marathi blog vishwa

Thursday, 17 August 2023

अवचिता परिमळु....झुळकला अळुमाळु ..

 #सुधा_म्हणेअवचिता परिमळु... 

17 ऑगस्ट 23

संत ज्ञानेश्वरांच्या विराण्या ही अतिशय मधुर अशी गोष्ट. नाथपंथी संप्रदायाचा अनुग्रह लाभलेल्या ज्ञानोबांची मानसिकताच मुळी हळवी. उपमा – उत्प्रेक्षा – आलंकारिक भाषेतून ते एखादा विषय असा उलगडत जातात की जाणवलेली गोष्ट इतरांना समजाऊन सांगणे हे केवळ एक रुक्ष शिक्षण बनत नाही तर तो जाणिवानुभव बनतो. ती अनुभूती “ये हृदयी ते ते हृदयी..” अशी पोचते. दीर्घकाळ मनात रेंगाळत राहते. एखाद्या स्वर्गीय सुगंधासारखी. या सुगंधाला देखील त्यांच्या लेखनात एक अलवार स्थान लाभले आहे. कृष्ण भेटीसाठी आतुर आतुर अशी ती राधा. वाऱ्याची झुळूक आणि कुठूनतरी अवचित आलेला तो सुगंध.. क्षणार्धात ती त्या गोपाळाच्या चाहुलीने मोहरून येते. हा त्याचाच गंध आहे हे तिला ठाऊक आहे.

त्याच्या दर्शनासाठी अतिशय अधीर अधीर असूनही, आपण असं वेड्यासारखे धावलो तर इतरांना कसे वाटेल याचा विचार करत, स्वतःला कसेबसे आवरत--सावरत ती बाहेर येते आणि तो दूरवर दिसताच जागीच खिळल्यासारखी उभी राहते.. भान हरपून. तो पीतांबरधारी तिला क्षणभर दिसतो आणि एकदम पुन्हा गायब होतो. त्याचा सुगंध तर येतोय पण तो पुन्हा का दिसत नाहीये, ज्याच्यामुळे मला अतीव सुख मिळते तो माझा वनमाळी कुठे गेला या विचाराने तिच्या मनात एकदम काहूर उठते. अस्वस्थ होऊन “ त्याची माझी भेट घडवून द्या” म्हणून काकुळतीने ती सख्याना विनवू लागते.

 

अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु । मी म्हणे गोपाळु आलागे माये ।

चांचरती चांचरती बाहेरी निघालें । ठकचि मी ठेलें काय करु ॥ १ ॥

मज करा का उपचारु अधिक ताप भारु । सखिये सारंगधरु भेटवा का ॥
तों सावळा सुंदरु कासे पीतांबरु । लावण्य मनोहरु देखियेला ।
भरलिया दृष्टी जंव डोळा न्याहाळी । तव कोठे वनमाळी गेलागे माये ॥ २ ॥
बोधोनि ठेले मन तंव जालें अने आन । सोकोनि घेतले प्राण माझेगे माये ।
बापरखुमादेविवरु विठ्ठल सुखाचा । तेणें कायामनेंवाचा वेधियेलें ॥ ३ ॥

ऊकाराचा इतका परिणामकारक वापर अन्य कोणत्या कवीने, संतांनी कधीच केला नसावा. परिमाळू, अळुमाळू, रुणुझुणू, घुणघुणा असे शब्द वापरत ज्ञानोबा तीव्र विरहाची भावना इतकी लोभस करतात की प्रत्येक शब्द जणू मोगऱ्याच्या फुलासारखा कोमल होऊन जातो. त्या प्रत्येक शब्दाचा टोकदारपणा नाहीसा होऊन जातो. तो शब्द मधाळ बनून जातो. ती जाणीव, तो विरह, भेटण्याची ती असोशी हे सगळं सगळं मधुर मधुर होऊन जाते. त्या सावळ्या प्रियतमाची तिला लागलेली ओढ आपल्याला देखील आर्त करते.

तो माझा सावळा सुंदर आता अधिक वेळ न घालवता सामोरा यावा. त्याच्या मनोहारी रूपाला मला डोळे भरून मनमुक्त पाहू दे. त्याच्या संगतीत इतक्या सुखाची अनुभूती येते की मी माझी उरतच नाही. त्याने जणू माझे प्राण हरण केले आहेत. हे माझे आयुष्य आता माझे उरलेय कुठे ? अभिषेकी बुवा मधुर मुलायम गाताना जसे म्हणतात “ शब्दावाचून कळले सारे.. शब्दांच्या पलिकडले..” तशीच तर ही अवस्था. काया-वाचा-मनाने एकत्र आल्यावर आपण आपले राहतच नाही. त्याचे होऊन जातो.

तिच्या तनामनात सामावून गेलेल्या, तिच्याशी एकरूप झालेल्या त्या प्रिय विठ्ठलासोबत असणारे तिचे हे नाते प्रीती- भक्ती सगळ्यापार पोचलेले असते. जिथे तनमन आणि आत्म्याचे मीलन होते तिथे मग द्वैत उरतेच कुठे? हे शरीर - हे मन - हे जीवन त्याला अर्पण करण्यापलीकडे हाती काहीच उरत नाही.

-    - सुधांशु नाईक,(nsudha19@gmail.com)




4 comments:

  1. माउली!🙏🏻

    ReplyDelete
  2. माऊलींची विराणी. अप्रतिम शब्दांकन 🙏💐💐

    ReplyDelete
  3. 👌👌👏🙏🙏 श्री ज्ञानराज माऊली महाराज की जय

    ReplyDelete