marathi blog vishwa

Friday 5 January 2024

माझिया मना...

मना सज्जना... भाग : 01
शुक्रवार 05/01/24
माझिया मना...
आपल्या शरीरातील न दिसणारी तरीही अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे मन. मनाची शक्ती इतकी मोठी की समर्थ रामदास तर "अचपळ मन माझे नावरे आवरिता..." असे म्हणून जातात. समर्थांसारख्या तनमनावर अतिशय कठोर नियंत्रण मिळवलेला सिद्ध पुरुष जिथं असं म्हणून जातो तिथं आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी मनावर विजय मिळवणे ही किती अवघड गोष्ट. मनावर विजय मिळवणे वगैरे दूरची गोष्ट. आपल्याला आपलंच मन धड उमगत देखील नाही.
आपलं मन कधी कोणता विचार करेल हेसुद्धा आपल्याला कळत नाही. त्यामुळे तर 'मन चिंती ते वैरी न चिंती' , ' मनी वसे ते स्वप्नी दिसें...' अशा कितीतरी म्हणी आपल्या बोलीभाषेत रुजल्या आहेत. कधी कधी मन अगदी छान सरळमार्गी असतं तर कधी वेडीवाकडी वळणे घेत आपल्याला गुंतवून टाकतं. कोणत्या क्षणी कोणता विचार करेल हेसुद्धा सांगता येत नाही.
एकदा एक मित्र सांगत होता, " अरे, नुकतीच एक गंमत झाली. सकाळी नेहमीसारखं पोहायला गेलो होतो. पोहताना मनात विचार आला की आपण एखाद्या डोंगरावर गेलोय आणि तिथं पाय घसरून पडलोय. पाय मोडलाय... आता पोहत असताना असा विचार का आला असेल? असं वाटलं. पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अचानक आमच्या ऑफिसची ट्रिप ठरली. आम्ही सगळे कर्नाळा किल्ल्यावर गेलेलो आणि येताना पाय घसरून पडलो. नशीब चांगलं की पाय मोडला मात्र नाही. किरकोळ खरचटलं फक्त... काहीच कुठले चिन्ह नसताना मला अचानक का असं वाटलं याचं अजूनही आश्चर्य वाटतंय..!" आपल्या योगाभ्यास आणि अध्यात्मिक क्षेत्रात असं मानतात की आपले मन आपल्याला अशा पूर्वसूचना देत असतं, फक्त आपण त्याच्याशी संवाद साधायला हवा.
इथं हल्ली आपला इतरांशी तर जाऊ दे पण स्वतःशी तरी कुठे फारसा संवाद होत असतो? आपली कामं, नोकरी - व्यवसाय, कौटुंबिक जबाबदारी, मीडिया आणि आसपास वावरणारी माणसे यांच्या कलाने वागताना आपल्याला नक्की काय हवंय हे आपले मन सांगत असूनही आपलं दुर्लक्ष होतं. एकामागून एका नव्या गुंत्यात अडकत जातो आणि मग त्यातून बाहेर पडणे अवघड होते.
कित्येकदा आपल्या मनातील गुंते आपल्याला कळतात पण त्यातून पुढं कसं जायचं हे समजत नाही. आपल्या शरीरावर अनेकदा आपण नियंत्रण मिळवून दाखवतो पण मुठीतून निसटणाऱ्या वाळूसारखे मनातले विचार आपल्या हातून निसटत राहतात. मनावर विजय मिळवणे अवघड नसते असं योगी किंवा विद्वान लोक सांगत असतात ते सत्यच आहे. पण आधी मनातले गोंधळ, मनोव्यापार आणि मनाचे गुंते आधी नुसते तटस्थपणे पाहता यायला हवेत. मग मनाशी संवाद साधायला हवा. ते जमू लागलं की मग आपण आपल्या मनाला सांगू शकतो, माझिया मना.. जरा थांब ना..!" 
सुधांशु नाईक(9833299791)🌿
(ही लेखमाला दर शुक्रवारी आणि शनिवारी दै. नवशक्तीच्या सर्व आवृत्तीमध्यें अग्रलेखाच्या खाली वाचायला मिळेल. ऑनलाईन ई पेपरवर ही पाहू शकता.)

No comments:

Post a Comment