marathi blog vishwa

Friday, 25 October 2024

पुस्तक परिचय: व्हाय मेन डोन्ट लिसन अँड विमेन कान्ट रीड मॅप्स

🌿
*पुस्तकप्रेमी समूहाचे पुस्तक परिचय अभियान यासाठी आठवडाभर दिलेल्या पुस्तक परिचयतील हा लेख 
आजपर्यंत सलग 1579 पुस्तकांचा परिचय... 
आठवडा क्र :....226
पुस्तक क्रमांक: 1579
*पुस्तकाचे नांव : व्हाय मेन डोन्ट लिसन अँड विमेन कान्ट रीड मॅप्स* 
*लेखक : बार्बारा आणि ऍलन पीस*
*मराठी अनुवाद : शुभदा विद्वान्स*
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस 
प्रथम आवृत्ती : मे 2009, पृष्ठे : 122
किंमत : 140/- रुपये.
*परिचयकर्ता : सुधांशु नाईक,पुणे.*
दिनांक : 10 ऑक्टोबर 2024

बार्बारा आणि ऍलन या जोडप्याने लिहिलेलं हे पुस्तक वाचणं म्हणजे एक धमाल अनुभव. स्त्री आणि पुरुषांच्या मानसिकतेवर, वर्तणुकीवर अचूक बोट ठेवणारं आहे हे पुस्तक. शुभदा यांना अनुवाद करताना इथल्या वातावरणानुसार काही प्रसंग टाळावे किंवा बदलावे लागले असं त्यांनी म्हटलं असलं तरी त्यांनी केलेला अनुवाद देखील उत्तम झाला आहे. 

स्त्री पुरुष समानता हा अनेकांच्या आवडीचा विषय असला 
तरी स्त्री आणि पुरुष हे दोघं किती वेगवेगळे आहेत हे अनेक उदाहरणं देत लेखक पटवून देतात. शारीरिक बदलच इतके आहेत की ज्यामुळे आपोआप मानसिकता देखील वेगळी घडते. 
*मानसशास्त्र हा माझ्या आवडीचा विषय. वेगवेगळी माणसं पाहत राहणं, त्यांच्या लकबी, त्यांचं वागणं निरखत बसणं मला आवडतं. छोटासा लेखक असल्यामुळे ही मंडळी लेखनाला, नव्या व्यक्तीरेखा लिहायला खाद्यही पुरवतात. त्यातच हे पुस्तक हाती आल्यावर लोकांकडे पाहायचा माझा दृष्टिकोन काही प्रमाणात नक्कीच बदलून गेला.*


“एकीकडे फोडणी टाकायची आणि दुसरीकडे पटकन भाजी चिरायची…इतकं तर सोपं आहे…” असं जेंव्हा बायको म्हणते, ती तसं रोज करूनही दाखवत असते मात्र जेंव्हा मी करतो तेंव्हा एकाचवेळी सगळं कर असं तिचं ते सांगणं अजिबात पटत नाही तसं करणं मला जमत नाही. त्याऐवजी आधी सगळं नीट चिरून घ्यायचं आणि मग भाजीची एकेक कृती करायची असं मला का वाटतं याचं उत्तर मला या पुस्तकात मिळालं.
दिशा, नकाशे आणि एकदा प्रवास केलेले रस्ते जसे माझ्या लक्षात राहतात तसे तिच्या लक्षात का राहत नाहीत हे ही समजलं. गाडी चालवत असताना दोन्हीकडील आरशात पाहणं, त्याचवेळी मागील बाजू दाखवणारा आरसा पाहणं, इंडिकेटर देणं, ब्रेक - ऍक्सीलेटर वापरणं आणि पाऊस असल्यास सोबत वायपरदेखील… हे सगळं एकावेळी आम्ही पुरुष सहज करू शकत असताना या सगळ्या कृतीबाबत कित्येक बायकांचा का गोंधळ उडतो हेही उमगलं. 

अशा विविध गोष्टींसाठी स्त्री पुरुष एकमेकांना टोचून बोलतात, खिल्ली उडवतात. तर कित्येकदा तो किंवा ती जसं करेल तसंच करायचा अट्टहास दाखवत राहतात.

“ हे तुला जमत कसं नाही रे...., तू काय कामाचा नाहीस…, तुला इतकी साधी अक्कल कशी नाही गं …, हे इतकं साधं तर आहे मग तुम्हा बायकांना का कळत नाही…” अशी सर्रास शेरेबाजी मग दोन्हीकडून होत राहते. सर्वच स्त्री पुरुषांनी हे पुस्तक जर वाचलं तर मग या शेरेबाजीत नक्कीच मोठ्या प्रमाणात घट होईल असं वाटतं.

मुळात स्त्री आणि पुरुषांची शरीरे वेगळी. कार्यरत हार्मोन्स वेगळे. त्यामुळे घडणारी मानसिकता भिन्न. हे आपण समजून घेतलं तर आयुष्याचा प्रवास किती सुखकर होईल ना? स्त्री आणि पुरुषांच्या वेगळेपणातील महत्वाची गोष्ट म्हणजे डोळे. बहुतांश स्त्रियांना समोरच्या व्यक्तीची मानसिक स्थिती न बोलता समजते तर पुरुषांना मात्र, समोरची व्यक्ती बोलल्याशिवाय, रडल्याशिवाय काही समजत नाही. रंगातील सूक्ष्म फरक स्त्रीला जितके चटकन कळतात तितके पुरुषांना कळत नाहीत. कारण बायकांच्या डोळ्यातील पांढरा भाग हा पुरुषांच्या डोळ्यातील भागापेक्षा मोठा असतो. त्यामुळे त्या जास्त आजूबाजूला पाहू शकतात ज्याला ‘ पेरिफेरल व्हिजन’ असं म्हणतात तर पुरुषांना ‘टनेल व्हिजन’ ची देणगी असते त्यामुळे ते जास्त दूरचं पाहू शकतात. शिकार करणाऱ्या आदिमानव काळापासून अशा काही गोष्टी विकसित होत गेल्या आहेत त्या समजून घ्यायला हव्यात.

एखाद्या पुरुषाला एखादा दूरचा पत्ता लगेच शोधता येतो पण फ्रिजमध्ये ठेवलेलं बटर किंवा एखादी वस्तू पटकन सापडत नाही. तर स्त्री बाहेर हॉलमध्यें बसून त्याला ती वस्तू कुठं आहे हे चटकन सांगून टाकते. पुरुष एखाद्या स्त्रीकडे जितक्या वेळा पाहतो त्यापेक्षा जास्त वेळा खरंतर स्त्री पाहते. मात्र तिच्या भिरभिरत्या नजरेमुळे त्या शक्यतो पकडल्या जात नाहीत. 
प्रत्यक्ष एखादी गोष्ट पाहिल्याविना पुरुष शक्यतो विश्वास ठेवत नाहीत तर स्त्रिया मात्र गॉसिप करताना एखादी गोष्ट स्वतःच पाहिल्यासारखं तपशीलवार वर्णन करत राहतात.
आपली कार रिव्हर्स पार्क करताना अनेकदा पुरुष चटकन पार्क करू शकतात तर स्त्रियांना खूपदा टेन्शन येतं.

प्रणयक्रीडेत देखील स्त्रीचं वागणं आणि पुरुषाचं वागणं यात फरक असतोच की. आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग च्या तत्वानुसार विरुद्ध ध्रुवामध्यें आकर्षण असतं. तसंच असायला हवं ना..? 
स्त्रियांमध्ये असणारं एस्ट्रॉजेन हे हार्मोन आणि पुरुषातील टेस्टेस्टेरोंन त्यांच्या अनेक कृतीवर कसं परिणाम करतं याची अशी काही उदाहरणं देत आपले मुद्दे लेखक पटवून देतात. हे छोटेखानी पुस्तक आपल्याला विज्ञानाची कास धरून नात्याकडे, समोरच्या व्यक्तीकडे पाहायला वेगळा नजरिया देतं. तेही सहज सोप्या भाषेत. म्हणूनच एकदा तरी हे पुस्तक सर्वांनी वाचायला हवंच.

*सार :* स्त्री आणि पुरुष गेली हजारो वर्षे एकत्र येताहेत. काळानुसार त्यात काही ना काही उत्क्रांती जरूर होत गेली पण काही पायाभूत गोष्टी तशाच उरल्या. आपण त्या समजून घेऊन जगायला हवं. त्याला काय हवं हे तिनं आणि तिला काय हवं हे त्यानं जसं समजून घ्यायला हवं तसंच निसर्गत: आपल्यात काय फरक आहे हेही दोघांनी समजून घेतलं तर सहजीवन आनंददायी होतं अन्यथा मग कुणा एकाची फरफट होत राहते. आयुष्यात हवाहवासा सहचर सर्वांना मिळो आणि सर्वांचं सहजीवन सुखी व्हावं इतकीच प्रार्थना.
-सुधांशु नाईक, पुणे (9833299791)🌿

*ता. क.:-* राशीचक्र सारख्या कार्यक्रमात राशींचा आधार घेत शरदजी उपाध्ये खूप गमतीजमती सांगायचे. त्यात एकमेकांच्या आयुष्यातील गंमती ऐकताना कधी तो आणि कधी ती खळखळून हसायचे. हे पुस्तक तुम्हाला नक्की तसा अनुभव देईल. हसता हसता काही अचूक धडे देऊन जाईल असं मला वाटतं.
🌿🌿🌿

No comments:

Post a Comment