सुधांशु नाईक
शुक्रवार 12/01/24
आपण जेंव्हा लहान असतो तेंव्हा लवकर लवकर मोठे व्हावेसे वाटत असते. मोठे झाल्यावर मात्र " बालपणीचा काळ सुखाचा…" असे वाटू लागते. लहानपणापासून अंगात भिनलेल्या किंवा आपल्याला आवडलेल्या सवयी, वागण्याची तऱ्हा आयुष्यात बरेचदा तशीच रहाते. कारण मुख्यत: लहानपणी आपण निरीक्षणातून किंवा अनुकरणातून शिकत जातो.
लहानपणी आई बाबा, काका काकू, मावशी आत्या, आजी आजोबा, दादा ताई इत्यादी नातेवाईकांइतकेच काही शेजारी देखील आपल्या आसपास असतात. त्यांच्याबाबत काहीतरी घडलेलं किंवा पाहिलेलं बरोबर लक्षात रहाते. त्या अनुषंगाने आपल्या वागण्याचा प्रयत्न होत रहातो.
लहान मुलांचं विश्व वेगळंच असतं. त्यामुळे लहान मुलांना नेमकं काय हवं हे समजून घेता येण्यासाठी आपल्याला पण मुलात मूल होता यायला हवं. कित्येकदा नेमकं आपल्याला काय हवंय हे त्यांना काहीवेळा सांगता येत नाही पण त्यांचं आणि आपलं ट्युनिंग जमलं की खूप मनमोकळेपणाने ती वागू, बोलू लागतात. लहान मुलांचा विश्वास मिळवणे, तो टिकवून ठेवणे यासाठी प्रामुख्याने गरज असते ती निरीक्षण करण्याची. एखाद्या मुलाचे बारीक निरीक्षण करून त्याच्या आवडीनिवडीचा अंदाज घेऊन आपण त्याला योग्य छंदात गुंतवलं तर त्या मुलाला अधिक उत्साहाने रोजच्या विविध गोष्टी करता येतात.
“ बच्चे मन के सच्चे…” असं गाण्यात जरी आपण म्हटलं तरी कित्येकदा मुलांना नीट हाताळले नाही तर मुलं मनात कुढत बसून रहातात. त्यांचे गुण झाकलेले राहतात. एखाद्या माणसाची मनोवृत्ती विकसित होणे किंवा एखाद्याला मानसिक आजार होणे यासाठी बालपणातील कित्येक गोष्टी कारणीभूत ठरतात. त्यासाठी लहानपणापासून मुलांना विविध गोष्टी हळूहळू शिकवणे गरजेचे असते. बालमानसशास्त्र हे खूप महत्वाचे शास्त्र आहे आणि त्यासाठी मुलांचे विविध प्रसंगी बारीक निरीक्षण करणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.
त्यांना प्रत्येक गोष्टीतून आनंद कसा मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरतं. मुलांचा कल पाहून, त्यांची चित्तवृत्ती लक्षात घेऊन, त्यांच्या आवडीनिवडी जाणून जर मुलांना शिकवले तर अनेक गोष्टी मुलं पटकन शिकतात. त्यातला आनंद मुले अधिक चांगल्या प्रकारे अनुभवू शकतात.
बालमन हे टीपकागदासारखं असतं. त्यांना अधिकाधिक आनंददायी गोष्टी देण्यासाठी खूप पैसे लागत नाहीत. मुख्यत: जगाकडे, निसर्गाकडे डोळस नजरेने पाहायला शिकवता यायला हवं.इतकंच नव्हे तर यश आणि अपयश हे दोन्ही सहजपणे कसं स्वीकारावं हे देखील मुलांना आपल्या वर्तणुकीतून दाखवता यायला हवं. हे जमलं तर मुलं नक्की अधिक चांगल्या प्रकारे विकसित होत राहतात. एक सुजाण नागरिक बनू शकतात असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?
- सुधांशु नाईक(9833299791)🌿
No comments:
Post a Comment