' सहजच सुचलेलं..' या लेखमालेतील हा सहावा लेख.
- सुधांशु नाईक.
मंदिरं आणि मी...
मित्रहो, मी तसा सश्रद्ध माणूस असलो तरी सतत किंवा रोज रोज मंदिरात जावं, नित्यनेमाने दर्शन घ्यावं असं अजिबात करत नाही. त्यातही जिथं अतोनात गर्दी असते ती मंदिरं, ते उत्सवी दिवस यावर तर शक्यतो फुलीच.
पण मंदिरं आवडतात मला.. कुणा डोंगर माथ्यावर एकटीच असलेली. एखाद्या नदीकाठी, तळ्याकाठी निवांत बसलेली. फारसं कुणी जिथं नसतं अशी मंदिरे... शक्यतो अशी मंदिरं शंकराचीच असतात.
तिथं आसपास असतं एखादं पुजारी कुटुंब, नियमाने येणारे चार दोन भक्त, बाहेर घुटमळत असलेलं एखादं कुत्रं वगैरे... आवडतात अशी मंदिरं.
नदी, तळं जे काही असेल तिथं स्वच्छ पाय धुवून आत यावं. उगीचच मोठ्याने घंटानाद न करता हळूच घंटा वाजवावी, घंटेच्या त्या नादाने तिथल्या नीरव शांततेचा भंग न करता त्या शांततेला जणू एक सूर द्यावा इतक्याच मोठ्याने.
आपण आल्याचं फारसं कुणाला पडलेलं नसतं. जो तो आपल्या नादात संथ काही करत असतो. देवाला वंदन करावं.
मग गाभाऱ्यात किंवा मंडपात एखाद्या खांबाला, किंवा भिंतीला टेकून शान्त बसावं. आसपासच्या आवाजावर लक्ष केंद्रित करावं. कधी त्या नदीजवळ कुणी कपडे धूत असतं. त्याचा विशिष्ट आवाज येत असतो. झाडावरील एखादा कोतवाल, सुतार पक्षी, बुलबुल, मैना, रॉबिन, भारद्वाज, सनबर्ड आदि त्यांच्या विशिष्ट स्वरात किलबिलत असतात. अचानक कधी मलाबार व्हिसलिंग थ्रश, हॉर्नबील असंही कुणी बोलत असतं.
त्या सगळ्या परिसराशी आपल्या चित्तवृत्ती मग एकरूप होऊन जातात. मनातले सगळे तरंग शान्त शान्त होत राहतात. आणि मग प्रकर्षाने वाटतं, आता इथं महिम्न स्तोत्र म्हणायला हवं. दूर तिकडं खान्देशात तापी नदीच्या तीरावर प्रकाशा हे गाव.. तिथं ही सुरेखसं पुष्पदंतेश्वर मंदिर आहे. पुष्पदंताने प्राचीन काळी बहुदा तिथं रचलेले.
आणि मग, शान्त सुरात सुरवात करावी,
महिम्नः पारं ते परमविदुषो यद्यसदृशी
स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः
महिम्न ला स्वतःची अशी एक छान लय आहे. मी तसं अजिबात रोज वगैरे न म्हणणारा. पण लहानपणी बाबांचं ऐकून त्यांच्यासोबत म्हणून हे, सौरसूक्त, श्री सूक्त, रुद्र, मन्यू सूक्त आदी काही काही पाठ झालेलं. ते बहुतेकदा नीटसं आठवत राहतं.
महिम्न सम्पले की उठावं. पुजारी आसपास असलाच तर हातावर तीर्थ देतो. ते घेऊन बाहेर पडावं. तसंच मूकपणाने. एका वेगळ्याच शांततेने आपल्याला प्रसन्न केलेलं असतं, ते अनुभवत.
≈≈≈≈
देवळाची आठवण झाली की चिपळूणमधलं बालपण आठवते. पागेवर कृष्णेश्वरच्या देवळाजवळ चितळ्यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहायचो आम्ही. बालवाडीत असेन मी तेंव्हा. वासुदेव मायदेव, सदा चितळे, मिलिंद तांबे, वरवडेकर आदी आम्ही मित्रमंडळी देवळाच्या आसपास खेळायचो. महाशिवरात्रीचा उत्सव म्हणजे पागेवर जणू महोत्सवाचे वातावरण. दूरदूर असलेले ग्रामस्थ, चाकरमानीही ठरवून 10,12 दिवसांच्या सुट्ट्या घेऊन आलेले असायचे. मंदिर जुन्या काळच्या हंड्या-झुंबरांनी सजवले जाई. रंगरगोटी होई. रोज छबीन्याचीं मिरवणूक सर्वत्र रात्री असे. त्यासाठी ते विशिष्ट पोशाख, मशाली, छत्रचामरे... वाजत गाजत रात्री पालखी सर्वत्र जाई.
मग मंदिरात भजन आणि त्यावर एका लयीत नाचणे... आम्हा मुलांना या सगळ्याचं फार आकर्षण वाटायचं. महाशिवरात्रीला मग सकाळपासून महारुद्र... अभिषेक असे. संध्याकाळी कीर्तन रंगे.
सगळा उत्सव कळसाला पोचे. नंतर दुसऱ्या तिसऱ्या नाटक असायचं. स्थानिकांनी हौसेने बसवलेलं. 3, 3 महिने तालमी केलेल्या असायच्या. नाटक देखील गाजलेल्या नाटकातून निवडलं जाई. सर्वांना उत्सुकता असायची यंदा कोणतं नाटक.. अमुकतमुक चा रोल कोण करणार वगैरे...
सगळं झालं की मग श्रमपरिहार म्हणून गावजेवण किंवा महाप्रसाद होई. साधासा मेनू असे पण त्याची चव आजही विसरता येत नाही.
उत्सव संपला की परत जाणाऱ्यामध्ये स्त्रियांसोबत पुरुषांच्याही डोळ्यात पाणी दाटून येई. पुढील वर्षी पुन्हा भेटायचे वायदे होत आणि सगळं पुन्हा शान्त होई.
≈≈≈≈
कृष्णेश्वराचं मंदिर जसं माझ्या लहानपणीच्या भावविश्वाचा भाग आहे तसंच पागेवर असलेलं गोपाळकृष्णाचे मंदिर देखील. इतकी प्रसन्न मूर्ती की तो कृष्ण जणू कुणीतरी आपला दोस्तच आहे असं वाटायचं.
दर एकादशीला तिथं कीर्तन असायचं. सहस्त्रबुद्धे नावाच्या आजी टेबलवर पुढ्यात पेटी घेऊन, बसून कीर्तन करायच्या. अगदी शिवाजी महाराजांच्या गोष्टी, पुराणतल्या विविध कथा तिथं उत्तरंगात घेतल्या जात. त्या गोष्टी ऐकण्यासाठी असलेली आतुरता मला आजही जाणवत राहते. आईचा हात धरून आम्ही भावंडे तिथं जायचो. आईला रोजच्या व्यापातून हाच जणू विरंगुळा असे. त्या परिसरातील तिच्या मैत्रिणींना भेटणं, गप्पा, चहापाणी आणि कीर्तन... यासागळ्याला जणू ती आसुसलेली असायची.
आणि आठवणारे तिसरे लाडके मंदिर म्हणजे वाशिष्टी नदीकाठी असलेलं गांधारेश्वर मंदिर. नदीचा खोल डोह, मधूनच सूर मारून मासे टिपणारे खंड्या पक्षी, किलबिल करणारे अन्य पक्षी.... आणि भरून राहिलेली शांतता. कितीदा तिथं जाऊन बसलोय त्याची गणतीच नाही. आणि मग आम्हा चिपळूणकरांची विंध्यवासिनी देवी. आणि डोंगरावर विठलाई. डोंगराच्या कुशीतलं ते मंदिर, समोरची पुष्करणी, मागच्या डोंगरात वाहणारे निर्झर.. बस्स फ़क्त शान्त बसून राहावं.
आणि आवडतात भटकंती करताना विविध गडदुर्गावर पाहिलेली अनेक छोटी मंदिरं. देवींची, शन्कराची, मारुतीची.
2,4 तास चालून तिथं वर पोचावं, टाक्यातील थंडगार पाण्याने तोंड धुवावं. आणि त्या देवापुढं शान्त जरावेळ बसून राहावं. आपल्याच हृदयाचे वाढलेले ठोके आपल्याला ऐकू येत राहतात. हळूहळू शान्त लयबद्ध होत राहतात. तिथं दिवा लावावा, नमस्कार करावा आणि मग गड पाहायला दिवसरात्र हिंडत राहावं.
ही अशीच मंदिरं आवडतात मला.!
≈≈≈≈≈
पुढं काळाच्या ओघात रत्नागिरी, कोल्हापूर, सान्गली, नंदुरबार, कल्याण असं कुठं कुठं गेलो. ट्रेकिंग सुरु असायचंच. जिथं जाऊ तिथं अशा शान्त निसर्गरम्य ठिकाणाची माहिती घेतली जायची. आवर्जून ते पाहिलं जायचं. सांगली जिल्ह्यात, बहे येथील कृष्णा नदी पात्रातलं रामदासानी स्थापलेलं मारुती मंदिर... कुडाळ जवळ वालावल आणि धामापूर चे मंदिर. शान्त पाण्याजवळ पाय पसरून बसलेली ही मंदिरे.. अतिशय भुलावतात.
लहानपणी वडील ही कुठं कुठं गेले की आम्हाला सोबत न्यायचे. मात्र गर्दीच्या ठिकाणी जाणं मला अजिबात आवडत नसे. कुटुंबासोबत विविध तीर्थक्षेत्रे पाहून झालीयत मात्र खरंच कुठं पुन्हा जावंस वाटत नाही, अपवाद शेगावचा. तिथं कितीही वेळा जायला आवडेलच. आणि आवर्जून सांगायचं तर लहानपणापासून आजवर केलेल्या भटकंतीत सर्वाधिक लक्षात राहिली ती दक्षिणेतील मंदिरं.
बेलूर हळेबिडू, सोमनाथपूर, पश्चिम कर्नाटकच्या शिरसी, सागर परिसरातील बनवासी, एक्केरी इथली मंदिरे, ऐहोळे पट्टदखल, हंपी, चिदंबरम, बृहदीश्वर, मीनाक्षीपूरम, कालडी, तिरुअनांथपुरम,कोची, शृंगेरी, उडूपी आदी अनेक ठिकाणचे ते विस्तीर्ण प्राकार, सर्वत्र सुरेख स्वच्छता, अफाट असं कोरीव कामं मनाला अक्षरशः वेड लावते. हलेबिडू चा नंदी किंवा बनवासी च्या मंदिरासमोरील सुबक कोरीव काम केलेला हत्ती पाहत नुसतं बसून राहावं.
इथं खरंच मंदिरे पाहावीत ती बाहेरून. एकेक इंच जागा कुठं रिकामी नसते. केवढं थक्क करणारे कोरीव काम. मंदिर निरखून झालं की मी शान्त एका कोपऱ्यात बसून राहतो. मनात विचार येत राहतात.
किती शिल्पी जीव ओतून वर्षानुवर्षे ते घडवत बसले असतील. त्यांचा चरितार्थ त्यांनी कसा सांभाळला असेल, कित्येक वर्षं सुरु असलेली ही बांधकामं... किती पिढ्यानी आपलं कौशल्य पुढील पिढीला सोपवलं असेल. सगळं कसं सुबक, आखीव रेखीव. गणित, भूमिती, भूगोल, सायन्स सगळंच कोळून प्यालेली ही मंडळी. मात्र आमच्या अभ्यासक्रमात कधीच यातले काही आम्हाला शिकवलं का गेलं नाही याचीच खंत वाटत रहाते.
≈≈≈≈≈≈≈
दक्षिणेच्या तुलनेत उत्तर भारतातील मंदिरात तुलनेने जास्त अस्वच्छता आहे. दक्षिणेतील मंदिरात जाणवत राहणारा कर्मठपणा उत्तरेकडे जाऊ तसं कमी होत जातो. आणि स्वच्छतादेखील.
अवघ्या उत्तर भारताने, इ.स.700- 800 पासून जवळपास 1200 वर्षं मुस्लिम आक्रमकांची जबरदस्ती अनुभवली. त्याचा परिणाम असेल का? माहिती नाही.
जिथं घर, संसार, राज्ये ही उध्वस्त झाली तिथं मंदिराच्या नशिबी वनवासच जणू. तरीही लोक लढत राहिले, आपला धर्म, मंदिर, ग्रंथ प्राणपणाने जपत राहिले. नर्मदेकाठी असलेली शेकडो मंदिरे, उज्जैन, महेश्वर, खजूराहो तिकडे ओरिसातील जगन्नाथपुरी, कोणार्क, गुजरातमधील हिंदू आणि जैन मंदिरे, राजस्थान, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, काशी, प्रयाग हे सगळं अनेक आक्रमणे पचवून पुनःपुन्हा उभी राहिली आहेत.
देशभरातील ही केवळ मंदिरे नव्हती तर कम्युनिकेशन सेंटर्स होती. देवपूजेबरोबरच विविध गायक, वादक, नर्तक यांना कलामंच देणारी स्थाने होती. इथूनच भरतनाट्यम, कथक, ओडीसी, कुचिपूडी आदी नृत्यसोबत धृपद गायकी देखील विकसित होत गेले. इथल्याच प्राकारातून हजारो पुस्तकांची ग्रंथालये होती.. योग्य उपचार करणारे, आयुर्वेद जाणणारे वैद्य ही मंदिराचा आश्रय घ्यायचे. इथल्या मंदिराच्या माध्यमातून जलव्यवस्थापन केले जात होते.
देशावर आधी मुस्लिम आक्रमणे झाली आणि मग इंग्रजांची, पोर्तुगीजांची... त्यांनी आपली ही सोशल सिस्टीमच उध्वस्त करायचे निकराचे प्रयत्न केले. खूप काही डळमळीत झालं तरीही हिंदू समाज पूर्णतः मोडून पडला नाही.
प्राणपणाने, चिवटपणे आपलं सगळं जमेल तितकं जपत राहिला.
आज पुन्हा विविध मंदिराना, प्राचीन वारसा स्थळांना जपण्याचे प्रामाणिक प्रयत्न होऊ लागलेत. हे सारं आपण जपायला हवं. ती केवळ मंदिरे नाहीयेत तर हजारो वर्षांचा समृद्ध असा ठेवा आहे. हौस म्हणून मूर्तिशास्त्राचा अभ्यास केलेला. त्यावेळी जाणवलं, काही इंचाच्या, फुटाच्या त्या मूर्तीला घडवताना किती काय काय विचार केला जातो हे उमगले.
मंदिरं हा जसा आपला एक अमूल्य असा वारसा आहे तसाच वारसा आहे देशभर पसरलेली हजारो लेणी, गुंफा यांचाही. हिंदू, जैन आणि बुद्ध धर्मीय लोकांनी अतिशय मनापासून यावर काम केले. तो एका वेगळ्या लेखाचाच विषय. ते ही सारं आपल्याला जपता यायला हवं.
मंदिर असो वा लेणी, मुख्यत: आपल्याला तिथं स्वच्छता राखता यायला हवी. तिथला परिसर, वास्तू, पाण्याची व्यवस्था जशी घडवली गेली तशी जतन करता यायला हवीत. आपण ते करू शकलो तर देवदर्शन केल्यापेक्षा जास्त पुण्य आपल्याला मिळेल आणि एक भव्य वारसा आपण पुढील पिढ्याकडे हस्तान्तरीत करू शकू असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे अवश्य सांगा. आणि जिथं जिथं अशी कामं सुरु आहेत त्याची माहितीही शेयर करत राहुयात.
आता असं वाटतं, शान्त हिंडत राहावं. नर्मदेचा किनारा मला कायमच खुणावत असतो. हिमालय पुकारत असतो. मन म्हणेल तसं हिंडत राहावं. जे जे आपल्याला ठाऊक ते ते लोकांना सांगत राहावं. इथल्या वीरांच्या कहाण्या सांगाव्यात. इतिहासाचा जो अभ्यास केलाय तो सांगावा देशापायी त्यांच्या मनात असलेलं प्रेम अधिक वाढवत राहावं.
देव, देश आणि या मातीपायी असलेली जनांची श्रद्धा वृद्धिंगत करावी. मग विशिष्ट मंदिरापुरते, पंथापुरते न उरता अवघ्या देहाचेच मंदिर होऊन जावे.
स्वतःच नाव विसरून हळूहळू सगळ्यात विलीन होत जावं...!
- सुधांशु नाईक, 9833299791🌿
#सहज #सुचलेलं
( नोंद : यात वापरलेला गांधारेश्वर मंदिराचं सुरेख क्षणचित्र सुवर्णा भावे जोशी यांनी टिपलेलं आहे. )
सखोल अभ्यासपूर्ण लेख.. खूप छान
ReplyDeleteखूपच छान लेख सर
ReplyDeleteअतिशय चित्रदर्शी वर्णन. डोळस भ्रमंती घडली आहे. पण हा धावता आढावा आहे. अजून खूप काही असेल मनात उरलेले, साठलेले. म्हणून प्रत्येक
ReplyDeleteदेवळावर स्वतंत्र नि सविस्तर पुन्हा नव्याने लिहावेस.