*पुस्तकप्रेमी समूहाचे पुस्तक परिचय अभियान यासाठी आठवडाभर दिलेल्या पुस्तक परिचयातील हा लेख.
आजपर्यंत सलग 1580 पुस्तकांचा परिचय
आठवडा क्र :....226
पुस्तक क्रमांक: 1580
पुस्तकाचे नांव : मी अल्बर्ट एलीस
लेखक : अंजली जोशी
प्रकाशन : शब्द प्रकाशन
प्रथम आवृत्ती : 2009.
(सध्या 18 वी आवृत्ती उपलब्ध.)
किंमत : 425/- रुपये.
*परिचयकर्ता : सुधांशु नाईक,पुणे.*
दिनांक : 11 ऑक्टोबर 2024
*प्रास्ताविक :* मानसशास्त्राचा अभ्यास म्हणजे जणू एक महासागर. शास्त्रीय माहिती, वेगवेगळ्या थिअरीज, विविध प्रयोग हे सगळं अभ्यासणे फार सुखद अनुभव असतो पण तरीही आपल्याला मानसशास्त्र कळलंय असं वाटत नाही. भेटणारा - दिसणारा - ऐकलेला - वाचलेला प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि त्याची मानसिकता देखील. म्हणूनच माणसाच्या कृतिमागील विचार समजून घेणं क्रमप्राप्त ठरतं.
फ्रॉईड, अरोन बेक, स्किनर, कार्ल रॉजर्स आदि मानसोपचार तज्ज्ञ मंडळींनी विविध सिद्धांत आणि अभ्यास मांडले. या मानसतज्ज्ञ मंडळींमध्ये डॉ.अल्बर्ट एलीस हे एक नांव खास जागा टिकवून आहे. त्यांचं नांव टाळता न येण्यासारखंच. त्यांच्याविषयी आहे आजचा पुस्तकपरिचय.
*आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्यें देखील मनाला सर्वाधिक महत्वाचं मानलं गेलं आहे. पतंजलीची योगसूत्रे असोत, गीता असो वा समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक… लोकांनी मनावर विजय मिळवावा, ज्यायोगे समाज अधिकाधिक कार्यक्षम होईल असं त्यांना वाटतं. याच भावनेतून आजपर्यंत 5 दिवस मानसशास्त्र समोर ठेऊन काही परिचय मांडले, त्यातील हा आजचा शेवटचा. हे सारे तुम्हाला कंटाळवाणे वाटले नसावेत असं वाटतं. उद्या आणि परवा काहीतरी वेगळं द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन.*
डॉ. अल्बर्ट एलीस आणि त्यांनी निर्माण केलेली विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धत अर्थात REBT (रॅशनल इमोटिव्ह बिहेविरल थेरपी) ही एक अतिशय लोकप्रिय गोष्ट. केवळ मानसोपचार नव्हे तर रोजच्या जगण्यातील विविध प्रसंगी ही विचारधारा उपयुक्त ठरत असल्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोचली आहे.
इतकंच नव्हे तर कामशास्त्राचा देखील त्यांनी खोलवर अभ्यास केला. स्त्री आणि पुरुषाच्या कामभावना वेगवेगळ्या असतात, त्यांच्या आवडी आणि क्रीडा वेगळ्या असतात. हे सारं हार्मोन्सशी जितकं संबंधित असतं तितकंच ते घडलेल्या काही घटनांशीही संबंधित असतं असं ते सांगायचे. स्वतःच्या कामविषयक अनुभवांना देखील त्यांनी खुलेपणे मांडलं. लैंगिक जाणीवा आणि संबंध यावर अधिक मोकळेपणाने चर्चा केली. लोकांचे सेक्सुअल प्रॉब्लेम सोडवण्यासाठी देखील उत्तम मार्गदर्शन केलं.
मात्र सुरुवातीला अल्बर्टना यासाठी अतिशय लढा द्यावा लागला होता. त्यांच्या आयुष्याचं दर्शन घडवणारं हे चरित्र.
भारतातील ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ कि. मो. फडकेसरांनी डॉ. अल्बर्ट एलीस विषयी प्रथम लिहिलं. त्यांचा डॉ. अल्बर्ट एलीस यांच्याशी 1966 पासून उत्तम संवाद होता. त्या आधारे त्यांनी विपुल लेखन केलं. अल्बर्टच्या REBT विषयक विचारानं प्रभावित होऊन त्यांनी पुस्तकाला देखील हात घातला. ते काम त्यांनी आणि त्यांची विद्यार्थिनी अंजली जोशी यांनी मनावर घेतलं. “ अल्बर्ट एलीस : एक विचारदर्शन” असं त्या पुस्तकाचं नांव. जे नंतर 2016 मध्यें प्रकाशित झालं. ( त्याचाही फोटो सोबत जोडला आहे.) अल्बर्टविषयी समजल्यावर, अभ्यास केल्यावर प्रभावित होऊन अंजली जोशी यांना हे चरित्र लिहावंसं वाटलं.
हा बंडखोर आणि लढाऊ वृत्तीच्या मानसोपचार तज्ज्ञ कसा होता, त्यानं ही निर्मिती कशी केली, त्याचं आयुष्य कसं होतं हे सांगणारं चरित्र तुफान लोकप्रिय झालं.
1956 मध्यें शिकागो मधील एका वार्षिक अधिवेशनात अनेक दिग्गज मानसोपचार तज्ज्ञ जमलेले असताना अल्बर्टने तिथं बंडाचा झेंडा फडकवत “विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्रा”विषयी शोधनिबंध साजरा केला. त्यानं केलेलं धडाकेबाज सादरीकरण पाहून तिथं मोठा गोंधळ उडाला. कारण या थेयरीमुळे सायकोथेरपीमधील अनेक सिद्धांताना त्यानं बाजूला केलं होतं..आणि एक नवीन विचारधारा अस्तित्वात आणली!
डॉ.अल्बर्ट एलीस यांचं बालपण अजिबात सुखकर नव्हतं. एकतर त्यांची सतत आजारपणे सुरु असायची किंवा घरातील आई- वडिलांच्या बेफिकीर वृत्तीमुळे आर्थिक अडचणी. आई वडिलांच्या घटस्फोटानंतर तर त्यांनी सूत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली. प्रसंगी लहानमोठ्या नोकऱ्या केल्या. त्यातच कॅरल नावाच्या युवतीसोबत प्रेमसंबंध जुळले आणि लग्न केलं पण तिच्या घरून असलेल्या विरोधामुळं ते लगेचच मोडलं. पुढे वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी “ Love and marriage problems institute ( LAMP) या संस्थेची स्थापना तर केली पण मानसशास्त्रीय पदवी नसल्याने अडचणी येऊ लागल्या. मग त्यांनी तीही पदवी मिळवली. “फ्रॉईडच्या सायकोअनालिसिस” पद्धतीनुसार मनोविश्लेषणतज्ञ म्हणून कामं सुरु केली पण लवकरच त्यांना त्यात अनेक त्रुटी जाणवू लागल्या.
आजवर केलेला अभ्यास, विविध लोकांना केलेलं मार्गदर्शन, त्यांच्या प्रतिक्रिया यातूनच मग REBT चा जन्म झाला. त्याचबरोबर कामशास्त्राचा अभ्यास करून ते त्यातील तज्ज्ञ म्हणूनही लोकांना मार्गदर्शन करू लागले.
1956 मध्यें त्यांनी आपला शोधनिबंध सादर केला आणि 1959 मध्यें इन्स्टिटयूट फॉर रॅशनल लिव्हिंग या संस्थेची स्थापना केली. पुढे या संस्थेचे नांव बदलून अल्बर्ट एलीस इन्स्टिटयूट असं ठेवलं गेलं.
या दरम्यान त्यांचा दुसरा विवाहदेखील अपयशी ठरला. जेनेट या त्यांच्या सहकारी स्त्रीसोबत मग त्यांचे प्रेमसंबंध जुळले आणि तब्बल 37 वर्षं त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिप जपली.
जगासमोर ही थियरी आणणं, आपले शोधनिबंध पटवून देणं यासाठी अत्यंत धडाकेबाज काम करणाऱ्या डॉ. अल्बर्ट यांनी आधी स्वतःवर खूप काम केलं.
सतत कामात वेळकाढूपणा करायची त्यांना सवय होती. यासाठी 5 min plan सारखं तंत्र निर्माण केलं. “ लोक काय म्हणतील?” या प्रश्नाला आपण घाबरतो तसेच तेही घाबरत. मात्र यावर मात करत त्यांनी स्वतःला कणखर केलं. त्यांना विविध तरुणीशी बोलायला भीती वाटायची. यावर मात करण्यासाठी मग त्यांनी सार्वजनिक उद्यानं, अन्य जागी कोणत्याही तरुणीशी थेट बोलायला सुरुवात केली. हळूहळू भीतीवर मात केली. इतकंच नव्हे तर पुढे अनेक तरुणी त्यांच्याशी बोलायला कायम उत्सुक असायच्या.
REBT पाहता पाहता अतिशय लोकप्रिय झाली. कार्ल रॉजर्स आणि फ्रॉईडनंतर थेट डॉ. अल्बर्ट यांचं नांव आजतागायत लोकांच्या ओठी आहे ते यामुळेच.
*या थेयरीचा अभ्यास करताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे अन्य थेयरी या विविध कारणाना महत्व देतात. बालपणी काय घडलं, एखाद्या घटनेचा किंवा व्यक्तीचा चांगला किंवा वाईट प्रभाव इत्यादी. मात्र डॉ. अल्बर्ट यांची थियरी आपल्या समस्येचे मूळ हे इतर कशातही नसून समस्येकडे अशास्त्रीय दृष्टिकोनाने पाहणं आणि आपल्या अवास्तव विचारात आहे असं मानते. माणसाला तर्कशुद्ध आणि प्रॅक्टिकल वागता आलं तर अनेक समस्या सुटू शकतात यावर भर देते...!*
अस्वस्थता, नैराश्य, OCD समस्या, भीती, न्यूनगंड किंवा अहंगंड, एखाद्या घटनेच्या तीव्र आघाताने हादरलेली मनोवस्था ( post traumatic disorder) आदि मानसिक समस्यावर REBT अतिशय उत्तम असल्याचं तज्ज्ञ मानतात. त्यातच congitive हा भाग जोडून घेत आजकाल RECBT असेंही उपचार केले जातात. या उपचार पद्धतीतील ABCDE टप्पे आपल्याला समस्येबाबत वस्तुनिष्ठ विचार करायला भाग पाडतात.
जगभर जी मानसोपचार थियरी आज मानली जाते त्या डॉ. अल्बर्ट एलीस यांचं हे चरित्र छान ओघवत्या भाषेत लिहिलं आहे. त्यामुळे ते अधिकाधिक लोकांना आवडलं नसतं तरच नवल होतं.
*सार:-* आपल्या रोजच्या जगण्यातील सर्वाधिक महत्वाचा घटक म्हणजे मन. पण ते असतं कुठं हेच आपल्याला ठाऊक नसतं. ज्या मनाला समर्थ रामदास “अचपळ मन..” असं म्हणतात ते मेंदूसह अवघ्या शरीरभर सर्व पेशी पेशीतून असतंच. आपल्या मनाला आधी आपण समजून घ्यायला हवं…मग अपेक्षा करावी कीं इतरांनी देखील माझं मन समजून घ्यावं. मनोव्यापार, मनोकायिक आजार या सगळ्याच्या अभ्यासात RECBT चा अभ्यास करणं अपरिहार्य आहे! म्हणूनच डॉ. एलीस यांना मानाचा मुजरा करावासा वाटतो.
-सुधांशु नाईक, पुणे (9833299791)🌿
*ता. क.:-* कर्वे इन्स्टिटयूटच्या बाया कर्वे स्त्री शिक्षण आणि संशोधन केंद्रात जेंव्हा अभ्यासासाठी प्रवेश घेतला तेंव्हा तिथल्या शिक्षकांच्या प्रेमळ सहवासाने भारावून गेलो. आजवर मानसशास्त्र विषयी वाचलं खूप होतं पण डॉ. पल्लवी कासंडे- मोहाडीकर, रश्मी पटवर्धन, तन्वी गाडगीळ आदींनी डॉ. अल्बर्टसह अन्य तज्ज्ञ आणि त्यांच्या मानसोपचार पद्धती याबद्दल खूप प्रॅक्टिकली शिकवलं. छोटया छोटया ऍक्टिव्हिटीमधून प्रयोग करायला उदयुक्त केलं. संस्थेच्या विविध उपक्रमात सामील करून घेतलं. त्यामुळेच वयाच्या पन्नाशीतदेखील हा विषय अधिक खोलवर जाऊन शिकता आला…त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. 🙏🏼
🌿🌿🌿
No comments:
Post a Comment