*पुस्तकप्रेमी समूहाचे पुस्तक परिचय अभियान* यासाठी दिलेल्या पुस्तक परिचयातील एक लेख.
आजपर्यंत सलग 1576 पुस्तकांचा परिचय...!
आठवडा क्र :....226
पुस्तक क्रमांक: 1576
पुस्तकाचे नांव : Dibs In search of self
लेखक : Virginia Axline
प्रकाशन : Ballantine Books, New york.
प्रथम आवृत्ती : 1967, पृष्ठे : 220
किंमत : 499/- रुपये.
*परिचयकर्ता : सुधांशु नाईक, पुणे.*
*दिनांक : 07 ऑक्टोबर 2024*
स्वतःला शोधणं ही खरंच आयुष्यातील सर्वात मोठी गरज. सगळ्यांनाच ते जमतं असं नाही. एक
लहान मूल स्वतःला शोधू पाहातं त्याची कहाणी सांगणारं हे सुरेख पुस्तक.
पुस्तकाच्या लेखिका व्हर्जिनिया या स्वतः मानसशास्त्राच्या अभ्यासक. इतकंच नव्हे तर ‘प्ले थेरपी’ बाबत त्यांचं लेखन जगभर नावाजलेले. या थेरपीबाबत नुसतं लेखनच नव्हे तर त्यांनी केलेले विविध प्रयोग हेही चर्चेचा विषय ठरलेले. त्यातीलच एका प्रयोगाची गाथा म्हणजे हे पुस्तक.
मित्रहो, बालमानसशास्त्र हा आपल्या अनेकांचा आवडीचा विषय. फक्त समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञच नव्हे तर प्रत्येक पालकांसाठी आवश्यक असाच विषय.
मुलांचं विश्व वेगळंच. कधी हसरा तर कधी उदास, कधी खेळकर तर कधी गंभीर अशा अनेक मनोवस्था आपण हरघडी एकाच मुलामध्ये पहात असतो. डिब्ज हा असाच एक मुलगा. वाहत्या पाण्याला अचानक कुणीतरी बांध घालावा आणि ते पाणी स्तब्ध होऊन जावं, तसा स्तब्ध झालेला.
शाळेत तो कुणाशीही एक अक्षरदेखील बोलत नसे. शांतपणे सगळ्यांना न्याहाळत बसे. आपल्याच मर्जीने वर्गात इकडे तिकडे फिरत राही. कधी बाकाखाली जाऊन बसून राही. त्याच्याशी इतर मुलामुलींनी बोलायचे अनेक प्रयत्न केले तरी परिणाम शून्य. लंच बॉक्स खातानाही तो एकटाच बसे.
वर्गात आल्यावर त्याची शिक्षिका त्याला आत घेऊन येई. प्रसंगी त्याचा रेनकोट वगैरे काढून ठेवी. पण तो चकार शब्द काढत नसे.
शाळा सुटताच मात्र तो हिंस्त्र होऊन जाई. त्याला अजिबातच घरी जायचं नसे. आरडाओरडा, आकांडतांडव हे सारं रोजचंच. शिक्षकांनी, आई वडिलांनी विविध प्रकारे समजावून देखील त्याच्याकडून प्रतिसाद शून्य. सर्वांना वाटे हा गतिमंद मुलगा आहे आणि याची रवानगी आता विशेष शाळेतच करायला हवी.
त्याच्या वर्गावर शिकवणाऱ्या शिक्षकांपैकी मिस जेन आणि मिस हेडा या दोघीना मात्र तो गतिमंद नाही याची काही प्रमाणात खात्रीच होती. अधूनमधून अचानक दिसणारी त्याची एखादी कृती, बारकाईने विविध गोष्टींचं निरीक्षण करण्यात रमणारा तो… त्याच्याबद्दल त्यांना नेहमीच काहीतरी गूढ वाटे. मात्र प्रेमानं सांगून, रागावून देखील त्यात कोणताच फरक पडत नव्हता. अखेर त्याला समुपदेशन आणि मानसोपचार द्यायला हवेत असं ठरवून मग लेखिकेकडे सोपवलं जातं. दर गुरुवारी त्याला एक तास तिच्यासोबत यापुढे घालवायचा असतो.
इथून सुरु होतो एक प्रवास प्ले थेरपीचा. तोंडातून एक अक्षरदेखील न काढणाऱ्या डिब्जला घेऊन ती समुपदेशन कक्षात येते. तिथं विविध खेळ, वाळू, ड्रॉईंगसाठी बोर्ड आणि कागद, रंग वगैरे बरंच काही असतं. ती त्याला सांगते, हे सगळं आजपासून तुझं आहे. तुला जे हवं ते कर.
तो काहीही बोलत नाही. मात्र हरखून जाऊन बराच वेळ एकेक गोष्ट न्याहाळत बसतो. हळूहळू दिवस जात असतात. काही आठवडे जातात.
मग “ डिब्ज ला खेळावंसं वाटतंय…”, “डिब्ज ला रंग हवे आहेत…”, “ हे खूप छान आहे, डिब्जला आवडलं..” अशा सारखी विविध वाक्य तो स्वतःशी पुटपुटत आहे हे तिला उमगतं.
त्यानंतर हळूहळू तो तिला विविध प्रश्न विचारू लागतो. “डिब्ज ने काय करावं?” “ डिब्जचा कोट काढून देणार का..?”
त्यानंतर डिब्ज म्हणजेच मी हे त्याला उमगू लागतं. तिथं एक खेळ त्यातील पात्रे तो तयार करतो. खेळण्यातील सैनिक, माणसं यांना नावं देतो. हा डिब्ज, ही आई, हे बाबा, ही लहान बहीण…इत्यादी इत्यादी…
खेळताना कधी तो, “मला हे हवंय, “मी आई बाबांना मरून टाकणार आहे… असं बोलू लागतो. आणि हळूहळू त्याचं बोलणं हळूहळू सुरु होतं. मात्र या सगळ्या प्रवासात घरी जायला असलेली त्याची नाराजी कायम राहते. फक्त त्याचा हिंस्त्रपणा कमी होत जातो. घरी जाणं अपरिहार्य आहे हे त्याला उमगू लागतं…तो ते स्वीकारतो.
पुढे जाऊन आता तो घरातलं सगळं तिला सांगू लागतो. त्याच्या घराच्या खिडकीत आलेली झाडाची फांदी, त्यावरील पक्षी, तिथला माळीमामा, बाबांनी तोडायला लावलेली ती फांदी…असं बरंच बोलू लागतो. त्याच्या घरातील पुस्तकांविषयी बोलतो. आमच्या घरात बाबांनी मला सगळी खेळणी आणून दिलीयत हे सांगतो आणि त्याचबरोबर मला रूमचं दार बंद करणं आणि कुलूप लावून ठेवणं याचा तिरस्कार वाटतो हेही सांगतो.
आई बाबा, शेजारी आणि शिक्षक या सर्वांना गतिमंद वाटणाऱ्या, एखादं सुरवंट वाटणाऱ्या डिब्जचं पाहता पाहता फुलपाखरात रूपांतर होतं.
समुपदेशन क्षेत्रात थोडीशी धडपड करू पाहाणाऱ्या मला सर्वाधिक काय भावलं असेल तर व्हर्जिनिया यांचं वागणं आणि बोलणं. त्या एकदाही त्याला हे कर, ते करू नको, हे चूक, ते बरोबर…असं काहीही सांगत नाहीत.
उदाहरणार्थ एखादी खेळण्यातील लहान बाहुली हातात घेऊन जेंव्हा डिब्ज म्हणतो, “ ही माझी बहीण..हिला दूर वाळूत गाडून टाकावंसं वाटतं…पण सध्या नको.. “
तेंव्हा त्या म्हणतात, “ डिब्जला वाटतंय बहिणीला वाळूत गाडून टाकावं. पण तो सध्या तसं तो करणार नाहीये.”
संपूर्ण पुस्तकभर त्या फक्त त्याचीच वाक्ये रिपीट करत राहतात. प्रसंगी त्याचीच वाक्य त्याला थोडंसं फेरफार करून ऐकवत राहतात.
डिब्ज हुशार आहे, विचार करू शकतो, उत्तम लिहू - बोलू शकतो फक्त त्यानं स्वतःतलं सगळं काही स्वतःच्या आतमध्ये दडपून ठेवलं आहे. हे असं का…या प्रश्नाचा छडा लावणं त्याना जास्त महत्वाचं वाटतं. त्याच्याकडून कुणाशीच संवाद साधला जात नाहीये कारण त्याच्या मनात संवादाविषयीं राग, नकारात्मक भावना आहे हे त्यांना उमगतं. आणि त्याच्या मनात संवादविषयीं त्या पुन्हा उत्सुकता, ओढ निर्माण करतात. एकेकाळी प्ले थेरपीचा तो एक तास सम्पल्यावर घरी जायला नाखूष असलेला डिब्ज पुढे जाऊन सामान्य मुलांप्रमाणे वागू लागतो का वगैरे प्रश्नाची उत्तरं तुम्हाला पुस्तक वाचताना समजून घेता येतीलच.
*सार :-* समुपदेशन करताना आपण कसं वागलं पाहिजे हे जसं हे पुस्तक वाचताना कळतं तसंच पालक म्हणून आपण काय करायला हवं, काय करू नये हेही समजतं. शिक्षकांनी मुलांशी कसं वागावं हे जसं समजतं तसंच मुलं अतिशय छोटया गोष्टींचंदेखील किती बारकाईने निरीक्षण करतात, लहानशा संवादाचे देखील त्त्यांच्या मनावर किती खोलवर परिणाम होतात हे उमगतं. आपल्याला खूप काही कळत असलं तरी अजून किती काय काय समजून घ्यायला हवं अशी जाणीव करून देणारं हे पुस्तक म्हणूनच वाचायला हवं.
-सुधांशु नाईक, पुणे (9833299791)🌿
ता. क.:-शुचिता नांदापूरकर फडके या आमच्या ताईने हे पुस्तक वाचायला उदयुक्त केलं याबद्दल तिचे मनापासून आभार.
🌿
No comments:
Post a Comment