*पुस्तकप्रेमी समूहाचे पुस्तक परिचय अभियान* यासाठी आठवडाभर दिलेल्या पुस्तक परिचयातील हा शेवटचा लेख.
आजपर्यंत सलग 1582 पुस्तकांचा परिचय झाला....!
आठवडा क्र :....226
पुस्तक क्रमांक: 1582
*पुस्तकाचे नांव : परिसस्पर्श सुरांचा
*लेखक : जया जोग
प्रकाशन : उन्मेष प्रकाशन
प्रथम आवृत्ती : 2016.पृष्ठे : 118
किंमत : 130/- रुपये.
*परिचयकर्ता : सुधांशु नाईक,पुणे.*
दिनांक : 13 ऑक्टोबर 2024
मनाला अपार शांतता देणारी गोष्ट म्हणजे संगीत. ते निसर्गातील पक्ष्यांचे कूजन, वाहत्या झऱ्याचा खळखळाट, ढगाचा गडगडाट असो किंवा एखादी मैफल असो…संगीत आपल्याला रिझवत राहतं. तनामनाला शान्त करतं. मात्र संगीत साधकांना गुरुच्या विचाराशी, संगीतकलेशी तादात्म्य पावल्याविना हे घडत नाही. गुरु आणि शिष्याच्या मानसिकतेचा, त्यांच्या संगीत साधनेचा प्रवास मांडणारं हे छोटंसं पुस्तक म्हणून आपल्याला खूप काही शिकवून जातं.
लेखिका जया जोग आणि सतारवादनातील त्यांचे गुरु उस्ताद उस्मान खांसाहेब यांच्याबद्दलचं हे पुस्तक. हे पुस्तक म्हणजे गुरु आणि शिष्या यांचं आयुष्य, साधना याबद्दलचे स्वानुभव इतकंच नाही तर नकळत आपल्यालाही चिंतन करायला प्रवृत्त करणारं आहे.
जया जोग ही एका बुद्धीवादी घरातील तरुण मुलगी. वडील डॉ. व्ही एम देवल हे प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ. काका मधुकर देवल यांनी हरिजनाच्या उद्धारास आयुष्य वेचलेलं. घरात हळवेपण, भरून येऊन रडणं आदि काही नाहीच. अशा वातावरणात वाढलेली ही मुलगी उस्ताद उस्मान खां या नामवंत सतारवादकांकडे सतार शिकायला जाऊ लागते. या एका घटनेने तिचं जगणं, तिची विचारधारा आणि मानसिकता कशी बदलून जाते याचं प्रत्ययकारी आत्मनिवेदन म्हणजे हे पुस्तक.
घरात खरंतर त्यांची आई सतार शिकू पाहात होती. मात्र तिला घरी सतार शिकवायला ते शिक्षक आले कीं घरातील मंडळी मुद्दाम त्रास द्यायची. मुलं पण काहीतरी निमित्त काढून सतत व्यत्यय आणायची. मग एकदिवस त्या बिचारीने ते सगळं गुंडाळून ठेवलं. त्यावेळी आईला पिडायला तत्पर मुलांमध्ये जया देखील असे. पण एकदिवस उत्सुकता म्हणून तिनं सतार हाती घेतली. मग त्यातून एक क्लास सुरु केला. कॉलेज, भटकंती, शॉपिंग, गॉसिप असं सगळं काही केल्यावर मग उरलेल्या वेळी सतार असं सुरु होतं आयुष्य.
एकदिवस त्यांनी एका मैत्रिणीला स्टेजवर बसून सतार वाजवताना पाहिलं आणि मग डोक्यात जणू आग भडकली. आपण पण असं करायचं या भावनेने त्यांनी तिच्या गुरूंचा पत्ता शोधला. एकदिवस स्वतःच त्यांच्या दारीं जाऊन पोचली. त्यांचं नांव होतं उस्मान खां.
विविध शिष्याच्या गराड्यात ते शान्तपणे बसलेले होते. शान्त मृदू आवाजात त्यांना समजाऊन सांगत होते. घरात सरस्वतीची मूर्ती होती आणि सर्वत्र भरून उरलेला सतारीच्या स्वरांचा झंकार…!
~~
मात्र हा प्रवास सोपा नव्हता…एकेकाळी या गुरूने देखील किती हाल अपेष्टा सोसत संगीत कला साध्य केली त्याचं वर्णनही यात येत राहतं आणि तिचं झगडणं देखील. हे पुस्तक तिचं मनोगत आणि गुरु उस्मान खां यांचं मनोगत अशा दोन धाग्यानी विणत जातं. एक सुंदर वाचनानुभूती देतं. कित्येक वाक्ये आपल्याला अंतर्मुख करतात. कित्येक अनुभव मनात खोलवर भिडतात.
मी अधिक काही न लिहिता त्यातील काही अवतरणेच इथं देतो;
*) एकदा एक विद्यार्थिनी सतार ट्युनिंग करून घेण्यासाठी ड्रायव्हरसोबत आली. तिच्या सतारीवर बसलेली धूळ गुरुजी स्वतःच्या रुमालाने शांतपणे स्वच्छ करत होते. “ ही असली कामं का करता तुम्ही?” मी नाराजीने विचारलं. “ अगं, हे कुणाचं काम नाहीये. ही सतारीची सेवा आहे जया…हे माझं श्रद्धास्थान आहे आणि हाच माझा धर्म..” गुरुजी म्हणाले.
*) गुरुजी सांगत होते एकेकाळी पुण्यात एका घराच्या अरुंद पोटमाळ्यावर राहत होतो. धारवाड सोडून आलेलो. खिशात पैसे नसायचे. पुण्यात शर्माबंधूनी आधार दिला. पण त्यांच्या घरी सोवळं फार. इतरांचा स्पर्श झालेली कपबशीसुद्धा फोडून टाकत. एकदा शर्माची आई रस्त्यात होती. रस्ता ओलांडता येत नव्हता. मला मदत करावंसं वाटत होतं पण धीर होत नव्हता. मग त्यांनीच बोलवलं. मी हात धरून त्यांना पलीकडे पोचवलं. त्या दिवसापासून मी त्यांचा मुलगा झालो. माझ्यातला माणूस ओळखला. त्यावर त्यांनी वात्सल्य पांघरलं. मी परधर्मी मुलगा तिथं रूळलो. शर्मा बंधू, कामत काका अशा कित्येकानी तेंव्हा जे प्रेम, आधार दिला त्यामुळे मी काहीतरी करू शकलो.
*) गुरु आणि शिष्या याबद्दल अनेक प्रवाद समाजात आहेत. त्याविषयी आपले अनुभव सांगताना जया जोग म्हणतात, “ माझं शिक्षण सुरु होतं. चार पाच वर्षात संगीत या संकल्पनेबद्दल माझ्या विचारात झालेला मोठा बदल मित्र मैत्रिणींना जाणवत होता. सिनेमा - पिकनिक - चायनीज खाणं - संगीताचे कार्यक्रम या सगळ्याकडे सब घोडे बारा टक्के नजरेनं पाहणारे मित्र मंडळ मग माझ्यापासून दुरावू लागलं. त्याचं मला दुःख झालं नाही तर उलटं हायसं वाटलं..! सतारीला तुणतुणं म्हणणं, सतार खाजवते म्हणून टवाळी करणं याचबरोबर गुरु शिष्याविषयी अचकट विचकट बोलणं सुरु असे. एकजण म्हणाली, “ मास्तर लोकांची मजा असते बुवा. चांगल्या घरातील तरुण पोरी आजूबाजूला. ते शिकतात.. हे न्याहाळत बसतात.. वाद्य धरावं कसं वगैरे दाखवण्यासाठी मग जवळही जाता येतं…” प्रचंड हास्यकल्लोळ झाला. मी हसू शकले नाही. मला आदल्या दिवशीचा प्रसंग आठवला.
रियाजावेळी माझा उजवा हात दुखत राही. नखीचे स्ट्रोक्स अडू लागले. गुरुजींचं लक्ष गेलं. माझ्या उजव्या हाताच्या हालचाली काळजीपूर्वक बघत बसले. एका क्षणी त्यांनी मनगटावर विशिष्ट ठिकाणी किंचित दाब दिला, म्हणाले, नुसती बोटं हलवा पाहू…बोटं पूर्ण मोकळी होईपर्यंत बोटं हलवत रहा… 2 मिनिटांनी त्यांनी त्यांचा हात अलगद केव्हा काढून घेतला हेच कळलं नाही. माझी सतारीवरील पकड सहज नीट करून दिली.
वडील-मुलगी, भाऊ- बहीण,मित्र- मैत्रीण, नवरा - बायको या नेहमीच्या नात्याशिवाय एका वेगळ्या नात्याची मला जाणीव झाली. गुरु - शिष्या. या नात्याच्या सखोल गांभीर्याचा अनुभव मी घेतला असल्यामुळे टिंगलटवाळीच्या गप्पात आता मला भाग घेववत नव्हता.
*) शांतपणे सुरांचा अभ्यास करणं मला नकोसं वाटायचं. ताना, आलाप, पलटे घेत बसायला आवडे. एकदा खूप वैतागले. निराश झाले. गुरुजींना म्हणाले, मला यात रस वाटत नाही. तुमचा अमूल्य वेळ माझ्यासाठी खर्च करू नका. दोन दिवसानी क्लासच्या वेळी गुरुजींनी तो मुद्दा छेडला. *एखादी भाषा शिकताना आपण आधी लिपी शिकतो, मग व्याकरण शिकतो. मग मर्मस्थळे, उच्चारण.. ही प्राथमिक तयारी झाली कीं मग साहित्याकडे, भाषेच्या सौंदर्यकडे वळतो. तसंच सूर - लय - ताल हे संगीताचे मूलभूत घटक. त्यावर ताबा मिळवला तर तुम्ही सौंदर्यनिर्मिती करू शकता.* चमत्कृती वादन आणि अर्थपूर्ण वादन यात फरक आहे. मोजक्याच गोष्टींच्या आधारे मैफल रंगवता आली पाहिजे. शिकलेलं सगळं एकाच ठिकाणी नसतं मांडायचं. साबुदाण्याची खिचडी करताना विविध मसाले, कांदा लसूण असं घरात आहे म्हणून आपण खिचडीला कांद्याची फोडणी देऊन वरती शेवग्याची आमटी ओतली तर चालेल का? इतकं सहजपणे मनातील संभ्रम ते दूर करायचे.
*) *सरस्वती ही संगीताची देवी. प्रसन्न व्हायला महाकठीण. संगीत असो वा अध्यात्म, ही एक साधना आहे. मनाची फार तयारी हवी त्यासाठी. स्वतःला बुद्धीवादी समजून नाना शंका कुशन्का काढत बसण्यापेक्षा समोरच्या पाण्यात स्वतःला झोकून द्यायला शिका. सुरुवातीला नाका तोंडात पाणी जाईल, गुदमरायला होईल पण त्यामुळेच तुम्हाला हात पाय मारावेसे वाटतील. आणि तुमचा गुरु समर्थ आहे ना तुमच्याकडे लक्ष ठेवायला…* ते असं सांगू लागले कीं मनातली निराशा पार संपून जाई..!
*) गुरुजी सांगत होते….संगीत हा एक प्रवास आहे. धर्म - भाषा - देश - संस्कृती ओलांडून त्या पलीकडे जाणारा. स्वीट्झर्लन्ड मधील दौऱ्यावर असताना मी शिवरंजनी वाजवला. कमालीचा एकरूप झालेलो मी. कार्यक्रम संपल्यावर डोळे उघडले. समोरचे श्रोते निःशब्द. काहीजण डोळे पुसत होते. एक आजीबाई हळूहळू काठी टेकत जवळ आली . माझे दोन्ही हात हाती घेऊन डोळे मिटून उभी राहिली. दाटून आलेल्या आवाजात म्हणाली, “ आज तुझी सतार ऐकताना मला जीझस भेटला…!”
*) एकदा गुरुजी म्हणले, “ जया, काही वर्षं तू सतार शिकतीयस. खूप फरक पडलाय तुझ्यात. पण अजून खूप व्हायला हवं. हातांचा, बोटांचा रियाज पुरेसा नाही. त्याला चिंतनाची जोड हवी. सतत नवे प्रयोग हवेत. काही स्वतःला आवडतील. काही नाही आवडणार. प्रत्यक्ष मैफलीत वादन करताना ते आपोआप वादनात यावेत. आपल्याकडे भरपूर दागिने असतात. म्हणून तू कुठं समारंभाला जाताना सगळेच दागिने घालून जाते का..?” ते सांगत, विचारत होते..
छे…अहो मग माझा तर नंदीबैल होईल..” असं बोलून मी थबकले. चमकून गुरुजींच्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत शान्त प्रसन्न भाव होते. शान्तपणे म्हणाले, “माझं काम झालं आता. चूक कीं बरोबर इथपर्यंत कलेचं शास्त्र काम करतं. तिथपर्यंत जाण्यासाठी गुरुची मदत. ती करून झाली…इथून पुढं सौंदर्याच्या प्रांतात जी जाते ती अंतिम पातळीवरील कला..! ती तू वाढव. इथं झेप घेणाऱ्याला सगळं आभाळ मुक्त आहे. कलेपेक्षा कुणीच मोठा असू शकत नाही. इथं नतमस्तक व्हावं.
*) * प्रत्येक क्षण सुंदर करत जगावं माणसानं. हे गुरुजींचं सांगणं स्वतःच्या जगण्यात आणण्याचा माझा प्रयत्न सुरु झाला. मला हरिद्वार ऋषिकेशची गंगेची आरती आठवू लागली. त्यातून किती सुंदर संस्कार दिला आहे पूर्वजानी. केवढं चिरंतन सत्य सांगितलं आहे. त्या गंगेच्या प्रवाहाची आरती… त्या फेसाळत्या चैतन्याची आरती.. येणाऱ्या प्रत्येक थेंबाची आरती… त्याची पूजा.. त्याचं स्वागत. येणारा प्रत्येक क्षण आपण रसरसून जगलो तर भूतकाळ सुंदर आठवणींनी भरलेला राहतोच पण भविष्यकाळही सुंदर होऊन येतो.*
जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन हा असा आमूलाग्र बदलून गेला. मनातला उद्वेग पार पळाला…मला सतार शिकण्यापूर्वी महत्वाच्या वाटणाऱ्या कित्येक गोष्टी खरंच किती फालतू आहेत हे जाणवून माझं मलाच हसू येऊ लागलं..!”
~~~~~
या पुस्तकातील असं सांगत बसावं तेवढं थोडंच आहे. म्हणूनच हे पुस्तक वाचणं, एखाद्या संध्याकाळी उस्ताद उस्मानखां यांची सतार ऐकणं हे अधिक सुंदर आहे… शब्दातीत आहे..!
-सुधांशु नाईक, पुणे (9833299791)🌿
*सार:* पुस्तक वाचताना मग हे पुस्तक एका गुरु शिष्याचा प्रवास इतकंच उरत नाही. तर आपल्याला ते अध्यात्मिक पातळीवर घेऊन जातं. आयुष्याकडे खोलवर पाहायला शिकवतं. मनात निर्मळ आणि उच्च विचाराचे तरंग निर्माण करतं.
*ता. क. -* एकेकाळी कित्येक वर्षं सवाई गंधर्व महोत्सव जवळून अनुभवता आला. त्यात उस्मान खां यांच्यासारख्या दिग्गजाना मनसोक्त ऐकता आलं. त्यावेळी तो महोत्सव जास्त छान होता हे सांगणं अस्थायी होणार नाही. आता मात्र तिथं गर्दीत बसण्यापेक्षा, घरात शांतपणे एखादी रेकॉर्ड लावावी आणि सुरांच्या विश्वात खोलवर बुडून जावं असं प्रकर्षाने वाटतं.
आपला मनोविकास, आपलं जगणं अधिक समृद्ध करत नेणं हे आपल्याच तर हाती असतं. उत्तम पुस्तकं, उत्तम संगीत, उत्तम निसर्ग आणि उत्तम सोबती यांनी माझं आयुष्य समृद्ध केलं याबद्दल नितांत कृतज्ञता वाटते..!🙏🏼
🌿🌿🌿
No comments:
Post a Comment