marathi blog vishwa

Friday, 25 October 2024

पुस्तक परिचय: बर्डस ऑफ कुंभारगाव - संदीप नागरे

पुस्तकप्रेमी समूहाचे पुस्तक परिचय अभियान यासाठी आठवडाभर विविध पुस्तकांचा परिचय दिला होता. त्यातील हे विविध लेख.
~~~~~~~~
पुस्तक क्रमांक: 1581
पुस्तकाचे नांव : बर्डस ऑफ कुंभारगाव 
लेखक : संदीप नागरे 
प्रकाशन : विरूपाक्ष प्रकाशन 
प्रथम आवृत्ती : 2024.पृष्ठे : 144
किंमत : 340/- रुपये. 
परिचयकर्ता : सुधांशु नाईक,पुणे.*
दिनांक : 12 ऑक्टोबर 2024

गेले काही दिवस मानसशास्त्राशी संबंधित किंवा मानवी मनातील विचार, भावभावना याविषयीच्या पुस्तकांचा परिचय दिला. *संगीत - भटकंती आणि साहित्य या तीन टेकूमुळे आयुष्य सुखद झालंय. मन प्रसन्न ठेवायचं असेल तर असे टेकू लागतातच आपल्याला.* भटकंतीच्या छंदामुळे या पुस्तकाची, लेखकाची माहिती समजली. आजच्या पुस्तकाचा लेखक-संदीप यांनी पक्ष्यांच्या मनोवृत्तीचा खूप बारकाईने अभ्यास केल्यामुळे पुन्हा ‘पक्ष्यांच्या मानसशास्त्राशी’ किंचितसा धागा जोडला गेलाय असं म्हणायला हरकत नाही. नांव इंग्रजी असलं तरी पुस्तक मराठीच आहे.
4 ऑगस्ट 2024 रोजी पुण्यात डीपी रोडवर वन्यजीव विषयक एक कार्यक्रम आयोजित केला गेलेला. उजनी - भिगवण येथील पक्षीवैभवाविषयी कार्यरत अशा संदीप नागरे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन, ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांची मुलाखत आणि अन्य काही कार्यक्रम त्यावेळी आयोजित केले गेलेले. त्यावेळी संदीप नागरे यांचं हे पुस्तक प्रकाशित झालं. 
हे पुस्तक म्हणजे विविध पक्ष्यांच्या सुंदर सुंदर छायाचित्रांचा संग्रह आहे. खरंतर इतक्या एका वाक्यात पुस्तकाचा परिचय सांगणं हा संदीप नागरे यांच्यावर अन्यायच जणू. कारण उजनी भिगवण परिसरात असणाऱ्या पाणथळ जागेत आढळणारे पक्षी, माळावरील पक्षी, झाडाझुडपातील पक्षी पाहण्यासाठी, त्यांच्या नोंदी करण्यासाठी, ते इतरांना दाखवण्यासाठी गेली कित्येक वर्षं संदीप धडपडत आहेत त्याची गाथा म्हणजे हा पक्षी संग्रह.

उजनी भिगवणच्या परिसरातच आहे कुंभारगाव. या परिसरात आज हजारो लोक फ्लेमिंगो आणि अन्य पक्षी पाहायला येतात. धरणातील पाण्याची पातळी कमी झाली कीं पळसदेव मंदिर पाहायला येतात. या साऱ्या पर्यटनाला आपल्या अभ्यासाची जोड दिलीय ती संदीप नागरे यांनी. अत्यंत मितभाषी असलेले नागरे स्टेजवर तर अजिबात जास्त बोलत नाहीत आणि पुस्तकात देखील.
त्यांच्यासोबत पक्षी पाहायला जेंव्हा आपण जातो तेंव्हा मात्र त्यांच्या तोंडातून माहितीचा जणू धबधबा वाहू लागतो. कोणता पक्षी कोणत्या महिन्यात दिसतो, कुठं दिसतो हे सगळं त्यांना तोंडपाठ आहे. प्रत्येक पक्ष्याचे जीवन, त्यांची मानसिकता, त्यांचं स्थलांतर या सगळ्याची इत्यंभूत माहिती संदीप यांना आहे. त्यांनी जणू इथं सतत येत राहणाऱ्या पक्ष्यांचे मन वाचलं आहे असंच वाटतं.

कुंभारगावात राहत असलेल्या संदीपच्या घरी मुख्यत: मासेमारीचा व्यवसाय. लहानपणी जलाशयातील मासे पकडण्यासाठी वडिलांसोबत तो होडी वल्हवत जाई. आसपास खूप पक्षी दिसत. ते पाहणं त्याला आवडू लागलं. एकेकाळी त्या परिसरात पक्षी निरीक्षण करणाऱ्या अभ्यासकांना, फोटोग्राफर मंडळींना लहानगा संदीप दुरून पाहात असे. तो या मंडळींना नेमके कुठं कोणते पक्षी दिसतात, कुठल्या बेटावर काय दिसतं आदि माहिती देऊ लागला. त्यांना आपल्या मासेमारीच्या बोटीतून बेटावर नेऊ लागला. त्याला तेंव्हा शास्त्रीय माहिती नव्हती पण या मंडळींच्या सहवासात आल्यावर त्याला पक्षीनिरीक्षणात रुची निर्माण झाली. ही मंडळी त्याला त्याकाळी काही पैसेही देत. त्यातूनच मग ‘अग्निपंख’ या संस्थेचा जन्म झाला. अशी माहिती त्यांनी त्यांच्या यू ट्यूबवरील मुलाखतीत दिली आहे.
या परिसरात पूर्वी फ्लेमिंगो आणि अन्य पक्षी, मासे मारून खाल्लेदेखील जात. ते थांबलं पाहिजे असं संदीप यांना वाटलं. आणि त्यांची धडपड सुरु झाली.
एका साध्या छोटया घरात राहणाऱ्या या मुलाने मग वाढत्या वयात आसपासचे तरुण एकत्र केले. अग्निपंख या संस्थेच्या माध्यमातून मग पर्यटन गाईडचा व्यवसाय सुरु झाला. असा व्यवसाय सुरु करणारे संदीप नागरे हे कुंभारगावातील पहिली व्यक्ती ठरले.

त्यानंतर आसपासच्या अनेक मुलांनी संदीप यांच्यापासून प्रेरणा घेत लोकांना पक्षी दाखवण्यासाठी व्यवसाय सुरु केले. पर्यटकांसाठी राहण्याची - जेवण्याची सोय विविध घरांतून होऊ लागली. लोकांना रोजगार मिळू लागला. जे पक्षी आपण मारून खात होतो तेच पक्षी आपल्याला उत्तम रोजगार मिळवून देतात हे समजल्यावर मग अनेकांनी पक्षी वाचवण्यासाठी धडपड केली. संदीप जणू या सर्वांचे मुखीया ठरले. दिशादर्शक ठरले. 

भारतात सुमारे 1250 पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. त्यापैकी महाराष्ट्रात सुमारे साडे पाचशे तर भिगवण - कुंभारगाव परिसरात साडेतीनशेहून अधिक पक्षी प्रजाती पाहता येतात. 
संदीप नागरे यांच्यासोबत हिंडताना अशी खूप सारी माहिती आपल्याला मिळत राहते. या परिसरात केलेल्या कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कार आणि मानपत्राने सन्मानित करण्यात आलं आहे. 

जगावेगळी वाट चालत राहण्याची संदीप यांची मानसिकता इतरांना प्रेरणादायी आहे. या पुस्तकातील विविध पक्ष्यांची देखणी क्षणचित्रे पाहणं जितकं प्रसन्न आहे त्यापेक्षा त्यांच्यासोबत त्या परिसरात हिंडणं जास्त आनंद देणारं आहे. 
-सुधांशु नाईक, पुणे (9833299791)🌿
*सार:* आपल्या भवतालची परिस्थिती कशीही असली तरी मनात सकारात्मक विचाराची ठिणगी पडली कीं ती व्यक्ती स्वतःला आणि आपल्या परिघातील अनेकांना बदलून टाकते. जीवन अधिक समृद्ध होण्यासाठी वाटचाल करते हेच लहानशा गावात राहणाऱ्या संदीपसारख्यांच्या आयुष्यातून आपल्याला पाहायला मिळतं. अशा माणसांचं प्रेरणादायी आयुष्य म्हणूनच अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला हवं.
संदीप यांची मुलाखत यू ट्यूबवर उपलब्ध असून त्याची लिंक पुढीलप्रमाणे.

https://youtu.be/42wSImojD4Q?si=-CgdLlymfStpsjyI

*ता. क.:* उजनी भिगवण परिसराप्रमाणेच राज्यात आणि देशात अशी अनेक ठिकाणं आहेत कीं तिथलं जैववैविध्य अतुलनीय आहे. ते जपण्यासाठी तुम्ही - आम्ही - सर्वांनी काहीतरी अवश्य करायला हवं असं या पुस्तक परिचयाच्या निमित्ताने कळकळीने सांगावंसं वाटतं. 
सोबत संदीप यांच्या पुस्तकातील काही छायाचित्रे दिली आहेत. ज्यांना संदीप यांच्याशी संपर्क साधायचा आहे, त्या परिसरात भटकंती करायची आहे त्यांनी +919960610615 या क्रमांकावर संदीप यांच्याशी अवश्य 
संपर्क साधावा.
🌿🌿🌿

No comments:

Post a Comment