marathi blog vishwa

Saturday 13 January 2024

मुलं आणि सामाजिक जाणीव

मना सज्जना... भाग : 04: मुलं आणि सामाजिक जाणीव 
- सुधांशु नाईक
शनिवार 13/01/24
काही दिवसापूर्वी मुलांसोबत फिरायला गेलो होतो. एका प्राचीन मंदिराचा तो नितांतसुंदर परिसर होता. चालता चालता लक्षात आलं की काही लोकांनी वेफर्सची पाकिटे, चॉकलेटचे व्रॅपर वगैरे इथं तिथं टाकलं आहे. पटकन मी एकेक उचलायला सुरुवात केली. मग आमच्या मुलांनीही कचरा उचलायला सुरुवात केली. ते पाहून इतर जे काही लोक आसपास होते त्यानी, त्यांच्या मुलांनीदेखील दिसेल तो कचरा उचलायला सुरुवात केली. पाहता पाहता अवघ्या 15,20 मिनिटात त्या प्राचीन मंदिराच्या परिसरातील सगळा कचरा उचलून बाहेर ठेवलेल्या पिंपात जमा झाला. ते पाहून तिथं जवळच बसून पाहणारे एक आजोबा पुढं आले. बाहेर टपरीवरून त्यांनी चॉकलेट आणली आणि सगळ्यांना बक्षीस म्हणून वाटली. त्याचवेळी “ आप ये चॉकलेट खाओ और उसका वो कव्हर मुझे वापस दो…” असं सांगून ते व्रॅपर स्वतः बाहेर नेऊन टाकले. आपण कचरा गोळा केला म्हणून या आजोबानी आपल्याला बक्षीस दिले याचा मुलांना खूप आनंद झाला.
एका छोट्याश्या कृतीमुळे मुलांना किती सहज संदेश गेला जो कदाचित मोठ्या व्याख्यानामुळेदेखील आचरणात आला नसता. आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो मात्र आपल्या उंबऱ्याबाहेरचं जग देखील आपलंच आहे तेही स्वच्छ सुंदर राखायला हवं ही जाणीव मुलांमध्ये विकसित होणे खरंच खूप आवश्यक आहे.
लहान मुलं कायमच अनुकरणप्रिय असतात. जर आई किंवा वडील, रस्त्यावर चालत जाताना, कारमधून जाताना काही कचरा रस्त्यावर फेकत असतील तर मुलं तसंच वागणार ना? आपला मोठा दादा किंवा एखादा काका - मामा किंवा शाळेतले शिक्षक तंबाखू किंवा गुटखा खाऊन रस्त्यावर किंवा एखाद्या इमारतीच्या कोपऱ्यात पिचकारी मारताहेत हे जर मुलं पाहत असतील तर त्यांच्याकडून स्वच्छ राहणीमानाची अपेक्षा आपण कसं करणार? आपलं जग किती सुंदर आहे आणि ते अधिकाधिक सुंदर करणे, नीट जपणे ही आपलीच जबाबदारी आहे हे जेंव्हा आपल्या वागण्यातून, रोजच्या आपल्या लहानसहान कृतीमधून दिसत राहील तेंव्हाच मुलं आणि पुढील पिढ्या त्याचं अनुकरण करतील.
आज आपण अनेकदा किल्ल्यावर जातो, जुनी मंदिरे किंवा वास्तू पाहायला जातो तिथं नेमकं कसं फिरायला हवं, काय पाहायला हवं हे त्यांना आपण समजावून द्यायला हवं. स्वतःच घर आपण जसं स्वच्छ सुंदर ठेवायला धडपडतोय तसंच आपली गल्ली, आपला परिसर, आपलं गांव आणि आपला देश स्वच्छ सुंदर ठेवणं ही नुसतीच काळाची गरज नसून आपलंच कर्तव्य आहे ही सामाजिक जाणीव आधी आपल्या मनात रुजली तरच मुलांच्या मनात रुजणार आहे हे नक्की. तेंव्हा नवीन वर्षात आपल्या मुलांना, आसपासच्या तरुण पिढीला सामाजिक भान मनात जागृत करता यावे यासाठी तुम्हीही प्रयत्न करणार ना?
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

No comments:

Post a Comment