marathi blog vishwa

Saturday, 30 March 2024

केल्याने होत आहे रे...

मना सज्जना... भाग २५ : केल्याने होत आहे रे...

-सुधांशु नाईक

शनिवार, ३०/०३/२४

“मना सज्जना..” या तीन महिने सुरु असलेल्या लेखमालेचा उद्देश हाच होता की मनाला अधिकाधिक सक्षम करता येणे, आपल्यातील न्यून जाणून घेऊन त्यावर तोडगा काढायला उद्युक्त होणे, आपल्यातील सुप्त गुण ओळखणे, आपल्या आणि इतरांच्या भल्यासाठी काही कृती करायला सुरुवात करणे ज्यायोगे सर्वांच्या आयुष्यात चार क्षण आनंदाचे असू शकतात. आयुष्यात चांगले दिवस येण्यासाठी वाईट क्षण अनुभवणे, त्यावर तोडगा काढून पुढे जाणे क्रमप्राप्त असते म्हणूनच  गेल्या काही भागात आपण चिंता, स्वार्थ, भय, क्रोध आदि गोष्टीबाबत विचार केला. आयुष्यात या सर्व गोष्टी आपल्या कृतीच्या, प्रगतीच्या आड येत असतात. त्याचबरोबर आर्थिक सहाय्य, फसवणूक, नैसर्गिक आपत्ती आदि अडचणींमुळे आपण निश्चित केलेले ध्येय गाठण्यात आपल्याला अनेकदा अपयश येते. कधी आपलेच निर्णय चुकल्याची जाणीव होते. कोणतीही चूक ही अजिबात वाईट नसते अशा अर्थाचे एक वचन आहे, त्याचा अर्थ हाच की झालेली चूक, पदरी पडलेले अपयश हे तुम्हाला उलट ज्ञान देऊन जाते. काय करायचे नाही हे आपल्या मनाला ठाम ठरवता आले की मग काय करायला हवे यावर लक्ष केंद्रित करता येते.

ज्या ज्या थोर माणसांची चरित्रे आपण वाचलेली असतात, किंवा काही मोठ्या व्यक्तींचे आयुष्य घडताना पाहिलेले असते त्यांना देखील या सगळ्या अडचणी भेडसावत होत्याच. तरीही मोठ्या जिद्दीने, चिकाटीने ते पुढे पुढे वाटचाल करत राहिले. मोठ्यांच्या चरित्रातून हेच तर आपल्याला शिकता येते. कित्येक वेळा असे घडते की आपण अमुक केले तर असे होईल, ही अडचण येईल, ते जमणार नाही असे म्हणून कृती करण्यापूर्वी सुरुवातीलाच माघार घेतो. तर कित्येकदा हाती एखादे काम घेतल्यावर लगेचच धरसोड करत ते काम टाकून देतो. इथे आपली प्रगल्भता न दिसता केवळ आरंभशूरता दिसते. 

त्यामुळे या सगळ्याविषयी सारासार विचार करून मग पाऊल उचलणे आवश्यक ठरते. केवळ गप्पा मारल्याने, मोठमोठ्या बढाया मारण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती घडणे महत्वाचे. त्यातही योग्य ती कृती घडणे अधिक महत्वाचे. म्हणूनच समर्थ म्हणतात की,

केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ।

यत्न्य तो देव जाणावा । अंतरी धरता बरे ।।

जेंव्हा विचारपूर्वक आपण कृती करू जातो तेंव्हा मन आत्मविश्वासाने भरून जाते. छत्रपती शिवाजी महाराज, शंभू राजे, पहिले बाजीराव पेशवे यांची चरित्रे अभ्यासली की असे दिसते की हजारो अडचणी त्यांच्या समोर होत्या. मात्र ध्येयनिश्चिती केल्यानंतर, वाटचाल करताना कितीही अडचणी आल्या तरीही त्यांनी आपले लक्ष कधीच विचलित होऊ दिले नाही. कठोपनिषदात म्हटल्यानुसार “उत्तिष्ठ...जागृत: प्राप्य वरान्निबोधत...” हेच महत्वाचे. पोकळ गप्पांमध्ये न रमता समाज कृतीशील होणे हे फलदायी आहे यात शंकाच नाही.

-सुधांशु नाईक (९८३३२९९७९१)

गेले तीन महिने या लेखमालेद्वारे मनाविषयीचे हे लेख लिहिले. आता गुढीपाडव्यापासून अजून काहीतरी वेगळे लिहायचा प्रयत्न असेल. ही लेखमाला तुम्हाला कशी वाटली, मन याविषयी तुम्हाला अजून काय जाणून घ्यायला आवडेल हे आवर्जून सांगावे ही विनंती.

Friday, 29 March 2024

चिंता

मना सज्जना भाग २४ : चिंता

-सुधांशु नाईक

शुक्रवार २९/०३/२४

चिंता, काळजी या भावना आपल्याला कधी आणि कशा येऊन चिकटतात हे आपल्यालाच कळत नाही. जन्माला आल्यापासून सतत कसली ना कसली चिंता आपली पाठ सोडत नाही. दोन वेळचे जेवण, झोप, शिक्षण, नोकरी, घर संसार, दुखणी खुपणी, इतरांची आजारपणे, रोजच्या जगण्यातील स्पर्धा अशा अनेक गोष्टींच्या मुळे आपण वारंवार चिंतीत होत राहतो. माणसाने चिंतामुक्त राहावे असे कितीही आपण सांगितले तरी प्रत्यक्षात ते घडत मात्र नाही. 

आधी स्वतःच्या आयुष्याबद्दल आपण चिंता करत राहतो आणि जसे संसारी होऊन जातो तसे मग मुलं, आपला जोडीदार, आईबाप, आपल्यावर असलेली नोकरी-व्यवसायातील जबाबदारी या सगळ्याचे ओझे घेत जगतो. तुलनेने आपलं आयुष्य तसे बरेच सरधोपट असले तरी ज्यांना रोजच्या आयुष्यात जगण्यासाठीच संघर्ष करावा लागतो त्यांना या चिंता अक्षरशः जाळत राहतात. पण चिंता करून काही फरक पडतो का? ज्या कृती करणे क्रमप्राप्त असते ते तर आपल्याला करावेच लागते. भूतकाळात काय घडले याच्या विचाराने किंवा भविष्यात काय घडणार या काळजीने चिंताक्रांत होऊन बसणे हा मूर्खपणा आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात,

मना मानवी व्यर्थ चिंता वहाते

अकस्मात होणार होऊनि जाते...

जे घडणार आहे ते घडणारच. मात्र आपण चिंता करत बसल्याने हातात असणारा वर्तमानकाळ देखील वाया घालवतो याकडे समर्थ किंवा अन्य संत, विचारवंत वारंवार लक्ष वेधताना दिसतात. उद्याचा विचार करून, येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यानुसार आपल्या कृतीत सुधारणा करून कामाला लागणे त्यांच्या दृष्टीने महत्वाचे होते. नुसतेच चिंता करत हातावर हात धरून बसणे यात पुरुषार्थ नाही तर आल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी झडझडून कामाला लागणे त्यांना अपेक्षित होते.

समर्थ असोत किंवा आजच्या काळातील मानसशास्त्रज्ञ, हे सारे जण नेहमीच सांगतात की अति विचार करत न बसता पहिले पाऊल उचला. आधी आज, आत्ता कार्यरत व्हा. एकदा मार्गक्रमण सुरु केले की आपोआप पुढे वाटा सापडत जातातच. भूतकाळातील चुकांवर काम करावे आणि भविष्यात चुका होऊ नयेत, हाती घेतलेले काम तडीस जावे यासाठी अधिकाधिक बारकाईने नियोजन करणे म्हणूनच गरजेचे ठरते. अचूक यत्न केले तर आपल्या कृती अधिकाधिक सफाईदार होतात. आपोआप मग आत्मविश्वास वाढतो. कामाचे डोंगर उपसायला बळ मिळते. जेंव्हा आपण असे वागू लागतो तेंव्हा चिंतामुक्त होण्यासाठीची ती सुरुवात असते हेच खरे.

-सुधांशु नाईक (९८३३२९९७९१)

Friday, 22 March 2024

स्वार्थ

मना सज्जना...भाग २३ : स्वार्थ

-    सुधांशु नाईक 

   शुक्रवार २२/०३/२४

   लहानपणापासून आपण शिकतो की दुसऱ्याचा विचार करावा, इतरांना त्रास देऊ नये आणि तरीही आपण प्रत्यक्षात जगात वावरताना खूप स्वार्थीपणे वावरत राहतो. तहान, भूक अशा आदिम नैसर्गिक जाणिवांच्या बाबत आपले स्वार्थीपण एकवेळ समजू शकते मात्र त्या व्यतिरिक्त अनेक लहान मोठ्या गोष्टींबाबत आपण स्वार्थी होताना दिसतो. एखाद्या घरात सगळे कुटुंबीय जेवायला एकत्र बसलेले असतात. समोरचे पदार्थ संपता संपता लक्षात येते की एखादी भाकरी शिल्लक आहे. मग आई किंवा बाबा ती भाकरी स्वतः न घेता मुलांना देऊ पाहतात. त्याचवेळी दोन मुलातील एखादे मूल मात्र ती भाकरी फक्त स्वतःलाच हवी यासाठी चपळाईने ती भाकरी घेऊन टाकते. नि:स्वार्थी आणि स्वार्थी वृत्ती दोन्हीचे एकाचवेळी आपल्याला दर्शन घडते. 

   हे तर खूपच क्षुल्लक उदाहरण आहे. अनेक घरात पैसा, प्रॉपर्टी, घर किंवा अन्य स्थावर मालमत्ता यासाठी सख्खे जवळचे नातेवाईक सुद्धा एकमेकांच्या जीवावर उठतात हे आपण प्रत्यक्षात अनेकदा पाहतो. मुळात कष्ट न करता स्वतःला सगळे काही मिळावे, इतरांपेक्षा जास्त मिळावे यासाठी अनेकजण हपापलेपणा दाखवतात. हा हव्यास, ही स्वार्थबुद्धी मग आपल्याच विनाशाला कारणीभूत ठरते.  कित्येक कर्तबगार व्यक्ती केवळ स्वार्थी वृत्तीपायी विविध समस्यांमध्ये अडकून जातात. इतिहास पाहू गेले तर पृथ्वीराज चौहान पासून छत्रपती शंभूराजांच्या पर्यंत अनेक थोर माणसांना जवळच्या व्यक्तींच्या स्वार्थी वृत्तीमुळे मोठे नुकसान सोसावे लागले, प्रसंगी जीव गमावण्याची वेळ आली.

म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात,

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे,

अति स्वार्थबुद्धी नुरे पाप साचे 

घडे भोगणे पाप ते कर्म खोटे,

न होता मनासारिखे दु:ख मोठे || 

एखादी चांगली व्यक्ती स्वार्थी मनोवृत्तीमुळे संपून जाते. ही प्रसंगी कुटुंबाची हानी असतेच पण समाजाची, देशाचीही यामुळे हानी होतेच. 

हे सगळे घडू नये म्हणून लहानपणापासून मुलांवर नि:स्वार्थी वृत्तीचे संस्कार व्हायला हवेत. मी, माझे यातून बाहेर पडून व्यक्तीने आपले, आपल्या परिवाराचे, देशाचे भले होईल याचा विचार करायला हवा. दुसऱ्याला ज्यामुळे आनंद होतो अशी कृती करता आली, असे देणे आपल्याला देता आले तर त्यासारखे दुसरे समाधान नाही हेच खरे. सर्वांच्या मनातील स्वार्थी वृत्ती हळूहळू लोप पावून नि:स्वार्थी वृत्तीचा सर्वत्र उदय होईल  ही भ्रामक कल्पना किंवा पोकळ आशावाद आहे हे खरे. मात्र अधिकाधिक लोकांच्या मनात निस्वार्थी वृत्ती जागवण्यासाठी आपण प्रयत्न करत राहणे सहज शक्य आहे असे मला वाटते.

-सुधांशु नाईक (९८३३२९९७९१)🌿

Friday, 15 March 2024

भय इथले...

मना सज्जना... भाग 22 : भय इथले...

-    सुधांशु नाईक, 

शुक्रवार १५/०३/२४

प्राण्यांच्या आयुष्यातील ज्या मूलभूत जाणीवा आहेत त्यात आहार,निद्रा आणि मैथुन यासोबत असणारी महत्वाची जाणीव म्हणजे भय. जन्माला येण्यापूर्वी गर्भावस्थेत असलेले मूल देखील भीतीच्या प्रभावाखाली असते. विशिष्ट आवाज त्याला घाबरवत राहतात. जन्माला आल्यापासून तर भीतीची छाया सतत असतेच. परक्या व्यक्तीकडे मूल जात नाही. आईवाचून दूर राहायला तयार नसते. वय वाढेल तसं भीतीची जाणीव कमी न होता वाढतच राहते. एखाद्याला विशिष्ट माणसांची भीती असते तर कुणाला एखाद्या ठिकाणाची भीती. कुणाला वाहन चालवण्याची भीती वाटते तर कुणाला बसच्या प्रवासात उलटी होईल याची भीती वाटते. कुणाला उंच डोंगरावर उभे राहण्याची भीती तर कुणाला लिफ्ट मधून जाण्याची भीती वाटते. असे भीतीचे कितीतरी प्रकार. त्याला मानसशास्त्रीय भाषेत फोबिया असे म्हणतात. भीतीचे काही प्रकार हे जन्मजात असतात तर काही प्रकार हे विशिष्ट घटनेचा परिणाम म्हणून सुरु होतात.

प्रणव हा एक कॉलेजला जाणारा मुलगा. यंदा बारावीला असलेला. कॉलेजमध्ये काहीतरी घडले. त्याचा त्याने इतका धसका घेतला की “यापुढे कॉलेजला अजिबात जाणार नाही..” असेच घरी जाहीर केले. काय घडले असे कित्येकदा सर्वांनी विचारून देखील त्याने अजिबात उत्तरे दिली नाहीत. मग त्याला घेऊन आई बाबा मानसोपचार तज्ञाकडे गेले. कित्येक दिवस त्याच्याशी बोलून त्याची भीती कमी करण्याचे प्रयत्न केले गेले. आज प्रणव थोडासा सावरला आहे, आता परीक्षा देतो आहे तरी काही गोष्टींच्या भीतीचा पगडा आजही तो झुगारून देऊ शकत नाहीये.

भीती फक्त लहान किंवा मोठ्या मुलांना वाटते असे नाही तर मोठ्या व्यक्तीलादेखील वाटते. ज्या गोष्टीमुळे भीती वाटते त्या गोष्टी सुरुवातीला टाळण्याकडे आपला कल असतो. पण अशी चालढकल केल्याने काहीच साध्य होत नाही. भय इथले संपत नाही...” ही गोष्ट कितीही खरी असली तरी त्या भीतीच्या जाणीवेला आपल्याला भिडावेच लागते. तरच भीतीच्या जाणीवेवर मात करणे शक्य होते.

भित्यापाठी ब्रह्मराक्षस अशी तर आपल्याकडे म्हण आहे.त्यामुळे घाबरत राहणे हे समस्येवरील उपाय असू शकत नाही. प्राचीन साहित्य असो वा सध्याच्या आधुनिक मानसोपचार पद्धती असोत, सगळे काही भीतीवर मात करून पुढे जाण्यासाठीच उद्युक्त करतात. आपल्या पाठीशी प्रसंगी आप्तेष्ट, मित्रमंडळी, गुरुसमान व्यक्ती असतातच,म्हणूनच समर्थ म्हणतात...

भवाच्या भये काय भीतोस लंडी। धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥

रघूनायकासारिखा स्वामि शीरीं। नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी॥

भीतीच्या जाणीवेवर मात केली की पुढे आत्मविश्वासपूर्ण वाटचाल आणि यश असणार हे नक्की.

-सुधांशु नाईक(९८३३१२९९७९१)

Saturday, 9 March 2024

नको रे मना क्रोध हा अंगिकारू....

मना सज्जना... भाग २१ : नको रे मना क्रोध हा अंगिकारू...

-    सुधांशु नाईक

शनिवार ०९/०३/२४

जन्माला आल्यापासून आपण लहानाचे मोठे होत जातो. अनेक गोष्टी नव्याने शिकतो. उठतो, बसतो, चालतो, धावतो... अभ्यास करतो, कामे करतो. कित्येकदा आपण यशस्वी होतो तर कित्येकदा अयशस्वी. ज्या ज्या वेळी आपल्या मनाप्रमाणे काही घडत नाही त्या त्या वेळी मनावर सर्वाधिक पगडा असतो तो क्रोध आणि निराशा यापैकी एका भावनेचा किंवा दोन्ही भावनांचा. काम, क्रोध, मोह, मत्सर आदि गोष्टींचा अतिरेक झाला तर ते मानवाचे सहा शत्रू होऊन जातात असे आपले ग्रंथ सांगतात. मनाचे श्लोक लिहिताना क्रोधाला सर्वात वर ठेवत समर्थ म्हणतात;

नको रे मना क्रोध हा खेदकारी।

नको रे मना काम नाना विकारी॥

नको रे मदा सर्वदा अंगिकारू।

नको रे मना मत्सरु दंभ भारु॥

का बरे त्यांनी क्रोधावर जास्त लक्ष केंद्रित केले असेल ? रागाच्या भरात काहीही करणाऱ्या व्यक्तीला आपण “ तो म्हणजे ना, जमदग्नीचा अवतारच आहे..” असे गमतीने जरी म्हणत असलो तरी जमदग्नी ऋषीसारख्या ज्ञानी व्यक्तीने रागाच्या भरात काय केले हेही आपल्याला ठाऊक असते. क्रोध ही गोष्टच अशी की त्यामुळे आपला सारासार विचारच खुंटतो. एका क्रोधापायी माणूस इतकी चुकीची पाऊले उचलतो की नंतर पश्चात्ताप करून काहीच फायदा नसतो.

छत्रपती संभाजीराजे जेंव्हा सिंहासनावर बसले तेंव्हा कारभाऱ्यांच्या कारस्थानाने उद्विग्न आणि क्रोधित होऊन गेले. प्रसंगी अनेकांना शिक्षा दिल्या. मात्र यातून पुढे जायला हवे, पुन्हा सगळी घडी नीट बसवायला हवी हे सांगण्यासाठी समर्थांनी त्यांना पत्र लिहिले. त्यातील उपदेश हा केवळ राजासाठीच नव्हे तर एखाद्या नेत्यासाठी, कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यासाठी, कुटुंबातील प्रमुख व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त असाच आहे;

कांहीं उग्र स्थिति सांडावी । कांहीं सौम्यता धरावी।

चिंता लागावी परावी । अंतर्यामीं ॥

मागील अपराध क्षमावे । कारभारी हातीं धरावे।

सुखी करूनि सोडावे । कामाकडे ॥

ऐसें सहसा करूं नये । दोघे भांडतां तिसर्यासी जय।

धीर धरोण महत्कार्य । समजून करावें ॥

समय प्रसंग ओळखावा । राग निपटून काढावा।

आला तरी कळों न द्यावा । जनांमध्यें ॥

या ओळी आजदेखील किती समर्पक आहेत ना..!

क्रोध किंवा राग येणे ही नैसर्गिक उर्मी असते. सर्व प्राणिमात्रांच्यात असलेली. त्याच्या मुळाशी मुख्यतः अपेक्षाभंग, अपयश किंवा फसवणूक या घटना असतात. घडलेली वाईट घटना आपण बदलू शकत नाही. ज्यामुळे घडली त्याला प्रसंगी शिक्षादेखील करतो मात्र तरीही माणसे क्रोधाने धगधगत राहतात. हा क्रोध इतरांना त्रास देतोच पण त्या व्यक्तीला देखील हानिकारक असतो असे आता सिद्ध झाले आहे. ज्या गोष्टीमुळे आपल्याला राग येतो त्या गोष्टीकडे अधिक बारकाईने पाहायला हवे. ज्या व्यक्ती किंवा प्रसंग आपल्याला सतत चिडवतात त्या गोष्टी टाळायला हव्यात. अनेकदा एखाद्या दुर्वर्तनी व्यक्तीशी थेट भिडणे किंवा अंगावर घेणे यापेक्षा त्याला पूर्ण टाळणे, संवाद न साधणे किंवा त्याला वळसा घालून आपल्या वाटेने पुढे चालत राहणे जास्त इष्टकारक. 

ज्या गोष्टीमुळे आपल्याला उत्कट आनंद, सुख, शांतता, कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळते तिथे आपण लक्ष केंद्रित केले तर आपोआप मन अधिक प्रफुल्लित होऊन जाते. आयुष्यात राग येणारे क्षण आपण टाळू शकत नाही मात्र ते क्षण आल्यावर कमीत कमी राग येईल किंवा आपल्या रागावर आपण नियंत्रण मिळवणे इतके तर नक्कीच करू शकतो ना?

-सुधांशु नाईक (९८३३२९९७९१)

Tuesday, 5 March 2024

देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी....

मना सज्जना... भाग 19 : देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी....
- सुधांशु नाईक
05/03/24
आज समर्थ रामदास यांची पुण्यतिथी. त्यांना मनापासून वंदन.
निर्भय, नि:स्पृह, नि:स्वार्थी विचारशील आणि लोकांच्या अंगातील रक्त सळसळते राहावे यासाठी आयुष्यभर धडपड केलेले कार्यमग्न व्यक्तिमत्व होते हे. ते सदैव आचार्याच्या भूमिकेतून वावरले असे मला वाटते. अन्याय सहन करावे लागू नयेत यासाठी, लोकांनी स्वतःची आणि समाजाची ताकद वाढवण्यासाठी सदैव खटपट करावी असे ते कायम सांगत राहिले.
त्यांचे आयुष्य किती खडतर असेल हे आता त्यांच्या आयुष्याचा अभ्यास करू जाता वारंवार जाणवते. वयाच्या १२ व्या वर्षी घरातून पळून ते नाशिक /टाकळी परिसरात आले. तिथे माधुकरी मागून एकवेळचे पोट भरले. शारीरिक आणि मानसिक ताकद वाढवण्यासाठी अपार मेहनत घेतली. नाशिक मध्ये त्या काळी किती ग्रंथालये होती, तिथे कोणते ग्रंथ अभ्यासासाठी उपलब्ध होते याची इतिहासात नीटशी नोंद नाही. मात्र समर्थांच्या हातून लिहिले गेलेले साहित्य वाचले की त्यांनी विविध विषयांचा किती अभ्यास केला होता हे त्वरित जाणवते. आज वयाच्या १२-14 व्या वर्षात असणारे एखादे मूल आपल्या आईकडे कितीवेळा “भूक लागली..खायला दे...”असे म्हणत हट्ट करते हे आपण पाहतोच, अशावेळी त्या काळी या १२ वर्षाच्या मुलाने कसे दिवस काढले असतील याची कल्पनादेखील कासावीस करते.
नाशिकमध्ये आल्यावर जेंव्हा विद्याभ्यास पूर्ण झाला असे वाटले तेंव्हा समर्थ भारतभ्रमणासाठी बाहेर पडले. त्यावेळी आसपास अनन्वित अत्याचार चालू असताना ते सर्वत्र हिंडले. नवीन लोक जोडले. आजही केवळ करमणुकीसाठी म्हणून गाडीतून भारत फिरायचा म्हटलं तरी लोकांच्या जीवावर येते मग त्याकाळी लोकसंग्रह आणि बलोपासना यासाठी समर्थ रामदासांनी कसे पदभ्रमण केले असेल याची कल्पना करायला हवी. त्यावेळी मोठी जंगले होती, वन्य श्वापदे होती, शत्रूचे सैनिक होते, चोर –दरोडेखोर होते... या सगळ्यांना तोंड देत त्यांनी केलेले काम जाणवून मन थक्क होते. समाजशास्त्र, मानसशास्त्र, नीतीशास्त्र, राजकारण यासाठी समर्थांनी लिहून ठेवेलेले साहित्य इतके चपखल ठरते की त्यांच्या लेखनातील अवतरणे ४०० वर्षानंतर आजही सहज वापरली जातात. त्याचे मुख्य कारण म्हणजे ते फक्त लेखन नव्हते तर प्रचितीचे बोलणे होते.

समाजाची मानसिकता समजून घेत त्यांना प्रेमाने समजावत उपदेश करण्यासाठी दासबोधासारखा ग्रंथ तर समर्थांनी लिहिलाच पण त्यासोबत सामान्य माणसाला सहज उमगतील असे मनाचे श्लोक लिहिले. सुरेख अशा विविध आरत्या लिहिल्या. गावोगावी कीर्तने, प्रवचने दिली. अंगचे कलागुण विकसित करतांनाच लोकांनी शक्तीची उपासना करावी आणि स्वतः देशासाठी कार्यरत व्हावे यासाठी सदैव प्रोत्साहित केले. आयुष्यभर इतके सारे काम करताना लोकांकडून स्वतःसाठी कोणतीही गोष्ट घेतली नाही. डोंगरात, गुहेत, मंदिरात राहून आयुष्यभर फक्त जनकल्याणाचा विचार केला. समर्थांचा सर्वात विशेष गुण म्हणजे ते पोकळ तत्त्वज्ञान न सांगता अनुभवसिद्ध असे मत कळकळीने सांगत राहतात. त्यामुळे ते मनावर ठसते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, “हे तो प्रचितीचे बोलणे । आधीं केलें मग सांगितले।!
माणसाला नरजन्म वारंवार मिळत नाही या जन्मी असे काही भव्य दिव्य काम करावे ही प्रेरणा इतरांना देताना ते तसेच जगून दाखवतात.
आज देशातच नव्हे तर परदेशात देखील समर्थांचे साहित्य अभ्यासले जाते. लोक त्यातून प्रेरणा घेतात. माणसाने कर्तृत्ववान व्हावे कारण माणसे देहरुपाने नष्ट झाली तरी आपल्या कार्यामुळे अजरामर होतात. त्यापासून स्फूर्ती घेत नवनवीन माणसे उभी रहातात. देश पुढे जात राहतो.
आपल्या जगण्यातून हेच सिद्ध केलेल्या समर्थांची “देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी....” ही ओळ म्हणूनच फार महत्वाची ठरते. प्रेरणास्त्रोत बनून राहते.
-सुधांशु नाईक (९८३३२९९७९१)🌿

Friday, 1 March 2024

सातत्य

मना सज्जना...भाग : 18 : सातत्य
- सुधांशु नाईक
शुक्रवार ०१/०३/२४
शिवाजी पार्कचे ते मैदान. तीन स्टंप रोवलेले. त्यावर एक नाणे ठेवलेले. एक मुलगा फलंदाजीचा सराव करतोय. कितीतरी वेळ ते सुरु असतं. जेंव्हा सत्र संपते, तोवर ते नाणे तसेच असते. एकदाही त्याने आपले स्टंप पडू दिलेले नसतात. एकदाही त्याला चुकवून बॉल स्टंपवर आदळत नाही. सराव संपतो. त्याचे गुरु समाधानाने पुढे येतात, स्टंपवरचे ते नाणे उचलतात आणि त्या मुलाला बक्षीस देतात. अनेकदा असा सराव होत राहतो आणि त्या मुलाकडे नाणी जमा होत राहतात. त्या गुरुचे नाव असते रमाकांत आचरेकर आणि तो मुलगा म्हणजे अर्थातच तुमचा आमचा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर. आपल्या आयुष्यातील अनेक क्षण आजही जपणाऱ्या सचिनने ती नाणी जपून ठेवली आहेत...! सचिन खेळताना एखादा फटका असा काही मारायचा की अवघे स्टेडियम टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमून जात असे. असे सिद्धहस्त होण्यासाठी अचूक प्रयत्न तर लागतातच पण त्यापेक्षा महत्वाचे ठरते ते सातत्य.
तुम्ही जंगलात फिरायला जाताना किंवा अगदी घराच्या आसपास सुद्धा परिसर निरखून पहाता ना? लहानसहान प्राणी पक्षी नित्यनेमाने काहीतरी करत असतात. अगदी क्षुल्लक भासणारा एखादा कोळी आपले जाळे विणत असतो. त्यावेळी तुम्ही कधी त्याचे निरीक्षण केले आहे का? कित्येकदा त्याचा धागा तुटतो, कधी त्यात काही अडथळे येतात मात्र तो हार मानत नाही. नेटाने आपले जाळे पूर्ण करतो. कोळ्याने बनवलेले ते जाळे नुसते पाहत राहायला देखील किती सुंदर भासते कारण त्याला त्याच्या श्रमाचा, सातत्याचा परीसस्पर्श झालेला असतो.
कित्येक शास्त्रज्ञ संशोधन करत असतात. कुणी एखादे उपकरण बनवायचा प्रयत्न करत असतो तर कुणी एखादे औषध. त्यांना हवे तसे निष्कर्ष मिळायला कित्येकदा काही आठवडे जातात तर कधी कित्येक वर्षे. मात्र ते सातत्याने प्रयत्न करतच राहतात. त्यानंतर जेंव्हा यश मिळते त्या यशाची चव अवर्णनीय असते. आपण कोणतेही काम करू गेलो की अडथळे येतात, आळस येतो, औदासिन्य येते, आणि ठरवलेल्या गोष्टीतील सातत्य खंडित होते. अभ्यास, खेळ, कलेची साधना या सगळ्यात असा खंड पडला की आपण पुन्हा शून्यावर येऊन पोचतो. तिथून पुन्हा उठून पुढे जाता यायला हवे.
आपले ध्येय गाठण्यासाठी पुन्हा भरारी घेता यायला हवी. आपल्याच मनाला आलेली मरगळ झुगारून देता यायला हवी. जेंव्हा सातत्याने आपण असे स्वतःला नव्याने बळ देत राहू तेंव्हा प्रगतीची नवनवीन क्षितिजे आपल्याला नव्याने जाणवू लागतील हे नक्की.
- सुधांशु नाईक(9833299791)🌿