कार्यरत होऊया…
- सुधांशु नाईक
शुक्रवार 26/01/24
आपल्या मनाची मोठी गंमत असते. जोवर आपण काही ना काही काम करत असतो तोवर मन अगदी गपगुमान असतं. बऱ्यापैकी एकाग्रतेने आपण आपली कामं करत असतो. मात्र जरा कुठं रिकामपणे बसलो, निवांत बसलो की मग मनात शेकडो विचार येत राहतात.
विविध माणसं, गावं, कित्येक आठवणी असं काय काय मनात पिंगा घालत राहतं. कुठून कुठली आठवण येईल आपल्याला हे काही सांगता येत नाही. कोणतं काम आठवेल हे सांगता येत नाही. विचारांच्या गलबल्यात मन अगदी पतंगसारखं हेलकावत राहते. म्हणूनच तर idle mind is devil's workshop..! असं इंग्रजीत किंवा “ रिकामं मन सैतानाचेच..” असं मराठीत म्हटलं जाते.
मनाला जितकं वेसण बांधायला जाऊ तितकं ते अधिकच उधळते असं अनेक तत्ववेत्ते, अध्यात्मिक जाणकार लोक सांगतात. मनाला उलटं मोकळं सोडा, मनात येणारे विचार तटस्थपणे पहायला शिका असं सांगितलं जातं. इतकं सोपं असतं का हे?
जेंव्हा मन रिकामं असतं तेंव्हा अशा मोहाना अधिक चटकन बळी पडत असावं. जेंव्हा आपण खूप कामात असतो तेंव्हा आपण म्हणतोच ना, “ अगदी तहान भूक विसरून गेलो बघ हे काम करताना…” पण तेच आपण अगदी रिकामे आहोत, आणि रस्त्यावरून जाताना एखाद्या गाडीवर कुणी गरमगरम वडा किंवा भजी तळत असेल तरी आपलं मन लालचावते. डाएट वगैरेची सगळी बंधने आपण काही दिवस फक्त पाळतो आणि असं दिसलं की पटकन वडापावची ऑर्डर देतो. वडापाव हे एक प्रातिनिधिक उदाहरण झालं. असे कितीतरी प्रकारचे मोह आपल्याला भुरळ घालत असतात.
जेंव्हा माणूस अशा मोहात अडकते तेंव्हा मग कामाकडे, अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागते. त्यामुळे घरात कुणी विद्यार्थी असेल तर त्याने इतकाच वेळ टीव्ही पाहावा इत्यादी बंधने घातली जातात.
समाजात देखील आपण पाहतो, जे तरुण भरपूर अभ्यासात रमले आहेत, जे तरुण नोकरी धंद्यात कष्ट करताहेत ते स्वतःची एक नवीन जागा निर्माण करून दाखवतात, त्याचवेळी काही रिकामटेकडे युवक मात्र गल्लीच्या तोंडाशी अचकट विचकट गप्पा मारत वेळ फुकट घालवतात. आज जगातील सगळ्यात जास्त युवाशक्ती आपल्या देशात आहे असं मानलं जाते. या सगळ्या युवशक्तीची मने विधायक विचाराने प्रेरित झाली तर अजून कितीतरी मोठे काम आपण करून दाखवू शकतो. मनाला विधायक कार्यात गुंतवले की स्वतः आणि इतरांसाठी देखील ते हितकारक असते हे माहिती असल्यामुळे समर्थ म्हणतात;
अखंड कामाची लगबग
उपासनेस लावावे जग
लोक समजोनी मग,
आज्ञा इच्छिती ||
आजच्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने अशा कार्यरत लोकांच्या झुंडीच्या झुंडी देशहित जपायला कार्यरत होवोत हीच प्रार्थना.
-सुधांशु नाईक(9833299791)🌿