marathi blog vishwa

Wednesday, 16 August 2023

घनु वाजे घुणघुणा...

 #सुधा_म्हणेघनु वाजे घुणघुणा..

16   ऑगस्ट 23

ईश्वर भक्तीत रमलेल्या संत सज्जनांची त्या दर्शनासाठीची व्याकुळता आणि आपल्या प्रियकराला भेटण्यासाठीची एखाद्या विरहिणीची ओढ ही एकसारखीच. तिथं असते फक्त समर्पणाची उत्कट असोशी. आणि मग त्यांना त्या प्रेयसाच्या दर्शनाव्यतिरिक्त काही काही सुचेनासे होते. सुरेख अशा निसर्गरम्य ठिकाणी खरेतर मानवी मन हे आत्यंतिक आनंदाची अनुभूति घेत असते. मात्र जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण सतावते, विरह असह्य होतो तेंव्हा आसपासचा सुंदर निसर्ग, प्रसन्न वातावरण हे सुद्धा नकोनकोसे भासू लागते. जगातील कोणतीही उत्तम गोष्ट प्रिय व्यक्तीच्या सहवासाच्या ओढीपुढे क्षुल्लक भासू लागते. किंबहुना त्या सर्व सुंदर गोष्टीमुळे प्रियकरासाठी ती अधिक आसुसून जाते. मिलनोत्सुक राधेची ती आर्त विरहवेदना लतादीदीच्या आवाजात मग काळजाला भिडत जाते..

ज्ञानेश्वरांची ही विराणी जणू असंच सांगणारी.. कृष्णदर्शनासाठी, त्याच्या मिलनासाठी आर्त झालेल्या राधेत परकाया प्रवेश करून ज्ञानोबा लिहीत आहेत अशी नाजुकता त्यांच्या शब्दा-शब्दातून उमलली आहे..

घनु वाजे घुणघुणा । वारा वाजे रुणझुणा । भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा कां ॥१॥

चांदवो चांदणें । चापेवो चंदनु । देवकी नंदनु । विण नावडे वो ॥२॥

चंदनाची चोळी । माझें सर्व अंग पोळी । कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा कां ॥३॥

आकाशात ढग आहे पण तो पावसाचा नसून, शांत घुणघुण करणारा आहे. वारा वेगवान नाहीये तर  रुणझुणता प्रसन्न आहे. सुरेख शीतल चांदणे आहे आणि चंदनाचा थंडावा देणारी वस्त्रे आहेत तरी तिची विरहव्यथा या सगळ्यापार आहे. हे सगळे उपचार तिला अधिकच त्रास देतायत. इतके सगळे उपाय सख्यानी केले तरी तिच्या शरीरातील विरहाग्नी शांत होत नाहीये. 

त्याने याक्षणी आता फक्त जवळ यावे यापरते काही नको असे तिला वाटते आहे. “वेगी भेटवा..” या दोन शब्दातून भेटीची ती तीव्र ओढ जणू जिवंत झाली आहे.  

सुमनाची सेज । सीतळ वो निकी । पोळे आगिसारिखी । वेगीं विझवा कां ॥४॥

तुम्हीं गातसां सुस्वरें । ऐकोनि द्यावीं उत्तरें । कोकिळें वर्जावें तुम्हीं बाइयांनो ॥५॥

दोन शरीराचे मीलन होताना पुष्पशय्या असावी असा सर्वसामान्य संकेत. त्या नाजुक, शांत शय्येवर चित्तवृत्ती अधिक बहरून याव्यात अशी त्यामागील धारणा. इथे मात्र त्या पुष्पशय्येवर ती एकटीच. त्याच्या विरहामुळे तर ती शय्या तिला अग्निसमान भासू लागली. कोकीळ पक्ष्याच्या सुरेल आवाज, सुरेख गाणाऱ्या तिच्या सख्या हे सारे सारे तिला आज रिझवू शकत नाही. तिच्या तनामनाला आता केवळ त्याच्या सहवासानेच तृप्तता येऊ शकते अशी ही विरहिणी. आणि मग एक क्षण असा येतो, ती “तो” होऊन जाते. ते एकरूप होऊन जातात. आरशात पाहू जावे तर स्वतःऐवजी तिला तिथे केवळ तोच दिसू लागतो.

दर्पणीं पाहातां । रुप न दिसे वो आपुलें ।

बापरखुमादेविवर विठ्ठलें । मज ऐसें केलें ॥६॥

इतकावेळ विरहात बुडालेला तिचा आर्त स्वर “मज ऐसे केले..” म्हणताना शांत शांत होऊन जातो. लतादीदीच्या सुरानी ज्ञानोबांच्या कल्पनेतील ती विरहिणी जणू सगुण साकार करून दाखवली.

“ज्ञानेश्वर माऊली” या संपूर्ण अल्बमसाठी हरिजीसारख्या दिग्गज कलाकारांना सोबत घेऊन केलेला  वाद्यवृंदाचा सुयोग्य संयमित वापर बाळासाहेब म्हणजे हृदयनाथांची विचारमग्नता, सांगीतिक प्रगल्भता दाखवत राहतो. आप्पा उर्फ गो नी दांडेकर यांचे मंगेशकर कुटुंबाशी जवळचे स्नेहबंध. या सर्व विराण्या, हरिपाठ असं बरच काही आप्पा पहाटे उठून सुरेलपणे म्हणत बसायचे. ते ऐकून बाळासाहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यातूनच मग या सर्व विराण्या आणि गीतेचे दोन अध्याय दीदीच्या आवाजात रेकॉर्ड करायचे ठरले. आप्पांच्या समोर बसून दीदीनी सगळी संथा आठ दिवस घेतली आणि मग गीतेचे ते दोन अध्याय रेकॉर्ड केले गेले. या विराण्या तर आता कायमच अजरामर झाल्या आहेत. त्यातील ते नाजुक शब्द , मुग्ध भाव, ती आर्तता, ती उत्कटता शब्दातीत..!

त्या कृष्णाने, त्या विठ्ठलाने “मज ऐसे केले..”, मला त्याच्यासारखे करून टाकले. मी त्याची झाले. आता दोन जीवांचे द्वैत उरलेच नाही असे सांगताना तिला झालेला त्या भेटीचा आनंद लतादीदीच्या सुरातून मधासारखा ठिबकत राहतो. त्या शब्द सुरांचा गंध आपल्याला अंतर्बाह्य वेढून टाकतो. फुलून आलेल्या चाफ्यासारखा सुगंधित करत रहातो..!

  - सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com)



No comments:

Post a Comment