुमादेविवर
विठ्ठलें । मज ऐसें केलें ॥६॥
इतकावेळ
विरहात बुडालेला तिचा आर्त स्वर “मज ऐसे केले..” म्हणताना शांत शांत होऊन जातो.
लतादीदीच्या सुरानी ज्ञानोबांच्या कल्पनेतील ती विरहिणी जणू सगुण साकार करून दाखवली.
“ज्ञानेश्वर माऊली”
या संपूर्ण अल्बमसाठी हरिजीसारख्या दिग्गज कलाकारांना सोबत घेऊन केलेला वाद्यवृंदाचा सुयोग्य संयमित वापर बाळासाहेब म्हणजे
हृदयनाथांची विचारमग्नता, सांगीतिक प्रगल्भता दाखवत राहतो. आप्पा उर्फ गो नी दांडेकर
यांचे मंगेशकर कुटुंबाशी जवळचे स्नेहबंध. या सर्व विराण्या, हरिपाठ असं बरच काही आप्पा
पहाटे उठून सुरेलपणे म्हणत बसायचे. ते ऐकून बाळासाहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली.
त्यातूनच मग या सर्व विराण्या आणि गीतेचे दोन अध्याय दीदीच्या आवाजात रेकॉर्ड करायचे
ठरले. आप्पांच्या समोर बसून दीदीनी सगळी संथा आठ दिवस घेतली आणि मग गीतेचे ते दोन अध्याय
रेकॉर्ड केले गेले. या विराण्या तर आता कायमच अजरामर झाल्या आहेत. त्यातील ते नाजुक
शब्द , मुग्ध भाव, ती आर्तता, ती उत्कटता शब्दातीत..!
त्या कृष्णाने, त्या विठ्ठलाने “मज ऐसे केले..”, मला त्याच्यासारखे करून टाकले. मी त्याची झाले. आता दोन जीवांचे द्वैत उरलेच नाही असे सांगताना तिला झालेला त्या भेटीचा आनंद लतादीदीच्या सुरातून मधासारखा ठिबकत राहतो. त्या शब्द सुरांचा गंध आपल्याला अंतर्बाह्य वेढून टाकतो. फुलून आलेल्या चाफ्यासारखा सुगंधित करत रहातो..!
- सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com)



