marathi blog vishwa

Saturday, 26 October 2024

पुस्तक परिचय पुस्तकाचे नांव : चॉईसेस, लेखक -लिव्ह उलमन. अनुवाद - मृणाल कुलकर्णी

🌿
पुस्तकप्रेमी समूहाचे पुस्तक परिचय अभियान यासाठी आठवडाभर पुस्तक परिचय दिले होते. त्यातील हा लेख.
आठवडा क्र :....225
पुस्तक क्रमांक: 1578
पुस्तकाचे नांव : चॉईसेस
लेखक : लिव्ह उलमन
मराठी स्वैर अनुवाद : मृणाल कुलकर्णी.
प्रकाशन : ग्रंथाली 
प्रथम आवृत्ती : जुलै 2023, पृष्ठे : 228
किंमत : 350/- रुपये.
परिचयकर्ता : सुधांशु नाईक,पुणे.
दिनांक : 09 ऑक्टोबर 2024

लिव्ह उलमन ही पाश्चात्य अभिनेत्री. तर मृणाल कुलकर्णी ही भारतीय अभिनेत्री. आपल्या क्षेत्रात उत्तम नावलौकिक मिळवलेल्या या दोन कर्तबगार आणि संवेदनशील अभिनेत्री आहेत. दोघीनाही समाजातील दुर्बलाविषयी ममत्व आहे. अभिनयासोबत लेखनादि कला अवगत आहेत. स्वतःच्या हातून लेखन घडत असूनही लिव्हच्या आत्मकथनाविषयी मृणाल कुलकर्णी यांना आकर्षण वाटलं. लिव्हची मानसिक आणि भावनिक आंदोलनं, तिची मनोवस्था समजून घ्यावीशी वाटली, तिच्या आत्मकथनाचा अनुवाद करावा असं वाटलं यातच त्या पुस्तकाचं वेगळेपण आहे असं मला वाटतं.

लिव्हचा जन्म टोकीयो मध्यें झालेला असला तरी ती नॉर्वे मध्यें वाढलेली. युरोपियन सिनेमातून पुढं आलेली. ऑटम सोनाटा, पर्सोना फेस टू फेस सीन्स फ्रॉम मॅरेज, सोफी, द इमिग्रॅण्ट अशा गाजलेल्या चित्रपटातील तिचं काम वाखाणलं गेलं. इंगमार बर्गमनच्या चित्रपटातील कामामुळं ती एकदम प्रकाशझोतात आली. दिग्दर्शक इंगमार आणि अभिनेत्री लिव्ह असं समीकरण रसिकांनी उचलून धरलं होतं.

त्यानंतर पुढे न्यूयॉर्कमध्यें जाऊन तिने तिथंही आपला ठसा उमटवला. चित्रपट, नाटकातील भूमिकांसोबत तिने दिग्दर्शन क्षेत्रात देखील आपलं पाऊल रोवलं आणि लेखनात सुद्धा..! चेंजिंग आणि चॉईसेस ही तिची दोन्ही पुस्तकं गाजली. त्याचबरोबर युनिसेफ साठी ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून काम करताना तिने अनेक देशातून प्रवास केला. विकसनशील देशातील दारिद्रय, युद्ध विध्वन्स, माणुसकी, भवताल, निसर्ग यावर वेळोवेळी पोटतिडिकीने लिहिलं. आपल्या जोडीदाराशी असलेल्या नातेसंबंधावर लिहिलं. खरंतर खूप आरामदायी आयुष्य जगणं शक्य असूनही ती वेगळं जगायचा प्रयत्न करत राहिली.
तिच्या या पुस्तकात, एक स्त्री म्हणून तिच्या मानसिकतेची, आयुष्याकडे पाहण्याची वर्णने येत राहतात. एखाद्या सुप्रसिद्ध स्त्रीकडे जग कसं पाहतं, ती जगाकडे कशी पाहते, तिच्या माणूस म्हणून काय गरजा आहेत, तिला जोडीदाराकडून काय अपेक्षा आहे, त्याच्या सोबतचे ताणेबाणे हे सारं या पुस्तकातून समोर येत राहतं.

*म्हटलं तर हे पुस्तक आहे आणि म्हटलं तर लिव्हची डायरी. तिचं चिंतन, मनातली स्पंदनं मांडणारी.*

तिच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. भावनिक आणि मानसिक संघर्ष अनुभवावे लागले त्याचं प्रतिबिंब म्हणजे हे पुस्तक. कोणतेच ठोकळेबाज निष्कर्ष या पुस्तकाला लावता येत नाहीत. तिचे काही अनुभव तर अगदी घरगुती असे आहेत. आजीची आठवण असो की घरातील कामं करण्याबाबतच्या आठवणी. सगळं वाचताना आपल्याला एक माणूस समोर उलगडत जातोय असं वाटतं…तरीही तिच्या मनातील सगळीच खदखद आपल्याला अजूनही कळली नाही हे उमगतं. 

एके ठिकाणी लिव्ह म्हणते, “ चाळीशीच्या आसपास असलेल्या अनेक स्त्रियांप्रमाणेच मी वाढले. मोठ्या माणसांसमोर कसं वागायचं, स्वयंपाक, भांडी धुणं कसं करायचं याचं शिक्षण मला मिळालं. नॉर्वेतही पिढ्यानपिढ्या मुलींकडून याच अपेक्षा असायच्या तेंव्हा. माझी पिढी त्यातलीच. मात्र 17 वर्षाची असताना, त्या छोटया गावातही वादळ आलं…स्त्री मुक्तीचं.! असं करावं की तसं असे कितीतरी प्रश्न. त्यामुळे सततच्या दुविधेने मी थकून जाई. एकंदरीत माझ्या पिढीचा हा फार गोंधळ झाला. तेंव्हाच्या कल्पनांमधील नावीन्यपूर्ण कल्पना म्हणजे स्त्री लैंगिकतेबाबतच्या तिच्या स्पष्ट कल्पना. आपल्या जाणीवा, मत मांडायचा अधिकार हे मुद्दे तेंव्हा फार चर्चेत होते…. 
आमच्या काळातील बहुतेक मुली केवळ शारीरिक गोष्टीतच अडकून पडल्या. अनेकदा समोर बरेच पर्याय असूनही स्वतःचे निर्णय घेण्याचं धैर्य , स्वतंत्र असूनही माझ्यात नव्हतं. याचे दुष्परिणाम मी आयुष्यभर भोगले. अनेकदा मला इच्छा होते की कालचक्र उलट फिरवावं.पुन्हा छोटीशी मुलगी व्हावं. माझे निर्णय इतरांनी घेण्याआधीची मी व्हावं…”

*जेंव्हा ती असं मनापासून सांगत राहते तेंव्हा ती कुणी दूरची परकीय स्त्री उरत नाही तर आपल्याच आसपास वावरणारी परिचित स्त्री आहे असं वाटत राहतं. तरल संवेदनशील व्यक्ती जेंव्हा प्रसिद्धीच्या झोतात काम करत राहते तेंव्हा तिच्या मनातील खळबळ, आनंद, दुःख, एकाकीपण, उद्वेग, हताशपण, काहीतरी मिळवण्यासाठीच्या धडपडीचा आनंद, त्यातील कृतार्थपण हे सारं बारकाईने न्याहाळत राहवंसं वाटतं. त्या व्यक्तीच्या मनाच्या अथांग डोहात शिरावंसं वाटतं.*

कदाचित याच भावनेतून मृणालताईने एका तीव्र आंतरिक ओढीने या पुस्तकाचा अनुवाद करायचं ठरवलं असावं. 
मृणालताईचं जगणं तर आपल्याला सर्वांनाच ठाऊक. लहानवयात जशी लिव्ह उलमनला प्रसिद्धी मिळाली तशीच प्रसिद्धी वयाच्या 16-17 व्या वर्षी रमाबाई यांच्या भूमिकेमुळे मृणालताईला मिळाली. 
घरातील साहित्यिक वातावरणातून एका चमचमत्या दुनियेत सहज शिरलेली मृणालताई आजही तिथं मोठ्या आत्मविश्वासाने वावरते आहे. शेकडो भूमिकेतून आपला अमीट ठसा उमटवणाऱ्या ताईने निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शनक्षेत्रातही यशस्वी पाऊल रोवलं. तिचा अभिनय आपल्याला अतिशय आवडतोच तरीही या पुस्तकाचा अनुवाद करणारी, ‘ मेकअप उतरवताना..’ सारखं तरल लेखन करणारी मृणालताई मला थोडी अधिक भावते कारण इथं गोनिदांपासून, आई बाबांपासून आलेला तो साहित्यिक आणि संवेदनशील विचारांचा वारसा सहज प्रवाहित होताना दिसतो. मनाला विचारप्रवृत्त करत राहतो. 

अनुवाद करताना लिव्हच्या मूळ आत्मचरित्रातील ताणेबाणे, भावनिक आंदोलने मराठीत देखील तितकीच सशक्तपणे उतरली आहेत असं मला वाटतं.
या आत्मकथनवजा पुस्तकाचा स्वैर अनुवाद करताना ताईच्याही मनात असंख्य प्रश्न उमटले असतील, लिव्हने पाहिलेलं जग आणि मृणालताईने पाहिलेलं जग यात कित्येक बदल असतील आणि काही साम्यसुद्धा. त्यावर तिनं व्यक्त व्हावं, लिहीत राहावं असं वाटतं.

*सार:-* आपल्या कामाच्या निमित्ताने प्रसंगी विविध मुखवटे आपल्याला घ्यावे लागतात. मात्र त्या मुखवट्यामागील माणूस हा सतत संवेदनशील ठेवणं, इतरांविषयी आपल्या मनात कळवळा असणं हे समाजात कितीही उंचीवर पोचलं तरी करता यायला हवं. आपल्यातलं माणूसपण टिकलं पाहिजे. आपण टिकवलं पाहिजे. 
आपल्या कृतीतून ते माणूसपण कसं दाखवता, टिकवता येतं हेच या पुस्तकाच्या लेखिकेने आणि अनुवादकाने दाखवून दिलं आहे असं मला वाटतं.
-सुधांशु नाईक, पुणे. (9833299791)🌿

*ता. क.:-* खरतर मृणालताई कीर्तीने, गुणांनी खूप मोठी आहे. तिला एकेरी संबोधन योग्य नव्हे पण तिच्या आई वीणाताई देव यांनी जी माया लावली, मृणालताईने मोठ्या बहिणीसारखं प्रेम मला दिलं आहे त्यामुळे अहो जाहो करत लिहिणं मलाच अवघड होऊन गेलं. इतक्या मोठ्या व्यक्ती “आपलं मानतात” यातलं सुख, त्याचं ऋण शब्दातीत आहे हेच खरं.

🌿🌿🌿

No comments:

Post a Comment