marathi blog vishwa

Saturday 6 January 2024

दिनचर्या नियमित का हवी?

मना सज्जना...भाग : 02 : दिनचर्या नियमित का हवी?
- सुधांशु नाईक 
शनिवार 06/01/24 
मनाचे बोलणे आपल्याला ऐकता यायला हवे आणि मनाशी संवाद असायला हवा असं काल म्हटलं होते. हे इतक्या सहजासहजी घडत नाही कारण जन्मल्यापासून विविध गोष्टींमुळे आपल्या मनाचे कंडिशनिंग झालेले असते. आपल्या सवयी, आपल्या पालकांच्या किंवा घरातील इतर ज्येष्ठ सदस्यांच्या सवयी यामुळे मुलाचे मन तयार होत असते.
 सकाळी उठल्यावर प्रात:स्मरण करावे, ईश्वराची, या भूमातेची आळवणी करावी, त्यांना आणि घरातील मोठ्या माणसांना वंदन करावे असे संस्कार पूर्वी घरात शिकवले जात. हल्ली आपल्याला हे सगळं जुनाट वाटतं. पण त्यामागे असलेला विचार आपण समजून घ्यायला हवाय.
Gratitude किंवा कृतज्ञता हा गुण मुलांच्यात लहानपणी रुजला गेला तर त्यांना जगणे अधिक सुंदर जाते. त्यासाठी आपले पालक, गुरुजन, शेतकरी, हा निसर्ग, इथली झाडें फुले, प्राणी - पक्षी या सगळयाविषयीं मुलाच्या मनात आपुलकी आणि कृतज्ञता निर्माण झाली की एक उत्तम नागरिक बनण्याकडे त्याची वाटचाल सुरु राहते. समर्थ दिनचर्येविषयी सांगताना म्हणतात,
प्रात:काळी उठावे | काही पाठांतर करावे
येथाशक्ती आठवावे | सर्वोत्तमासी ||
यासाठी त्या दिनचर्येची सुरुवात वंदनाने व्हायला हवी. इथं समर्थ अमुक एका देवास आठवा असे म्हणत नाहीत तर सर्वोत्तमाचा ध्यास घ्या असं सांगतात हे लक्षात घेण्यासारखे आहे.
त्यानंतर शरीर स्वच्छता, व्यायाम या गोष्टी महत्वाच्या ठरतात. आपल्या प्राचीन योगशास्त्रात असं म्हटलं आहे की एका विशिष्ट वेळी, एखादी कृती सलग 33 दिवस केली तर मनाला त्याची सवय होऊ लागते. त्यामुळे सकाळी ठराविक वेळी उठणे, आवरणे, व्यायाम करणे, अभ्यास करणे या गोष्टींना फार महत्व आहे. आपण ठरवल्यानुसार वागायला सुरुवात जरूर करतो पण मध्यें अनेकदा मोहाचे क्षण येतात. कधी सकाळी उठायचा आळस येतो कधी व्यायाम करायचा कंटाळा येतो. एकदोन दिवस जरा खंड पडला की मग त्या आळसाचीच सवय होऊन जाते. त्यामुळे मनाला पुन्हा पुन्हा ठरलेल्या आखलेल्या मार्गाकडे वळवावे लागते.
आपलं मन कसं हे सांगताना बहिणाबाई म्हणूनच तर म्हणाल्या होत्या, 'मन वढाय वढाय…उभ्या पिकातला ढोर…' त्याला प्रसंगी चुचकारावे लागते, प्रसंगी वेसण घालावी लागते तर कधी मायेने समजावावे लागते.
हे सगळं करण्यासाठी जर नेमकी आखून घेतलेली दिनचर्या असेल तर मनाला नियंत्रित करण्यासाठी महत्वाचे आयुध आपल्याला मिळाले आहे असं समजायला हरकत नाही.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿

No comments:

Post a Comment