marathi blog vishwa

Monday 14 August 2023

माना मानव वा परमेश्वर..

 #सुधा_म्हणेमाना मानव वा परमेश्वर..

14   ऑगस्ट 23

कृष्ण. सगळ्यांना जसा उमजेल तसा दिसणारा आणि तरीही दशांगुळे उरणारा. कृष्णाचा मला सर्वात भावणारा स्वभाव म्हणजे निरपेक्ष असणे. जिथं कृष्ण असायला हवा असं वाटतं तिथे प्रत्येक ठिकाणी तो असतोच. जे घडवायला हवं ते ते सगळं बरोबर घडवून आणतो मात्र सगळं करूनही नामानिराळा राहतो. कोणताच फायदा स्वतःसाठी न घेणारा, सगळ्यात असून संगळ्याच्या पलीकडे जाऊन उभा असलेला कृष्ण मला भावतो..!

प्रत्येक माणसाला सुख-दुःख आहेत, ती कुणाशी तरी शेयर करावीशी वाटतात, प्रसंगी सल्ला नाही मिळाला तरी चालेल पण कुणीतरी ऐकून घेणारे असावे असं वाटतं. कृष्ण त्या सगळ्यांसाठी असा होता. गोपिकांचा कृष्ण, राधेचा कृष्ण, कुब्जेचा कृष्ण, द्रौपदीचा कृष्ण, नरकासुराच्या तावडीतील हजारो हतबल स्त्रियांना सन्मानाने आपलं मानणारा कृष्ण. हा कृष्ण म्हणजे जणू त्यांना मनमोकळे बोलू /वागू देण्यासाठी एक हक्काचा खांदा आहे. कृष्णाला देखील स्वतःविषयी असंच वाटत असावं का? असा विचार जेंव्हा मनात येतो तेंव्हा मला मनोहर कवीश्वर यांचे सुरेख गीत आठवते. सुधीर फडके यांनी “मल्हार”च्या स्वरात गायलेले..

माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा

भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा..

दैवजात दुःखाने मनुजा पराधीन केले,

त्या पतितांचे केवळ रडणे मजला ना रुचले

भूषण रामा एकपत्निव्रत मला नको तसले

मोह न मजला कीर्तीचाही, मी नाथ अनाथांचा....

त्याने कंसाचा निःपात करून मथुरा मुक्त केली, तीही उग्रसेन राजाला दिली. दूर पश्चिम किनाऱ्यावर द्वारका वसवली तिथं बलरामाला मोठेपण दिले. जरासंधाचा भीमाकडून वध करविल्यावर देखील ते राज्य स्वतः घेतले नाही. खांडववन जाळताना तो सोबत असतो पण इन्द्रप्रस्थ बनल्यावर त्यात त्याला काहीच नको असते. पांडवांनी स्वतःचे राज्य निर्माण केल्यावरदेखील तो शांतपणे परत द्वारकेला निघून जातो. तीच तऱ्हा नरकासुराचा पाडाव केल्यावर. मात्र जिथं समाजरूढी-परंपरा यांना बाजुला ठेवून काही करायचे आहे तेंव्हा कृष्ण स्वतः पुढे येतो. मग कौरव पांडव युद्ध असो, नियमविरुद्ध जाऊन अर्जुनाला भीष्म, कर्ण यांच्यावर शस्त्र चालवायला सांगणे असो, अनेक स्त्रियांचा पत्नी म्हणून स्वीकार असो प्रत्येक वेळी कृष्ण जुन्या वाटाना छेद देतो. नीती अनीतीच्या कल्पनेपलिकडे जाऊन समोरच्या व्यक्तीला परिस्थितीनुसार योग्य ते पाऊल उचलायला लावणारा आहे.

एकपत्नीव्रत पाळूनदेखील सीतेला प्रसंगी परीक्षा द्यायला लावणाऱ्या, जनरीतीपुढे मान तुकविणाऱ्या रामापेक्षा, जनरीती धुडकावून लावणारा असा तो कृष्ण. कृष्ण फार वेगळा आहे, विविध ग्रंथातून तो एकतर भगवान म्हणून समोर येतो किंवा आनंदाने भोगात रमलेला दिसतो. तो मात्र रासलीला, संगीत निर्मिती, अश्वपरीक्षा, युद्ध कौशल्य, राजकीय डावपेच अशा सगळ्यात पारंगत असूनदेखील त्या पलीकडे असतो.  

त्याच्या शेकडो विवाहांची फार चर्चा होते. पण आपण आजच्या काळातले नियम कृष्णाला किंवा त्या काळातील संस्कृतीला लावू शकत नाही. आजदेखील जिथे स्त्री-पुरुषांच्यात अनेकदा चोरून संबंध ठेवले जातात, खरी-खोटी करणे देत एकाच वेळी चोरून 2-4 लग्ने करणारी मंडळी आजदेखील आढळतात. त्यामुळे खरे तर उघडपणे विविध स्त्रियांना पत्नीचा दर्जा देणाऱ्या कृष्णाचे कौतुक व्हायला हवे. तो जबाबदारी टाळत नाही तर उलट त्या स्त्रियांना सन्मानाने वागवले जावे म्हणून त्यांच्याशी नाते जोडतो. त्याच्यावर भाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीला तो आपलेसे करतो, सन्मानाने वागवतो. त्यासाठी प्रसंगी तो समाजाच्या रूढी, परंपरा बाजूला ठेवतो. रुक्मिणी देखणी, तिनेच तर पत्र पाठवून त्याला बोलावून घेतलेले. तत्कालीन प्रथा डावलून स्वयंवरापूर्वी कृष्ण सरळ तिचे हरण करतो. युद्ध करतो. तिच्याशी लग्नदेखील करतो. तरीही तो फक्त रुक्मिणीचाच उरत नाही. तो तिचा असतोच पण तरीही सत्यभामेचा आहे, अन्य स्त्रियांचा आहे, द्रौपदीचा आहे, राधेचा आहे. अनेक स्त्रियांशी विवाह केला म्हणून जे लोक नांवे ठेवतात त्यांना “पराधीन ना, समर्थ घेण्या वार कलंकाचा....” असं निर्भीडपणे सांगणारा आहे. अगदी सुभद्रा-अर्जुन यांच्या प्रेमप्रसंगात देखील कृष्ण इतरांपेक्षा त्या दोन प्रेमी जीवांचा जास्त विचार करतो. द्रौपदीशी कृष्णाचे अत्यंत आत्मीय असे नाते आहे, तरीही तिला सवत म्हणून येणाऱ्या आपल्याच बहिणीला अवश्य मदत करतो. सगळे कट कारस्थान घडवून आणत ते दोन्ही जीव एकमेकांच्या सोबत राहतील यासाठी सगळे काही करत स्वतःवर ठपका घेतो. जिथे जिथे इतराना सुख देण्यासाठी बोल लावून घ्यायची वेळ येते तिथे कधीच कृष्ण मागे पाऊल घेत नाही. म्हणूनच हा “ जगता देण्या संजीवन मी कलंक आदरितो” असं म्हणणारा कर्मयोगी कृष्ण मला अधिकाधिक आकर्षित करत राहतो, आवडत राहतो..!

सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com)



2 comments:

  1. Priya Prabhudesai16 August 2023 at 19:59

    फारच सुंदर लेख

    ReplyDelete