marathi blog vishwa

Saturday, 26 October 2024

पुस्तक परिचय- पुस्तकाचे नांव :परिसस्पर्श सुरांचा, लेखक : जया जोग

🌿
*पुस्तकप्रेमी समूहाचे पुस्तक परिचय अभियान* यासाठी आठवडाभर दिलेल्या पुस्तक परिचयातील हा शेवटचा लेख.
आजपर्यंत सलग 1582 पुस्तकांचा परिचय झाला....!
आठवडा क्र :....226
पुस्तक क्रमांक: 1582
*पुस्तकाचे नांव : परिसस्पर्श सुरांचा 
*लेखक : जया जोग 
प्रकाशन : उन्मेष प्रकाशन 
प्रथम आवृत्ती : 2016.पृष्ठे : 118
किंमत : 130/- रुपये. 
*परिचयकर्ता : सुधांशु नाईक,पुणे.*
दिनांक : 13 ऑक्टोबर 2024

मनाला अपार शांतता देणारी गोष्ट म्हणजे संगीत. ते निसर्गातील पक्ष्यांचे कूजन, वाहत्या झऱ्याचा खळखळाट, ढगाचा गडगडाट असो किंवा एखादी मैफल असो…संगीत आपल्याला रिझवत राहतं. तनामनाला शान्त करतं. मात्र संगीत साधकांना गुरुच्या विचाराशी, संगीतकलेशी तादात्म्य पावल्याविना हे घडत नाही. गुरु आणि शिष्याच्या मानसिकतेचा, त्यांच्या संगीत साधनेचा प्रवास मांडणारं हे छोटंसं पुस्तक म्हणून आपल्याला खूप काही शिकवून जातं.

लेखिका जया जोग आणि सतारवादनातील त्यांचे गुरु उस्ताद उस्मान खांसाहेब यांच्याबद्दलचं हे पुस्तक. हे पुस्तक म्हणजे गुरु आणि शिष्या यांचं आयुष्य, साधना याबद्दलचे स्वानुभव इतकंच नाही तर नकळत आपल्यालाही चिंतन करायला प्रवृत्त करणारं आहे.
~~
जया जोग ही एका बुद्धीवादी घरातील तरुण मुलगी. वडील डॉ. व्ही एम देवल हे प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ. काका मधुकर देवल यांनी हरिजनाच्या उद्धारास आयुष्य वेचलेलं. घरात हळवेपण, भरून येऊन रडणं आदि काही नाहीच. अशा वातावरणात वाढलेली ही मुलगी उस्ताद उस्मान खां या नामवंत सतारवादकांकडे सतार शिकायला जाऊ लागते. या एका घटनेने तिचं जगणं, तिची विचारधारा आणि मानसिकता कशी बदलून जाते याचं प्रत्ययकारी आत्मनिवेदन म्हणजे हे पुस्तक. 

घरात खरंतर त्यांची आई सतार शिकू पाहात होती. मात्र तिला घरी सतार शिकवायला ते शिक्षक आले कीं घरातील मंडळी मुद्दाम त्रास द्यायची. मुलं पण काहीतरी निमित्त काढून सतत व्यत्यय आणायची. मग एकदिवस त्या बिचारीने ते सगळं गुंडाळून ठेवलं. त्यावेळी आईला पिडायला तत्पर मुलांमध्ये जया देखील असे. पण एकदिवस उत्सुकता म्हणून तिनं सतार हाती घेतली. मग त्यातून एक क्लास सुरु केला. कॉलेज, भटकंती, शॉपिंग, गॉसिप असं सगळं काही केल्यावर मग उरलेल्या वेळी सतार असं सुरु होतं आयुष्य. 
एकदिवस त्यांनी एका मैत्रिणीला स्टेजवर बसून सतार वाजवताना पाहिलं आणि मग डोक्यात जणू आग भडकली. आपण पण असं करायचं या भावनेने त्यांनी तिच्या गुरूंचा पत्ता शोधला. एकदिवस स्वतःच त्यांच्या दारीं जाऊन पोचली. त्यांचं नांव होतं उस्मान खां.
विविध शिष्याच्या गराड्यात ते शान्तपणे बसलेले होते. शान्त मृदू आवाजात त्यांना समजाऊन सांगत होते. घरात सरस्वतीची मूर्ती होती आणि सर्वत्र भरून उरलेला सतारीच्या स्वरांचा झंकार…!
~~
मात्र हा प्रवास सोपा नव्हता…एकेकाळी या गुरूने देखील किती हाल अपेष्टा सोसत संगीत कला साध्य केली त्याचं वर्णनही यात येत राहतं आणि तिचं झगडणं देखील. हे पुस्तक तिचं मनोगत आणि गुरु उस्मान खां यांचं मनोगत अशा दोन धाग्यानी विणत जातं. एक सुंदर वाचनानुभूती देतं. कित्येक वाक्ये आपल्याला अंतर्मुख करतात. कित्येक अनुभव मनात खोलवर भिडतात.
मी अधिक काही न लिहिता त्यातील काही अवतरणेच इथं देतो;

*) एकदा एक विद्यार्थिनी सतार ट्युनिंग करून घेण्यासाठी ड्रायव्हरसोबत आली. तिच्या सतारीवर बसलेली धूळ गुरुजी स्वतःच्या रुमालाने शांतपणे स्वच्छ करत होते. “ ही असली कामं का करता तुम्ही?” मी नाराजीने विचारलं. “ अगं, हे कुणाचं काम नाहीये. ही सतारीची सेवा आहे जया…हे माझं श्रद्धास्थान आहे आणि हाच माझा धर्म..” गुरुजी म्हणाले.

*) गुरुजी सांगत होते एकेकाळी पुण्यात एका घराच्या अरुंद पोटमाळ्यावर राहत होतो. धारवाड सोडून आलेलो. खिशात पैसे नसायचे. पुण्यात शर्माबंधूनी आधार दिला. पण त्यांच्या घरी सोवळं फार. इतरांचा स्पर्श झालेली कपबशीसुद्धा फोडून टाकत. एकदा शर्माची आई रस्त्यात होती. रस्ता ओलांडता येत नव्हता. मला मदत करावंसं वाटत होतं पण धीर होत नव्हता. मग त्यांनीच बोलवलं. मी हात धरून त्यांना पलीकडे पोचवलं. त्या दिवसापासून मी त्यांचा मुलगा झालो. माझ्यातला माणूस ओळखला. त्यावर त्यांनी वात्सल्य पांघरलं. मी परधर्मी मुलगा तिथं रूळलो. शर्मा बंधू, कामत काका अशा कित्येकानी तेंव्हा जे प्रेम, आधार दिला त्यामुळे मी काहीतरी करू शकलो.

*) गुरु आणि शिष्या याबद्दल अनेक प्रवाद समाजात आहेत. त्याविषयी आपले अनुभव सांगताना जया जोग म्हणतात, “ माझं शिक्षण सुरु होतं. चार पाच वर्षात संगीत या संकल्पनेबद्दल माझ्या विचारात झालेला मोठा बदल मित्र मैत्रिणींना जाणवत होता. सिनेमा - पिकनिक - चायनीज खाणं - संगीताचे कार्यक्रम या सगळ्याकडे सब घोडे बारा टक्के नजरेनं पाहणारे मित्र मंडळ मग माझ्यापासून दुरावू लागलं. त्याचं मला दुःख झालं नाही तर उलटं हायसं वाटलं..! सतारीला तुणतुणं म्हणणं, सतार खाजवते म्हणून टवाळी करणं याचबरोबर गुरु शिष्याविषयी अचकट विचकट बोलणं सुरु असे. एकजण म्हणाली, “ मास्तर लोकांची मजा असते बुवा. चांगल्या घरातील तरुण पोरी आजूबाजूला. ते शिकतात.. हे न्याहाळत बसतात.. वाद्य धरावं कसं वगैरे दाखवण्यासाठी मग जवळही जाता येतं…” प्रचंड हास्यकल्लोळ झाला. मी हसू शकले नाही. मला आदल्या दिवशीचा प्रसंग आठवला.
रियाजावेळी माझा उजवा हात दुखत राही. नखीचे स्ट्रोक्स अडू लागले. गुरुजींचं लक्ष गेलं. माझ्या उजव्या हाताच्या हालचाली काळजीपूर्वक बघत बसले. एका क्षणी त्यांनी मनगटावर विशिष्ट ठिकाणी किंचित दाब दिला, म्हणाले, नुसती बोटं हलवा पाहू…बोटं पूर्ण मोकळी होईपर्यंत बोटं हलवत रहा… 2 मिनिटांनी त्यांनी त्यांचा हात अलगद केव्हा काढून घेतला हेच कळलं नाही. माझी सतारीवरील पकड सहज नीट करून दिली. 
वडील-मुलगी, भाऊ- बहीण,मित्र- मैत्रीण, नवरा - बायको या नेहमीच्या नात्याशिवाय एका वेगळ्या नात्याची मला जाणीव झाली. गुरु - शिष्या. या नात्याच्या सखोल गांभीर्याचा अनुभव मी घेतला असल्यामुळे टिंगलटवाळीच्या गप्पात आता मला भाग घेववत नव्हता.

*) शांतपणे सुरांचा अभ्यास करणं मला नकोसं वाटायचं. ताना, आलाप, पलटे घेत बसायला आवडे. एकदा खूप वैतागले. निराश झाले. गुरुजींना म्हणाले, मला यात रस वाटत नाही. तुमचा अमूल्य वेळ माझ्यासाठी खर्च करू नका. दोन दिवसानी क्लासच्या वेळी गुरुजींनी तो मुद्दा छेडला. *एखादी भाषा शिकताना आपण आधी लिपी शिकतो, मग व्याकरण शिकतो. मग मर्मस्थळे, उच्चारण.. ही प्राथमिक तयारी झाली कीं मग साहित्याकडे, भाषेच्या सौंदर्यकडे वळतो. तसंच सूर - लय - ताल हे संगीताचे मूलभूत घटक. त्यावर ताबा मिळवला तर तुम्ही सौंदर्यनिर्मिती करू शकता.* चमत्कृती वादन आणि अर्थपूर्ण वादन यात फरक आहे. मोजक्याच गोष्टींच्या आधारे मैफल रंगवता आली पाहिजे. शिकलेलं सगळं एकाच ठिकाणी नसतं मांडायचं. साबुदाण्याची खिचडी करताना विविध मसाले, कांदा लसूण असं घरात आहे म्हणून आपण खिचडीला कांद्याची फोडणी देऊन वरती शेवग्याची आमटी ओतली तर चालेल का? इतकं सहजपणे मनातील संभ्रम ते दूर करायचे.

*) *सरस्वती ही संगीताची देवी. प्रसन्न व्हायला महाकठीण. संगीत असो वा अध्यात्म, ही एक साधना आहे. मनाची फार तयारी हवी त्यासाठी. स्वतःला बुद्धीवादी समजून नाना शंका कुशन्का काढत बसण्यापेक्षा समोरच्या पाण्यात स्वतःला झोकून द्यायला शिका. सुरुवातीला नाका तोंडात पाणी जाईल, गुदमरायला होईल पण त्यामुळेच तुम्हाला हात पाय मारावेसे वाटतील. आणि तुमचा गुरु समर्थ आहे ना तुमच्याकडे लक्ष ठेवायला…* ते असं सांगू लागले कीं मनातली निराशा पार संपून जाई..!

*) गुरुजी सांगत होते….संगीत हा एक प्रवास आहे. धर्म - भाषा - देश - संस्कृती ओलांडून त्या पलीकडे जाणारा. स्वीट्झर्लन्ड मधील दौऱ्यावर असताना मी शिवरंजनी वाजवला. कमालीचा एकरूप झालेलो मी. कार्यक्रम संपल्यावर डोळे उघडले. समोरचे श्रोते निःशब्द. काहीजण डोळे पुसत होते. एक आजीबाई हळूहळू काठी टेकत जवळ आली . माझे दोन्ही हात हाती घेऊन डोळे मिटून उभी राहिली. दाटून आलेल्या आवाजात म्हणाली, “ आज तुझी सतार ऐकताना मला जीझस भेटला…!”

*) एकदा गुरुजी म्हणले, “ जया, काही वर्षं तू सतार शिकतीयस. खूप फरक पडलाय तुझ्यात. पण अजून खूप व्हायला हवं. हातांचा, बोटांचा रियाज पुरेसा नाही. त्याला चिंतनाची जोड हवी. सतत नवे प्रयोग हवेत. काही स्वतःला आवडतील. काही नाही आवडणार. प्रत्यक्ष मैफलीत वादन करताना ते आपोआप वादनात यावेत. आपल्याकडे भरपूर दागिने असतात. म्हणून तू कुठं समारंभाला जाताना सगळेच दागिने घालून जाते का..?” ते सांगत, विचारत होते..
छे…अहो मग माझा तर नंदीबैल होईल..” असं बोलून मी थबकले. चमकून गुरुजींच्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत शान्त प्रसन्न भाव होते. शान्तपणे म्हणाले, “माझं काम झालं आता. चूक कीं बरोबर इथपर्यंत कलेचं शास्त्र काम करतं. तिथपर्यंत जाण्यासाठी गुरुची मदत. ती करून झाली…इथून पुढं सौंदर्याच्या प्रांतात जी जाते ती अंतिम पातळीवरील कला..! ती तू वाढव. इथं झेप घेणाऱ्याला सगळं आभाळ मुक्त आहे. कलेपेक्षा कुणीच मोठा असू शकत नाही. इथं नतमस्तक व्हावं. 

*) * प्रत्येक क्षण सुंदर करत जगावं माणसानं. हे गुरुजींचं सांगणं स्वतःच्या जगण्यात आणण्याचा माझा प्रयत्न सुरु झाला. मला हरिद्वार ऋषिकेशची गंगेची आरती आठवू लागली. त्यातून किती सुंदर संस्कार दिला आहे पूर्वजानी. केवढं चिरंतन सत्य सांगितलं आहे. त्या गंगेच्या प्रवाहाची आरती… त्या फेसाळत्या चैतन्याची आरती.. येणाऱ्या प्रत्येक थेंबाची आरती… त्याची पूजा.. त्याचं स्वागत. येणारा प्रत्येक क्षण आपण रसरसून जगलो तर भूतकाळ सुंदर आठवणींनी भरलेला राहतोच पण भविष्यकाळही सुंदर होऊन येतो.*
जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन हा असा आमूलाग्र बदलून गेला. मनातला उद्वेग पार पळाला…मला सतार शिकण्यापूर्वी महत्वाच्या वाटणाऱ्या कित्येक गोष्टी खरंच किती फालतू आहेत हे जाणवून माझं मलाच हसू येऊ लागलं..!” 
~~~~~
या पुस्तकातील असं सांगत बसावं तेवढं थोडंच आहे. म्हणूनच हे पुस्तक वाचणं, एखाद्या संध्याकाळी उस्ताद उस्मानखां यांची सतार ऐकणं हे अधिक सुंदर आहे… शब्दातीत आहे..!
-सुधांशु नाईक, पुणे (9833299791)🌿

*सार:* पुस्तक वाचताना मग हे पुस्तक एका गुरु शिष्याचा प्रवास इतकंच उरत नाही. तर आपल्याला ते अध्यात्मिक पातळीवर घेऊन जातं. आयुष्याकडे खोलवर पाहायला शिकवतं. मनात निर्मळ आणि उच्च विचाराचे तरंग निर्माण करतं.

*ता. क. -* एकेकाळी कित्येक वर्षं सवाई गंधर्व महोत्सव जवळून अनुभवता आला. त्यात उस्मान खां यांच्यासारख्या दिग्गजाना मनसोक्त ऐकता आलं. त्यावेळी तो महोत्सव जास्त छान होता हे सांगणं अस्थायी होणार नाही. आता मात्र तिथं गर्दीत बसण्यापेक्षा, घरात शांतपणे एखादी रेकॉर्ड लावावी आणि सुरांच्या विश्वात खोलवर बुडून जावं असं प्रकर्षाने वाटतं. 
आपला मनोविकास, आपलं जगणं अधिक समृद्ध करत नेणं हे आपल्याच तर हाती असतं. उत्तम पुस्तकं, उत्तम संगीत, उत्तम निसर्ग आणि उत्तम सोबती यांनी माझं आयुष्य समृद्ध केलं याबद्दल नितांत कृतज्ञता वाटते..!🙏🏼
🌿🌿🌿

पुस्तक परिचय पुस्तकाचे नांव : Dibs In search of self लेखक : Virginia Axline

🌿
*पुस्तकप्रेमी समूहाचे पुस्तक परिचय अभियान* यासाठी दिलेल्या पुस्तक परिचयातील एक लेख.
आजपर्यंत सलग 1576 पुस्तकांचा परिचय...!
आठवडा क्र :....226
पुस्तक क्रमांक: 1576
पुस्तकाचे नांव : Dibs In search of self
लेखक : Virginia Axline
प्रकाशन : Ballantine Books, New york.
प्रथम आवृत्ती : 1967, पृष्ठे : 220 
किंमत : 499/- रुपये.
*परिचयकर्ता : सुधांशु नाईक, पुणे.*
*दिनांक : 07 ऑक्टोबर 2024*

स्वतःला शोधणं ही खरंच आयुष्यातील सर्वात मोठी गरज. सगळ्यांनाच ते जमतं असं नाही. एक
लहान मूल स्वतःला शोधू पाहातं त्याची कहाणी सांगणारं हे सुरेख पुस्तक.

पुस्तकाच्या लेखिका व्हर्जिनिया या स्वतः मानसशास्त्राच्या अभ्यासक. इतकंच नव्हे तर ‘प्ले थेरपी’ बाबत त्यांचं लेखन जगभर नावाजलेले. या थेरपीबाबत नुसतं लेखनच नव्हे तर त्यांनी केलेले विविध प्रयोग हेही चर्चेचा विषय ठरलेले. त्यातीलच एका प्रयोगाची गाथा म्हणजे हे पुस्तक.

मित्रहो, बालमानसशास्त्र हा आपल्या अनेकांचा आवडीचा विषय. फक्त समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञच नव्हे तर प्रत्येक पालकांसाठी आवश्यक असाच विषय.

मुलांचं विश्व वेगळंच. कधी हसरा तर कधी उदास, कधी खेळकर तर कधी गंभीर अशा अनेक मनोवस्था आपण हरघडी एकाच मुलामध्ये पहात असतो. डिब्ज हा असाच एक मुलगा. वाहत्या पाण्याला अचानक कुणीतरी बांध घालावा आणि ते पाणी स्तब्ध होऊन जावं, तसा स्तब्ध झालेला.
शाळेत तो कुणाशीही एक अक्षरदेखील बोलत नसे. शांतपणे सगळ्यांना न्याहाळत बसे. आपल्याच मर्जीने वर्गात इकडे तिकडे फिरत राही. कधी बाकाखाली जाऊन बसून राही. त्याच्याशी इतर मुलामुलींनी बोलायचे अनेक प्रयत्न केले तरी परिणाम शून्य. लंच बॉक्स खातानाही तो एकटाच बसे.
वर्गात आल्यावर त्याची शिक्षिका त्याला आत घेऊन येई. प्रसंगी त्याचा रेनकोट वगैरे काढून ठेवी. पण तो चकार शब्द काढत नसे.
शाळा सुटताच मात्र तो हिंस्त्र होऊन जाई. त्याला अजिबातच घरी जायचं नसे. आरडाओरडा, आकांडतांडव हे सारं रोजचंच. शिक्षकांनी, आई वडिलांनी विविध प्रकारे समजावून देखील त्याच्याकडून प्रतिसाद शून्य. सर्वांना वाटे हा गतिमंद मुलगा आहे आणि याची रवानगी आता विशेष शाळेतच करायला हवी.

त्याच्या वर्गावर शिकवणाऱ्या शिक्षकांपैकी मिस जेन आणि मिस हेडा या दोघीना मात्र तो गतिमंद नाही याची काही प्रमाणात खात्रीच होती. अधूनमधून अचानक दिसणारी त्याची एखादी कृती, बारकाईने विविध गोष्टींचं निरीक्षण करण्यात रमणारा तो… त्याच्याबद्दल त्यांना नेहमीच काहीतरी गूढ वाटे. मात्र प्रेमानं सांगून, रागावून देखील त्यात कोणताच फरक पडत नव्हता. अखेर त्याला समुपदेशन आणि मानसोपचार द्यायला हवेत असं ठरवून मग लेखिकेकडे सोपवलं जातं. दर गुरुवारी त्याला एक तास तिच्यासोबत यापुढे घालवायचा असतो.

इथून सुरु होतो एक प्रवास प्ले थेरपीचा. तोंडातून एक अक्षरदेखील न काढणाऱ्या डिब्जला घेऊन ती समुपदेशन कक्षात येते. तिथं विविध खेळ, वाळू, ड्रॉईंगसाठी बोर्ड आणि कागद, रंग वगैरे बरंच काही असतं. ती त्याला सांगते, हे सगळं आजपासून तुझं आहे. तुला जे हवं ते कर. 

तो काहीही बोलत नाही. मात्र हरखून जाऊन बराच वेळ एकेक गोष्ट न्याहाळत बसतो. हळूहळू दिवस जात असतात. काही आठवडे जातात.

मग “ डिब्ज ला खेळावंसं वाटतंय…”, “डिब्ज ला रंग हवे आहेत…”, “ हे खूप छान आहे, डिब्जला आवडलं..” अशा सारखी विविध वाक्य तो स्वतःशी पुटपुटत आहे हे तिला उमगतं. 
त्यानंतर हळूहळू तो तिला विविध प्रश्न विचारू लागतो. “डिब्ज ने काय करावं?” “ डिब्जचा कोट काढून देणार का..?” 

त्यानंतर डिब्ज म्हणजेच मी हे त्याला उमगू लागतं. तिथं एक खेळ त्यातील पात्रे तो तयार करतो. खेळण्यातील सैनिक, माणसं यांना नावं देतो. हा डिब्ज, ही आई, हे बाबा, ही लहान बहीण…इत्यादी इत्यादी…

खेळताना कधी तो, “मला हे हवंय, “मी आई बाबांना मरून टाकणार आहे… असं बोलू लागतो. आणि हळूहळू त्याचं बोलणं हळूहळू सुरु होतं. मात्र या सगळ्या प्रवासात घरी जायला असलेली त्याची नाराजी कायम राहते. फक्त त्याचा हिंस्त्रपणा कमी होत जातो. घरी जाणं अपरिहार्य आहे हे त्याला उमगू लागतं…तो ते स्वीकारतो.

पुढे जाऊन आता तो घरातलं सगळं तिला सांगू लागतो. त्याच्या घराच्या खिडकीत आलेली झाडाची फांदी, त्यावरील पक्षी, तिथला माळीमामा, बाबांनी तोडायला लावलेली ती फांदी…असं बरंच बोलू लागतो. त्याच्या घरातील पुस्तकांविषयी बोलतो. आमच्या घरात बाबांनी मला सगळी खेळणी आणून दिलीयत हे सांगतो आणि त्याचबरोबर मला रूमचं दार बंद करणं आणि कुलूप लावून ठेवणं याचा तिरस्कार वाटतो हेही सांगतो.

आई बाबा, शेजारी आणि शिक्षक या सर्वांना गतिमंद वाटणाऱ्या, एखादं सुरवंट वाटणाऱ्या डिब्जचं पाहता पाहता फुलपाखरात रूपांतर होतं.

समुपदेशन क्षेत्रात थोडीशी धडपड करू पाहाणाऱ्या मला सर्वाधिक काय भावलं असेल तर व्हर्जिनिया यांचं वागणं आणि बोलणं. त्या एकदाही त्याला हे कर, ते करू नको, हे चूक, ते बरोबर…असं काहीही सांगत नाहीत.
उदाहरणार्थ एखादी खेळण्यातील लहान बाहुली हातात घेऊन जेंव्हा डिब्ज म्हणतो, “ ही माझी बहीण..हिला दूर वाळूत गाडून टाकावंसं वाटतं…पण सध्या नको.. “
तेंव्हा त्या म्हणतात, “ डिब्जला वाटतंय बहिणीला वाळूत गाडून टाकावं. पण तो सध्या तसं तो करणार नाहीये.”
संपूर्ण पुस्तकभर त्या फक्त त्याचीच वाक्ये रिपीट करत राहतात. प्रसंगी त्याचीच वाक्य त्याला थोडंसं फेरफार करून ऐकवत राहतात. 

डिब्ज हुशार आहे, विचार करू शकतो, उत्तम लिहू - बोलू शकतो फक्त त्यानं स्वतःतलं सगळं काही स्वतःच्या आतमध्ये दडपून ठेवलं आहे. हे असं का…या प्रश्नाचा छडा लावणं त्याना जास्त महत्वाचं वाटतं. त्याच्याकडून कुणाशीच संवाद साधला जात नाहीये कारण त्याच्या मनात संवादाविषयीं राग, नकारात्मक भावना आहे हे त्यांना उमगतं. आणि त्याच्या मनात संवादविषयीं त्या पुन्हा उत्सुकता, ओढ निर्माण करतात. एकेकाळी प्ले थेरपीचा तो एक तास सम्पल्यावर घरी जायला नाखूष असलेला डिब्ज पुढे जाऊन सामान्य मुलांप्रमाणे वागू लागतो का वगैरे प्रश्नाची उत्तरं तुम्हाला पुस्तक वाचताना समजून घेता येतीलच.

*सार :-* समुपदेशन करताना आपण कसं वागलं पाहिजे हे जसं हे पुस्तक वाचताना कळतं तसंच पालक म्हणून आपण काय करायला हवं, काय करू नये हेही समजतं. शिक्षकांनी मुलांशी कसं वागावं हे जसं समजतं तसंच मुलं अतिशय छोटया गोष्टींचंदेखील किती बारकाईने निरीक्षण करतात, लहानशा संवादाचे देखील त्त्यांच्या मनावर किती खोलवर परिणाम होतात हे उमगतं. आपल्याला खूप काही कळत असलं तरी अजून किती काय काय समजून घ्यायला हवं अशी जाणीव करून देणारं हे पुस्तक म्हणूनच वाचायला हवं. 
-सुधांशु नाईक, पुणे (9833299791)🌿

ता. क.:-शुचिता नांदापूरकर फडके या आमच्या ताईने हे पुस्तक वाचायला उदयुक्त केलं याबद्दल तिचे मनापासून आभार.
🌿

पुस्तक परिचय - पुस्तकाचे नांव : सिनेमा पॅराडिसो, लेखक : डॉ. नंदू मुलमुले

🌿
पुस्तकप्रेमी समूहाचे पुस्तक परिचय अभियान यासाठी आठवडाभर पुस्तक परिचय लिहिले. त्यातील एक लेख.
आजपर्यंत सलग 1577 पुस्तकांचा परिचय
पुस्तक क्रमांक: 1577
पुस्तकाचे नांव : सिनेमा पॅराडिसो
लेखक : डॉ. नंदू मुलमुले
प्रकाशन : मॅजेस्टिक प्रकाशन
प्रथम आवृत्ती : डिसेंबर 2021, 
पृष्ठे : 193
किंमत : 200 /- रुपये.
*परिचयकर्ता : सुधांशु नाईक,पुणे.*
दिनांक : 08 ऑक्टोबर 2024

डॉ. नंदू मुलमुले हे नांव महाराष्ट्रातील मानसोपचार क्षेत्रातील अग्रगण्य नांव. त्यांच्या परिचयाचा फोटो सोबत जोडत आहे. तो अवश्य पाहावा. मानसोपचाराला त्यांनी सिनेमा, कविता अशा विविध गोष्टींशी जोडून घेत नवीन आयाम दिला. हे पुस्तक त्यातलंच एक. 

या पुस्तकात काही इटालियन सिनेमाविषयी त्यांनी आस्वादक लेखन केलं आहे. चित्रपटाचा अनुभव घेताना, त्याविषयी सांगताना डॉक्टर हळूच त्यात मनोविकार, माणसाच्या मनोकायिक विश्वातील घडामोडी याच्याशी चित्रपटाचा सांधा सुरेख जोडून देतात. 

आपल्या मनोगतात ते म्हणतात, “ मी चित्रपट अभ्यासक नाही. एक साधसुधा प्रेक्षक आणि आस्वादक आहे. मला सिनेमाची कथा भावते. एक मानसतज्ज्ञ असल्यामुळे मला त्यातील मनोविश्लेषणाचं अंग दिसू लागतं. माणसं जशी वागतात, ती माणसं तशी का वागतात हाच माझ्या कुतूहलाचा विषय. ती लॉजिकली वागत नाहीत म्हणून कोड्यात टाकतात पण म्हणूनच साहित्य निर्मिती होते, चित्रपट होतात..! चित्रपट हे मनोरंजन करतात, तेवढंच ते आपलं भावविश्व समृद्ध करतात…”

किती खरं आहे ना हे?

कोल्हापूरमध्यें असताना तिथल्या फिल्म सोसायटीशी संबंध आला. तिथं सदस्य असताना कित्येक उत्तमोत्तम विदेशी चित्रपट पाहिले. फिल्म फेस्टिवल पाहिले. त्यावर जमेल तेंव्हा लिहिलं देखील. पण डॉ. मुलमुले ज्या प्रकारे चित्रपटांशी आपल्या अभ्यासाचा विषय जोडून घेतात ते पाहून मलाच एक नवीन नजर मिळाली असं वाटतं.

या पुस्तकातील सगळ्याच लेखावर / चित्रपटावर बोलणं शक्य नाही. एखाद्याविषयी आज सांगतो.

पहिलाच लेख हा पुस्तकाचं नांव असलेल्या चित्रपटावरचा. “ सिनेमा पॅराडिसो..” म्हणजे सिनेमागृहावरचा चित्रपट. 

एका लहानशा गावात प्रोजेक्टर घेऊन सिनेमा दाखवणारा अल्फ्रेडो हा द्रष्टा माणूस एका कुमारवयीन मुलाच्या आयुष्यात येतो. या गावात तसं सगळं जीवन सुस्त आहे. तिथं हा खोडकर मुलगा आईसोबत राहतो आहे, त्याचे वडील दूर रशियात युद्धावर गेलेत. सिनेमा दाखवणाऱ्या अल्फ्रेडोसोबत त्याची गट्टी जमते. सगळे या मुलाला टोटो असं संबोधतात. त्याला सिनेमाचं प्रचंड वेड आहे. गावातील चर्चचा प्रिस्ट हा गावातलं सेन्सॉर बोर्ड आहे. कोणत्याही सिनेमातील सगळी दृश्य तो आधी स्वतः पाहतो आणि मग अल्फ्रेडोला ती काही ‘ विशिष्ट’ दृश्य कापायला लावतो. मात्र हे सगळे कारनामे टोटो गुपचूप पाहत असतो. तोही वयात येत असतो.
एकदा अचानक प्रोजेक्टर रूममध्यें आग लागते. तेंव्हा धावत जाऊन टोटो अल्फ्रेडोचे प्राण वाचवतो. मात्र त्याचे डोळे जातात. यापुढे टोटो त्याचे डोळे होऊन जातो.

पुढे हळूहळू टोटो प्रोजेक्टर चालवण्याचं कसब शिकून घेतो. व्हिडिओ कॅमेरा चालवू लागतो. अल्फ्रेडोला उमगतं की टोटो एक फार संवेदनशील मुलगा आहे. हा पुढे मोठा कलावंत आणि त्यातही एखादा दिग्दर्शक होऊ शकतो. तो टोटोचा फ्रेंड - फिलोसॉफर - गाईड बनतो. खूप काही सांगत राहतो.

या दरम्यान तरुण टोटोच्या आयुष्यात एलेना येते. दोघांना एकमेकांशिवाय काही सुचत नाही. मात्र एलेनाच्या घरातील लोकांचा त्यांच्या लग्नाला विरोध आहे. टोटो अजून स्थिर नाही. तो एक फडतूस प्रोजेक्टर ऑपरेटर आहे त्यामुळे आपल्या मुलीने त्याचा विचार सोडून द्यावा असं त्यांना वाटतं. त्याला भेटायला तिच्या घरातून बंदी घातली जाते. त्यामुळे दोघांची प्रचंड घालमेल सुरु आहे. एकेका भेटीसाठी दोघं तळमळत राहतात. जमेल तसं भेटत राहतात. एकमेकांना बिलगून राहू पाहतात. आपलं काम विसरून तिची भेट कशी होईल या एकाच ध्यासाने टोटो अस्वस्थ आहे. 

अल्फ्रेडो त्यांचं उत्कट प्रेम, त्यांची तडफड पाहतो. सुरुवातीला त्यांना एकत्र यायला मदतही करतो. पण लवकरच त्याला कळतं की प्रेमाची ही तीव्र आणि प्रखर ऊर्जा टोटोला जाळून भस्मसात करेल.

डॉ. नंदू मुलमुले इथं लिहितात की, “प्रेमाचं अत्युच्च शारीर शिखर म्हणजे दोन तना- मनांचं मिलन. वासना हे शरीराच्या गतीचं, एका अर्थानं प्रगतीचं इंधनच. या प्रचंड ऊर्जेचं मानसिक उन्नयन म्हणजे निर्मिती…सृजन…” किती सुंदर वाक्य आहे हे! 
मात्र टोटो सर्जनशील आहे त्यानं असं वागायला नको, त्याचं आयुष्य कलेच्या उत्कर्षांसाठी आहे हे तो त्याला समजावतो.

अखेर टोटोला एक वर्षासाठी सैन्यात जावं लागतं आणि त्यांची ताटातूट होते. पुन्हा आल्यावर तो एलेनाचा माग काढतो. तिच्या वडिलांची बदली जिथं झाली तिथंही जाऊन येतो, पण भेट होत नाही. माग अल्फ्रेडो त्याला सांगतो आता गावाकडे मागे वळून पाहू नको, रोमला जा.. मोठा हो..!

टोटो पुढील 30-35 वर्षं खूप काम करतो. ‘ सॅलवादोर दि विटा’ या नावानं मोठा दिग्दर्शक होतो. आणि आईने बोलवल्यामुळे पुन्हा गावात येतो अल्फ्रेडोच्या अंत्यसंस्कारासाठी. मग त्याला अचानक पुन्हा एलेना दिसते. पुलाखालून आता खूप पाणी वाहून गेलंय. ती उत्कट प्रीतीची जाणीव शान्त झाली आहे. मात्र त्या दिवसांविषयी बोलताना तो जेंव्हा म्हणतो की आपण त्यावेळी पुन्हा भेटायला हवं होतं...त्यामुळे आपलं आयुष्य वेगळं घडलं असतं का??

आणि मग एकेकाळी जे त्याला अल्फ्रेडोने सांगितलेलं असतं तेच ती सांगते…”तुझं आयुष्य कलेच्या उत्कर्षांसाठी आहे…एखाद्या नात्यात गुंतून जाण्यासाठी नव्हे...” 

चित्रपटाचा कॅनव्हास फार भव्य आहे. प्रेम म्हणजे काय, त्याची व्याख्या काय यावर प्रकाशझोत टाकतो. चित्रपट आपल्याला अंतर्मुख करतो. चिंतन करायला भाग पाडतो.

 या पुस्तकातील अन्य लेख, त्यासाठी निवडलेले चित्रपटदेखील आपल्याला असंच अंतर्मुख करणारे. मानवी भावभावना, वासना, ईर्षा, मत्सर, मृत्यू, कृतज्ञता इत्यादीचं दर्शन घडवणारे.

  ‘मलेना’ या चित्रपटात, पौगंडावस्थेतील मुलाच्या स्त्रीदेहाबद्दलच्या कामभावनेची वाटचाल दाखवली आहे. शारीरिक आकर्षणापासून प्रेमभावनेकडे होणाऱ्या त्या वाटचालीचा चित्रपटात वेध घेतला जातो. त्याचवेळी समाज एखाद्या स्त्रीला कितीप्रकारे छळतो तेही हा चित्रपट विदारकपणे दाखवत राहतो.
 तर ब्लो अप हा चित्रपट म्हणजे एक सुंदर मर्डर मिस्ट्री आहे. तो चित्रपट माणसाच्या वास्तव आयुष्यातील मूलभूत प्रश्नांना हात घालतो. सत्याच्या शोधकडे वळतो…

प्रत्येक लेख आणि तो चित्रपट काहीतरी वेगळं देऊन जाणारा आहे.

हे पुस्तक आधी वाचावं आणि नंतर यातील तुम्हाला आवडलेला चित्रपट शक्य असल्यास जरूर पाहावा असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं.

*सार :-* एकूण 9 चित्रपटाबद्दल डॉक्टरांनी लिहिलं आहे. अनेक ठिकाणी मानसोपचार विषयक शब्द, संकल्पना यांचा ते उल्लेख करतात. हे लेख वाचताना चित्रपट कसे पाहावेत, माणसं कशी पाहावीत याचंच जणू शिक्षण मिळाल्यासारखं मला वाटलं. तुम्ही हे पुस्तक अवश्य वाचावं. यात उल्लेखलेले चित्रपटच नव्हे तर अन्य विविध चित्रपटदेखील या नजरेने पाहावेत. आपलं आयुष्य समृद्ध झाल्याचं समाधान अवश्य मिळतं असं वाटतं.
-सुधांशु नाईक, पुणे. (9833299791)🌿

 *ता. क.:-* जून 2023 मध्यें मी बडोद्याला जाताना वाटेत मुंबईला पुस्तकप्रेमी ग्रुपवरील स्नेही श्रेयाची भेट झालेली. तेंव्हा तिने हे अफलातून पुस्तक भेट दिलं ज्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी एक नवीन नजर लाभली. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून चित्रपट पाहावेत कसे हे उमगलं. त्याबद्दल तिचे खूप खूप आभार.
🌿🌿🌿

पुस्तक परिचय पुस्तकाचे नांव : चॉईसेस, लेखक -लिव्ह उलमन. अनुवाद - मृणाल कुलकर्णी

🌿
पुस्तकप्रेमी समूहाचे पुस्तक परिचय अभियान यासाठी आठवडाभर पुस्तक परिचय दिले होते. त्यातील हा लेख.
आठवडा क्र :....225
पुस्तक क्रमांक: 1578
पुस्तकाचे नांव : चॉईसेस
लेखक : लिव्ह उलमन
मराठी स्वैर अनुवाद : मृणाल कुलकर्णी.
प्रकाशन : ग्रंथाली 
प्रथम आवृत्ती : जुलै 2023, पृष्ठे : 228
किंमत : 350/- रुपये.
परिचयकर्ता : सुधांशु नाईक,पुणे.
दिनांक : 09 ऑक्टोबर 2024

लिव्ह उलमन ही पाश्चात्य अभिनेत्री. तर मृणाल कुलकर्णी ही भारतीय अभिनेत्री. आपल्या क्षेत्रात उत्तम नावलौकिक मिळवलेल्या या दोन कर्तबगार आणि संवेदनशील अभिनेत्री आहेत. दोघीनाही समाजातील दुर्बलाविषयी ममत्व आहे. अभिनयासोबत लेखनादि कला अवगत आहेत. स्वतःच्या हातून लेखन घडत असूनही लिव्हच्या आत्मकथनाविषयी मृणाल कुलकर्णी यांना आकर्षण वाटलं. लिव्हची मानसिक आणि भावनिक आंदोलनं, तिची मनोवस्था समजून घ्यावीशी वाटली, तिच्या आत्मकथनाचा अनुवाद करावा असं वाटलं यातच त्या पुस्तकाचं वेगळेपण आहे असं मला वाटतं.

लिव्हचा जन्म टोकीयो मध्यें झालेला असला तरी ती नॉर्वे मध्यें वाढलेली. युरोपियन सिनेमातून पुढं आलेली. ऑटम सोनाटा, पर्सोना फेस टू फेस सीन्स फ्रॉम मॅरेज, सोफी, द इमिग्रॅण्ट अशा गाजलेल्या चित्रपटातील तिचं काम वाखाणलं गेलं. इंगमार बर्गमनच्या चित्रपटातील कामामुळं ती एकदम प्रकाशझोतात आली. दिग्दर्शक इंगमार आणि अभिनेत्री लिव्ह असं समीकरण रसिकांनी उचलून धरलं होतं.

त्यानंतर पुढे न्यूयॉर्कमध्यें जाऊन तिने तिथंही आपला ठसा उमटवला. चित्रपट, नाटकातील भूमिकांसोबत तिने दिग्दर्शन क्षेत्रात देखील आपलं पाऊल रोवलं आणि लेखनात सुद्धा..! चेंजिंग आणि चॉईसेस ही तिची दोन्ही पुस्तकं गाजली. त्याचबरोबर युनिसेफ साठी ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून काम करताना तिने अनेक देशातून प्रवास केला. विकसनशील देशातील दारिद्रय, युद्ध विध्वन्स, माणुसकी, भवताल, निसर्ग यावर वेळोवेळी पोटतिडिकीने लिहिलं. आपल्या जोडीदाराशी असलेल्या नातेसंबंधावर लिहिलं. खरंतर खूप आरामदायी आयुष्य जगणं शक्य असूनही ती वेगळं जगायचा प्रयत्न करत राहिली.
तिच्या या पुस्तकात, एक स्त्री म्हणून तिच्या मानसिकतेची, आयुष्याकडे पाहण्याची वर्णने येत राहतात. एखाद्या सुप्रसिद्ध स्त्रीकडे जग कसं पाहतं, ती जगाकडे कशी पाहते, तिच्या माणूस म्हणून काय गरजा आहेत, तिला जोडीदाराकडून काय अपेक्षा आहे, त्याच्या सोबतचे ताणेबाणे हे सारं या पुस्तकातून समोर येत राहतं.

*म्हटलं तर हे पुस्तक आहे आणि म्हटलं तर लिव्हची डायरी. तिचं चिंतन, मनातली स्पंदनं मांडणारी.*

तिच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. भावनिक आणि मानसिक संघर्ष अनुभवावे लागले त्याचं प्रतिबिंब म्हणजे हे पुस्तक. कोणतेच ठोकळेबाज निष्कर्ष या पुस्तकाला लावता येत नाहीत. तिचे काही अनुभव तर अगदी घरगुती असे आहेत. आजीची आठवण असो की घरातील कामं करण्याबाबतच्या आठवणी. सगळं वाचताना आपल्याला एक माणूस समोर उलगडत जातोय असं वाटतं…तरीही तिच्या मनातील सगळीच खदखद आपल्याला अजूनही कळली नाही हे उमगतं. 

एके ठिकाणी लिव्ह म्हणते, “ चाळीशीच्या आसपास असलेल्या अनेक स्त्रियांप्रमाणेच मी वाढले. मोठ्या माणसांसमोर कसं वागायचं, स्वयंपाक, भांडी धुणं कसं करायचं याचं शिक्षण मला मिळालं. नॉर्वेतही पिढ्यानपिढ्या मुलींकडून याच अपेक्षा असायच्या तेंव्हा. माझी पिढी त्यातलीच. मात्र 17 वर्षाची असताना, त्या छोटया गावातही वादळ आलं…स्त्री मुक्तीचं.! असं करावं की तसं असे कितीतरी प्रश्न. त्यामुळे सततच्या दुविधेने मी थकून जाई. एकंदरीत माझ्या पिढीचा हा फार गोंधळ झाला. तेंव्हाच्या कल्पनांमधील नावीन्यपूर्ण कल्पना म्हणजे स्त्री लैंगिकतेबाबतच्या तिच्या स्पष्ट कल्पना. आपल्या जाणीवा, मत मांडायचा अधिकार हे मुद्दे तेंव्हा फार चर्चेत होते…. 
आमच्या काळातील बहुतेक मुली केवळ शारीरिक गोष्टीतच अडकून पडल्या. अनेकदा समोर बरेच पर्याय असूनही स्वतःचे निर्णय घेण्याचं धैर्य , स्वतंत्र असूनही माझ्यात नव्हतं. याचे दुष्परिणाम मी आयुष्यभर भोगले. अनेकदा मला इच्छा होते की कालचक्र उलट फिरवावं.पुन्हा छोटीशी मुलगी व्हावं. माझे निर्णय इतरांनी घेण्याआधीची मी व्हावं…”

*जेंव्हा ती असं मनापासून सांगत राहते तेंव्हा ती कुणी दूरची परकीय स्त्री उरत नाही तर आपल्याच आसपास वावरणारी परिचित स्त्री आहे असं वाटत राहतं. तरल संवेदनशील व्यक्ती जेंव्हा प्रसिद्धीच्या झोतात काम करत राहते तेंव्हा तिच्या मनातील खळबळ, आनंद, दुःख, एकाकीपण, उद्वेग, हताशपण, काहीतरी मिळवण्यासाठीच्या धडपडीचा आनंद, त्यातील कृतार्थपण हे सारं बारकाईने न्याहाळत राहवंसं वाटतं. त्या व्यक्तीच्या मनाच्या अथांग डोहात शिरावंसं वाटतं.*

कदाचित याच भावनेतून मृणालताईने एका तीव्र आंतरिक ओढीने या पुस्तकाचा अनुवाद करायचं ठरवलं असावं. 
मृणालताईचं जगणं तर आपल्याला सर्वांनाच ठाऊक. लहानवयात जशी लिव्ह उलमनला प्रसिद्धी मिळाली तशीच प्रसिद्धी वयाच्या 16-17 व्या वर्षी रमाबाई यांच्या भूमिकेमुळे मृणालताईला मिळाली. 
घरातील साहित्यिक वातावरणातून एका चमचमत्या दुनियेत सहज शिरलेली मृणालताई आजही तिथं मोठ्या आत्मविश्वासाने वावरते आहे. शेकडो भूमिकेतून आपला अमीट ठसा उमटवणाऱ्या ताईने निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शनक्षेत्रातही यशस्वी पाऊल रोवलं. तिचा अभिनय आपल्याला अतिशय आवडतोच तरीही या पुस्तकाचा अनुवाद करणारी, ‘ मेकअप उतरवताना..’ सारखं तरल लेखन करणारी मृणालताई मला थोडी अधिक भावते कारण इथं गोनिदांपासून, आई बाबांपासून आलेला तो साहित्यिक आणि संवेदनशील विचारांचा वारसा सहज प्रवाहित होताना दिसतो. मनाला विचारप्रवृत्त करत राहतो. 

अनुवाद करताना लिव्हच्या मूळ आत्मचरित्रातील ताणेबाणे, भावनिक आंदोलने मराठीत देखील तितकीच सशक्तपणे उतरली आहेत असं मला वाटतं.
या आत्मकथनवजा पुस्तकाचा स्वैर अनुवाद करताना ताईच्याही मनात असंख्य प्रश्न उमटले असतील, लिव्हने पाहिलेलं जग आणि मृणालताईने पाहिलेलं जग यात कित्येक बदल असतील आणि काही साम्यसुद्धा. त्यावर तिनं व्यक्त व्हावं, लिहीत राहावं असं वाटतं.

*सार:-* आपल्या कामाच्या निमित्ताने प्रसंगी विविध मुखवटे आपल्याला घ्यावे लागतात. मात्र त्या मुखवट्यामागील माणूस हा सतत संवेदनशील ठेवणं, इतरांविषयी आपल्या मनात कळवळा असणं हे समाजात कितीही उंचीवर पोचलं तरी करता यायला हवं. आपल्यातलं माणूसपण टिकलं पाहिजे. आपण टिकवलं पाहिजे. 
आपल्या कृतीतून ते माणूसपण कसं दाखवता, टिकवता येतं हेच या पुस्तकाच्या लेखिकेने आणि अनुवादकाने दाखवून दिलं आहे असं मला वाटतं.
-सुधांशु नाईक, पुणे. (9833299791)🌿

*ता. क.:-* खरतर मृणालताई कीर्तीने, गुणांनी खूप मोठी आहे. तिला एकेरी संबोधन योग्य नव्हे पण तिच्या आई वीणाताई देव यांनी जी माया लावली, मृणालताईने मोठ्या बहिणीसारखं प्रेम मला दिलं आहे त्यामुळे अहो जाहो करत लिहिणं मलाच अवघड होऊन गेलं. इतक्या मोठ्या व्यक्ती “आपलं मानतात” यातलं सुख, त्याचं ऋण शब्दातीत आहे हेच खरं.

🌿🌿🌿

Friday, 25 October 2024

पुस्तक परिचय: व्हाय मेन डोन्ट लिसन अँड विमेन कान्ट रीड मॅप्स

🌿
*पुस्तकप्रेमी समूहाचे पुस्तक परिचय अभियान यासाठी आठवडाभर दिलेल्या पुस्तक परिचयतील हा लेख 
आजपर्यंत सलग 1579 पुस्तकांचा परिचय... 
आठवडा क्र :....226
पुस्तक क्रमांक: 1579
*पुस्तकाचे नांव : व्हाय मेन डोन्ट लिसन अँड विमेन कान्ट रीड मॅप्स* 
*लेखक : बार्बारा आणि ऍलन पीस*
*मराठी अनुवाद : शुभदा विद्वान्स*
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस 
प्रथम आवृत्ती : मे 2009, पृष्ठे : 122
किंमत : 140/- रुपये.
*परिचयकर्ता : सुधांशु नाईक,पुणे.*
दिनांक : 10 ऑक्टोबर 2024

बार्बारा आणि ऍलन या जोडप्याने लिहिलेलं हे पुस्तक वाचणं म्हणजे एक धमाल अनुभव. स्त्री आणि पुरुषांच्या मानसिकतेवर, वर्तणुकीवर अचूक बोट ठेवणारं आहे हे पुस्तक. शुभदा यांना अनुवाद करताना इथल्या वातावरणानुसार काही प्रसंग टाळावे किंवा बदलावे लागले असं त्यांनी म्हटलं असलं तरी त्यांनी केलेला अनुवाद देखील उत्तम झाला आहे. 

स्त्री पुरुष समानता हा अनेकांच्या आवडीचा विषय असला 
तरी स्त्री आणि पुरुष हे दोघं किती वेगवेगळे आहेत हे अनेक उदाहरणं देत लेखक पटवून देतात. शारीरिक बदलच इतके आहेत की ज्यामुळे आपोआप मानसिकता देखील वेगळी घडते. 
*मानसशास्त्र हा माझ्या आवडीचा विषय. वेगवेगळी माणसं पाहत राहणं, त्यांच्या लकबी, त्यांचं वागणं निरखत बसणं मला आवडतं. छोटासा लेखक असल्यामुळे ही मंडळी लेखनाला, नव्या व्यक्तीरेखा लिहायला खाद्यही पुरवतात. त्यातच हे पुस्तक हाती आल्यावर लोकांकडे पाहायचा माझा दृष्टिकोन काही प्रमाणात नक्कीच बदलून गेला.*


“एकीकडे फोडणी टाकायची आणि दुसरीकडे पटकन भाजी चिरायची…इतकं तर सोपं आहे…” असं जेंव्हा बायको म्हणते, ती तसं रोज करूनही दाखवत असते मात्र जेंव्हा मी करतो तेंव्हा एकाचवेळी सगळं कर असं तिचं ते सांगणं अजिबात पटत नाही तसं करणं मला जमत नाही. त्याऐवजी आधी सगळं नीट चिरून घ्यायचं आणि मग भाजीची एकेक कृती करायची असं मला का वाटतं याचं उत्तर मला या पुस्तकात मिळालं.
दिशा, नकाशे आणि एकदा प्रवास केलेले रस्ते जसे माझ्या लक्षात राहतात तसे तिच्या लक्षात का राहत नाहीत हे ही समजलं. गाडी चालवत असताना दोन्हीकडील आरशात पाहणं, त्याचवेळी मागील बाजू दाखवणारा आरसा पाहणं, इंडिकेटर देणं, ब्रेक - ऍक्सीलेटर वापरणं आणि पाऊस असल्यास सोबत वायपरदेखील… हे सगळं एकावेळी आम्ही पुरुष सहज करू शकत असताना या सगळ्या कृतीबाबत कित्येक बायकांचा का गोंधळ उडतो हेही उमगलं. 

अशा विविध गोष्टींसाठी स्त्री पुरुष एकमेकांना टोचून बोलतात, खिल्ली उडवतात. तर कित्येकदा तो किंवा ती जसं करेल तसंच करायचा अट्टहास दाखवत राहतात.

“ हे तुला जमत कसं नाही रे...., तू काय कामाचा नाहीस…, तुला इतकी साधी अक्कल कशी नाही गं …, हे इतकं साधं तर आहे मग तुम्हा बायकांना का कळत नाही…” अशी सर्रास शेरेबाजी मग दोन्हीकडून होत राहते. सर्वच स्त्री पुरुषांनी हे पुस्तक जर वाचलं तर मग या शेरेबाजीत नक्कीच मोठ्या प्रमाणात घट होईल असं वाटतं.

मुळात स्त्री आणि पुरुषांची शरीरे वेगळी. कार्यरत हार्मोन्स वेगळे. त्यामुळे घडणारी मानसिकता भिन्न. हे आपण समजून घेतलं तर आयुष्याचा प्रवास किती सुखकर होईल ना? स्त्री आणि पुरुषांच्या वेगळेपणातील महत्वाची गोष्ट म्हणजे डोळे. बहुतांश स्त्रियांना समोरच्या व्यक्तीची मानसिक स्थिती न बोलता समजते तर पुरुषांना मात्र, समोरची व्यक्ती बोलल्याशिवाय, रडल्याशिवाय काही समजत नाही. रंगातील सूक्ष्म फरक स्त्रीला जितके चटकन कळतात तितके पुरुषांना कळत नाहीत. कारण बायकांच्या डोळ्यातील पांढरा भाग हा पुरुषांच्या डोळ्यातील भागापेक्षा मोठा असतो. त्यामुळे त्या जास्त आजूबाजूला पाहू शकतात ज्याला ‘ पेरिफेरल व्हिजन’ असं म्हणतात तर पुरुषांना ‘टनेल व्हिजन’ ची देणगी असते त्यामुळे ते जास्त दूरचं पाहू शकतात. शिकार करणाऱ्या आदिमानव काळापासून अशा काही गोष्टी विकसित होत गेल्या आहेत त्या समजून घ्यायला हव्यात.

एखाद्या पुरुषाला एखादा दूरचा पत्ता लगेच शोधता येतो पण फ्रिजमध्ये ठेवलेलं बटर किंवा एखादी वस्तू पटकन सापडत नाही. तर स्त्री बाहेर हॉलमध्यें बसून त्याला ती वस्तू कुठं आहे हे चटकन सांगून टाकते. पुरुष एखाद्या स्त्रीकडे जितक्या वेळा पाहतो त्यापेक्षा जास्त वेळा खरंतर स्त्री पाहते. मात्र तिच्या भिरभिरत्या नजरेमुळे त्या शक्यतो पकडल्या जात नाहीत. 
प्रत्यक्ष एखादी गोष्ट पाहिल्याविना पुरुष शक्यतो विश्वास ठेवत नाहीत तर स्त्रिया मात्र गॉसिप करताना एखादी गोष्ट स्वतःच पाहिल्यासारखं तपशीलवार वर्णन करत राहतात.
आपली कार रिव्हर्स पार्क करताना अनेकदा पुरुष चटकन पार्क करू शकतात तर स्त्रियांना खूपदा टेन्शन येतं.

प्रणयक्रीडेत देखील स्त्रीचं वागणं आणि पुरुषाचं वागणं यात फरक असतोच की. आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग च्या तत्वानुसार विरुद्ध ध्रुवामध्यें आकर्षण असतं. तसंच असायला हवं ना..? 
स्त्रियांमध्ये असणारं एस्ट्रॉजेन हे हार्मोन आणि पुरुषातील टेस्टेस्टेरोंन त्यांच्या अनेक कृतीवर कसं परिणाम करतं याची अशी काही उदाहरणं देत आपले मुद्दे लेखक पटवून देतात. हे छोटेखानी पुस्तक आपल्याला विज्ञानाची कास धरून नात्याकडे, समोरच्या व्यक्तीकडे पाहायला वेगळा नजरिया देतं. तेही सहज सोप्या भाषेत. म्हणूनच एकदा तरी हे पुस्तक सर्वांनी वाचायला हवंच.

*सार :* स्त्री आणि पुरुष गेली हजारो वर्षे एकत्र येताहेत. काळानुसार त्यात काही ना काही उत्क्रांती जरूर होत गेली पण काही पायाभूत गोष्टी तशाच उरल्या. आपण त्या समजून घेऊन जगायला हवं. त्याला काय हवं हे तिनं आणि तिला काय हवं हे त्यानं जसं समजून घ्यायला हवं तसंच निसर्गत: आपल्यात काय फरक आहे हेही दोघांनी समजून घेतलं तर सहजीवन आनंददायी होतं अन्यथा मग कुणा एकाची फरफट होत राहते. आयुष्यात हवाहवासा सहचर सर्वांना मिळो आणि सर्वांचं सहजीवन सुखी व्हावं इतकीच प्रार्थना.
-सुधांशु नाईक, पुणे (9833299791)🌿

*ता. क.:-* राशीचक्र सारख्या कार्यक्रमात राशींचा आधार घेत शरदजी उपाध्ये खूप गमतीजमती सांगायचे. त्यात एकमेकांच्या आयुष्यातील गंमती ऐकताना कधी तो आणि कधी ती खळखळून हसायचे. हे पुस्तक तुम्हाला नक्की तसा अनुभव देईल. हसता हसता काही अचूक धडे देऊन जाईल असं मला वाटतं.
🌿🌿🌿