marathi blog vishwa

Friday, 18 August 2023

पैल तो गे काऊ कोकताहे...

 #सुधा_म्हणे: पैल तो गे काऊ कोकताहे..

18  ऑगस्ट 23

 ईश्वर भक्तीत बुडून जाणे असो वा प्रेमात बुडून जाणे असो, जिथे तुम्ही स्वतःला पूर्ण समर्पित करता त्यावेळची मनस्थिती ही काही वेगळीच. त्याच्यासाठी असुसलेले तिचे मन आणि त्यातली ती हवीहवीशी आतुरता शब्दात मांडणे किती कठीण. तिने किती वाट पाहिलीये त्याची. त्याच्या एका दर्शनासाठी, एका भेटीसाठी किती दिवस थांबावे लागले आहे. रोज सकाळ व्हावी आणि जाणवावे की तो येण्याची आजही कोणती वार्ता नाही. दिवसभर त्याची वाट पाहताना मग रोजची रात्र पुनः उदास भासावी. त्याच्याविना एकेक क्षण रहाणे तिला आता अशक्य झाले असताना असं सकाळी उठताक्षणी दारी कावळा ओरडत असावा .. केवढा हा शुभशकुन..!

आजही अनेक ठिकाणी सकाळी दारातील झाडावर कावळा ओरडणे हे पाहुणा येण्यासाठी सुचिन्ह मानले जाते. त्याकाळी तर संदेशवाहनासाठी मर्यादित साधने उपलब्ध असताना घरात मनावर दगड ठेऊन आपापली जबाबदारी निभावून नेणाऱ्या स्त्रिया आपल्या प्रिय व्यक्तीची वाट पाहत. दूरदेशी गेलेला प्रियकर, पती, पुत्र, भाऊ, वडील यांच्या वाटेकडे त्या स्त्रीचे डोळे लागलेले असायचे. सर्वजण अशा संकेतांशी त्यामुळे चटकन जोडले जात.

मनाच्या तरल, हळुवार अवस्थेत असताना, त्या विरहार्त मनांना अशा संकेतांमुळे किती समाधान होत असेल त्याची कल्पना देखील किती सुखावह आहे. त्या कृष्णासाठी, त्या विठ्ठलासाठी इथे ती देखील डोळ्यात प्राण आणून वाट पाहते आहे. किती काय मनाशी योजले आहे तिने. तो आला की असे करू, तसे करू, त्याला काहीतरी छान खायला करू, त्याचा शीण दूर होईल असे काही करू.. किती स्वप्न असतात एखाद्या विरहिणीच्या मनात. मग ती प्रेयसी असो, पत्नी असो. ज्यावेळी त्याच्या येण्याची वार्ता घेऊन असा एखादा शुभशकुन होतो तेंव्हा  ते विरहार्त मन अतिशय आनंदून जाते.

ज्ञानेश्वरांची भाषा इथे फार लडिवाळ, हळुवार होऊन जाते. ती इतकी मुलायम होते की रुक्ष असा “कावळा” हा शब्द सुद्धा तिथे काऊ बनून येतो. ज्या कावळ्याकडे आपण कधी फारसे पाहतदेखील नाही (एका प्रसंगाचा अपवाद वगळता) त्या काऊचे लाड करायला मग तिच्या मनात माया दाटून येते. त्या मनोहारी गोपाळाला भेटायला अधीर झालेली ती म्हणते, 

पैल तो गे काऊ कोकताहे ।

शकूनगे माये सांगताहे ॥ १ ॥

उडरे उडरे काऊ, तुझे सोन्याने मढविन पाहु ।
पाहुणे पंढरीराऊ घरा कैं येती ॥ २ ॥
दहिभाताची उंडी लाविन तुझे तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥ ३ ॥
दुधे भरुनी वाटी लावीन तुझे वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥ ४ ॥

आंबयां डाहाळी फळे चुंबी रसाळी ।
आजिचेरे काळीं शकुन सांगे ॥ ५ ॥
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे ।
भेटती पंढरीराणे शकुन सांगे ॥ ६ ॥

ज्या कावळ्याला सुरेख रूप नाही, सुरेख आवाज नाही तरीही तो कावळा तिच्यासाठी जगातील सुंदर गोष्ट बनून जातो कारण तिच्या पंढरीच्या येण्याची शुभवार्ता घेऊन तो आला आहे.

तुझी पाऊले सोन्याने मढवीन, दहीभाताचे सुरेख घास तुला भरवेन पण माझा पंढरी मला भेटू दे आज तो येऊ दे.  इतकाच शकुन तू फक्त सांगत रहा. त्या काऊला सांगताना आनंदून गेलेल्या त्या विरहिणीचे ज्ञानेश्वरांनी रेखाटेलेले चित्र फार मनोरम आहे.

हे गीत असो किंवा “ज्ञानेश्वर माऊली” या अल्बम मधील विविध रचना असोत, त्या तयार करताना हृदयनाथ मंगेशकर यांनी लतादिदीच्या दैवी स्वरासोबत बासरी, पखवाज आदि वाद्यांचा इतका सुरेख वापर केला आहे की त्यामुळे या मूळ रचनेतील कोमलता, तो गोडवा काळजाला इतका अधिकाधिक भिडत जातो की त्याचे वर्णन करताना मग आपल्यालाच शब्द अपुरे पडून जातात.

सुधांशु नाईक( nsudha19@gmail.com )



No comments:

Post a Comment